आसामच्या पार्वतीपूर या छोटय़ाशा गावातल्या मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या वाटेवर नेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अशोक आणि अलका वर्णेकर हे मराठमोळं जोडपं गेल्या २५ वर्षांपासून करीत आहे. त्यांच्या या अथक भगीरथ प्रयत्नांची फळं दिसू लागली असून इथली मुलं आता ठामपणे म्हणताहेत.. ‘होगा दूर घना अँधीयारा, होगा निश्चित नया सवेरा।’

पूर्वाचलचं नाव घेतलं की, कोणाच्या नजरेसमोर अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्किम.. अशा ठिकाणचं सृष्टिसौंदर्य उभं राहातं, तर कोणाला आसामच्या डोंगरउतारावर गालिच्याप्रमाणे पसरलेले चहाचे मळे दिसू लागतात.. इतकंच नव्हे तर उल्फा/बोडो संघटना, बांगलादेशी घुसखोरदेखील आठवतात; परंतु इथल्या सुपीक, पण दलदलयुक्त जमिनीला स्वत:च्या रक्ताचं पाणी करून सुजलाम-सुफलाम बनवणाऱ्या आसाममधील चहाच्या मळ्यातील मजुरांचं मात्र कोणाला फारसं स्मरण होत नाही.
खरं तर या मजुरांची संख्या प्रचंड आहे. (आसामच्या एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश) मात्र दारिद्रय़, मागासलेपण, शिक्षणाचा अभाव व बालमजुरी यामुळे यांचं आयुर्मान ५० वर्षांच्या आसपासच थांबलंय. काही महिन्यांपूर्वी घुसलेले बांगलादेशीही आज इथे स्थानिक गणले जातात आहेत, परंतु या भूभागात पावणेदोनशे र्वष राहणाऱ्या या ‘सदानी’ भाषिक समाजाला आजही बाहेरचं मानलं जातंय. मात्र पिढय़ान्पिढय़ा गुलामीचं जीवन जगणाऱ्या या उपेक्षित समाजाला शिक्षणाच्या वाटेने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आसामच्या लखीमपूर जिल्हय़ातील पार्वतीपूर या छोटय़ाशा गावात गेल्या २५ वर्षांपासून एक प्रयोग केला जातोय.. एक मराठमोळं जोडपं, अशोक श्रीधर वर्णेकर आणि अलका वर्णेकर हे या अभिनव चळवळीचं जनक आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांची फळं आता दिसू लागली आहेत. ‘भास्कर संस्कार केंद्र’, ‘भास्कर ज्ञानपीठ’ व ‘सदानी भाषा युवा मंच’ यांच्या माध्यमातून या समाजाच्या नव्या पिढीतील मुलांची पावलं आता आत्मविश्वासाने प्रगतिपथावर पडत आहेत.
मूळचे नागपूरकर असणाऱ्या या दोघांचं लग्नानंतर मुंबईत तसं छान चाललं होतं. उत्तम शिक्षण, उत्तम नोकरी, दोघंही आकडेतज्ज्ञ (एम.एस्सी. स्टॅटिस्टिक) अशोककडे एम.ए. इकॉनॉमिक्स ही आणखी एक पदवी. दोघांचा सामाईक गुणधर्म म्हणजे साधेपणाची व सामाजिक कामांची आवड. अशोकच्या घरची संघाची पाश्र्वभूमी. त्यामुळे मुंबईचा लोकल प्रवास व नोकरी यात त्यांचा जीव रमेना. या मन:स्थितीत विवेकानंद केंद्राची एक जाहिरात त्यांच्या वाचनात आली. त्यात उच्चशिक्षित तरुणांना अरुणाचलमधील विवेकानंद केंद्राच्या शाळांतील मुलांना शिकवण्यासाठी येण्याचं आवाहन केलं होतं. ही संधी साधून वर्णेकर पती-पत्नी १९८० मध्ये या निसर्गरम्य ठिकाणी दाखल झाली. या राज्यात शिक्षण क्षेत्रातील विविध ठिकाणी काम करताना हां हां म्हणत ८ र्वष निघून गेली. या परिसराच्या प्रेमात पडल्याने नंतर त्यांनी इथेच स्थायिक व्हायचं ठरवलं. अरुणाचलच्या सीमेबाहेरील (बाहेरच्या व्यक्तीस इथे कायमचं राहण्यास मनाई असल्याने) आसाममधील पार्वतीपूर (नं. २) नामक खेडय़ात एक एकर जमीन घेतली. १९८८ च्या नोव्हेंबर महिन्यापासून आपल्या दोन लहान मुलांसह वर्णेकरांचं चौकोनी कुटुंब या जागी बांबू व गवताची झोपडी उभारून राहू लागलं.
