निष्पाप, वंचित मुलांना जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. अनिल कुडीया यांनी आंबळे या गावी ‘सार्थक सेवा संघ’ स्थापन केला. या मुलांच्या आयुष्यात अर्थ भरता आला तरच आयुष्य सार्थकी लागलं असं मानून जगणाऱ्या भारती आणि डॉ. अनिल कुडीया या जोडप्याविषयी.. 

‘‘हा आमचा विक्रांत ऊर्फ विक्या.. इथे आला तेव्हा जेमतेम अडीच वर्षांचा असेल. डोळे तिरळे.. बोलणं-चालणं तर सोडाच साधं खाताही येत नव्हतं त्याला.. मांसाचा नुसता गोळाच म्हणा ना! त्याला इथे घेऊन आलेल्या त्याच्या आजीकडून सर्व इतिहास कळला.. हे वाईचं कुटुंब. त्याची आई तो सहा महिन्यांचा असतानाच वारली. बाप दारुडा, गांजाबहाद्दर. आजी पोटासाठी शेतावर कामाला जायची. याला कोण सांभाळणार? हे काम अफूनं केलं. रांगायला लागल्यावर पाय बांधून शेळीपाशी ठेवायची.. इथे आला तेव्हा तोंडातून फक्त शेळीसारखा आवाज काढायचा. आम्ही मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली, पण यापेक्षाही कामी आलं ते आमच्या मोठय़ा मुलांनी या वेडय़ाबागडय़ा पोराला दिलेलं प्रेम. बघता बघता पोर पळायला लागलं. बोलायला लागलं. आता साडेसहा वर्षांचा झालाय. शाळेत जातो, कविता म्हणतो.. कोणीही न सांगता हातात झाडू घेऊन लखलखित कचराही काढतो..’’ बोलता बोलता डॉ. अनिल कुडीया यांचा गळा दाटून आला.

निष्पाप, वंचित मुलांना जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आंबळे (ता. पुरंदर) या गावी स्थापन केलेल्या ‘सार्थक सेवा संघ’ या वसतिगृहातील प्रत्येक मुलाची कहाणी डोळ्यांत पाणी आणणारी. इथली बरीचशी मुलं पुणे शहर व परिसरातील झोपडपट्टय़ा, कचराकुंडय़ा, पुलाखालच्या जागा, दारूचे अड्डे इत्यादी ठिकाणांवरून आणलेली. दिशाहीन भटकणाऱ्या अशा मुलांचं जीवन बदलायचं तर त्यांना त्यांच्या असुरक्षित वातावरणातून दूर नेणं गरजेचं. त्यासाठी त्यांच्या पालकांचा विश्वास मिळवणं हे पहिलं काम. त्यानंतर या वंचित मुलांना सुसंस्कारित व सुशिक्षित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात पाय रोवून उभं करणं ही पुढची पायरी. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पत्नीच्या पाठबळावर गेली सात र्वष जीवाचं रान करणाऱ्या डॉ. अनिल कुडीया या चाळीस मुलांच्या बापाची कहाणी कुणीही दिङ्मूढ व्हावं अशीच! अहमदनगरमधील मेहतर समाजात जन्मलेला, लष्कराच्या लंगरमधून आणलेल्या उरल्यासुरल्या अन्नावर वाढलेला एक मुलगा मोठा होताना रंजल्या-गांजल्यांना, पीडितांना आधार देण्याचं स्वप्न बघतो आणि अपार कष्टांनी ते प्रत्यक्षात आणतो.. सारंच मोठं विलक्षण!

