बोलता बोलता एकीकडे सर्वाचे हात चालूच होते. अंतिम टप्प्यातील ऐरणीवर आलेली कामं.. रोजची जागरणं.. खाण्यापिण्याची शुद्ध हरपलेली.. सतत घणघणणारे ग्राहकांचे/विक्रेत्यांचे फोन.. ‘येथे भान हरावे’ असं हे वातावरण. गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पेण येथील गणेशाची मूर्ती बनवणाऱ्या पती-पत्नींची उत्सवपूर्व लगबग आणि परंपरा जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

‘गणपती आणायचे तर पेणचे’ हा लौकिक कानांवर असल्यामुळे गणेशाची मूर्ती बनवणाऱ्या पती-पत्नींची उत्सवपूर्व लगबग जाणून घेण्यासाठी मी अलीकडेच अगदी ठरवून पेण गाठलं. एस.टी. स्टँडसमोरील बाजाराचा रस्ता पार करून गावात शिरल्याबरोबर गल्ल्यांच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने उभ्या असलेल्या घराघरांतून गणपतींचं दर्शन घडू लागलं. गांगल आळी, कुंभार आळी, कासार आळी, हनुमान आळी.. सगळीकडे गणपतीचे कारखानेच सुरू होते. काही मूर्ती कच्च्या काही रंगवलेल्या, तर काही गणपती अगदी निघायच्या तयारीत. अशा भारलेल्या वातावरणात सर्वप्रथम या गणेश इंडस्ट्रीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवधर कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील शिल्पकार आनंद नारायण (राजाभाऊ) देवधर व त्यांच्या पत्नी विद्याताई यांची भेट घेतली.

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
how to use coconut oil
पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ तेल वापरून पाहा, तेलात फक्त मेथी दाणे टाकून करा केसांची मालिश
how to Make green chili pickle
घरच्या घरी झटपट बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं! जेवणाबरोबर तोंडी लावा, नोट करा सोपी रेसिपी
how to water a plant tips in marathi
Garden tips : उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याची योग्य वेळ काय? रोपांच्या वाढीसाठी पाहा ‘१०’ टिप्स

देवधरांचं घराणं कलाकारांचं. गणपती बनवण्याची त्यांची परंपरा शंभर वर्षांची. जोडलेल्या ग्राहकांची ही सध्याची चौथी पिढी. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात कोकणातून पोट भरण्यासाठी म्हणून अनेक शिक्षित, अर्धशिक्षित मंडळी मुंबई-पुण्याकडे आली. भिकाजीपंत देवधर हे त्यापैकी एक. मात्र कोणा नातेवाईकामुळे शहराकडे न जाता ते पेणला आले आणि गणपती करायला शिकले. अशा प्रकारे देवधरांच्या घरात गणरायाने जे बस्तान बसवलं ते आजतागायत तसंच आहे. भिकाजीपंतांनी रचलेल्या या पायावर कळस चढवला तो त्यांच्या तिसऱ्या पिढीतील राजाभाऊ देवधर या प्रतिभेचा स्पर्श लाभलेल्या कलावंताने. आनंद देवधर म्हणाले, ‘‘मूर्ती बनविण्यासाठी साचा तयार करताना रबराचा उपयोग करण्याची कल्पना प्रथम दादांना (राजाभाऊ) सुचली आणि त्यांनी अथक परिश्रमांनी रबराचा साचा बनवला. आजही साचा बनविण्याची तीच पद्धत प्रचलित आहे. हा साचा बनवण्याचं काम अत्यंत गुप्तपणे चाले. जवळ जवळ १२ र्वष हे गुपित राहिलं ज्यामुळे आमचा व्यवसाय प्रगतिपथावर गेला..’’ ते म्हणाले की, ‘‘गणपती विकण्यासाठी दलाल नेमण्याची कल्पनाही राजाभाऊंचीच. त्यामुळे अल्पावधीतच मुंबई-पुण्यापासून सोलापूपर्यंत विक्रेत्यांची मालिका तयार झाली आणि हा व्यवसाय चांगला स्थिरावला.’’

