डॉ. सुजाता खांडेकर

स्त्रियांच्या अनेक प्रश्नांचं मूळ त्यांना लहानपणापासून मिळणाऱ्या असमान वागणुकीत, त्यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या समर्पणाच्या संस्कारात आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

‘तुझं जीवन तू समरसून जगावंस यासाठी नाहीये,’ हे मुलींना अनेक रुढी-रीतींमधून अप्रत्यक्षपणे सांगितलं जातं. हा अन्याय एवढा सामान्य होतो की, ‘बाईचं जगणं असंच असतं,’ या समजासह बहुतेक स्त्रिया विविध रूपांतील शोषणाला सामोऱ्या जातात. मोठय़ा शोषणाबद्दल आवाज उठवताना ‘समाजमन बदलायला हवं’ हा केला जाणारा कंठशोष पुरेसा नाही आणि किती सूक्ष्म अनुभवांपासून बदल घडवायला हवा, याचंच हे निदर्शक. 

पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांवरच्या हिंसेच्या, दडपणुकीच्या उदाहरणांवर सतत चर्चा होत असते आणि व्हायलाच हवी; पण बऱ्याचदा या चर्चा हुंडाबळी, बलात्कार, मारहाण, टोकाचा मानसिक दबाव, अशा स्पष्टपणे दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या उदाहरणांभोवतीच फिरतात. या घटनांपर्यंत पोहोचवणारा जो प्रवास असतो, तो चर्चिला जात नाही. आयुष्यभर छोटय़ा, सहज, निर्विवाद वाटणाऱ्या मान्यता आणि व्यवहारांच्या साखळीतून अशा घटनांसाठी पोषक परिस्थिती निर्माण होते. असे व्यवहार जाणीवपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने घडवलेले किंवा केलेले असतात. कळत-नकळत आपण सगळे मिळून त्यात सहभागी असल्याचं लक्षातही येत नाही. परिणामी, या व्यवहारांचा भस्मासुर होतो, तेव्हा ‘बदल अशक्य आहे,’ अशी केवळ निराशेची भावना मूळ धरते; पण ही निराशा आता आशावादात बदलत चालली आहे, हेही तितकंच खरं.

  स्त्री-पुरुष विषमतेचं वास्तव कसं बदलता येईल याबद्दल आता बोलायला हवं. निर्विवाद वाटणाऱ्या रूढी, परंपरांकडे सजगपणे बघायला लागणार आहे. व्यवहार, रीती, चुकीच्या धारणांमध्ये बदलण्यापूर्वीच त्यातल्या बदलाची शक्यता चोखाळायला लागणार आहेत. नेतृत्व विकास प्रक्रियेतल्या स्त्रियांबरोबर गप्पा मारताना लहानपणी समाजाची रीत म्हणून निर्विवाद वाटलेले अनेक अनुभव त्यांच्या नवजाणिवांच्या ‘स्कॅनर’खाली आले.

शीला पवार मुंबईच्या वाशीनाका वस्तीत वाढलेल्या. त्यांच्या भावाचा वाढदिवस पाहुण्यारावळय़ांसहित सजावट, गोडधोड करून जंगी पद्धतीनं साजरा व्हायचा; पण शीला आणि त्यांच्या बहिणीचा वाढदिवस कधी साजरा झाला नाही. ‘‘भावाच्या वाढदिवसाला खूप आनंद, मजा वाटायची आणि आमचाही वाढदिवस साजरा व्हावा असं वाटायचं; पण सांगण्याचं धैर्य नव्हतं आणि ऐकणारंही कोणी नव्हतं.’’ त्यामुळे लहानपणापासून कमीपणाची भावना मनात नकळत रुजल्याचं शीला सांगतात. मुमताज शेख आज महाराष्ट्रभर स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करतात. सात वर्षांचं वय असताना त्यांना आणि आईला सोडून, वडील नऊ वर्षांच्या भावाला बरोबर घेऊन गेले. मुमताज मुलगी असल्यानं त्यांना वडिलांनी नेलं नसल्याची चर्चा शेजारीपाजारी मुमताजसमोरच करायचे. त्या सांगतात, ‘‘मुलगी असणं वाईट आहे, हे लहानपणापासूनच मला कळलं होतं. नऊ वर्षांची असल्यापासून १३ जणांचा स्वयंपाक करून मी दीड किलोमीटर चालून शाळेत जायचे. पण नववीत शाळा सोडावी लागली.’’   

 घरकाम आणि भावंडांचा सांभाळ, ही मुली शिक्षणातून गळण्याची प्राथमिक कारणं आहेत. मुलींचं शिक्षण मुलांइतकं महत्त्वाचं नसल्याची सार्वत्रिक भावना यात निर्णायक ठरते. वर्षांनुवर्ष आपण याबाबतचे अहवाल वाचून काळजी, दु:ख व्यक्त करतो; पण गळतीच्या मुळाशी असलेल्या समाज-जाणिवांवर गंभीरपणे विचार करतो का? या जाणिवा, रीती, प्रघात बदलायचा विचार, प्रयत्न व्यक्तिगत किंवा सामूहिक पातळीवर करतो का?..

