अनिकेत साठे मूळच्या हरियाणाच्या असलेल्या २६ वर्षांच्या कॅप्टन अभिलाषा बराक या देशाच्या लष्करी हवाई दलातील पहिल्या स्त्री हेलिकॉप्टर वैमानिक ठरल्या आहेत. आतापर्यंत स्त्रियांना दूर असलेले लष्करी हवाई दलातील अशा प्रकारच्या सेवेचे स्वप्न पूर्ण व्हायचा खराखुरा अनुभव घेणाऱ्या अभिलाषा या करिअरची वाट निवडू पाहणाऱ्या अगणित मुलींना प्रेरणा देत आहेत. त्यांचा आणि त्यांच्या कामाचा हा परिचय.. शेकडो हेलिकॉप्टर बाळगणारे लष्करी हवाई दल (आर्मी एव्हिएशन) नेमकं काय काम करतं?.. आघाडीवरील तळांवर रसद पुरवठा करणं, उत्तुंग शिखरांवरील जखमी आणि आजारी जवानांना हवाई रुग्णवाहिका सेवा पुरवणं, तोफगोळय़ाच्या अचूक माऱ्यासाठी अवकाशातून निरीक्षण करणं, पायी भ्रमंती करता न येणाऱ्या भागात गस्त घालणं, विशेष दलांची जलद वाहतूक, हिमालयाच्या शिखरांत अडकलेल्या गिर्यारोहकांची सोडवणूक, स्थानिक प्रशासनाच्या विनंतीनुसार आपत्कालीन सेवा.. ही यादी वाढतच जाते. हल्ला चढवण्याची क्षमता राखणारे ‘रुद्र’ आणि हलकी ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर ताफ्यात समाविष्ट होत आहेत. त्यामुळे युध्दभूमीवर दल आता थेट लढाऊ भूमिकेत उतरेल. शांतता क्षेत्रात काम करताना दलावर इतका भार जरी नसला, तरी नैसर्गिक आपत्तीत बचाव मोहिमांची जबाबदारी मात्र नित्यनेमाने पार पाडावी लागते. या सर्वाच्या केंद्रस्थानी असतो तो हेलिकॉप्टर वैमानिक. या दलाच्या स्थापनेला साडेतीन दशके झाली. ही आव्हाने पेलण्यात आजवर केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली होती. कॅप्टन अभिलाषा बराक यांच्या निमित्ताने पहिल्यांदा स्त्रिया ही जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाल्या आहेत. भारतीय हवाई दलात हे बदल काही वर्षांपूर्वीच घडले. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टरचे सारथ्य करण्याची संधी स्त्रियांना मिळाली. आता त्यांची संख्या वाढतेय. नौदलातदेखील स्त्रिया ‘डॉर्निअर’ आणि ‘पी-८१’ सागरी गस्ती विमान घेऊन आकाशात झेपावत आहेत. मात्र आता लष्करी हवाई दलातील ही उणीव पहिली हेलिकॉप्टर वैमानिक अभिलाषा बराक या २६ वर्षांच्या युवतीने दूर केली. या दलाशी अभिलाषा यांची नाळ खूप आधीपासून जोडलेली आहे. अभिलाषा यांचे वडील सैन्य दलात होते. सियाचीनच्या अमर ते बना चौकीदरम्यान गस्त घालताना खराब हवामानामुळे त्यांची प्रकृती अकस्मात ढासळली. लष्करी हेलिकॉप्टरने त्यांना त्या उंच शिखरावरून तातडीने तळावरील रुग्णालयात नेण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले, ही आठवण आजही अभिलाषांच्या मनात घर करून आहे, आणि ‘आपले अस्तित्वच हवाई दलामुळे आहे’ असेही त्या मुलाखतींमध्ये आवर्जून नमूद करतात. अभिलाषा हरियाणातील रोहतकच्या. वडिलांच्या निवृत्तीनंतर अभिलाषा यांचा भाऊ लष्करात दाखल झाला. तेथील मानमरातब, प्रतिष्ठा पाहून अभिलाषाही या सेवेकडे आकृष्ट झाल्या. अणुविद्युत आणि दूरसंचार विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्या झपाटून तयारीला लागल्या. प्रशिक्षणात घोडेस्वारी, ज्युदोमध्ये पहिले स्थान त्यांनी पटकावले. हवाई वाहतूक, हवाई कायदा अभ्यासातही चांगले गुण मिळवले. हवाई संरक्षण दलातर्फे त्यांना राष्ट्रपतींसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळाली. लष्कराने हेलिकॉप्टर वैमानिकपद स्त्रियांसाठी खुले केले आणि अभिलाषांनी केलेली निवड सार्थ ठरली. हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी १५ स्त्री लष्करी अधिकाऱ्यांची निवड झाली होती. परंतु वैमानिक योग्यता चाचणी (पीएबीटी) आणि वैद्यकीय चाचणी या निकषांतून केवळ दोन जणी पात्र ठरल्या. वैमानिक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘पीएबीटी’ हा महत्त्वाचा टप्पा असतो, कारण त्यावर करिअरचं भवितव्य ठरतं. उमेदवार ही चाचणी केवळ एकदाच देऊ शकतो. सतर्कता, आत्मविश्वास, संभाव्य उड्डाणात मज्जातंतूंवर नियंत्रण, आदींची पडताळणी यात केली जाते. आवश्यक निकष पूर्ण