एम.ए. करत असतानाच हा मुलगा ‘आनंदवना’त काम करण्यासाठी बाबा आमटे यांकडे गेला होता. तेव्हा साधनाताईंनी आधी शिक्षण पूर्ण करायचं आणि मग अशा कामात उडी घ्यायची असं समजावून त्याला परत पाठवलं. त्याच दरम्यान (१९८९) नगरमध्ये गिरीश कुलकर्णी यांनी ‘स्नेहालया’च्या माध्यमातून वेश्या व त्यांच्या मुलांसाठी काम करायला सुरुवात केली होती. हा त्या कामाला जाऊन भिडला. आज ‘सार्थक सेवा संघ’ ही संस्था स्वतंत्रपणे काम करत असली तरी गिरीश कुलकर्णी यांच्याशी जुळलेले बंध आजही तितकेच घट्ट आहेत. ‘स्नेहालया’च्या माध्यमातून आणखी एक बंध त्याच्याशी आयुष्यभरासाठी जोडला गेला तो भारतीचा. दोघांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना भारती म्हणाल्या, ‘‘त्यांनी सर्वप्रथम दोन गोष्टी स्पष्ट केल्या. एक म्हणजे मी नोकरी करणार नाही आणि दुसरी गोष्ट संपूर्ण जीवन वंचितांच्या सेवेत घालवणार. पुढे त्यांनी नोकरी केली. पण त्या वेळी त्यांच्या त्या विचारांनी मी एवढी भारावले की विचारल्या क्षणी लग्नाला हो म्हणून मोकळी झाले..’’

बाणेदार शब्दांनी हुरळून जाणं आणि नंतर अशा माणसाची आयुष्यभर साथ देणं या दोन कृतीत महद्अंतर असतं. परंतु भारती यांनी दिलेलं वचन मनापासून निभावलं. दोघांच्या पूर्वीच्या सांपत्तिक स्थितीतही जमीनअस्मानाचा फरक. भारती यांचे वडील शास्त्रज्ञ आणि आई शाळेत मुख्याध्यापिका तर अनिलचे वडील जिल्हा परिषदेत कर्मचारी. घरात कमावणारा एकटा आणि खाणारी तोंडं सोळा. त्या वेळी भारती ‘स्नेहालया’मध्ये लुनावरून यायच्या. अनिल सायकलने. परंतु जेव्हा मनं जुळतात तेव्हा बाकी सर्व गोष्टी गौण ठरतात.

त्या दिवसात अनिल ‘स्नेहालया’च्या कामात एवढा एकरूप झाले होते की, मुंबईत शिपिंग कॉपरेरेशनमध्ये मिळालेली साडेअकरा हजार रुपये पगाराची नोकरी सोडून त्याच्या एकचतुर्थाश पगारावर ते नगरला परत आले. २००१ मध्ये त्यांची पुण्याला प्रमोशनवर बदली झाली. नगर सुटलं पण हृदयात धगधगणारी सेवेची ज्योत शांत बसू देणारी नव्हतीच. पुण्यात आल्यावर त्यांनी एकटय़ाच्या हिमतीवर १६ मुलींना वेश्या व्यवसायातून सोडवलं. वेश्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांच्या रक्तात एवढा भिनला होता की त्यांनी पीएच.डी.साठीही तोच विषय निवडला.. ‘हिंदी उपन्यासों में वेश्यावृत्ती एक अनुशीलन’.

वेश्यांचं ‘रेस्क्यू ऑपरेशन’ पार पाडताना डॉ. कुडीयांना रस्त्यावरच्या मुलांचं विविध प्रकारांनी केलं जाणारं शोषण जाणवलं, अस्वस्थ करून गेलं आणि सेवेचा नवा अध्याय सुरू झाला. सर्वप्रथम नजरेत आलेल्या पाच मुलांच्या पालकांची अनुमती मिळवण्यासाठी (त्यांना घेऊन जाण्यास) चार ते पाच महिने लागले. रोज ऑफिसनंतर या पालकांबरोबर फूटपाथवरच बसून त्यांना समजावण्याचा तो काळ परीक्षा पाहणारा होता. कसाबसा होकार मिळाल्यावर मुलांना डॉक्टरांनी थेट आपल्या घरीच आणलं. पत्नीच्या मदतीने त्यांना आंघोळी घातल्या. नवे कपडे चढवले. मुलं पोटभर जेवली. चार दिवस राहिली. त्यानंतर त्यांचं मधून मधून येणं, जाणं, राहाणं सुरू झालं.

त्यानंतर मुलांना कायमचं ठेवून घेण्यासाठी डॉक्टरांनी स्वतंत्र जागा शोधायला सुरुवात केली.. त्यानुसार हांडेवाडीत (पुणे) कमी भाडय़ात एक चार खोल्यांचा प्लॅट मिळाला. मुलांचं जेवण व देखरेख यासाठी सेवाभावी पण शिस्तप्रिय अशी अक्का कुमुदिनी खंडागळे मिळाली. या अक्कापाशी कस्तुरबा आश्रमापासून स्नेहालयापर्यंत असा प्रचंड अनुभव होता. तिने डॉक्टरांचा अर्धा भार हलका केला.