कमल मते या ४९ वर्षांच्या, मराठा समूहातल्या. त्या सांगतात,‘‘अकरा-बारा वर्षांची असल्यापासून मला मुलांबरोबर विटीदांडू, दगडगोटय़ा, सूरपारंब्या, लगोऱ्या, क्रिकेट खेळायला आवडायचं; पण आजी म्हणायची, की मुलीनं ‘भांडे-भांडे’ खेळलं पाहिजे. मी जरा धसमुसळी होते, मग ‘पोरगी वयात आली. सांडासारखी पोरांमध्ये उडय़ा मारती.. हे शोभतं का?’ असं आजी विचारायची. आईनं मला कपडय़ाचा काष्टा करण्यास शिकवलं. लहानपणीसुद्धा कायम पोलकं आणि मोठा परकर घातला, फ्रॉक नाही. बसताना चुकून मांडी दिसली, की मांडीवर चापटय़ा बसायच्या. मी म्हणायचे की, ‘पोरांनापण मारा! पोरं हाफ चड्डी घालतात, त्यांच्या मांडय़ापण दिसतात..’ आजी म्हणायची, ‘मुलीच्या जातीची टाचसुद्धा परपोशाला (परपुरुषाला) दिसली नाही पाहिजे. आपण आपल्या मापातच राहिलं पाहिजे.’ त्यामुळे रात्री परकराचा काष्टा करून झोपावं लागायचं. चिडचिड व्हायची; पण मुलीनं असंच वागायला हवं हे मात्र डोक्यात बसलं. माझ्या आत्याला तिची तीव्र इच्छा असूनही शेवटपर्यंत सायकल शिकू दिली नाही.’’

नाशिकचे सहकारी संतोष जाधव सांगतात,

‘‘त्यांच्या बचतगटात ७० वर्षांच्या आजी आहेत. एके रात्री कोणी बघत नाही याची खात्री करून त्या बर्फीवाल्याकडे गेल्या. पदरात लपवलेली नाणी देऊन त्यांनी मलई बर्फी विकत घेतली आणि घाबरतच ती तिथल्या तिथेच खाऊन टाकली.’’ अनेक स्त्रियांना आयुष्यभर असं भीतीनं, मन मारून का जगावं लागतं?

अशी बंधनं घालून, इच्छा मारायला लावून आपण मुली आणि स्त्रियांचं माणूसपण हिरावून घेतो हे जाणवतं का? मांडय़ा दिसू नयेत म्हणून डोळय़ांत तेल घालून जपणाऱ्या आई-आजी लहान मुलींनी त्यांचं लैंगिक शोषण झाल्याचं सांगितलं तर काय करतात? माझ्यासकट अनेक स्त्रिया लहानपणी अशा अनुभवातून गेल्या आहेत. आम्ही कोणीही घरात याबद्दल आईलाही सांगितलं नव्हतं. आपल्यावर कोण विश्वास ठेवणार, आपल्याबरोबर असं घडलं म्हणजे आपल्यातच काही तरी खोट असणार, या जाणिवेनं कोणीच याची वाच्यता केली नाही आणि करत नाहीत. ही जाणीव कोणी व कशी तयार केली? विश्वासाच्या मैत्रिणी मिळाल्यावरच आम्ही मोकळेपणानं याबद्दल त्यांच्याशी बोललो. चारित्र्य सांभाळण्याच्या चुकीच्या कल्पना आणि त्याचं अवाजवी ओझं आपण मुली आणि स्त्रियांवरच टाकल्याचा विचार मनात येतो का? असं ओझं लादणं हीदेखील हिंसा आहे ना?

 ललिता धनवटे नवी मुंबईच्या. त्या सांगतात, ‘‘मी वडार समूहातली. आमच्यात ४-५ वर्षांच्या मुलींच्या कपाळावर आणि हातावर गोंदवतात. मुली हरवल्यावर शोधायला उपयोग होतो, असं सांगतात. मुलांना गोंदवत नाहीत. फक्त मुलीच का हरवतात? मुलगे हरवले तर कसे शोधत असतील? असं मला वाटायचं. सुवासिनींच्या गळय़ात मंगळसूत्र, तसं वडार समूहातल्या मुली आणि स्त्रियांचं गोंदवून घेणं. मला गोंदवून घ्यायला कधीच आवडलं नव्हतं. गोंदवण्याची प्रक्रिया वेदनादायक असायची; पण ‘गोंदणाशिवाय नांदवणं नाही’ हा नियम.’’