देवधरवाडय़ापासून चालत ५ मिनिटांच्या अंतरावर ‘प्रभात कलामंदिर’ हे तीनमजली कलादालन आहे. तळमजल्यावर देवधर पितापुत्रांनी (राजाभाऊ व आनंद) गेल्या ६० वर्षांत घडवलेल्या महर्षी व्यासांपासून कुसुमाग्रजांपर्यंत आणि ज्ञानेश्वरांपासून डॉ. हेडगेवारापर्यंत अनेक प्रेक्षणीय मूर्ती आहेत. यातील व्यासांच्या डोळ्यातील धग अशी की, आपण त्याकडे दोन मिनिटंही पाहू शकणार नाही. कलादालनाचे वरचे दोन्ही मजले गणपतींनी व्यापलेले दिसले. पहिल्या माळ्यावर मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरू होतं. तयार मूर्ती बाजूच्या लाकडी घडवंच्यांवर (शेल्फ) विराजमान झाल्या होत्या. हारीने बसलेल्या त्या साजिऱ्यागोजिऱ्या प्रतिमा पाहून मनात भक्तिभाव दाटून आला. गौरींचे मुखवटेही नटूनथटून सज्ज होते. विद्याताईंची गडबड सुरू होती. त्या दिवशी जाणाऱ्या मूर्तीचं त्यांच्या देखरेखीखाली पॅकिंग सुरू होतं. म्हणाल्या, ‘‘देवधरांच्या घरी येईपर्यंत मला या कलेचा गंधदेखील नव्हता, पण हळूहळू मूर्तिकामाशिवाय बाकी सर्व कामं म्हणजे रंग देणे, झिलाई.. इत्यादी जमू लागली.

पत्नीच्या भूमिकेचं महत्त्व सांगताना आनंद देवधर म्हणाले, ‘‘मूर्ती बनवण्याचं काम माझं, परंतु कच्च्या मालाची खरेदी, ऑर्र्डस घेणं, त्या वेळेवर जातायत ना याकडे लक्ष ठेवणं, कामगारांचा हिशेब सांभाळणं, ग्राहकांना जोडून ठेवणं.. ही आजूबाजूची सगळी जबाबदारी विद्याची.’’ त्यांनी आवर्जून सांगितलं की, ‘‘मध्यंतरी ते सलग ३ र्वष केरळमधील एका मंदिरातील मूर्ती बनवण्यात व्यस्त होते. तेव्हा इथला संपूर्ण व्याप तिनेच सांभाळला.’’

१९७४-७५ मध्ये देवधरांच्या कलादालनात साडेसात ते आठ हजार गणपती तयार व्हायचे, पण जे.जे.मधून शिकून आलेल्या आनंद देवधर यांनी शिल्पं बनविण्याकडे (चिरकाल टिकणारी) लक्ष केंद्रित केल्याने ही संख्या आता दीड ते दोन हजारांवर आलीय. सध्या तयार होणारे बहुतेक सर्व गणपती वर्षांनुवर्षांच्या परंपरेचे.

आतापर्यंत ३०० ते ४०० जण देवधरांकडून मूर्तिकाम शिकून गेले आहेत. आनंद देवधर अभिमानाने सांगतात की, ‘‘पेणमध्ये गणपतीचे जे तीनेकशे कारखाने आहेत त्या कुटुंबातील कोणी ना कोणी आमच्याकडे काम करत होतं असं तुम्हाला आढळेल. आपल्या माणसाला मदतीचा हात देऊन सक्षम करण्याची देवधरांची परंपरा आजही

सुरूच आहे.’’

