डॉ. सुजाता खांडेकर

फेमिनिझम वा स्त्रीवादाचा शब्दकोशातील अर्थ राजकीय, आर्थिक आणि सामाजिक लिंग समानतेचा सिद्धांत, असा आहे. आज काही प्रमाणात जी स्त्री-पुरुष समानता दिसते आहे त्याची बिजं स्त्रीवादाच्या चळवळीतही होतीच, परंतु ही लिंगसमानता काही वर्गापर्यंत अद्याप पोहोचलेलीच नाही. आजही तिथे संघर्षच आहे. आशेची कवाडं किलकिली झालीत, पण दरवाजा सताड उघडायला अजून किती काळ जाणार माहीत नाही. तळागाळातल्या मानल्या गेलेल्या अशा कितीतरी स्त्रिया स्वत:च्या अस्मितेच्या शोधात स्वत:ची पायवाट तयार करत आहेत. इतरांना त्या मार्गावर आणत आहेत. अशाच काही जणींच्या संघर्षांचा, पण यशस्वी प्रवास दर पंधरवडय़ानं.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामाजिक व आर्थिक भूगोल
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…

वाचकहो, या सदरामधून आपण वर्षभर भेटणार आहोत. आजची आपली ही पहिली भेट. या सदरातून आपल्याला वेगवेगळय़ा मैत्रिणी भेटणार आहेत, त्यांची आयुष्यं खूप वेगळी आहेत. त्यांचे अनुभव, त्यांच्या जगण्यात झालेले बदल, त्यांची कारणं, त्यांची समज, त्यांचं काम, यातून आपल्याला त्या कळत जाणार आहेतच, परंतु समाज म्हणूनही आपण कुठे आहोत, नेमका काय बदल घडतो आहे, हेही कळणार आहे. 

बदलाबद्दल सांगताना जरा तपशिलात बोलणार आहोत. व्यक्ती आणि समष्टीच्या बदलासंबंधित काही नवीन प्रक्रिया, नवीन दृष्टी, नव्या जाणिवा आणि कृती कार्यक्रम, याबाबतही यातून चर्चा व्हावी, असा या सदराचा उद्देश आहे. या सदरातून सांगितल्या जाणाऱ्या कहाण्या स्त्रियांच्या असल्यामुळे साहजिकच स्त्री-चळवळीशी याचा काय आणि कसा संबंध आहे हेही अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहेच. ‘ग्रासरूट फेमिनिझम’ त्यांच्या बाबतीत कसं खरं ठरतंय. त्या याच्याशी कशा जोडल्या जात आहेत, हेही आपण पाहणार आहोत. या मैत्रिणी, तळातून, सामाजिक दृष्टीनं अव्हेरल्या गेलेल्या समाजातून, मुख्यत: ग्रामीण भागातून येत असल्यामुळे, हा संबंध समजून घेणं महत्त्वाचं वाटतं. त्याला तशी कारणंही आहेत.  

स्त्री चळवळीनं स्त्रियांच्या स्थानात, विचारांत, अस्मितेत, नातेसंबंधांत, अधिकारांत, लादलेल्या असमानतेत मुळातून बदल होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली, चालना दिली. बराच काळ ही चळवळ एका ठरावीक आवर्तनात अडकलीसुद्धा.. उच्चवर्णीय, उच्चवर्गीय स्त्रियांचं आवर्तन; मुख्यत: स्त्रीशरीराशी निगडित प्रश्नांभोवती घुटमळणारं आवर्तन, ठरावीक पद्धतीनं मांडणी आणि विश्लेषण करणारं आवर्तन, यात ती प्रक्रिया अडकली. त्यामुळे या काळात या चळवळीपासून लांब राहिलेल्या किंवा लांब ठेवल्या गेलेल्या मैत्रिणी आता ही आवर्तनं कशी पार करताहेत हे बघणं लोभस आहे.  

