सुप्रिया जाण- सोनार
आपल्यावर ओढवलेली परिस्थिती बदलण्याचा इतर कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा सर्व सूत्रं हाती घेऊन खंबीरपणे लढा द्यावा लागतो, परिस्थिती पालटावी लागते. याचा अनुभव शहर आणि गावांतल्या स्त्रिया सतत घेत असतात. सामाजिक कार्यासाठी उभ्या राहिलेल्या प्रत्येक वंचित स्त्रीची कहाणी थोडय़ाफार फरकानं अशीच. साखळी ओढून ट्रेन थांबवावी, तसाच त्यांनी प्रतिकूल परिस्थितीला यशस्वी ‘ब्रेक’ लावला आणि पुढचा इतिहास घडला..
To Stop the Train, Pull Chain प्रत्येक ट्रेनमधलं हे वाक्य अनेकांनी असंख्य वेळा वाचलं असेल, पण त्याचा आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी काही संबंध असेल, असा विचार मनात आलाय कधी? ही साखळी ओढायची असते कठीण प्रसंग टाळण्यासाठी, गाडी थांबावी म्हणून. खरं तर बहुसंख्यांच्या आयुष्यातही अशी एक वेळ येतेच, जेव्हा प्रतिकूल परिस्थितीची साखळी ओढली, त्याला ब्रेक लावला, तरच पुढचा मार्ग सुकर होऊ शकणार असतो; पण प्रत्येकाला ही साखळी ओढणं जमतं का? जमलंय का? तर हो, काही जणींना नक्कीच जमलं आहे. त्यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी साखळी ओढली आणि आज त्यांचंच नाही तर बरोबरीनं अनेकीचं आयुष्य अनुकूल मार्गावर पोहोचलं आहे. अशाच काही जणींच्या या यशकथा.




या आहेत युवा पिढीतल्या, उत्साही तरुणी. सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून काम सुरू केलेल्या. त्यांच्याशी चर्चेचा मुद्दा हा, की त्यांच्या कामातून त्यांना जगण्याचा काही वेगळा अर्थ समजतोय का? त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष आहे का? हे जाणून घेणं. तेव्हा लक्षात आलं, काही जणींसाठी बंधनांच्या धाग्याची वीण घट्ट झाली आहे, तर काही जणींसाठी थोडी सैल झालेली आहे. या तरुणींचं म्हणणं असं, की वस्तीतलं असो, की गावपातळीवरचं काम, हे सामाजिक काम हिरिरीनं करणाऱ्या त्यांच्याबाबतीतला इतरांचा दृष्टिकोन बदलायला हवा. या तरुणींना घरात आणि बाहेर, दोन्ही पातळय़ांवर संघर्ष करावा लागतो. या सगळय़ा जणी या कार्यकर्ता-प्रवाहात आल्या असल्या, तरी मुलगी म्हणून मिळणारी असमान वागणूक, हा धागा सगळय़ांसाठी समानच आहे.
‘आपण या कार्यात का आलो?’ या साध्या प्रश्नापासून आम्ही चर्चेला सुरुवात केली. त्यावर सगळय़ाच एका सुरात म्हणाल्या, ‘‘किमान मुक्तपणे बोलायला तरी मिळावं, म्हणून!’’ रितिका म्हणाली, ‘‘आम्ही स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा घेऊन वस्तीत चर्चा करतो, तेव्हा मुळात अनेक गोष्टी या बंधनं आहेत हेच अनेकींना पटत नाही, जसं संध्याकाळी सातच्या आत घरात येणं, हे त्यांच्याही अंगवळणी पडलं आहे.’’ त्यातही मुलगी ‘अमुक वस्तीतली’ वा ‘अमुक जाती-धर्माची’ असा विषय असेल, तर तिच्यावर काळजीवजा नजर असतेच. तिला हेच सांगितलं जातं, ‘या कारणास्तव तू वेळेत घरी यायलाच हवं.’ या सामाजिक कार्यानं मला काय दिलं, हे सांगताना रितिका म्हणाली, ‘‘मला या कामानं स्वतंत्र ओळख दिली. पूर्वी कुणाची तरी मुलगी, कुणाची बहीण, असंच ओळखलं जात होतं, त्यामुळे नव्यानं मिळालेली स्वत:ची स्वतंत्र ओळख महत्त्वाची वाटते.’’