इथे आल्यावर मात्र जे चित्र दिसलं ते अस्वस्थ करणारं. ती वस्ती होती चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या गरीब मजुरांची. गावात शिक्षण शून्य. कित्येक पिढय़ा गुलामीत पूर्ण दबलेल्या. अंगभर कपडे (पॅन्ट, साडी) घातलेल्या या दोघांशी बोलतानाही लोक घाबरायचे. त्यांची ही केविलवाणी स्थिती पाहून दोघांनीही एकमताने निर्णय घेतला. आता पुढचं आयुष्य या आपल्या देशबांधवांच्या उन्नतीसाठीच व्यतीत करायचं.
ठरलं खरं, पण समोर अडचणींचा डोंगर होता. त्यांची भाषा येत नव्हती. संध्याकाळी गाणी, प्रार्थना म्हणायला सुरुवात केली की, मुलं दारात येऊन उभी राहात. हळूहळू खेळ सुरू केले. मुलं सहभागी होऊ लागली आणि भास्कर संस्कार केंद्राला सुरुवात झाली. येणारी मुलं १२ ते १६ वयोगटातली. दिवसा वेगवेगळ्या कामांत व्यस्त. संध्याकाळी यांच्याकडे येत. गाणी, गोष्टी, खेळ, प्रार्थना यात २ महिने गेले. त्यानंतर एकदा अशोकनी प्रश्न टाकला- ‘‘आप लोग पढोगे क्या?’’ उत्तर नाही, पण चेहऱ्यावर हास्य. मग अरुणाचलमधील मित्राच्या स्टेशनरी दुकानातून ‘नाकाम’ झालेल्या पाटी-पेन्सिली आणून कंदिलाच्या उजेडात रात्रशाळा सुरू झाली. सोबत गाणी-गोष्टी असल्यानं त्यांना लिहिणं-वाचणं आवडू लागलं. मुलांची संख्या वाढत ४०/५० वर स्थिरावली. कंदिलाची जागा पेट्रोमॅक्सने घेतली. रात्री नऊ-साडेनऊला दूरच्या मुलामुलींना घरी सोडायला गेल्यामुळे पालकांशी संपर्क तर वाढलाच, शिवाय त्यांच्यावरील विश्वासही.
लहान लहान मुलांचीही पावलं जेव्हा शाळेकडे वळायला लागली तेव्हा वर्णेकरांनी दोन मोठय़ा मुलांना व मुलींना निवडून त्यांना शिक्षक बनवलं आणि ‘भास्कर ज्ञानपीठ’ ही चौथ्या वर्गापर्यंतची शाळा बांबूच्या इमारतीत सुरू झाली. रोज रात्री संस्कार केंद्र संपल्यावर शिक्षकांची उद्याची तयारी व्हायची. त्यासाठी अशोकनी महिन्या-महिन्याचा अभ्यासक्रम आखला. सकाळी साडेसहा ते साडेदहा शाळा. शेवटचा तास स्नानाचा. यासाठी विहिरीतून पाणी काढण्याची जबाबदारी अशोक यांची, तर मुलांना साबण लावून आंघोळ घालण्यासाठी अलकाताईंनी पदर खोचलेला. शिवाय दर शनिवारी नखं/केस कापणं, फाटलेले कपडे शिवणं, मळके कपडे धुणं या कार्यक्रमांवर देखरेखही अलकाताईंचीच. शिक्षक कम् मुलं सकाळी दहापर्यंत विनावेतन शिकवून ११ ते ४ मध्ये छोटे छोटे उद्योग करत. मोत्यांच्या माळा बनवणं, बुक बाइंडिंग, काँक्रीटच्या विटा पाडणं.. असे विजेशिवाय चालणारे व्यवसाय या मुलांना दर उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरला कोणाकोणाच्या घरी ठेवून शिकवले. विक्रीची धुराही अर्थात वर्णेकर दाम्पत्यावरच. पोटापाण्याच्या उद्योगानंतर घरची कामं आटोपून मुलं/शिक्षक रात्री पुन्हा शिकायला तयार.
