विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पद्धतीनेच वागायची सवय अनेकांच्या अंगवळणी म्हणजे ‘मनवळणी’ पडलेली असते. इतकी की, तो माझा स्वभावच आहे, असं लेबल चिकटवून आपण मोकळे होतो. त्यातल्या कित्येक सवयी या आपल्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या असतात. मग अशा सवयी मोडता येऊ शकतात का? आपल्याच मनाचे खेळ समजून घेता येतात का? हे सांगणारा हा लेख… येणाऱ्या नवीन वर्षाच्या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी सांगितलेल्या या कानगोष्टी!
‘‘मला ना, कोणी बोललेलं, टोमणा मारलेला सहन होत नाही. ऑफिसमध्येसुद्धा लगेच रडायला येतं.’’ गटातल्या एका हळव्या मुलीने लाडिक आवाजात स्वत:ची ‘कानगोष्ट’ समोरच्या जोडीदाराला सांगितली.

‘‘माझ्याकडून प्रत्येक गोष्ट लांबणीवर पडते. कुणाला भेटणं असो, फोन असो, मेसेजसुद्धा राहतो. ताण येत जातो मग हळूहळू त्याचा.’’ एकीने दुसरीला सांगितलं.

‘खेळ मनाचे जाणू या’ या कार्यशाळेच्या गटात हा खेळ चालू होता. त्यामध्ये प्रत्येकाने स्वत:च्या स्वभावातली न आवडणारी, नेहमी सलणारी, कुठलीही एक गोष्ट, थोडक्यात सांगायची होती. आयोजक मितवाने त्याला ‘कानगोष्टी’ असं नाव दिलं होतं. आपली कोणती ‘कानगोष्ट’ सांगावी ते ठरवण्यासाठी सहभागींना थोडा वेळ देऊन तिने कानगोष्ट सांगण्याची पद्धत स्पष्ट केली.

‘‘दोन-दोनच्या जोड्या करून समोरासमोर उभं राहायचंय, जोडीदाराशी हात मिळवायचा आणि थेट त्याच्या वा तिच्या डोळ्यांत पाहात एकाने ‘आपली कानगोष्ट’ सांगायची. त्यानंतर जोडीदारानेही अशीच स्वत:ची ‘कानगोष्ट’ सांगायची. वाटलं तर त्याबद्दल दोघं थोडं बोलू शकता, पण नंतर दोघांनीही पुढे सरकून नवीन जोडीदारासमोर जायचं, हात मिळवून, डोळ्यांत पाहून आपली तीच कानगोष्ट सांगायची, त्याची ऐकायची. थोडा संवाद करून पुढे सरकायचं. प्रत्येकाची प्रत्येकाशी एकदा जोडी झालीच पाहिजे. पंधरा मिनिटांचा वेळ आहे. करा सुरुवात’’, मितवा म्हणाली. त्याप्रमाणे एकाची कानगोष्ट होती, ‘‘मला कुणी आव्हान दिलं तर कितीही अवघड गोष्ट मी जिद्दीने करतो पण एरवी त्याच गोष्टीसाठी आपण होऊन पुढाकार घेत नाही.’’

‘‘मी नेहमी हसतखेळत असतो. पण काही बाबतींत संताप आला की आवरत नाही. माझ्या भावाचा स्वभावही असाच. संतापामुळेच त्याचा घटस्फोट झालाय. त्यामुळे मी मुली वा रिलेशनशिपच्या भानगडीत पडत नाही.’’ एकाने सांगितलं.

सुरुवातीला ‘कानगोष्ट’ सांगताना अडखळलेले लोक नंतर सरावले. ती सांगून झाल्यानंतर गप्पाही सुरू व्हायच्या पण तोपर्यंत पुढची व्यक्ती कानगोष्ट घेऊन थांबलेली असायची, त्यामुळे गप्पा, मस्करी, सल्ला, चर्चा असं होत वीसेक मिनिटांत सर्वांचं सांगून झालं. आता प्रत्येकाचा प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद होऊन सर्वांच्या कानगोष्टी सर्वांना माहीत झाल्या होत्या. सर्वजण जागेवर परतल्यावर मितवा म्हणाली, ‘‘आपली कानगोष्ट सांगण्याआधी आणि नंतर काय घडलं? काय वाटलं? त्या मनातल्या घडामोडींबद्दल आता सर्वांसोबत बोलायचंय.’’

