अपर्णा देशपांडे: दक्षिण अमेरिकेत गुलामीचं आयुष्य जगत असलेल्या हॅरिएट टबमन यांना कुणकुण लागली की, त्यांना दुसर्या मालकास विकण्यात येणार आहे. तिकडच्या अमानुष छळाच्या कहाण्यांनी त्यांच्या पावलात धाडस आणलं ते या गुलामगिरीतून निसटण्याचं… खडतर पायपीट करत गुलामी नसलेल्या पेनसिल्व्हेनियात त्या पोहचल्या…मुक्त झाल्या; पण अस्वस्थ हॅरिएट यांनी परतण्याचा निर्णय घेतला… का परतल्या त्या गुलामगिरीच्या जगात…?
जन्मत:च स्वतंत्र, मुक्त जीवन जगायला मिळालेल्या आपल्यासारख्या लोकांना गुलाम म्हणून मरणप्राय हालअपेष्टांचं जगणं कसं असू शकतं याचा अंदाज येणं कठीण आहे. पण फार मोठा काळ असा होता की, अमेरिकेत आणि जगात अनेक ठिकाणी लाखो लोकांसाठी एक माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नव्हता. अमेरिकेत १८२२ मध्ये, जेव्हा गुलामगिरीचा काळिमा परमचरणावर होता,
तेव्हा कृष्णवर्णीय रॉस दाम्पत्याच्या पोटी एका बालिकेचा जन्म झाला. चार वर्षांची असतानाच तिनं तिच्या दोन बहिणींना गुलाम म्हणून क्रूरपणे खेचून नेताना बघितलं होतं. तिच्या बालमनावर त्या प्रसंगाचा कायमचा व्रण उमटला. ॲरामिंटा रॉस म्हणजे मिंटी जेमतेम पाच वर्षांची होती. गुलाम आई रिट शेतात काम करत होती. मिंटी तिच्या लहान भावाला घेऊन काही खाण्यास मिळतं का ते बघत असताना तिथं मिस सुझन आल्या.
गुलाम आईच्या मालकानं चिमुकल्या मिंटीचा सौदा केला होता. काही समजण्याच्या आत मादाम सुझनच्या माणसानं मिंटीला उचलून नेलं. हे लेकरू घाबरून जोरात ओरडलं तरी कठोर शिक्षा मिळायची. इतकंच नाही तर जेव्हा जेव्हा सुझनचं बाळ रडायचं तेव्हा तेव्हा त्यासाठी तिलाच जबाबदार धरून मिंटीला बेदम मार बसत असे.
मिंटी किशोरवयात असताना एकदा अफूच्या शेतात काम सुरू होतं. एक गुलाम तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना मालकानं लोखंडी वजन त्याच्या दिशेनं फेकून मारलं. नेम चुकला आणि मिंटी (तोपर्यंत तिला हॅरिएट नाव मिळालं होतं) म्हणजे हॅरिएट यांना ते लागलं. मेंदूला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे त्यांना आयुष्यभर फीट येणं आणि नार्कोलेप्सीचा विकार जडला. तरीही त्या अत्यंत चिवट आणि वेदनेप्रति कमालीच्या सोशीक होत्या.
इतक्या अन्यायात वाढूनही हॅरिएट यांच्या मनात दोन गोष्टी कायम जिवंत राहिल्या. स्वातंत्र्याची जिद्द आणि गुलामगिरी संपवण्याचा निर्धार! समजत्या वयात आपण ही परिस्थिती बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करणार, हा त्यांचा प्रण होता. त्याच काळात जॉन टबमन यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या बनल्या हॅरिएट टबमन!