निकिता काहीशी बंडखोर. तिला कुणाच्या हाताखाली काम करायचं नव्हतं. ती दिसायला गव्हाळ (इतरांच्या मते काळी), धिप्पाड (इतरांच्या मते जाडी). त्यामुळे घरच्यांच्या नजरेत, बोलण्यात कायम भेदभाव व्हायचा. ती आयुष्यात काहीच भरीव करू शकणार नाही, असंही बोललं जायचं. ‘मुलगी झाली’ म्हणून निकिताच्या जन्मानंतर वडिलांनी तिच्या आईला सोडलं. तेव्हापासून तिला आणि तिच्या बहिणीला वाटायचं, की आईला आमच्यामुळे चांगली ओळख मिळेल असं काम करून दाखवायचं. त्यातून तिनं एक स्वप्न पाहिलं. वयाच्या विसाव्या वर्षी बहीण, मामा आणि ‘युवा मंथन’ या उपक्रमातल्या कार्यकर्त्यां मित्रमैत्रिणींच्या मदतीनं स्वत:च्या वस्तीतच एक हॉटेल सुरू केलं. ज्यांनी आधी नावं ठेवली होती तेच लोक आता तिथे जेवायला येतात. रितिका आणि निकिता वस्तीतल्या युवक-युवतींचं संघटन बांधणं, त्यांचे प्रश्न शोधणं, मोकळेपणानं बोलण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणं, अशी कामं ‘युवा मंथन’च्या माध्यमातून त्यांच्या भागात करतात.
या दोघींना जिनं या कामात जोडून घेतलं होतं, ती सुषमा सांगू लागली, ‘‘आपली स्वप्नं आपण बघतो, की ती आजूबाजूचं जग आपल्याला दाखवत असतं? म्हणजे मला आधी वाटायचं की पोलीस व्हावं. त्यासाठी पोलीस अकॅडमीसुद्धा जॉइन केली, पण प्रॅक्टिस सुरू असताना जाणवलं, की हे माझं स्वप्न नाहीये. जगानं मनावर बिंबवलेलं स्वप्न आहे. मग मी परत निघून आले.’’ आज युवकांबरोबर काम करताना मुलामुलींचे पालक ‘तू आहेस ना त्यांच्याबरोबर!’ असं म्हणत विश्वास व्यक्त करतात, तेव्हा काय वाटतं हे तिला शब्दांत सांगता येत नाही. सुषमाच्या घरी त्या चार बहिणी आणि त्यांची आजी हे कुटुंब. घरात पुरुष नाही म्हणून लोकांच्या टोचणाऱ्या नजरांचा कायम सामना करावा लागला. सुषमाचं स्वप्नं बघण्याबद्दलचं हे मत आपल्याला विचार करायला भाग पाडतं. ज्या पद्धतीनं आपला भोवताल लंग, जात, धर्म अशी वेगवेगळी भिंगं लावून आपल्याला पाहात असतो, आपणही नकळत तीच भिंगं लावून इतरांकडे बघायला लागतो. सुषमा इयत्ता चौथीपासून वस्तीत काम करणाऱ्या संघटनेशी जोडली गेली. म्हणून कदाचित तिला तिचं स्वत:चं भिंग लवकर सापडलं. त्याचा उपयोग ती मुंबईत ‘युवा मंथन’च्या युवकांबरोबरचे विविध उपक्रम करण्यासाठी करतेय.
आणखी एक मैत्रीण रोहिणी. तिचं म्हणणं असं, ‘‘ज्या वेळी ठसठसणारा चटका लागतो, त्या वेळी आपण सामाजिक कामाकडे वळतो.’’ दहावीत असताना रोहिणीला आलेले काही वाईट अनुभव, यापासून तिनं ‘राइट टू पी’च्या- अर्थात स्त्री-स्वच्छतागृहांसाठीच्या चळवळीत घेतलेला सहभाग, असा तिचा प्रवास आहे. ही चळवळ मुंबईच्या बाहेरही घेऊन जावी असं तिला वाटतं. तिनं समाजकार्य या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. मुंबईत आणि इतर महाराष्ट्रातही शाळेतली मुलं आणि शिक्षकांबरोबर लंगाधारित भेदभाव या विषयासंदर्भात काम केलं. सुषमा आणि रोहिणी यांनी फक्त युवतीच नाही, तर युवकांबरोबरही काम करण्याची प्रक्रिया उभी केली आहे.
