पल्लवी पालव
सगळय़ा इच्छाआकांक्षा मारून स्वत:ला कोशात बंद करून जगणाऱ्या चित्रलेखा ऊर्फ सुषमा यांची माहेरगावी ‘अमृत कावळेची मुलगी’ एवढीच ओळख होती. सासरीगावी मात्र त्यांच्यातल्या नेतृत्वगुणाला संधी मिळाली आणि त्यांनी थेट सरपंच होण्यापर्यंत मजल मारली. आज त्या ग्रामसंघाच्या अध्यक्ष आहेत. ५० गावांमधून प्रशिक्षकाचं काम करताहेत. स्वत: मनसोक्त जगत इतर अनेकींनाही मोठं करत आहेत. आज त्यांना ‘मॅडम’ म्हणून मान मिळायला लागला आहे, कौतुक होऊ लागलं आहे. त्या जेव्हा माहेरगावी प्रशिक्षणासाठी आल्या तेव्हा त्यांचा आत्मविश्वास पाहून अनेकांच्या तोंडी वाक्य होतं, ‘अमृत कावळेची मुलगी ‘म्याडम’ कधी झाली?..’
पितृसत्ताक किंवा पुरुषप्रधान संस्कृती या शब्दांचा अर्थ बऱ्याच वेळा अत्याचार, मारहाण, बलात्कार, हुंडा अशा स्पष्ट किंवा अतिहिंसक घटनांशी लावला जातो. हा संबंध तर आहेच, पण आपल्या रोजच्या व्यवहारात आणि आयुष्यभर पुरुषप्रधानता कशी शांतपणे हवं तसं नियमन करत असते, ते समजून घेण्याचा अभ्यास भेदक आणि मनोरंजकही आहे. आयुष्यात आपल्याला कशा-कशाला आणि कशामुळे मुकावं लागलं ते समजून घेऊन आपल्याला नाकारलेला आनंद पुन्हा मिळवायचा हे धैर्याचं काम. सुषमा मोहुर्ले (पूर्वाश्रमीच्या चित्रलेखा कावळे) यांची गोष्ट म्हणूनच महत्त्वाची.
चंद्रपूरमधल्या डोंगरगावच्या चित्रलेखा कावळे. तीन भावंडं आणि आई-वडील असं कुटुंब. वेगवेगळय़ा समाजाचा शेजार- माळी, तेली, कापेवार वगैरे. गंमत म्हणजे आपल्या शेजाऱ्यांबद्दल सांगताना सुषमांना आठवतात त्या प्रत्येकाच्या विटाळाच्या रीती. ‘कापेवरांचा मरणाचा विटाळ, तेली-माली यांचा जन्माचा विटाळ, सर्वाचा मासिक पाळीचा विटाळ’ वगैरे.. सुषमा सांगतात, ‘‘मी चौथीपर्यंत खूप हुशार होते; पण अतिगरीब परिस्थितीमुळे कमावण्यासाठी कामाला जायला लागले. अभ्यासाला वेळ मिळेना. वर्गात पहिल्या नंबरात असणाऱ्या मला ‘वरढकल’ व्हावं लागलं. पैसे नसल्यामुळे पुस्तकं विकली. आठवीत शाळा सोडावी लागली. परत शाळेत जा, असं कुणी म्हणालंही नाही. वडिलांची (अमृत कावळे) बंधनं खूप. मला आवडणाऱ्या गोष्टी त्यांना आवडायच्या नाहीत. आई माझ्या बाजूनं बोलली तर तिला मारहाण व्हायची. मग मी एकेक आवडी सोडूनच दिल्या. घराबाहेर जाणं वडिलांना आवडत नव्हतं, म्हणून सोडून दिलं. तबल्याच्या ठेक्यावर स्वत: गाणं गात नाच करत होते, ते सोडून दिलं. पावडर लावणं सोडून दिलं. लोकांसमोर भाषण करायला आवडायचं, पण तेही सोडून दिलं. अनेक गोष्टी सुटल्या. बाहेरच्या कार्यक्रमातलं माइकवरचं बोलणं मी खिडकीत बसून ऐकायचे. लावायला (घालायला) चांगले कपडे नव्हते, त्याची लाज वाटायची. कामाला बाहेर जायला मात्र वडिलांची हरकत नसायची. सगळे निर्णय फक्त वडिलांचे. पहिल्यांदा आणि पोटभर जेवण्याचा मान वडिलांचा आणि भावाचा. घरकाम दोघंही करायचे नाहीत. हे सगळं मला काही तरी वेगळं शिकवत होतं.’’