एक दिवस त्यांना कुणकुण लागली की, सद्य मालक त्यांना दक्षिण अमेरिकेतल्या दुसर्या मालकास विकणार आहे. तिकडच्या अमानुष छळाच्या थरकाप उडवणार्या कहाण्या गुलाम वर्गाला माहीत होत्या. त्यातच मुख्य मालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे थोडी उसंत मिळाली आणि त्याचा फायदा घेत, आता निघालो नाही तर कधीच नाही! हे माहीत असल्याने हॅरिएट यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला;
पण त्यांच्या पतीनं त्यांच्या सोबत जाण्यास चक्क नकार दिला. मध्यरात्रीच्या अंधारात मालक निद्रिस्त असताना त्यांनी शेतामागील दलदलीचा मार्ग निवडला. दिवसा दाट झाडीत लपून राहून रात्री त्या पुढचं अंतर कापत. कुणाच्या नजरेस पडणं म्हणजे पुन्हा गुलामगिरी… कारण पळून गेलेल्या गुलामास पकडून देण्यासाठी बक्षिसं दिली जात.
हॅरिएट यांचा तार्यांचा अभ्यास जबरदस्त होता त्यामुळं दिशा समजण्याचं त्यांचं कौशल्य त्यांना पुढे हेरगिरी करण्यासाठी कामी आलं. अंग मोडेपर्यंत काम करताना त्यांनी आजूबाजूचं जंगल, पायवाटा, जलमार्ग, गुंगी आणण्यापुरता अफूचा वापर, प्राण्यांचे हुबेहूब आवाज या सगळ्यांचा बारकाईनं अभ्यास केला होता. अनेक दिवसांच्या पायपिटीनंतर हॅरिएट पेनसिल्व्हेनिया पोहोचल्या, कारण तिथं गुलामगिरी नव्हती!
त्या मुक्त झाल्या होत्या! त्या काळी गुलामांची मुक्ती ही दुर्मिळाहून दुर्मीळ होती. त्यांनी स्वत:ला विचारलं, ‘‘आज मी तीच जुनी व्यक्ती आहे, की पूर्णत: नवीन? कारण आज पायात बेडी नाही, आज मी मुक्त आहे.’’ अशा मुक्त झालेल्या इतर कुण्या व्यक्तीनं पुन्हा दक्षिण अमेरिकेत मृत्यूच्या दारात परत जाण्याचा निर्णय घेतला असता का? इथंच हॅरिएट यांचं वेगळेपण ठळक होतं.
त्या गुप्तपणे भूमिगत राहून काम करणार्या एका संघटनेस जाऊन मिळाल्या. बंधक गुलामांची सुटका करण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त जाळं निर्माण केलं होतं. त्याला ‘अंडरग्राऊंड रेलरोड’ म्हटलं जाई. रेल्वेमध्ये वापरतात तसे शब्द त्यांनी सांकेतिक भाषा तयार करण्यासाठी वापरले होते. ‘स्टेशन’ म्हणजे सुरक्षित लपण्याचं ठिकाण, ‘कंडक्टर’ म्हणजे मार्गदर्शक, ‘पॅसेंजर’ म्हणजे सुटका करवून आणायचे गुलाम… ‘‘माझ्या समस्त गुलाम बांधवांना मी सोडवून आणणार!’’ असं म्हणत त्या १८४९ मध्ये पुन्हा तिथंच परत गेल्या…त्याच शेतात…त्याच मालकाच्या राज्यात…!
लेखिका कॅथरीन क्लिंटन यांनी ‘हॅरिएट टबमन : द रोड टू फ्रीडम’ या पुस्तकात त्यांच्या या धाडसी योजनांबद्दल विस्तृत वर्णन केलं आहे. एकदा त्या बंदिस्त गुलामांची सुटका करवून अत्यंत खडतर मार्गावरून रात्रीचा प्रवास करत असताना एका मध्यमवयीन गुलामाचं धैर्य संपलं. ‘‘माझ्यात हिंमत नाही, मी परत माघारी जातो. मागून जंगली कुत्र्यांचा आवाज येतोय. ते आपल्याला फाडून खातील.’’ तो म्हणाला. हॅरिएट यांनी तत्क्षणी त्याच्यावर बंदूक उगारली. ‘‘तसं असेल तर मी तुला आत्ता इथंच गोळी घालते. जंगली कुत्र्यांना खाद्य मिळेल.