मस्तानबी शेख बीडमधल्या एकल महिला संघटनेतल्या. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्यात स्त्रियांनी नेहमी एकदम टापटीप राहायला हवं, असं सांगितलं जातं; अगदी मेकअप करून! पण त्यांनी तो मेकअप नवऱ्याशिवाय कोणालाही दाखवायचा नाही. ही दुहेरी गोष्ट मला नेहमीच खटकत आली आहे.’’ फक्त नवऱ्याच्या बायकोवरच्या संपूर्ण अधिकाराची ही झलक. 

 लग्न या कल्पनेत तर ‘संपूर्ण समर्पण’च अभिप्रेत आहे. नीलम शेंडगे या माणमधल्या. त्यांचं लग्न सोळाव्या वर्षी झालं. त्या सांगतात, ‘‘मी कराटेमध्ये चॅम्पियन होते! सरावासाठी शिक्षक आणि मुलांबरोबर जादा वेळ असायचे. मी कोणाच्या प्रेमात पडण्याच्या भीतीनं चुलते आणि आईनं माझं लग्न लावून दिलं. नवऱ्याचं घरदार, शिक्षण, नोकरी, घरातलं वातावरण, काहीच बघितलं नाही. सासरी माझी सर्व सर्टिफिकेट्स, मेडल्स फाडून-जाळून टाकली. लग्नानंतर मासिक पाळीत गुरांच्या गोठय़ात झोपावं लागायचं. अंगावर गोमूत्र शिंपडलं जायचं आणि तिसऱ्या दिवशी शरीरशुद्धीसाठी गोमूत्र प्यायला दिलं जायचं. पाचव्या दिवशी घरातल्या कुणा स्त्रीनं आंघोळ घातल्यावरच घरात जायचं. आता मी हे सर्व बंद केलं आहे.’’      

 आईवडिलांनी प्रामुख्यानं जात बघून निवडलेल्या मुलाशी लग्न करण्यात आपल्या आवडीनिवडीचं समर्पण, मग सासरी सगळय़ांशी जमवून घेताना स्वत:च्या इच्छांचं समर्पण, शरीरावरच्या अधिकाराचं समर्पण, कसलाही त्रास गपगुमान सहन करण्याची अंगवळणी पडणारी सवय, नवरा आपल्याला सोडणार नाही ना, या भीतीत राहण्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्याचं समर्पण, मुलांना वाढवताना स्वत:बद्दलचे सर्व विचार दूर ठेवण्याचं समर्पण.. ही जंत्री संपणारी नाही आणि नवरा किंवा मूल नसेल, तर मग अस्तित्व  समर्पणासाठीच. 

 राजस्थानच्या मैत्रिणी सांगतात, की त्यांच्या येथे पुरुष खुर्चीवर आणि स्त्रिया जमिनीवर बसतात. दोघांसाठी बसायला पाट असतील तर स्त्रियांच्या पाटाची उंची कमी! पुरुष चटईवर बसले, तर बायका जमिनीवर. पातळीचा फरक पाहिजेच. स्त्री आणि पुरुषांची पातळी, सन्मान वेगळा दाखवण्याची ही मान्यता सार्वत्रिकच आहे. म्हणूनच कित्येक सरपंच स्त्रिया जमिनीवर आणि उपसरपंच पुरुष सरपंचाच्या खुर्चीवर बसतात. खाली-वर बसण्यात एवढा कसला अन्याय, अशाच विचारानं आपण दुर्लक्ष करतो ना? मात्र राजस्थान, महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यां स्त्रियांनी झगडून सरपंच स्त्रीला मानाची खुर्ची मिळवून दिली आहे. 

 पारिलगी स्त्रियांची परिस्थिती आणखीच कठीण. नगरच्या ऋषाली या पारिलगी सहकारी त्यांच्याबद्दल इतरांना असलेल्या तिरस्काराबद्दल सांगत होत्या. ‘‘लोकांच्या नजरेतच तिरस्कार किंवा टिंगल असते. भाडय़ानं घर मिळणं कठीण. आमच्यासाठी सगळं इतरांपेक्षा महाग. उदाहरणार्थ, ६ रुपयांचं अंडं आम्हाला ८ रुपयाला मिळतं. वर ‘तुम्हाला देतोय हेच विशेष समजा,’ असा आविर्भाव.’’