लहानपणी कुणी आपल्याशी चुकीचं वागलं की, ‘कानफटात देणारी डॅशिंग मुलगी’ असलेल्या सुषमा हळूहळू भित्रट, लाजाळू, कष्टाळू, सहनशील, त्यागी स्त्री बनत होत्या; अगदी सगळय़ांना अपेक्षित असते तशी! सतराव्या वर्षी लग्न झालं आणि ‘चित्रलेखा कावळे’च्या ‘सुषमा मोहुर्ले’ झाल्या. सुषमा सांगतात, ‘‘चित्रलेखा नाव मला खूप आवडायचं, पण सांगणार कुणाला? सासरची आर्थिक स्थिती नंतर माहेरपेक्षाही हलाखीची झाली. सासऱ्यांप्रमाणे नवरा दारूच्या आहारी गेला. संशय, मारहाण रीतसर चालू. त्यात दोन मुली पदरात. मुलींना घरी ठेवून पूर्णवेळ कामाला जाता येईना. असह्य त्रास बघून मला आईवडील न्यायला आले; पण नवऱ्यानं किंवा नवऱ्याला सोडलेल्या स्त्रीला किंमत नसते, म्हणून जायचा विचारसुद्धा केला नाही.’’ मोठय़ा मुलीला बरोबर नेऊन आईवडिलांनी सुषमांचं ओझं हलकं केलं. जंगलातला उपडा (झाडाचा डिंक/ मोहाची फुलं/ तेंदूपत्ता) गोळा करून विकणं हे उदरनिर्वाहाचं साधन. लिहिता-वाचता येत असल्यामुळे स्त्रियांनी उधारीवर (त्यांनीच पैसे भरून) बचतगटाचं सभासद करून घेतलं. मीटिंगवरून यायला उशीर झाला तर नवरा सुषमांना मुलीसकट रात्रभर घराबाहेर ठेवायचा म्हणून बायका घरी सोडायला यायला लागल्या.
बचतगट चालवणाऱ्या ‘अक्षय सेवा संस्था’ आणि त्याचे संस्थापक सुधाकर महादोरे यांच्या प्रोत्साहनामुळे सुषमांचं संस्थेतल्या कामात सहभाग वाढला. त्यांना ‘ग्रासरूट्स’ नेतृत्वाची फेलोशिप मिळाली आणि सुषमांचं क्षितिजच विस्तारलं. आत्मभानाचं एक वेगळं आवर्तन आयुष्यात सुरू झालं. संस्थेचं आणि गावाचंही नेतृत्व त्या करू लागल्या. गावात वाढलेल्या मानामुळे नवराही सुषमांना पाठिंबा द्यायला लागला. मात्र नंतर अतिव्यसनामुळे नवऱ्याचा मृत्यू झाला.
सुषमा यांनी सर्वप्रथम काम हाती घेतलं ते जमिनीचं. बळकावलेल्या जंगल- जमिनी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांबरोबर सुषमांचं काम सुरू झालं. रोजगार हमी कायद्याच्या अभ्यासामुळे रोजगार हमीतून सात गावांमध्ये ८५५ कुटुंबांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. गावातलं काम, यामुळे सर्वाचा पाठिंबा आणि ग्रामपंचायतीत ‘ओबीसी’ स्त्रीसाठी आरक्षण यामुळे सुषमा सरपंच झाल्या. ग्रामसभा आणि महिला-ग्रामसभेचं आदल्या दिवशी स्वत: घरोघरी जाऊन निमंत्रण देणारी ही आगळी सरपंच!
‘अक्षय सेवा संस्थे’च्या पुढाकारानं ‘सामूहिक वनहक्क कायदा (२००६)’अंतर्गत (आदिवासी लोकांना जंगलावरचा हक्क मिळण्याबाबत) १६ गावांत १२६७ हेक्टर जंगल जमीन ग्रामसभांना सामूहिक हक्कातून मिळाली. त्यातून १७ ग्रामसभांचा ग्रामसंघ तयार झाला. सुषमा ग्रामसंघाच्या अध्यक्ष झाल्या. ग्रामसभेच्या सहभागातून तेंदूपत्यांचा लिलाव झाला. ७२ लाख, १३ हजार रुपयांचा तेंदूपत्त्यांचा व्यवहार सुषमांच्या देखरेखीखाली झाला. ग्रामसभांचा फायदा तर झालाच आणि मजुरांना पूर्वी मिळणाऱ्या २३० रुपयांऐवजी दर दिवशी ३८० रुपये मजुरी मिळाली.