एकट्या तुझ्यासाठी मी या बाकी बांधवांचा जीव गमावू शकत नाही. मुकाट्यानं सोबत चल, मी तुला सुरक्षित ठेवेन.’’ त्या म्हणाल्या आणि खरंच त्यांनी सर्वांना गुलामगिरीतून सोडवून सुरक्षित ठिकाणी नेऊन पोचवलं. त्यांनी तब्बल तेरा वेळा दक्षिण अमेरिकेत जाऊन सत्तरहून अधिक गुलामांची मुक्तता केली, ज्यात त्यांचे कुटुंबीयसुद्धा होते. इतक्या वेळा गुप्त मार्ग वापरून धोका पत्करणं यासाठी काय प्रचंड मनोबल लागत असेल! त्यांची ही कामगिरी पाहून एका सैन्य अधिकार्यानं त्यांना गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी बोलावून घेतलं.
दरम्यान, त्यांच्या पतीनं दुसरं लग्न केल्याचं त्यांना समजलं होतं… अशा वेळी एखादी स्त्री कोलमडून पडली असती, पण हे पाणीच वेगळं होतं. त्यांनी ते काम स्वीकारलं. अमेरिकेत यादवी युद्ध पेटलं असताना ‘युनियन आर्मी’(युनाइटेड स्टेटमधील उत्तर राज्यांची सेना) साठी हेरगिरी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. तेव्हा उत्तर अमेरिका गुलामगिरी संपवण्याच्या मताची होती, तर दक्षिण अमेरिकेच्या अकरा राज्यांत मात्र गुलामगिरी कायम हवी होती. त्यांच्या सैन्यास ‘कॉन्फिडरेट सैन्य’ म्हणत असत. त्याचं नेतृत्व जनरल रॉबर्ट ली करत होते.
कॉन्फेडरेट सैन्य कुठे कुठे आहे, त्यांचे तळ कुठे आहे याची माहिती काढण्यासाठी हॅरिएट यांनी शेतात, बंदरावर आणि मोठ्या बंगल्यावर काम करणारे मजूर यांना हाताशी धरलं. कुठे पूल बांधले आहेत, शस्त्र लपवली आहेत याची अगदी अचूक बातमी त्या पुरवत असत. गुलाम जगतात त्यांनी काही सांकेतिक ओळीत गाणी बसवली होती. ज्यात ‘आज रात्री भेटू नका धोका आहे’ किंवा ‘इथं संख्येनं किती गुलाम आहेत’, ‘पलीकडून या इकडं पहारा आहे’ अशा ओळी त्या गाण्यात असत. हॅरिएट यांनी अंधारात, दलदलीतून रस्ता कापत गुलामांशी गुप्त संपर्क ठेवला होता.
संपूर्ण तयारी नंतर १८६३ मध्ये हॅरिएट यांनी ‘कॉम्बाही नदी धाड’ या अत्यंत धाडसी योजनेचं नेतृत्व केलं होतं. २ जून १८६३. साऊथ कॅरोलिना राज्यातील हजारो गुलामांचं आयुष्य बदलण्याचा दिवस. तीन मोठ्या सशस्त्र बोटी कॉम्बाही नदीतून पुढे सरकत होत्या. नेतृत्व करत होत्या, हॅरिएट टबमन! कॉन्फेडरेट सैनिकांनी पाण्यात जागोजागी स्फोटकं पेरली होती. हॅरिएट यांनी तार्यांच्या दिशेचा अभ्यास करून आपल्याला योग्य त्या दिशा बघून ठेवल्या होत्या. त्या नकाशावर शत्रूंची ठिकाणं दाखवत पुढे निघाल्या.