सायमाचं सामाजिक कामात येणं ही तिच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. ती म्हणते, ‘‘मुस्लीम घर से लडकियों को बाहर जा के बस्ती मे काम करना आसान नही था। लोग बोलते थे, ‘माँ भी महिला मंडल में गई, और बेटी को भी लेके गयी’। लडकियोंको हमेशा शक की नजर से गुजरना पडता हैं।’’ महिला मंडळाचं काम म्हणजे घर तोडण्याचं काम अशी भावना असणारे लोक अजूनही आपल्या आजूबाजूला आहेत. मुली, स्त्रिया बोलत नसतात तोपर्यंत सर्व काही ठीक असतं. त्या बोलायला लागल्या की त्यांना ते सहन होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सायमाची आई यास्मिन स्त्रियांना सहन करावी लागणारी घरगुती हिंसा कमी व्हावी यासाठी महिला मंडळाच्या माध्यमातून काम करते. या मायलेकींनी स्वत:च्या घरात या प्रकारचा हिंसाचार अनुभवला आहे. स्वत:ला जे सहन करावं लागलं, ते इतर कुणालाही सहन करावं लागू नये, म्हणून माय-लेकी घराबाहेर पडल्या. सायमा मुस्लीम युवकांचं संघटन, त्यांचे रोजगाराचे प्रश्न, स्कॉलरशिप, मानसिक आरोग्य, अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांच्याशी संवाद साधते. हल्लीच तिनं ‘सेक्स म्हणजे काय’ (अर्थात सेक्स या गोष्टीला असलेले सामाजिक संदर्भ) या विषयावर ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या मीडिया फेलोशिपच्या माध्यमातून लघुपट बनवला. एका मुस्लीम मुलीनं ‘सेक्स’ या विषयावर तिच्या वस्तीतल्या लोकांचं मत समजून घेणं हे काम अवघडच. हा लघुपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या कार्यक्रमात तिच्या आईनं लेकीच्या धैर्याचं कौतुक करणं हेही विशेष. यानं सायमाला पुढच्या प्रवासात कसं बळ मिळालं, हे ती सांगते.
बिनधास्त बोलणारी किरण. तिनं ‘मास्टर्स इन डिसअॅबिलिटी स्टडीज्’ ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिला दहावीला उत्तम गुण होते. पोलीस व्हायची इच्छा होती; पण घरूनच विरोध आणि लढाई सुरू झाली. तिला अनेक प्रश्न पडायचे, पण उत्तरं सापडत नव्हती. तीही ‘राइट टू पी’ अभियानाशी जोडली गेली. ‘जेंडर’ (अर्थात लंगाधारित भेदभाव) काय असतं हे समजल्यावर तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अगदी घरातही साध्या साध्या वाटणाऱ्या किती तरी गोष्टी खरं तर लंगाधारित भेदभावाच्या होत्या. उदा. तिला नेहमी जेवण स्वत: वाढून घ्यावं लागायचं, पण भावांना वाढून दिलं जायचं, अगदी बारावीपर्यंत तिच्या हातात टीव्हीचा रीमोट कधी दिला जात नसे वगैरे. ती कुटुंबातली पहिली शिकलेली मुलगी. तिला जेव्हा समाजकार्यात पदवी घ्यायची होती, तेव्हा तिची फी १२ हजार रुपये होती, तर भावाच्या अभ्यासक्रमाची फी होती ५० हजार रुपये; पण भावाची फी आधी भरली गेली आणि तिला मात्र इकडून तिकडून पैसे जमवावे लागले. खूप रडारड करावी लागली. किरण म्हणते, ‘‘अशा वेळी आयुष्याच्या धावत्या ट्रेनची साखळी ओढावीशी वाटते.. कधी कधी ओढता येते, पण अनेक वेळा गाडीत बसून तसंच पुढे निघून जावं लागतं.’’ किरणनं स्त्रीवर ओढवणाऱ्या परिस्थितीला रेल्वे ट्रेनच्या साखळीची दिलेली उपमा सर्वानाच पटत होती. त्यातून चर्चेचे दुसरेही पैलू उलगडू लागले.
रितिका सांगत होती, ‘‘मला घराच्या जबाबदारीतून जेवढा वेळ मिळतो तेवढंच मी सामाजिक काम करू शकते. अनेकदा वाटतं, की पूर्णपणे झोकून देऊन काम करायचं; पण करता येत नाही. मला फिरायला आवडतं; पण मला ते स्वातंत्र्य नाही. मी कुणाबरोबर बाहेर जायचं ते घरचे ठरवतात.’’ रोहिणी सांगते, ‘‘मी कुणाबरोबर लग्न करायचं हे ठरवलं, तेव्हा घरच्यांचा विरोध होता; पण मी न जुमानता साखळी ओढली. माझा निर्णय योग्य होताच; पण नंतरही मला तो सातत्यानं सिद्ध करावा लागला. आता परिस्थिती सुधारली आहे.’’ सुषमानंही परिस्थितीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी साखळी ओढली, ती तिला मासिक पाळी आली तेव्हा. तिचं जीन्स, शॉर्ट्स घालणं बंद होऊन पंजाबी ड्रेस,ओढणी हा पेहराव आला होता. रात्री झोपतानाही ओढणी हवीच! नाही तर जवळच राहणाऱ्या मामाकडून मार मिळायचा. सुषमाला गुदमरायला व्हायचं. एकदा डोंगरावरून पाणी आणताना त्या ओढणीमुळे सुषमा पाय घसरून पडली. डॉक्टरकडे जायलाही पैसे नव्हते. मग तिनं ठरवलं की, ‘छाती दिसेल’ म्हणून ओढणी घेणं आता बंद! तोच अनुभव निकिताचा. तिनंही ओढणी वापरणं बंद केलं.