यातील संतोष पाटील व त्याची पत्नी अरुणा यांची देवधरवाडय़ातच भेट झाली. गेल्या वीस वर्षांपासून तो इथे कामाला आहे. ओतकाम, पॉलिश, रंगकाम.. इत्यादी सगळं शिकला आणि मग रंगकामात तरबेज झाला. गेल्या ५ वर्षांपासून त्याने अरुणाच्या मदतीने कच्चे गणपती आणून विकण्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केलाय. तेवढे २-३ महिने तो देवधरांच्या कामातून रजा घेतो. (साच्यातून काढून कच्चे गणपती बनवण्याचा उपव्यवसायही पेणच्या आसपासच्या हमरापूर, शिरळी, जोहा.. अशा अनेक गावांतून जोरात चालतो.) संतोषने अरुणालाही रंगकामातील खुबी शिकवलीय. दोघं मिळून हंगामात दीडशे ते पावणेदोनशे गणपती रंगवून लाख/ सवा लाख रुपयांचा व्यवसाय करतात.

राजाभाऊंच्या प्रोत्साहनाने स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास उद्युक्त झालेल्या माधवराव फाटक यांची दुसरी पिढी म्हणजे विजय व दीपक हे बंधू आता सहधर्मचारिणींच्या साथीने हे व्रत पुढे नेत आहेत. माधवराव खरं तर एके काळी माधुकरी मागून शिकलेले, पण बोटातील कला आणि मनगटातील जिद्द या जोरावर त्यांनी फोटो व चित्रांवरून गणपतीची अनेक रूपं (मॉडेल्स) तयार करवली व अपार कष्टाने पेणमध्ये स्वत:ची वास्तू उभी केली.

दीपक यांची जोडीदारीण मनीषा शिक्षकी पेशा सांभाळून पतीला मदत करते, तर विजय यांची पत्नी जान्हवीने व्यवसायात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलंय. बघायला गेलं तर ही फॅशन डिझायनिंग शिकलेली पुण्याची मुलगी; परंतु दुधात साखर विरघळावी तशी घरच्या व्यवसायात एकरूप झालीय. मूर्तीच्या रंगकामाबरोबर आखणीही (डोळे रंगवण्याचं काम) उत्तम करते. म्हणाली, ‘‘यासाठी मला माझ्या शिक्षणाचा उपयोग झाला. आखणी करताना डोळ्यातील बुबुळं काळजीपूर्वक मधोमध रेखाटावी लागतात, जेणेकरून देवापुढे हात जोडणाऱ्या प्रत्येक भक्ताला वाटायला हवं की, बाप्पा माझ्याकडेच बघतोय. माझं ऐकतोय.’’ तिने असंही सांगितलं की, ‘‘नमस्कारासाठी देवाचा उजवा पाय चटकन दिसावा अशीही लोकांची अपेक्षा असते.. या गोष्टी ध्यानात ठेवूनच काम करावं लागतं.’’ त्यांचा आठ वर्षांचा अथर्वही साच्यातून उंदीर बनवतो आणि रंगवतोदेखील. स्वत: बनवलेल्या उंदरांचा एक बॉक्सच त्याने माझ्यासमोर ठेवला.

शून्यातून विश्व उभं करणाऱ्या आपल्या वडिलांचा दोन्ही भावांना विलक्षण अभिमान आहे. विजय म्हणाले, ‘‘पूर्वी गणपतींच्या मूर्तीवर विक्रीकर आकारला जाई, परंतु वडिलांनी पेणमधील सर्व मूर्तिकारांना एकत्र केलं आणि ते तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भेटले. त्यांनी न्याय दिला. तेव्हापासून महाराष्ट्रात पूजेच्या गणपतींवरील विक्रीकर रद्द झाला. तसंच उत्कृष्ट व्यवसाय केल्याबद्दल ज्या बँकेकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं त्या पेणच्या ‘बँक ऑफ इंडिया’ने त्यांचा सत्कारही केला..’’ आता विजय यांनी एक पाऊल पुढे टाकत सी.सी.टी.व्ही.मार्फत लांबलांबच्या ग्राहकांना आपल्या मूर्तीचं सुरू असलेलं काम बघण्याची सोय केलीय. ते दरवर्षी पाच ते सहा हजार गणेशमूर्ती बनवितात. त्यामुळे ८ ते १० माणसांना रोजगार मिळतो