स्फोटकांना टाळून किंवा निकामी करत त्या जहाजांना पुढे मार्ग दाखवत होत्या. किनार्यावर आल्याबरोबर तोफा डागल्या गेल्या. अंधारात एकच धुमाकूळ झाला. शत्रू सैन्यास अवधी मिळाला नाही. शेकडो गुलाम शेतातून धावत येऊन जहाजांकडे धावले. एकीकडे हल्ला चढवत असताना हॅरिएट सगळ्यांना आश्वासन देत होत्या, ‘‘सगळ्यांना जहाजावर जागा मिळेल. घाबरू नका.’’ अनेक तंबाखू आणि अफूची शेतं उद्ध्वस्त करण्यात आली आणि सातशेहून अधिक गुलामांना घेऊन जहाजं परत निघाली.
या मोहिमेनंतर हॅरिएट याचं नाव पडलं, ‘मोझेस’ ‘एकही प्रवासी न गमावणारी देवदूत!’ त्या मोहिमेत हॅरिएट या मार्गदर्शक, कमांडर, आणि प्रसंगी शुश्रूषा करणारी परिचारिकादेखील होत्या. इतिहासात ही मोहीम ‘कॉम्बाही नदी धाड’ या नावानं प्रसिद्ध झाली. हॅरिएट यांच्या बारकाईनं माहिती मिळवण्याच्या पद्धती आणि पूर्वतयारीमुळे ही मोहीम यशस्वी झाली. अन्यथा तीनही जहाजं स्फोटकांनी क्षणात उद्ध्वस्त झाली असती. यानंतर मात्र अमेरिकेत गुलामगिरी अधिकृतपणे संपली.
हॅरिएट यांना स्वत:ला फारसं लिहायला, वाचायला संधीच मिळाली नव्हती. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि सारा ब्रॅडफोर्ड यांनी १८६९ मध्ये ‘सीन्स इन लाइफ ऑफ हॅरिएट टबमन’ या चरित्रात लिहून काढले. त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. त्यांच्या आठवणीतले काही प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत. आयुष्यभर इतक्या विविध महत्त्वाच्या भूमिका निभावल्यानंतर, उत्तर अमेरिकेसाठी एक जबरदस्त गुप्तहेर म्हणून काम करूनही हॅरिएट यांची आर्थिक परिस्थिती कायम खालावलेलीच होती.
त्यांनी जे काही कमावलं ते गरजू लोकांना मदत करण्यात आणि समाजसेवेत कामी आणलं. न्यूयॉर्कमधल्या ऑबर्न इथं त्यांनी एक छोटंसं घर घेतलं आणि तिथं फक्त स्वत: न राहता वृद्ध गरजू कृष्णवर्णीय लोकांसाठी आश्रयस्थान सुरू केलं. लहानपणी झालेल्या मेंदूच्या दुखापतीचा त्यांना शेवटपर्यंत त्रास झाला. परंतु ती त्यांच्या कामात अडथळा आणू शकली नाही. त्या काळी कृष्णवर्णीय व्यक्तीस फारसे पुरस्कार, सन्मान दिले जात नसत; पण हॅरिएट यांना लष्कराकडून सन्मान आणि निवृत्तिवेतन दिलं गेलं.
१० मार्च १९१३ या दिवशी लोकांना गुलामगिरीतून मुक्तता देण्यासाठी पुढे सरसावलेल्या लढवय्या स्त्रीनं देह ठेवला. अमेरिकी सैन्यानं त्यांना लष्करी इतमामात मानवंदना दिली. अमेरिकेनं त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं, वीस डॉलरच्या नोटेवर त्यांचा फोटो छापण्यात आला. अमेरिकी चलनावर दिसणार्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय स्त्री ठरल्या. मृत्यूआधी त्या आश्रमातील सहकार्यांना म्हणाल्या, ‘‘मी तुमच्यासाठी चांगली जागा तयार करण्यासाठी जात आहे!’’ कायमच गुलामगिरीतील बांधवांच्या मुक्ततेसाठी झटलेल्या हॅरिएट यांनी पृथ्वीवर जगातील करोडोंच्या हृदयात मात्र कायमची जागा निर्माण केली आहे.