विद्या, श्रद्धा या उस्मानाबादच्या. लंगभेद कमी व्हावा यासाठी शाळांमध्ये मुलं आणि शिक्षकांबरोबर, एकूणच गावाबरोबर काम करतात. दोघींचा बालविवाह झाला, मुलं झाली, नवऱ्यानं दारूवरचं प्रेम आणि बायकोला मारहाण थांबवली नाही. या दोघींनीही साखळी ओढून- अर्थात परिस्थिती आपल्या हातात घेऊन अत्याचाराला पूर्णविराम दिला. स्वतंत्र राहू लागल्या. एकीला कुटुंबानं आधार दिला, दुसरीला मात्र घर सोडल्यामुळे जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. श्रद्धासाठी घर सोडणं, ती साखळी खेचणं सोपं नव्हतं. त्यासाठी गल्ला (घरातला पैसे साठवलेला डबा) फोडावा लागला, कारण सतत कुटुंबाकडे लक्ष देताना तिच्या गाठीशी काहीच पैसे उरले नव्हते. स्वातीही या दोघींबरोबर काम करणारी. तिला एकदा सरकारी कुटुंब सल्लागार स्त्रीनंच ऐकवलं होतं, ‘‘ मला ५०-६० हजार रुपये पगार असूनही मी घरातलं सगळं काम करते. मग तू का तुझ्या नवऱ्याला घरात कामाला लावतेस?’’
राणीनं तर जिल्ह्याचं ठिकाण कधी पाहिलंच नव्हतं; पण आज ती पाच जिल्ह्यांचं काम करते. ती विदर्भातल्या ज्या आदिवासी समूहातून आली, तिथली पदव्युत्तर शिक्षण घेणारी ती पहिली मुलगी. आदिवासी समूहांबरोबर वनहक्क, ‘नरेगा’ योजना आणि विविध मुद्दय़ांवर ‘ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रमा’अंतर्गत ती काम करते. युवकांबरोबर संवाद करत राहायला हवं असं तिला ठामपणे वाटतं. समाजानं तिला खूप नावं ठेवली. ‘लग्न न करता एवढं बाहेर राहून का शिकायचंय? शेवटी चूल आणि मूलच करायचं आहे ना,’ ही शिकवण; पण कामातून तिची समज तयार झाली आणि घरातल्यांशी संवाद साधण्यासाठी आधार मिळाला. त्यामुळे तिचे बाबा जेव्हा आता लोकांना सांगतात, ‘ती ठरवेल तिला काय करायचंय, कधी लग्न करायचंय ते.’ तेव्हा आपणही शिक्षणासाठी बाहेर जाता यावं म्हणून परिस्थितीची साखळी ओढली, याचं तिला समाधान वाटतं. सामाजिक कामात आल्यामुळे आपण आधी माणूस आहोत ही जाणीव तिला झाली; पण आजही ती जेव्हा फील्डवर असते तेव्हा हे प्रश्न येतातच- ‘तुम्ही एकटय़ाच आहात का?’ किंवा ‘कुणी पुरुष नाही का? रात्रीचा दुर्गम भागातला प्रवास एकटीनं कसा कराल?’ ‘‘पुरुष कार्यकर्त्यांना असे प्रश्न विचारले जातात का? तर नाही. ही मानसिकता बदलायला हवी,’’ असं ती म्हणते.
या सगळय़ा जणींना स्त्री म्हणून त्यांच्यावर आलेल्या बिकट परिस्थितीत साखळी ओढण्याचं, ब्रेक लावण्याचं बळ दिलं ते त्यांच्याच अनुभवांनी. दुसरा उपायच नव्हता त्यांच्यासमोर. संघटनेनं त्यांना साथ दिली. यापुढेही कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक, संस्था, शासन या सर्वानी अशा युवतींना पािठबा आणि बळ दिलं तर साखळी ओढणारे असंख्य हात पुढे येतील.
‘ग्रासरूट फेमिनिझम’च्या पटलावर युवा स्त्रियांची सक्षम फळी तयार होतेय. त्यांचा सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन काम करण्याचा प्रवास सुरू झालाय. त्या उपमा देतात तसं, त्यांनी ‘साखळी ओढून गाडी थांबवली’. भविष्यातल्या सामाजिक बदलांसाठीची ही नांदीच आहे..
coro.grassrootfeminism@gmail.com