एकाने सुरुवात केली. ‘‘माझ्याकडे अनेक ‘कानगोष्टी’ होत्या. त्या चार लोकांना सांगायच्या कल्पनेनेही भीती वाटली, पण प्रत्येकी अर्धा-पाऊण मिनिटंच मिळणार म्हटल्यावर, गटात सांगण्याजोगी एक छोटी आणि साधी गोष्ट निवडली.’’ त्याने मनातली चलबिचल प्रामाणिकपणे सांगितली. ‘‘आपल्या गोष्टीला लोक हसतील या विचाराने सुरुवातीला अवघडले, पण नंतर मोकळं वाटत गेलं, काही जणांशी फारच मनापासून बोलणं झालं. आपणच नऊ जणांना नजरेला नजर देऊन सांगायच्या गोष्टीला कानगोष्ट म्हणायची मजा वाटली.’’ एकीनं व्यक्त केलं. एक-दोघांनी त्याला दुजोरा दिला.

‘रडायला येतं’ सांगणारी म्हणाली, ‘‘तीन-चार जणांना तेच सांगून झाल्यानंतर माझं मलाच वाटायला लागलं की, कुणी बोलल्यावर वाईट वाटणं स्वाभाविक असलं, तरी मी लहान मुलीसारखं रडते कशासाठी? वर सगळ्यांना हे कौतुकाने का सांगतेय? आज पहिल्यांदा मला रडण्याबद्दल लाजल्यासारखं झालं.’’
‘‘यापुढेही तशीच रडशील?’’ या मितवाच्या प्रश्नावर ती म्हणाली, ‘‘नक्कीच नाही. शेवटच्या जोडीदाराला तर सांगायचाही मला कंटाळा आला. निरर्थक वाटलं. माझी रडारडी माहीत झाल्यावर लोक माझ्याशी जपून बोलतात. म्हणजे रडणं मी सुरक्षा-कवचासारखं वापरते की काय? असंही वाटलं.’’ ती प्रामाणिकपणे म्हणाली.

‘मला आव्हान लागतं’वाला म्हणाला, ‘‘माझी कानगोष्ट ऐकल्यावर एका जोडीदाराने विचारलं, ‘आव्हान मिळालं नाही तर तू कधीच, काहीच करत नाहीस का? की ‘पुढाकार’ आणि ‘पुढे पुढे करणं’ यात गोंधळ होतोय?’ त्यावर मी विचार केला. मला पुढे पुढे करायला आवडत नाही हे खरंच, आव्हान मिळाल्यावर मी जास्त जोर लावतो हेही खरं पण गरज असेल तेव्हा पुढाकारही घेतोच. कधी तरी आव्हानामुळे खूप चांगलं काम केलं असेल तो समज मी मनात धरून ठेवलाय असं स्पष्टच दिसलं. आव्हान, पुढे पुढे करणं आणि पुढाकार तिन्हींच्या घोळातून बाहेरच पडलो चटकन.’’

‘संताप’वाला म्हणाला, ‘‘माझ्या कानगोष्टीनंतर काही जोडीदारांनी ‘संताप कसा चुकीचा’वर प्रवचनं ऐकवली. त्यामुळे मला खेळाचा कंटाळा आला, पण पुढच्या मैत्रिणीने अनपेक्षितपणे प्रश्नांचा भडीमार केला. ‘कशावरून तुझ्या भावासारखाच तुझाही घटस्फोट होईल? ती फक्त एक शक्यता आहे. तुम्ही दोघं वेगळ्या व्यक्ती आहात. नात्यांपेक्षा आपल्या संतापाचं कौतुक मोठं केल्यावर काय घडतं ते तू शिकला असशीलच ना यातून? आयुष्य एकट्याने काढणं अवघड असतं हेही पाहिलं असशील? शक्यताच हवी असेल तर ‘छान जोडीदारासोबत आपण समंजस आयुष्य जगतोय’ अशी का नको?’ तिचे प्रश्न आणि ‘संतापाचं कौतुक’ या शब्दांनी मला साक्षात्कारच झाला जणू.’’

