शुद्ध हेतूला चिकाटीची जोड असेल तर केव्हा ना केव्हा उजाडतंच, हा वालावलकर सरांचा विश्वास. याच विश्वासाने त्यांनी पर्यावरण दक्षता मंचचं काम यशस्वीरीत्या करून दाखवलं आहे. या त्यांच्या चिकाटीला साथ आहे ती त्यांची सहचारिणी कविता यांची. पर्यावरणस्नेहात गुंतलेल्या वालावलकर दाम्पत्याविषयी..

ती गोष्ट २००५ ची. ठाण्यामधील वसंतविहार संकुलात, क्लब हाऊसमध्ये जमलेल्या शंभर सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना वालावलकरसर पावसाचं पाणी कसं साठवता येईल (रेनवॉटर हार्वेिस्टग) या विषयासंदर्भात मार्गदर्शन करत होते. ३/४ तासांच्या अथक चर्चेमधून प्रत्येकाला मनातील सर्व शंकांची उत्तरं मिळाली आणि या संकुलातील चाळीस सोसायटय़ांमध्ये ठाण्यातील पहिलं रेन वॉटर हार्वेिस्टग सुरू झालं. थोडय़ा अवधीत त्याचा परिणामही दिसून आला. आजूबाजूच्या भागात जेव्हा कूपनलिका खणल्या तेव्हा पाण्यासाठी फार खोल जावं लागलं नाही. जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याचं ते द्योतक होतं.
लोकांना विविध मार्गानी जलसाक्षर करण्याचं सरांचं व्रत ‘पर्यावरण दक्षता मंच’ या संस्थेच्या माध्यमातून २००३ पासून अव्याहतपणे सुरू आहे. रेन वॉटर हार्वेिस्टगबरोबर सांडपाण्याचा पुनर्वापर, पाण्याचे महत्त्व, साठवणूक व वापर याबद्दलची जागरूकता मोहीम, ‘पर्यावरण दक्षता मंच’ला २००६/०७ मध्ये युनेस्को व सी.एन्.बी.सी. वाहिनीद्वारे बेस्ट वॉटर एन.जी.ओ. हा पुरस्कार मिळालाय. सर्वसामान्य जनतेबरोबर अनेक बिल्डर्स व इंजिनीअर्सनीही या संदर्भात सरांकडे धडे घेतलेत. वालावलकर सरांच्या या पर्यावरण स्नेहाची लागण त्यांच्या सहधर्मचारिणीला झाली नाही तरच नवल! सुरुवातीला संसार व नोकरी सांभाळून संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांत जमेल तसा सहभाग घेणाऱ्या कविता वालावलकरांनी स्वेच्छानिवृत्तीनंतर मंचच्या ‘आपलं पर्यावरण’ या मासिकाची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारलीय. पर्यावरण शिक्षण, संशोधन व जनजागरण या तीन मार्गावरून सरांच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांची वाटचाल सुरू आहे.
रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांचा अभ्यास करताना वालावलकर सरांना (व्ही.पी.एम. पॉलिटेक्निक कॉलेजचे ते गेल्या २६ वर्षांपासूनचे प्राध्यापक म्हणून वालावलकर सर) पर्यावरण ही नवी दिशा गवसली. प्रदूषण समस्येवर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या गुरूंनी डॉ. नंदकिशोर जोशी यांनी स्थापन केलेल्या (१९९०) ‘पर्यावरण दक्षता मंच’मध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ते संस्थेला ठाण्यात घेऊन आले. लगेचच डॉ. विकास हजरनीस, डॉ. संजय जोशी, रवींद्र कदम, प्रसाद दाते व सर स्वत: असा समविचारी मंडळींचा ग्रुप जमला. पुढे डॉ. प्रसाद कर्णिक, डॉ. नागेश टेकाले, डॉ. गोविंद तारटकर, डॉ. पुरुषोत्तम काळे व डॉ. मानसी जोशी असे आणखी ५ शिलेदार त्यांना येऊन मिळाले व ‘पर्यावरण दक्षता मंच’चा वारू चौफेर धावू लागला.