   समाज म्हणून आपण असं का वागतो? स्त्रियांना वागवण्याच्या अशा समाजमान्य रीती योग्यच आहेत अशी श्रद्धा का आहे? इतक्या इमानदारीत त्यांचं अनुकरण आपण का करतो?  आपला समाजव्यवहार म्हणजे स्त्रियांचं दुय्यम स्थान अधोरेखित आणि पक्कं करणाऱ्या अशा अनेक स्पष्ट, अस्पष्ट रीतींची पोतडी आहे. यात सूक्ष्म बारकावे आणि ओंगळवाणे प्रघात आहेत. असंख्य सूक्ष्म, बारकाव्याचे व्यवहार एकत्रित आणि बेमालूमपणे ओंगळवाण्या प्रघातांची रचना करतात; त्यांना समर्थन, प्रतिष्ठा बहाल करतात. आजच्या या लेखांतल्या सगळय़ा स्त्रिया, त्यांच्या नवजाणिवा, त्यातून होणारं चिंतन, त्यामुळे निर्माण झालेली पर्यायी व्यवहाराची बांधिलकी सांगतात. रूढार्थानं ओंगळवाण्या, अतिक्रूर, बटबटीत घटना हतबलता देतात. बदल अशक्य असल्याची मानसिकता तयार करतात; पण अशा घटनांपर्यंत पोहोचवणाऱ्या, सूक्ष्म बारकाव्यांची समज, वास्तव बदलण्याची मानसिकता आणि ताकद देते. यासाठी स्वत:चेच विचार आणि व्यवहार चाचपडावे लागणार, स्वत:लाच प्रश्न विचारावे लागणार.  व्यवहार बदलायचा म्हणजे काय करायचं? मानसिक जडणघडणीच्या काळात रोवली गेलेली बीजं, मूल्यं आयुष्याची ओळख बनवतात. आज तरी संगोपनातून मुलींच्या मनावर रुजवली जाणारी मूल्यं- रुजणारी मूल्यं ‘असमानता, समर्पण, सहनशीलता’ ही आहेत. ती आत्मसन्मान रुजवत नाहीत. उलट अपमान, अत्याचार, हिंसा मूकपणे सहन करण्याचं उदात्तीकरण करतात. हे बदलायला हवं.

मुलीचा जन्म साजरा करायला हवा, त्यांना  मोकळेपणा द्यायला हवा, त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, त्यांची जीवनाची इतिकर्तव्यता चूल-मूल एवढय़ातच आहे, असं न मानता त्यांचं माणूसपण, आंतरिक शक्ती, कौशल्यं यांचा आविष्कार करण्याची मुभा त्यांना मिळायला हवी. माणूस म्हणून व्यक्त होण्यासाठी, कृती करण्यासाठी, नाकारण्यासाठी, प्रोत्साहन मिळायला हवं. मुली आणि स्त्रियांना बाहेर जायला, जग बघायला, इतरांमध्ये मिसळू द्यायला हवं. मुख्य म्हणजे इतरांसारखी त्यांना चुका करण्याची मुभा मिळायला हवी. चुका होतील तेव्हा आईवडील, कुटुंब, समाज म्हणून आपण आधार द्यायला असायला हवं ना!  असं घडण्यासाठी ‘मी बापुडी/बापुडा काय करू शकणार’ असा पळपुटा प्रश्न आपल्याला पडता कामा नये. आजचे स्त्रियांचे अनुभव जात, धर्म, वर्ग, प्रांत यांच्या पलीकडे जातात. म्हणूनच आपण कुठेही आणि कोणीही असलो तरी अन्यायमूलक रीतींना थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो, असा विश्वास वाटतो. स्वत:च्या आयुष्यात याबद्दल जागरूक राहणं, आपल्या भोवतालच्या लोकांना हे पटवून देत राहणं तर शक्यच आहे. आपण सगळेच समाजमान्य रीतींच्या अशा गुन्ह्यात सहभागी असल्यामुळे, बदलाची सुरुवातही आपल्यापासूनच होणार. आपली मानसिकता बदलायला लागली तर समाजमन बदलायची सुरुवात तरी होईल. व्यक्तींची मानसिकता बदलली की सगळं आलबेल होईल, असा हा भाबडेपणा नाहीये. मानसिकता रुजवणाऱ्या संस्थांमध्ये (Institutions) बदल होणं निर्णायक ठरेल. समाजमन आणि संस्थात्मक बदलासाठी स्वतंत्रही आणि एकत्रही प्रयत्न आवश्यक आहेत. समाजमन बदलण्याची सुरुवात ही नांदी असू शकते. 

कवयित्री बहिणाबाई मनाबद्दल लिहितात, तेच समाजमनाबद्दलही खरं आहे. ‘मन एवढं एवढं जसा खाकसाचा (खसखसीचा) दाणा’ अन् ‘मन केवढं केवढं? आभायात (आभाळात) बी मायेना’. आता स्त्रियांच्या बाबतीत खसखशीएवढं असलेलं समाजमन आभाळाएवढं होईल का? आणि केव्हा?..

(या लेखासाठी मुमताज शेख, पल्लवी पालव, सुप्रिया जान, विनया घेवदे यांचे सहकार्य झाले आहे.)

 coro.grassrootfeminism@gmail.com

Story img Loader