शलाका धाक्रस
आयुष्याचा जोडीदार निवडतानाचं द्वंद मला अजूनही आठवतं. आपला निर्णय योग्य आहे का? आपण दुसऱ्याच्या आयुष्यात कसे रुळू? माझ्या ‘करिअर ॲजस्पिरेशन्स’ तो समजून घेईल का? असे एक ना अनेक प्रश्न.. माझ्या आई-बाबांच्या नोकरीच्या जागा कायम वेगवेगळय़ा होत्या, त्यामुळे घरी कायम तणाव असायचा. यात दोघांचीही फरफट झाली. आईची ती ‘आई’ असल्यामुळे थोडी जास्तच फरफट झाली. या सगळय़ामुळे मला लग्नाबद्दल धाकधूक होती. त्यात मी कायम रूढींना प्रश्न करणारी, धाडसी अन् स्वप्नांचा पाठपुरावा करणारी होते. अशी मी, आज या लेखाच्या निमित्तानं भूतकाळाचा विचार करत गेले, तेव्हा सारं आयुष्य चित्रपटासारखं समोर आलं..
माझा नवरा माझ्या आयुष्यात आला तो दिवस म्हणजे २६ जुलै २००५. आमच्या दोघांचं भेटायचं ठरलं, आणि त्याच दिवशी मुंबईवर प्रलय आलेला. त्यामुळे ती भेट चांगलीच लक्षात राहिली. खरंतर एकमेकांना बघताच आम्ही प्रेमात पडलो. जात एकच असली तरी घरांच्या आचार-विचारांमध्ये तफावत होती, अन् एकमेकांच्या स्वभावांतही. त्याला लाल रंग आवडतो, अन् लाल रंगाचा, माझ्या दृष्टीनं भडक ड्रेस घालण्याचा मी विचारदेखील करू शकत नव्हते. पण म्हणतात ना, माणूस प्रेमात पडला की त्याचं सगळं जगच बदलून जातं, तसं काहीसं माझं झालं.
घरातलं पहिलंच लग्न म्हणून उत्साहात तयारी सुरू होती. सगळे एकदम खूश होते. लग्नाला पाच दिवस राहिले असताना बाबांचं हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक निधन झालं. एका घटनेनं माझ्या घरचं सगळं वातावरणच बदलून गेलं. पुढे काय होणार कोणालाच माहीत नव्हतं, पण या सगळय़ा परिस्थितीत तो मात्र माझ्यासोबत माझा हात घट्ट पकडून उभा राहिला. पुढे महिन्याभरानं घरातल्यांनी आमचं लग्न लावून दिलं. पण या सगळय़ामध्ये तो अन् माझ्या सासरची मंडळी माझ्यासोबत माझी आई अन् बहिणीचा पूर्ण आधार बनली. माझ्या सासरच्या लोकांनी जितकं त्यांना आपलंसं केलं, प्रेम दिलं तितकं इतर कोणी करू शकतील असं मला वाटत नाही. बाबांच्या अचानक जाण्यानं आई पार कोलमडून गेली होती. माझ्याबरोबर त्यानं माझ्या दोन्ही बहिणींची लग्नं सख्ख्या भावासारखी उचलून धरली. तो अजूनही हेच सांगतो, की ‘तुझे बाबा गेल्यावर त्या दोघी ज्या विश्वासानं मला बिलगल्या त्या विश्वासाला मी तडा जाऊ देऊ शकतच नाही.’
माझ्या गरोदरपणात त्याच्या आजोबांची तब्येत (त्याच्या आईचे वडील) खूप खालावली. माझ्या प्रसूतीच्या वेळी तर आजोबा ‘सीरियस’, हा तापानं फणफणलेला, बहिणीची परीक्षा.. अशा एक ना अनेक फ्रंटवर दोन्ही कुटुंबं लढत होती. मुलाच्या जन्मानंतर त्याच्या बारशाच्या निमित्तानं त्याचे पणजी-पणजोबा घरी आले, तेव्हा आजोबा पाय घसरून पडले आणि त्यांच्या मांडीचं हाड मोडलं. तेव्हा त्यांचं वय साधारण ८५ र्वष असेल. त्यांना सहा महिने पूर्ण ‘बेड रेस्ट’ सांगितली होती. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या घरी एकटं जाऊ देणं आम्हाला योग्य वाटेना. मग काय, पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, काका, मावशी अशा गोकुळात, लाडात माझा बाळकृष्ण वाढू लागला. खरंतर त्या वेळी सासू-सासरे त्यांच्या नोकरीच्या जागी दुसऱ्या गावी राहात होते. पण या सगळय़ा परिस्थितीत सासूबाईंनी माझ्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. घरात इतकी माणसं, खूप येणारे-जाणारे त्यामुळे खूप आर्थिक, मानसिक अन् शारीरिक ओढाताण होत होती. पण आपल्या माणसांना मदतीची गरज असताना ती केलीच पाहिजे, यावर आम्ही दोघंही ठाम होतो. एकमेकांवर भरवसा ठेवून पुढे जात होतो.
मुलगा वर्षांचा झाला, तोच घरमालकानं घर रिकामं करायला सांगितलं. नवीन संकट उभं राहिलं. त्या वेळी आपण स्वत:चं मोठं घर घेऊ, असं ठरवलं खरं, पण खरं युद्ध तर पुढे होतं. अगदी नाकापर्यंत कर्ज घेऊन घर घेतलं. नवीन मुलाची जबाबदारी, नोकरी, घर, कर्जाचे हप्ते अशी कसरत सुरू झाली. कधी कधी खूप असहाय्य वाटत असे, कुठेतरी पळून जावंसं वाटे. पण या सगळय़ात माझ्या माणसांनी (माहेरच्या अन् सासरच्या) कधी साथ सोडली नाही.
या सगळय़ामध्ये सुरुवातीला घरातल्या कामामध्ये फारसा लक्ष न घालणारा माझा नवरा घरातली छोटी कामं न सांगताही कधी करायला लागला हे मलाही कळलं नाही. अशा एक ना अनेक वेगवेगळय़ा जबाबदाऱ्या, प्रसंग येत होते, अन् आम्ही त्याला हसतमुखानं तोंड देत पुढे जात होतो. आमच्या लग्नाला १६ र्वष झालीत, आम्ही कायम सोबत होतो, आहोत. कधी वाद नव्हते असं नव्हतं, पण एकमेकांबद्दलचं प्रेम, आदर, अन् विश्वास कधी कमी नाही झाला. आज आम्ही दोघंही आपापल्या क्षेत्रात स्थिर आहोत. घराची घडीही छान बसली आहे यात आम्हा दोघांबरोबर कुटुंबाचा वाटाही तितकाच आहे, असं मला वाटतं.
sbdhakras@gmail.com