केलेल्या लष्करी अधिकाऱ्यांची वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड होते. हवाई प्रशिक्षणाचा अनुभव नसणाऱ्या या अधिकाऱ्यांना नाशिक येथील ‘कोम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूल’ (कॅट्स) हवाई प्रशिक्षण देते. सुरुवातीला ‘पूर्व सैन्य वैमानिक’ आणि नंतर ‘लढाऊ वैमानिक’ हे दोन्ही शिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणारे हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून लष्करी हवाई दलात दाखल होतात. स्कूलमधून आतापर्यंत शेकडो वैमानिक तयार झाले, परंतु ते सर्व पुरुष आहेत. या वेळी ३७ वैमानिकांच्या तुकडीत अभिलाषा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. या दलाची स्थापना झाली, तेव्हा वैमानिकांची मोठी कमतरता होती. ती दूर करण्यासाठी ‘कोम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूल’ची निर्मिती करण्यात आली. दलाचे काम अधिक्याने तोफखाना विभागाशी संलग्न असते. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांना वैमानिक म्हणून प्राधान्य दिले जाते. दोन्ही प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव मिळतो. स्कूलला एक तासाचे प्रशिक्षण द्यायचे असेल, तर इंधन, हेलिकॉप्टर देखभाल, दुरुस्तीच्या खर्चाचा ताळमेळ केल्यास तो खर्च लाखाच्या घरात जातो. प्रशिक्षण खर्चाचा भार कमी करण्यासाठी मध्यंतरी स्कूलने ‘सिम्युलेटर’- अर्थात आभासी पध्दतीवर लक्ष केंद्रित केले. हेलिकॉप्टरमधून हवाई भरारी न घेता जमिनीवर आभासी पध्दतीने प्रशिक्षणाची सुविधा सिम्युलेटरने उपलब्ध झाली. आधुनिक सामग्रीमुळे रात्रीच्या मोहिमांचे धडे दिले जातात. बचाव कार्यासाठी खास प्रशिक्षण दिले जाते. मध्यंतरी स्कूलमधून हेलिकॉप्टर वैमानिक होऊन दलात दाखल झालेले काही वर्षांच्या सेवेपश्चात लगेच निवृत्ती घेत असल्याचे निदर्शनास आले होते. खासगी क्षेत्रात वैमानिकांना मिळणारे भरमसाठ वेतन हे त्याचे कारण. त्यामुळे वैमानिक तयार करण्यासाठी केला जाणारा खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन लष्करी वैमानिकास १५ वर्षे सेवा बंधनकारक करण्यात आलेली आहे. भारतीय हवाई दल आणि लष्करी हवाई दल यामधील फरकामध्ये अनेकदा संभ्रम होऊ शकतो. भारतीय हवाई दल हे लष्कर आणि नौदलाप्रमाणे विविध आयुधे, शस्त्रसामग्रीने सज्ज असणारे परिपूर्ण दल आहे. त्याच्या भात्यात लढाऊ, मालवाहू विमानांबरोबर हेलिकॉप्टरचा मोठा ताफा आहे. विविध शस्त्र सामग्रीने सज्ज असणाऱ्या या दलाचे आकारमान विशाल आहे. तुलनेत लष्कराचे हवाई दल बरेच लहान असते. त्याची भिस्त केवळ हेलिकॉप्टरवरच आहे. या दलाची स्थापना होण्यापूर्वी लष्कराला दैनंदिन कामांसाठी भारतीय हवाई दलावर अवलंबून राहावे लागायचे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी या स्वतंत्र दलाची उभारणी झाली. आतापर्यंत दलात स्त्री अधिकाऱ्यांना फक्त जमिनीवरील कामाची (ग्राउंड डय़ुटी) जबाबदारी दिली जात होती. अभियांत्रिकी, हवाई वाहतूक नियंत्रण अशा ठिकाणी त्या कार्यरत होत्या. त्यांचे क्षितिज विस्तारले आहे. सीमेवर शांतता असली, तरी सीमावर्ती भागापासून ते देशांतर्गत कायमस्वरूपी सज्जता बाळगावी लागते. दक्षिण भारतात कुठेही नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले, की नाशिकच्या तळावरील हेलिकॉप्टर पाठवली जातात. केरळच्या २०१८ मधील महापुरात बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्याचे आदेश आले आणि रातोरात तयारी करत पथके सकाळी हेलिकॉप्टर घेऊन केरळच्या दिशेने झेपावली. महिनाभर तिथेच कार्यप्रवण राहिली. अशा प्रकारचे काम या वैमानिकांना सोपवले जात असल्याने अनेकांना स्त्रिया ही जबाबदारी पार पाडतील का, याविषयी साशंकता आहे. अर्थात ही तयारी ठेवूनच अभिलाषा आणि त्यांच्या पाठोपाठ दलात येणाऱ्या अन्य स्त्री वैमानिक खडतर, तितक्याच धाडसी मोहिमांवर निघतील. कर्तृत्व सिध्द करण्यासाठी त्यांना काही अवधी द्यावा लागेल, इतकेच. aniket.sathe@expressindia.com