मुलांची संख्या वाढत वाढत सतरा-अठरावर गेली तशी त्या सोसायटीत कुरबुरी सुरू झाल्या. मग शेवाळेवाडी, उरळी कांचन या ठिकाणी ‘सार्थक’चं बिऱ्हाड हललं. शेवटी स्वत:च्या हक्काच्या जागेची निकड निर्माण झाली तेव्हा डॉक्टरांना पुरंदर तालुक्यात, घाटावर आंबळे गावी, प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढून घेतलेल्या आपल्या दीड एकर जागेची आठवण झाली. त्याच क्षणी त्यांनी भारतीला फोन लावला. त्या वेळी त्या कार्यालयीन प्रशिक्षणासाठी अहमदाबादमध्ये होत्या. जागा दान करण्याचा निर्णय फोनवर एका मिनिटात झाला. त्यानंतर लगेचच म्हणजे २०१३ मध्ये कच्च्या बांधकामावर पत्र्याची शेड उभारून ‘सार्थक’चा परिवार इथे राहायला आला.

भारती म्हणाल्या, ‘‘झपाटलेला हे एकच विशेषण यांना तंतोतंत लागू पडतं. पुण्यातील डिफेन्स अकाऊंटस विभागात असिस्टंट डायरेक्टर पदावर काम करणारा हा सद्गृहस्थ ऑफिस सुटल्यावर रोज ४७/४८ कि.मी. प्रवास करून आंबळेला जातो आणि रात्री साडेअकरा/ बाराला परत येतो. आधी बाईक पळवत होते आता पाठ दुखते म्हणून ट्रेनने जातात. शनिवार-रविवार तिथेच मुक्काम. डोक्यात सतत ‘सार्थक’चा विचार. काही घरगुती प्रश्न विचारला तर उत्तर तिसरंच मिळतं. आम्ही दोघंही ऑफिसतर्फे विमान भाडय़ासाठी पात्र आहोत पण एकदाही कुठे गेलेलो नाही. शेवटचं नाटक/ सिनेमा कधी पहिला तेही आठवत नाही. सासूबाईंचा आधार आहे. त्यांच्याच मदतीने माझी नोकरी, दोन्ही मुलांची, घरची जबाबदारी निभावतेय. ‘सार्थक’च्या ज्या मुलांना घर नाही त्यांना हे दिवाळी/मे महिन्याच्या सुट्टीत आठ-आठ दिवस राहायला आणतात. हे सगळं सांभाळताना माझी दमछाक होते. खोटं कशाला सांगू? कधी कधी चिडचिडही होते, पण त्यांचं समर्पण बघितलं की अपराधी वाटतं.. आपलं वचन आठवतं आणि मी ‘सार्थक’साठी मदत गोळा करण्याच्या कामाला लागते. मी काम करते त्या ‘ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी’ने गेल्या काही महिन्यांपासून मुलांच्या जेवणाचा खर्च उचलून आमच्या कार्याचा सन्मान केलाय..’’

पत्नीच्या समजूतदारपणाबद्दल डॉ. कुडीयांच्या मनात कृतज्ञता आहे. त्यांचं म्हणणं, भारतीची साथ आहे म्हणूनच काही निर्णय मी बेधडकपणे घेऊ शकलो. मध्यंतरी एका सरकारी समितीवरील काही सदस्य व माहितीच्या अधिकारासंबंधित एक स्वयंघोषित कार्यकर्ता अनेक संस्थांना त्रास देऊन पैसे उकळत होते. डॉ. कुडीयांनी धाडस दाखवून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली आणि सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला.