पुरुषप्रधान रचनेत स्त्रियांना सतत स्वत:ला सिद्ध करत राहावं लागतं. एक प्रकारची अग्निपरीक्षाच ती! पहिल्यांदा सरपंच झाल्यावर गावातल्या प्रस्थापित विरोधकांनी खोटी तक्रार करून सुषमांच्या निवडीला आव्हान दिलं. एका हितचिंतक वकिलांच्या मदतीनं स्वत: केस चालवून सुषमांनी न्याय मिळवला. सरपंच म्हणून उत्तम कामं केल्यावर परत निवडून येऊनही आणि ‘सर्वसामान्य’(general) श्रेणीमधूनसुद्धा सरपंच होण्याची पूर्ण पात्रता असतानाही नंतरच्या निवडणुकीत प्रस्थापितांमुळे सुषमा सरपंच होऊ शकल्या नाहीत. (मात्र नवीन सरपंच आणि सुषमा विचारविनिमयानं काम करत राहिले). नंतर ग्रामसंघाचं काम उत्तम झालं होतं तरी ‘महिला अध्यक्ष नको’ असं सांगत काही ग्रामसभा संघातून बाहेर पडल्या. नंतर काही स्वगृही परतले, काही नवीनही आले. आता ग्रामसंघ २५ ग्रामसभांचा आहे आणि सुषमाच त्याच्या अध्यक्ष आहेत. बचत गट, वनहक्क, मजूर संघटना, स्त्रियांचा संपत्तीचा अधिकार, शासकीय योजना या निमित्तानं सुषमा ५० गावांमधून प्रशिक्षकाचं काम करताहेत.
आता त्यांच्या प्रवासातल्या व्यक्तिगत आयामाबद्दल. सुषमांचं आत्मभान सामाजिक आणि सांघिक कामापुरतंच मर्यादित नाही. या प्रवासात त्या त्यांच्या स्त्री म्हणून तयार झालेल्या (खरं म्हणजे केल्या गेलेल्या) मानसिकतेची चिकित्सा करत होत्या. पूर्वी मारून टाकाव्या लागलेल्या इच्छा त्यांना खुणवायला लागल्या. सुषमा जाणीवपूर्वक त्यावर विचार आणि कृती करायला लागल्या. पूर्वी घराबाहेर न पडण्याबद्दल स्वत:शी समझोता केलेल्या सुषमा आता संस्थेच्या कामासाठी महाराष्ट्रभर मनसोक्त भटकायला लागल्या. कामानिमित्तानं स्त्री-पुरुषांशी मोकळेपणानं संवाद सुरू झाला. भाषण करायचं, माइकवर बोलायचं, या दबलेल्या इच्छा आता कामाचं अविभाज्य अंग बनल्या. अभ्यास करायचा होता, शिकायचं होतं. मुक्त विद्यापीठातून त्या ‘बी.ए.’ झाल्या. ‘तुमची सून फार घराबाहेर असते,’ असं मुद्दामहून सासूला कुणी म्हटलं, तर ‘‘तिचं काम आहे ना? ऑफिसला जायलाच हवं..’’ असं सांगत त्यांची सासू बोलणाऱ्याचं तोंड बंद करते.