गरिबी, जाती-धर्म यामुळे कुटुंबाची होणारी ससेहोलपट संभाळताना, स्वत:च्या शरीराचे, अस्मितेचे प्रश्न पडायची फुरसतच काही जणांना मिळाली नव्हती, मिळालेली नाही. मात्र आज या मैत्रिणींना वेगळे प्रश्न पडत आहेत, त्याची उकल करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. एक प्रकारे स्त्री चळवळीतली दरी सांधली जातेय. उपेक्षित समाजातल्या स्त्रियांच्या अस्मितेचे, त्यांच्या हक्काचे, जातीमुळे होणाऱ्या कुचंबणेचे प्रश्न आत्ता ऐरणीवर येत आहेत. या प्रश्नांमुळे घायाळ झालेल्या स्त्रियाच आत्मविश्वासानं आणि पद्धतशीरपणे ते मांडत आहेत आणि तडीसही नेत आहेत. स्वत:च्याच जाती-जमातीतील अनिष्ट चालिरीतींबद्दलचा विरोध तीव्रतेनं मांडत आहेत.  

स्त्री चळवळीचं रुजणं वा मुरणं मूर्त स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न या सदरामधून करायचा मानस आहे. ‘ग्रासरूट फेमिनिझम’ची ही उकल आहे. ही प्रक्रिया वेगळी आणि महत्त्वाची आहे. वेगवेगळय़ा टप्प्यांवर एकटीची ताकद अगदीच तोकडी असल्याच्या समजेतून सहजपणे हा प्रवास एकत्रितपणे होत आहे. वेगवेगळय़ा प्रकारची दु:खं त्यांना एकमेकांशी जोडत आहेत. आपल्या ‘power within’ ची जाणीव त्यांना ‘power with’चा विचार करायला लावते आहे, आणि ‘power to change’ प्रभावी होते आहे. 

उपेक्षित समाजातल्या स्त्रियांच्या बदलाचा हा प्रवास आहे. हा बदल छोटा की मोठा हा मुद्दा नाही, या मैत्रिणी करत असलेलं काम छोटं की देदीप्यमान, हाही मुद्दा नाही. स्वत:बद्दल झालेलं नवं आकलन त्या पुढे कसं नेत आहेत, आपली ताकद इतरांशी कशी जोडत आहेत हे महत्त्वाचं आहे. याच प्रक्रियेतून माणूसपण, समानता, न्याय, स्वातंत्र्य या मूल्यांची रुजवात नव्यानं होईल असा विश्वास आहे. ही आताच्या काळाची मोठी गरज आहे.

गेल्या ३० वर्षांहून अधिक ‘ग्रासरूट’ वा तळागाळातल्या मानल्या गेलेल्या मैत्रिणींबरोबर काम करताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. या मैत्रिणींकडे फक्त कृतीचीच ताकद नाही, तर आयुष्याबद्दलचा बदलता दृष्टिकोन आहे, जीवनाच्या अनुभवातून आलेलं शहाणपण आहे, रोजच्या व्यवहारातून मिळालेलं ज्ञान आहे. माझे काही अनुभव फार बोलके आहेत. पीएच.डी. संशोधन मी माझ्या अशाच काही मैत्रिणींबरोबर केलं. ‘स्त्रियांच्या सक्षमतेचा अर्थ काय’ असा त्याचा विषय होता. या मैत्रिणी सहसंशोधिका म्हणून सहभागी होत्या. दोघी जणी मुस्लीम समाजातील, एक पारधी समाजातील, एक मातंग समाजातील, दोन दलित समाजातील, एक मराठा समाजातील आणि मी ब्राह्मण समाजातली अशी आमची टीम होती. यात फक्त तिघी पदवीधारक, बाकी इतर निरक्षर, किंवा सातवीपर्यंत शिकलेल्या. मात्र संशोधनात याची काही अडचण आली नाही. जगण्यातून आलेल्या दृष्टिकोनाचा, शहाणपणाचा अभाव नव्हताच.