आंबळे हे पेशवेकालीन सरदार दरेकर यांना इनाम मिळालेलं गाव. इथले पडके वाडे, कमानी, पायऱ्यांच्या विहिरी इतिहासाची साक्ष देतात. कुडीया दाम्पत्याने दान केलेल्या जागेत १०० ते १५० मुलं राहू शकतील, अशी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहं बांधण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. पाच ते पंधरा वयोगटांतील इथल्या चाळीस मुलांबरोबर (बत्तीस मुलगे, आठ मुली) गेला बालदिन (१४ नोव्हेंबर) साजरा करण्याचं भाग्य मला मिळालं. ही सर्व मुलं शाळेत जातात. त्यांना त्यांच्या वयानुसार स्वच्छता, ऑफिस सांभाळणं, लहान मुलांचा अभ्यास अशी कामं वाटून दिलीयत. मुलांच्या सोबतीला अक्कासोबत आणखी तिघीजणी आहेत. मोठय़ा मुलांनी ‘सार्थक’च्या इमारतीचं बांधकाम बघता बघताना कटिंग, ग्राइंडिंग, वेल्डिंग, प्लम्बिंग.. अशी कौशल्य आत्मसात केलीयत. रंगकामही करतात. कामात सफाई नसली तरी जिद्द दाद देण्यासारखी. मनात आलं, यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं तर यांच्यामधून कुशल कारागीर निर्माण होऊ शकतील. डॉ. कुडीया म्हणाले, ‘‘मुलांना नवं काही शिकवू पाहणाऱ्या कोणाचंही इथे स्वागत आहे. त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था इथे होऊ शकते.’’ मी गेले त्या दिवशी काही मुलं शौचकूपाचं प्लॅस्टरिंग करण्यात गर्क होती तर काही लोखंडी दरवाजांचं वेल्डिंग करण्यात. प्रदूषणविरहित स्वच्छ थंड हवा, मोकळा परिसर आणि पोटभर अन्न यामुळे मुलं टवटवीत दिसतात.

डॉ. कुडीया सांगू लागले, ‘‘हे वंचित, निराधार, विस्कळीत कुटुंबातील मुलांचे वसतिगृह आहे. विशेषत: ज्यांना आई नाही त्यांना आम्ही प्राधान्याने प्रवेश देतो. या मुलांमध्ये आत्मविश्वास भरण्याचा मी प्रयत्न करतोय. कोणापुढे हात पसरायचा नाही आणि कितीही बिकट प्रसंग ओढवला तरी कोणावर हात उगारायचा नाही या दोन गोष्टी मी त्यांना शिकवत राहतो. विश्वास गुंड, कविता सत्तुरवार, अक्का.. अशा समविचारी व्यक्तींच्या साथीने लढतोय पण कधी कधी खूप मेहनत घेऊन मार्गाला लागू पाहाणारी मुलं रस्त्यावरचं स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी पळून जातात. आपल्याबरोबर आणखी तीन/चार जणांनाही घेऊन जातात (त्यांना मी शोधून शोधून परत आणतो.). कधी मुली मोठय़ा झाल्या की त्यांच्या आया व नातेवाईक खोटं-नाटं सांगून त्यांना नेतात आणि वेगवेगळ्या कामाला (?) लावतात. नंतर त्यांना खूप वाईट अवस्थेत जगताना पाहिलं की नैराश्य येतं. पण थोडाच वेळ. तेवढय़ात कोणाचा तरी फोन येतो.. ‘ इधर आव जल्दी, तुम्हारे बहन को कोई मार रहा है!’ पत्ता बहुधा एखाद्या गुत्त्याचा असतो. त्या मानलेल्या बहिणीला वाचविण्यासाठी माझे पाय आपोआप मोटारसायकलकडे वळतात. जाता जाता मनाची समजूत घालतो.. आपलं काम अशांसाठीच आहे, ज्यांना आपलं भलंबुरं समजत नाही, आपले निर्णय घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी उभं राहायला हवं. प्रसंगी लोकांचं वागणं सहन करायला हवं. मी हे सगळं माझ्या देशासाठी करतोय. कारण माझ्या देशावर माझं प्रेम आहे. हे करता करता काही आयुष्यांत जरी अर्थ भरता आला तरी माझं आयुष्य सार्थकी लागलं असं मला वाटेल..’’

तुमचंही आयुष्य सार्थकी लागावं असं वाटतंय ना? मग फिरवा हा फोन..

डॉ. अनिल कुडीया – ९८२२४९०७०६

arthak.anilk@gmail.com

waglesampada@gmail.com