घनकचरा व्यवस्थापन हा विषय सरांच्या डोक्यात बऱ्याच आधीपासून होता. १९९३-९४ मध्ये त्यांनी ठाण्याजवळील ओवळा गावात हरियाली संस्थेच्या सहकार्याने एक प्रयोग केला. जमिनीच्या खाली ४ खड्डे खणले आणि जमिनीच्या वर कारवीचं कुंपण घालून ४ हौद तयार केले. त्यानंतर या मुद्दाम बनवलेल्या आठ ठिकाणी त्यांनी पालापाचोळा व घराघरांतला ओला कचरा टाकायला सुरुवात केली. प्रत्येकात वेगवेगळं विरजण (बायोकल्चर) टाकलं. हा प्रयोग बघायला १५ ते २० हजार लोक येऊन गेले. ३ महिन्यांनंतर या कचऱ्यापासून दाणेदार खत बनलेलं जेव्हा लोकांनी डोळ्यांनी बघितलं तेव्हा ओल्या कचऱ्याचा असा उपयोग होऊ शकतो यावर लोकांचा विश्वास बसला. आता अनेक सोसायटय़ांनी ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या सल्ल्याने व साहाय्याने ओल्या कचऱ्याचा प्रकल्प आपापल्या संकुलात सुरू केलाय. घरच्या घरी खत बनवणारी त्यांची जादूची बादलीही प्रसिद्ध आहे. इतक्या वर्षांच्या अथक परिश्रमानंतर घनकचरा व्यवस्थापनाचं महत्त्व आता महानगरपालिकेलाही पटू लागलंय.
सर्व वयोगटांतील विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध व व्यावहारिक पर्यावरण शिक्षण देणारी साप्ताहिक शाळा हा ‘पर्यावरण दक्षता मंच’चा २००० साली सुरू झालेला उपक्रम. ही पर्यावरण शाळा माहिती विज्ञान, अनुभव व प्रात्यक्षिक या मार्गाने कार्यरत आहे. तज्ज्ञांबरोबर नित्यनियमाने आयोजिलेल्या निसर्गभेटीत तर अनेकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
लोकांच्या वर्षांनुर्वष हाडीमासी खिळलेल्या सवयी बदलणं म्हणजे महामुश्कील काम. त्यातही हे प्रघात देवधर्माशी निगडित असतील तर मामला अधिकच गंभीर. परंतु शुद्ध हेतूला चिकाटीची जोड असेल तर केव्हा ना केव्हा उजाडतंच हा सरांचा विश्वास. गणपतीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या/कागदाच्या मूर्ती बनवण्यासाठी व थर्माकोलविरहित सजावटीसाठी कार्यशाळांचं आयोजन, मूर्तीचं विसर्जन कृत्रिम जलाशयातच करावं. निर्माल्य तलावात कुठेही फेकू नये यासाठी पाठपुरावा..अशा १० वर्षांच्या धडपडीचे परिणाम आता दिसू लागलेत. मुख्य म्हणजे ठाणे महापालिकेला ग्रीन गणेश फेस्टिव्हचं महत्त्व पटवण्यात पर्यावरण दक्षता मंच यशस्वी झाल्याने आता ठाण्यात सध्या शाबूत असलेली तळी तरी वाचतील अशी आशा निर्माण झालीय. त्याचप्रमाणे नववर्षांचं स्वागत, आदल्या रात्री प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीतून करण्याची प्रथा गेल्या २/१ वर्षांपासून ठाण्यातून जवळजवळ हद्दपार झालीय. त्याऐवजी शहरातील मध्यवर्ती भागामधील मासुंदा तलावाभोवती असंख्य पणत्या पेटवून उजळलेल्या दिव्य ज्योतींनी येणाऱ्या वर्षांला सलामी देण्यासाठी आता पोरांपासून थोरांपर्यंत हजारो ठाणेकर न बोलवता एकत्र येतात. पर्यावरणाच्या ज्योतीने संस्कृती संवर्धनाचा दिवाही प्रज्वलित होतो तो असा.