एकदा नेतृत्व विकासाच्या विशेष प्रशिक्षणात लिंगभावाचे (जेंडर अॅटिटय़ूड) वेगवेगळे पदर उलगडले जात होते. स्त्रियांचं शरीराबद्दलचं भान आणि त्यांचं सक्षमीकरण यांच्या संबंधावर चर्चा झाली. लावणी नृत्याचा प्रकार घेऊन सावित्री-आकांक्षा या प्रशिक्षकांनी शरीरभान, लैंगिकता यांवर केलेली चर्चा वेगळा विचार देऊन गेली. लावणीबद्दल शिकताना, तो नृत्य प्रकार करून बघताना सुषमांची लहानपणी दाबून ठेवलेली नृत्याची ऊर्मी पुन्हा उफाळून आली. लावणी नृत्य करताना स्वत:च्या मारलेल्या इच्छांचं, विधवा म्हणून लादलेल्या अपेक्षांचं एक वेगळं भान सुषमांना आलं. त्यांनी मनसोक्त नृत्य सुरू केलं. या प्रशिक्षणात आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली. स्त्रियांच्या शरीरावर नियंत्रण हे पुरुषप्रधान रचनेच्या नियमनाचं केवढं मोठं हत्यार आहे. कधी प्रेमानं, रागानं, दटावून, शिकवून, शिक्षा करून स्वत:च्या शरीराची भीती किंवा घृणा स्त्रियांमध्ये तयार केली जाते. शरीरावर हल्ला होईल म्हणून बाहेर जायचं नाही, लोकांच्या नजरेत येईल म्हणून नाचायचं नाही, पुरुषांची नजर चाळवेल, अमुक असे कपडे घालायचे नाहीत, तमक्या इच्छा करायच्या नाहीत.. या शिकवणुकी- मधली मेख लक्षात आल्यामुळे सुषमांनी चांगले ड्रेस घालायला, नीटनेटकं राहायला सुरुवात केली. थोडक्यात, स्वत:वर प्रेम करायला सुरुवात केली. लहानपणापासून वागवलेलं दडपण उतरवल्यामुळे असेल, त्या आता खूप आनंदी दिसतात, असं सगळे सहकारी सांगायला लागले.
‘ग्रासरूट्स नेतृत्व विकास’ कार्यक्रमातल्या संस्थांच्या एका कार्यक्रमात ५०० च्या वर लोकांसमोर सुषमांनी लावणी नृत्य सादर केलं. ‘‘लावणी हा नृत्य प्रकार आणि हे नृत्य करणाऱ्या कलाकार यांच्याबद्दलचा माझा आदर, मी स्वत: ते नृत्य करून व्यक्त करणार आहे,’’ असं सांगून त्यांनी सादरीकरण केलं. कार्यक्रम संपल्यावर सगळय़ांनी खूप कौतुक केलं. त्यांच्या धाडसाचंही आणि नृत्याचंही.
यादरम्यान सुषमा त्यांच्या माहेरच्या गावी वनहक्काचं प्रशिक्षण करायला गेल्या. त्यांच्या गावात त्या विधवा आहेत, पोटासाठी काही तरी काम करतात, एवढंच माहिती होतं; पण नक्की काय करतात ते माहीत नव्हतं. तिथल्या प्रशिक्षणात सुषमांनी सगळय़ांना कायदा समजावून सांगितला, काय करायचं त्याचे नियम, प्रक्रिया सांगितली. लहानपणीचे सवंगडी भेटले, त्यांनी सुषमांना ओळखलंच नाही. त्यांचा आत्मविश्वास, कायद्यातल्या बारकाव्यांची माहिती, लोकांना सहभागी करून घेण्याची पद्धत, यामुळे गावातली मंडळी आश्चर्यचकित झाली. बैठकीसाठी बाहेरून आलेले सगळे जण, अगदी अधिकारीसुद्धा त्यांना ‘मॅडम’ म्हणत होते. गावकरी एकमेकांना कौतुकानं विचारत होते, ‘अमृत कावळेची मुलगी ‘म्याडम’ कधी झाली?’ सुषमांचे वडीलही हसत, कौतुकानं लावणीचा व्हिडीओ बघत ‘ही माझी मुलगी आहे’ असं अभिमानानं सगळय़ांना सांगत होते.
जगण्याचा हेतू जेवढा स्पष्ट, आत्मभान जेवढं पक्कं, आत्मविश्वास जेवढा अभेद्य, तेवढा लोकांचा पाठिंबा मिळतो. आपल्या मनात कुठला संकोच असेल, तर मात्र तो हजारपटीनं मोठा करून जाब विचारणाऱ्यांची फौज जमा होते, हेच खरं. स्त्रियांची पुरुषसत्तेनं तयार केलेली आभासी ओळख (adopted identity) ही विचारांची स्पष्टता आणि समर्पक कृतीनं पुसली जाऊन नवीन ओळख तयार करता येते, हेच त्यांच्या उदाहरणावरून अधोरेखित होतं.
(या लेखासाठी सुजाता खांडेकर यांचे सहकार्य झाले आहे.)