   माझ्या या सगळय़ा मैत्रिणींचं बालपण म्हणजे भीषण वास्तव होतं. शाळेत न जाऊ देणं, घराबाहेर पडू न देणं, मारहाण, उपासमार, लहानपणापासूनच पैसे मिळवण्यासाठी काम करावं लागणं, वगैरे. एकीच्या वडिलांनी तर तिच्या आईला आणि तिला ३-४ दिवस कुलूप लावून खिडकी नसलेल्या खोलीत डांबून ठेवलं होतं- त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत सगळे प्रातर्विधी करून, दार उघडल्यावर, ते  गटारात टाकावे लागत होते.. सगळय़ा आठवणी हेलावून टाकणाऱ्या. माझी मात्र प्रत्येक आठवण शाळेशी, शिकण्याशी संबंधित. आई-बाबा कसे सगळय़ा गोष्टीत व्यवस्थित लक्ष द्यायचे, शाळेतल्या बाईंचं प्रेम, मी शाळेत पहिली कशी यायचे, भाषणं कशी करायचे, घरीसुद्धा बहिणीबरोबर शाळा-शाळाच कसं खेळायचे वगैरे..

   मात्र एक गोष्ट आमच्यात सारखी होती. एक सोडून आम्ही सगळय़ा एकल म्हणजे नवऱ्याशिवाय राहात असलेल्या. नाती संपताना, थांबताना, व्रण देणारे अनुभव सगळय़ांचे होते. आम्ही सर्वानी आमच्या आयुष्याचा प्रवास एकमेकींना सांगितला आणि त्याचं विश्लेषणही एकत्रित केलं.  

 माझ्या अनुभव कथनानंतर दोन प्रतिक्रिया आल्या. एकदम विरोधी वाटणाऱ्या. अन्वरी म्हणाली, ‘‘तुमचं आयुष्य किती वेगळं आहे. मला तर शाळेची पायरीही चढू दिली नाही. माझ्या लहानपणी मुलींना शिकवत नसत. मला मदरशातही पाठवलं नाही आणि तुमच्या सगळय़ा आठवणी शिक्षणाच्याच. तुमच्या शिक्षणामुळे तुम्ही आज एवढं काम करू शकता. आपली आयुष्यं खूप वेगळी आहेत.’’ आणि द्वारका, जी पारधी समाजातली असून सातवी शिकलेली आहे, पण तिनंही समाजाची भरपूर निर्भर्त्सना सहन केली आहे. ती म्हणाली, ‘‘मला वाटायचं, मी पारधी आहे म्हणून दु:खी आहे. तुमच्याबद्दल सांगताना तुमच्या डोळय़ात पाणी आलं, तुम्ही तुमचं दु:ख व्यक्त केलं आणि माझ्या लक्षात आलं, की दु:ख तर ब्राह्मण स्त्रियांनाही आहेच.’’. आपल्यामधलं हे सारखेपण आणि वेगळेपण आपण कसं समजून घेणार? मोठे मोठे शब्द न वापरतासुद्धा आपल्या आयुष्यातून, आपल्या अनुभवातून हे कसं कळणार? ‘इंटरसेक्शनालिटी’ या अवघड संकल्पनेचा अर्थ किती सोप्या पद्धतीनं मला मैत्रिणींनी समजून दिला.

   अन्वरी सांगत होती, ‘‘मीटिंग घेताना सगळय़ांना मी काय भोगलं आहे ते सांगते, किती त्रास मला झाला ते सांगत असतानाच त्या वेळी इतरांचा आधार मिळाल्यानं मी त्यातून सन्मानानं कशी बाहेर पडले हे सांगते. ऐकणाऱ्या बायकांना वाटतं, अरे हे तर आपलेच, आपल्यासारखेच अनुभव आहेत. म्हणजे आपणही यातून बाहेर पडू शकू. आणि मग त्या जोडल्या जातात.’’

मी स्त्री चळवळीत काम करताना ‘पर्सनल इज पोलिटिकल’ म्हणजे आपल्या भोगाचे संदर्भ व्यक्तिगत नाही, राजकीय आहेत,’ हे शिकले होते. अभ्यासातूनही हे शिकले, पण अभ्यास न करता, चळवळीत रुढार्थानं सामील न होता अन्वारीला हे कसं कळलं? नुसतंच कळलं नाही, तर तिनं तिचं दु:ख इतरांशी वाटून घेऊन त्याचं सार्वत्रीकरण कसं केलं? आज ती लिंगभाव आधरित हिंसा रोखण्याचं काम सगळय़ांना बरोबर घेऊन कशामुळे करते आहे? या सदरातून अशा काही प्रश्नांवर चर्चा करायची आहे. 