‘पर्यावरण दक्षता मंच’ ने २२ मार्च २००३ ला ठाणे महानगरपालिकेबरोबर जागतिक जलदिन प्रथमच साजरा केला. तोपर्यंत या दिवसाचं अस्तित्व कोणाच्या गावीही नव्हतं. त्याशिवाय २ फेब्रुवारी वर्ल्ड वेटलॅन्ड (खाडीकाठची दलदलीची जमीन) डे, २१ मार्च जागतिक वन दिन, २२ एप्रिल वसुंधरा दिन, २२ मे जैवविविधता दिन, १ ते ७ ऑक्टोबर वन्यजीवन सप्ताह, २ डिसेंबर प्रदूषणविरोधी दिवस, वन स्वच्छता अभियान..असे विविध उपक्रम लोकांना सहभागी करून आयोजित करत राहिल्याने आता पर्यावरण हा ठाणेकरांच्या जगण्याचा विषय होऊ लागलाय. दरवर्षी पर्यावरण दिनाला एका नव्या उपक्रमाची सुरुवात हे संस्थेचं आणखी एक वैशिष्टय़. असे एकूण १६ उपक्रम कळव्यातील ‘अंकूर थीम पार्क’ या एकाच ठिकाणी पाहण्याची, अनुभवण्याची संधी कोणालाही उपलब्ध आहे.
हे सर्व उपक्रम चालवण्यासाठी लागणाऱ्या पैशांचा उगमही संचालकांचं सामाजिक दायित्व सांगणारा. महानगरपालिकेबरोबर सुरू झालेल्या (२००३) ठाण्याच्या सर्व रुग्णालयातील घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पासाठीची गुंतवणूक ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या ५ ज्येष्ठ संचालकांनी केली. मात्र त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून संसार चालतोय पर्यावरणाचा! कविता म्हणाल्या की जोडीदाराच्या सहवासातून माझ्याही चित्तवृत्ती बदलत गेल्या. आम्ही नवं घर घेतलं तेव्हा परवडत असूनही मीच म्हटलं, नवं फर्निचर म्हणजे कोणत्या ना कोणत्या झाडाची कत्तल. त्यापेक्षा आहे ते काय वाईट आहे? अंकुर थीम पार्कमध्ये भेट देणाऱ्यांना घरच्या घरी खत बनवणारी जादूची बादली दाखवण्याआधी मी ती घरी घेऊन आले. स्वत:च्या अनुभवांमुळे इतरांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात मला अडचण आली नाही.
कविता या ‘सांज लोकसत्ता’चे माजी संपादक चंद्रशेखर वाघ यांच्या कन्या. स्वेच्छानिवृत्तीनंतर पर्यावरण दक्षता मंचला पूर्णपणे जोडून घेताना त्यांनी वडिलांचा पत्रकारितेचा वसा हाती घेतला व संस्थेच्या पर्यावरणविषयक मासिकाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या माहेरीही तीच विचारसरणी. गणपतीची शाडूची मूर्ती आणून तिचं घरच्या घरी विसर्जन, चंद्रशेखर वाघांचा देहदानाचा निर्णय ही त्याची काही उदाहरणं. सकाळी ९ ते दुपारी ४ कॉलेज व दुपारी चारपासून रात्री ९ पर्यंत ‘पर्यावरण दक्षता मंच’ हे वेळापत्रक सांभाळणारे वालावलकर सर मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणेचे कार्याध्यक्षही आहेत. ठाणे शहरापासून लांब राहाणाऱ्यांना घरबसल्या वाचनाचा आनंद मिळावा म्हणून वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या ग्रंथयानाची (फिरते गं्रथालय) संकल्पना व डिझाइन सरांचेच. त्यांचा पुढचा प्रोजेक्ट तर आणखी महत्त्वाचा. मामणोली येथील त्यांच्या ४ एकर जागेत ते सध्या ४०,००० जंगली झाडं वाढवत आहेत. कशासाठी? तर सरकारकडून जंगल निर्मितीसाठी मिळवलेल्या (७ वर्षांच्या करारावर) टिटवाळ्याजवळील रुंदे गावातील २५ हेक्टर वनजमिनीवर देवराई निर्माण करण्यासाठी.
पर्यावरण जतनाचा ध्यास घेतलेल्या वालावलकर सरांचा उरक आणि आवाका पाहताना, ऐकताना मला अब्दुल कलाम यांचं प्रसिद्ध वाक्य आठवलं..‘स्वप्नं ती नव्हेत, जी झोपल्यावर पडतात. स्वप्नं ती, जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.’

संपर्क-विद्याधर वालावलकर
९८६९०००६३२
ई-मेल – vawalavalkar@gmail.com
वेबसाइट- paryavaran.org
waglesampada@gmail.com