या संवाद-प्रक्रियेमुळे प्रत्येकाच्या ‘कानगोष्टी’कडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन समोर येत होते. कधी इतरांच्या कानगोष्टी स्वत:शी कुठेतरी जुळत होत्या, कधी पूर्णपणे विरुद्ध दृष्टिकोन मिळत होते. कधी प्रश्न पडत होते, तर कधी काही उलगडत होतं.

कामात ‘चालढकल’ करणारी म्हणाली, ‘‘माझ्यासारखी चालढकल बरेच जण करतात हे गप्पांतून कळलं पण एका जोडीदाराने उपायही हातात दिला. तो म्हणाला, ‘चालढकल करण्याची मुख्य कारणं आळस आणि अतिविचार हे माझ्या लक्षात आलं. ‘मी विचार करतोय’ हे बरेचदा आपल्या आळसाचं समर्थनही असतं. हे पक्कं कळल्यावर, आता एखादी गोष्ट मनात येताक्षणी, आळस जागा व्हायच्या आत मी पटकन कृती करतो. म्हणजे समजा, कुणाला भेटायचंय, तर ‘त्यांना या वेळी फोन करावा का?’ वगैरे टाळाटाळ विचार मनात येण्याआधीच, फोन उचलून मी त्यांची वेळ घेतलेली असते. मग ती वेळ पाळणं मला भागच पडतं आणि कामं पुढे सरकतात.’’ सांगणारीने पुढे आपली कृती जोडली, ‘‘मला पुढचा रस्ताच दिसला. मी लगेच एका मैत्रिणीला फोन लावून ‘उद्या पहाटे फिरायला जायचं’ ठरवून टाकलं. आता मला लाजेकाजेस्तव तरी पहाटे तयार राहावंच लागेल. व्यायामाची सुरुवात होईल, मग सवय लागेल. हा ‘युरेका’ क्षण देणाऱ्या मित्राचे मनापासून जाहीर आभार.’’

लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. एकीने मात्र विचारलं, ‘‘कार्यशाळेतला खेळ म्हणून मजा आली मितवा, पण बाहेरच्या जगात आपल्या ‘कानगोष्टी’ सर्वांना सांगत सुटणं हा उपाय नव्हे. खरे प्रश्न वेगळे, मोठे असतात. ते बाहेर सांगणं शक्यही नसतं. शिवाय, आपल्या अडचणी सांगायला दरवेळी कुणाला शोधायचं?’’

मितवा म्हणाली, ‘‘बरोबर आहे तुझं. पण हा छोटासा खेळ ‘सर्व समस्यांवरचे रामबाण उत्तर’ शोधण्यासाठी नव्हताच. एकाच गोष्टीकडे किती वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहिलं जाऊ शकतं ते ‘दिसण्या’साठी, समजून घेण्यासाठी आणि त्यावर विचार करावासा वाटण्यासाठी होता. इतके पर्याय असूनही आपण कसे त्याच त्या दिशेने विचार करत तिथेच अडकून बसतो याचं ‘भान यावं’ हा उद्देश होता.’’

सहभागींपैकी काहींना उलगडत होतं, काही गोंधळले होते. ते जाणवून मितवाने आणखी स्पष्ट केलं. ‘‘मित्रहो, तुमच्या लक्षात येतंय का? आपण सांगितलेल्या ‘कानगोष्टी’ म्हणजे, ‘मनाच्या विचार करण्याच्या सवयी’ आहेत, ज्यांच्याबद्द्ल आपण फारसे जागरूक नसतो. या नकोशा सवयी आपण स्वत:च्याही नकळत स्वीकारलेल्या असतात. म्हणजे बघा ना, संताप, आळस वाईट असतात, सारखं रडू नये अशा अनेक नैतिक किंवा सामाजिक ‘सत्याचं’ सामान्यज्ञान प्रत्येकाजवळ असतंच. तरीही स्वत:च्याच स्वभावातल्या नकोशा सवयी थांबवता का येत नाहीत? कारण विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वागायची सवय अंगवळणी म्हणजे ‘मनवळणी’ पडलेली असते. ‘ते तसंच असणार’ ही चौकट आपणच स्वीकारलेली असते. जसं या मैत्रिणीला कुणी बोललं की तिला रडायला येणारच. किंवा हा मित्र मुलींना टाळणारच. या सवयींचं तक्रारीच्या सुरात आपण नकळत कौतुक करत राहतो, पण सामोरं जाऊन त्याकडे नव्याने बघत नाही. मनाचे खेळ समजून घेताना ही जाणीव-भान (रिअलायझेशन) स्वत:ला येणं महत्त्वाचं.