आमच्या संशोधनाच्या वेळी चर्चा करताना मुमताज म्हणाली होती, ‘‘आपण कोणत्याही दुसऱ्यानं, बाहेरून केलेल्या मांडणीला बळी न पडता, आपल्याला काय वाटतं, काय समजलं, काय सांगायचं आहे, यालाच महत्त्व दिलं आहे. दुसऱ्याच्या थिअरीमध्ये आपल्याला फिट करण्याऐवजी, आपण आपल्याला पाहिजे तेच, तसंच इतरांना दाखवतो आहोत आणि हा या संशोधनाचा सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा आहे.’’ तेच आम्ही या सदरातही करणार आहोत.

तळागाळातील लोकांच्या बाबतीत साधारणपणे समज असतो, की या वंचित लोकांना बदलण्याची इच्छाच नसते, ते आळशी असतात, म्हणून त्यांची प्रगती होत नाही वगैरे. हा भ्रम नाहिसा झाला पाहिजे. त्यांच्याविषयीची हेतुपूर्वक, पद्धतशीरपणे आणि सातत्यानं तयार केली गेलेली दुबळी, विस्कळीत ओळख

(weak and fragmented identity) हा वंचितांच्या मार्गातला सगळय़ात मोठा अडसर आहे. हे येणार नाही, हे करायचं नाही, याची परवानगी नाही, हा अधिकार नाही, ते क्षम्य नाही, असे हजारो आणि सतत मिळणारे संदेश.. शब्दांतून सांगून, कृतीतून दाखवून, नाही पाळले तर मिळणाऱ्या शिक्षेतून, या ओळखीची पेरणी होते आणि दिवसागणिक ती मजबूत होत जाते. उपेक्षित व्यक्तीही याच ओळखीला आपलं मानते, विश्वास ठेवते आणि त्यानुसार वागण्याचाच प्रयत्न करते. या विस्कळीत ओळखीची जाणीव माणसाला कायम ‘आपण बळी’च्या मानसिकतेत ठेवते, बदल घडवणाऱ्याच्या नाही. त्यामुळे मग बदल घडवणारं नेतृत्व तयार होणं तर दूरच. मात्र या विस्कळीत जाणिवेवर काम करून त्यांची कुवत, क्षमता जाणवून दिली तर परिवर्तन होणं सहज शक्य आहे.

 आमची मैत्रीण मुमताज, स्वत:वर होणारा कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी २०००मध्येमदत मागायला आली होती. तिच्यात नंतर इतका बदल घडला, की २०१५ मध्ये ‘बीबीसी’च्या, जगभरातल्या लिंगसमानता- विषयक परिणामकारक काम करणाऱ्या १०० स्त्रियांच्या यादीमध्ये तिचा समावेश होता. हा प्रवास महत्त्वाचा आहे. बदल घडवून आणण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असतेच, त्याची जाणीव व्हावी लागते. मदत करणारी इको-सिस्टीम लागते. या सदरात स्त्रीत्वाचे, त्यांच्या नेतृत्वाचे सर्व पदर आपण ते दाखवणाऱ्याच्याच चष्म्यातून बघणार आहोत. या सदरातल्या कहाणी मांडणाऱ्या मैत्रिणी सूत्रधार आणि विश्लेषकही आहेत. आम्ही त्यांचा हा प्रवास पाहाणाऱ्या त्यांच्या ‘कोरो’च्या (CORO) मैत्रिणी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वाचक हो, ते समजून घेण्यासाठी अवघड भाषेची नाही, तर मनोवृत्तीची, जोडलं जाण्याची आवश्यकता आहे.

 या सदराच्या निमित्तानं, तळागाळातील स्त्रियांमधलं शहाणपण आणि ज्ञान यांचं शब्दांकन करण्याची पहिली पायरी आम्ही चढत आहोत याचं भान आहे. तुम्हा वाचकांना कसं वाटतंय, तुम्ही त्यांच्याशी कसे जोडले जाताय ते पाहाणं हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

coro.grassrootfeminism@gmail.com