कासार आळीतील सतीश समेळ यांच्या कारखान्यात डोकावले तेव्हा त्यांच्या २०० मूर्ती मंडणगडला निघाल्या होत्या. ती गडबड शांत झाल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. या कुटुंबातील तिघेही म्हणजे स्वत: सतीश, पत्नी, सुजाता व मुलगा हर्षद पूर्णवेळ या व्यवसायात असल्यामुळे त्यांच्याकडे हंगामापुरती २-३ माणसंच कामाला असतात. सतीश समेळ पूर्वी पेण अर्बन को. ऑप. बँकेत नोकरीला होते. तेव्हाही नोकरी सांभाळून १५ र्वष ते हा व्यवसाय करतच होते. त्यामुळे बँक बंद पडल्यावरही त्यांचं निभावून गेलं. त्यांची पत्नी सुजाता मुंबईची. बोलण्यात चटपटीत. त्यामुळे मार्केटिंगमध्ये हुशार.  इथली इतरंही अनेक कामं करते. हर्षद आखणीमध्ये एक्स्पर्ट. त्यांचं या बाबतीतील कौशल्य सांगण्यासाठी एकच दाखला पुरेसा आहे. तो म्हणजे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन गेल्याच वर्षी त्याला आपल्या घरच्या गणपतीचे डोळे रेखाटण्यासाठी घेऊन गेले होते.

सतीश समेळ यांनी गणपती कसा बनतो, झिलाईसाठी, रंगवण्यासाठी कोणतं साहित्य/ साधनं लागतात याची सविस्तर माहिती दिली. पेणमध्ये हा व्यवसाय फोफावण्याचं कारण सांगताना ते म्हणाले की, ‘‘मुख्य म्हणजे या व्यवसायाला जागा खूप लागते. (मूर्ती ठेवण्यासाठी) शिवाय कमी पैशांत उपलब्ध होणारं मनुष्यबळ. या दोन्ही गोष्टी खेडय़ातच शक्य असल्याने देवधरांनी मुहूर्तमेढ रोखल्यावर पेण म्हणजे गणपती हे समीकरण रूढ होऊ शकलं. मात्र आता रेल्वे पेणचं दार ठोठावू लागल्याने भविष्यात हे चित्र असंच राहील का, याबाबत त्यांनी शंकाही व्यक्त केली.

बोलता बोलता एकीकडे सर्वाचे हात चालूच होते. अंतिम टप्प्यातील ऐरणीवर आलेली कामं.. रोजची जागरणं.. खाण्यापिण्याची शुद्ध हरपलेली.. सतत घणघणणारे ग्राहकांचे/विक्रेत्यांचे फोन.. ‘येथे भान हरावे’ असं हे वातावरण तरीही माझ्या मनात नेहमीचा व्यावहारिक प्रश्न आलाच.. वर्षभर मेहनत करणाऱ्या या मध्यम स्वरूपाच्या गणपती व्यावसायिकांचं पोट केवळ या एक-दोन महिन्यांच्या कमाईतून भरत असेल? मूर्तीची किंमतही मुंबई-पुण्याच्या तुलनेत किती तरी कमी.. झालंच तर कच्च्या मालासाठी उचललेल्या पैशांची परतफेडही त्याच पैशातून.. यावर मिळालेलं उत्तर तुम्हाआम्हाला अंतर्मुख करणारं. मंडळी म्हणतात, ‘‘ही वस्तुस्थिती समजूनच आम्ही खर्च करतो. शिवाय मुळात गरजा किती वाढवायच्या ते आपल्याच हातात असतं नाही का?’’ हे शब्द ऐकताना वाटलं, जे मिळेल ते त्यात आनंदी, समाधानी राहायचं हे वरदान त्यांना तो वरदविनायक तर देत नसेल?

संपर्क – आनंद देवधर – ९४२२०९५७९०

विजय फाटक – ९८५०३५४५७१

संपदा वागळे

waglesampada@gmail.com