आजच्या खेळात काय काय घडलं बघू या?

‘स्वत:च्या स्वभावातल्या नावडत्या गोष्टीला सवय, दोष न म्हणता मी ‘कानगोष्ट’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला, त्यामुळे खेळाची मजा आली.
‘आपली कानगोष्ट’ ठरवायला थोडाच वेळ दिल्यामुळे तुम्हाला साधी, सोपी सवय निवडता आली.

कानगोष्ट ‘थोडक्यात’ सांगायची असल्याने विचारात नेमकेपणा आणावा लागला.

सर्वांच्याच मनात असं काहीतरी अडकलेलं असतं हे समजल्यावर भीड चेपली, मोकळेपणा आला आणि स्वत:च्या गोष्टींचा बाऊ करायचा नाही हे पण समजलं.

हातात हात आणि डोळ्याला डोळा भिडवून तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगताना तुम्ही हळूहळू अंतर्मुख होत गेलात. समोरच्याचं मत ऐकताना स्वत:कडे त्रयस्थपणे पाहिलं गेलं.

संवाद आणि प्रश्नांमुळे आपल्या सवयीच्या विचारापेक्षा आणखी नऊ आयाम, पर्याय ऐकायला मिळाले.

थोडक्यात, या प्रक्रियेतून काय काय मिळवलं? आपली त्रासदायक सवय सांगता येण्याची हिंमत, तिच्याबद्दलचं भान, बाहेरून निरीक्षण, आपल्यापेक्षा वेगळे दृष्टिकोन आणि ते समजून घेण्याचा खुलेपणा इतक्या गोष्टी आपण अनुभवल्या. (Courage, Realization, Observation, Other Perspectives and Openness) अशा अनुभवांचं मर्म समजून घेऊन ते वाहनासारखं वापरायला आता शिकायचं. हळूहळू अशा छोट्या कानगोष्टींकडून मोठ्या गोष्टींपर्यंत जाणं जमायला लागतं. मनवळणी पडलेल्या घट्ट सवयी लगेच निघत नाहीतच. पण त्यांचं भान- जागरूकता -‘अवेअरनेस’ आल्यावर नाहीशा होत जातात.

आजचा खेळ म्हणजे ‘एक झलक’ आहे, स्वत:च्या मनाचे खेळ समजून घेण्याची. आपण जागरूक झाल्यानंतर, लोकांना ‘कानगोष्टी’ सांगून पर्याय शोधण्याची गरज उरत नाही. रोज समोर घडणाऱ्या घटना, पुस्तक, चित्रपट, नाटक, वेबसेरीज, संवाद, गप्पा कशातूनही आपल्याला वेगळी दिशा दिसते. ती पाहायला शिकल्यावर हे शिकणं अखंड चालूच राहतं. त्याच्या सरावासाठी आणि ‘मनवळणी’ पडण्यासाठी पुढचं वर्षं, त्याहीपुढची अनेक वर्षं आहेत. आपल्या गतीने समजून घेत पुढे जात राहायचं. त्या समृद्ध होण्याच्या अखंड प्रवासाची ही सुरुवात समजू या.

नवीन वर्षसुरू व्हायला अगदी चारच दिवस राहिले आहेत. तुम्हीही करून बघा हा खेळमित्र-मंडळीत किंवा स्वत:चा स्वत:शीही. तुम्हाला तुम्ही सापडण्यासाठी.

neelima.kirane1@gmail.com