गाडी हळूहळू रुळावर येत असताना अचानक मोठा आघात झाला. एका कार अपघातात अशोक यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर आई अंथरुणाला खिळली. ६ र्वष नागपूरला राहून दोघं परतले तेव्हा शाळा कशीबशी सुरू होती, पण परिस्थिती बिकट होती. अशा वेळी दोघांचे नागपुरातील मित्रमैत्रिणी, नातेवाईक पाठीशी उभे राहिले आणि ‘उत्थान चॅरिटेबल फाऊंडेशन’ची स्थापना झाली. या पाठबळावर शाळेला पुन्हा उभारी मिळाली. आज या भास्कर ज्ञानपीठातील बालवर्ग ते पाचवीच्या २०० विद्यार्थ्यांना आठ शिक्षक शिकवताहेत. आजही या शाळेची महिन्याची फी आहे ३० रुपये, तर शिक्षकांचा पगार फक्त एक हजार रुपये.
अर्धनिवासी संस्कार शिबीर, भास्कर ज्ञानपीठ याबरोबरच माजी विद्यार्थ्यांनी सर व बाईदेव (दीदी अलकाताई) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सदानी भाषा युवा मंच’चीही स्थापना केली. या युवकांच्या प्रयत्नांमुळे दारूचे अतिसेवन, बालमजुरी, बालविवाह आदी वाईट चालीरीतींना आळा बसलाय. शिवाय शिक्षणाचं महत्त्व, आपलं घर नीट ठेवणं, एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, देशाबद्दल जाणून घेणं, राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग.. अशा विषयांत इथले लोक रस घेऊ लागलेत. ही चळवळ आता आसपासच्या आठ गावांमध्येही फोफावलीय.
आता चित्र बदललेलं असलं तरी सुरुवातीच्या कठीण काळात त्यांच्या मुलांनीही कशी साथ दिली ते सांगताना अलका वर्णेकर म्हणाल्या की, ‘‘आम्ही पार्वतीपूरला राहायला आलो तरी मुलं त्यांच्या अरुणाचलमधील केंद्रीय विद्यालयातच जात होती. ही शाळा आमच्या या घरापासून २१ कि.मी. लांब. आमचा मोठा मुलगा तेव्हा होता पाचवीत आणि मुलगी दुसरीत. हा आमचा पाचवीतला मुलगा शाळेत जाताना लहान बहिणीला सायकलवर डबलसीट घेऊन २ कि.मी.वरच्या बसस्टॉपवर जायचा. तिथे ओळखींच्याकडे सायकल ठेवून मग बसचा प्रवास. उतरल्यावर एक कि.मी. चालल्यावर मग शाळा. या प्रकारे शाळेत जायला दीड ते पावणेदोन तास लागत, यायलाही तितकाच वेळ. कधी वाटेत दरडी कोसळल्या, तर बूट हातात घेऊन चिखलातून चालायचं..’’ अशा अवघड परिस्थितीत आनंदाने राहिलेली त्यांची मुलं आता उत्तमरीत्या मार्गस्थ झालीत. मुलगा आय.टी. इंजिनीयर होऊन पुण्यात स्थिरावलाय, तर मुलगी इंडियन एअर फोर्समध्ये पायलटची डय़ुटी निभावतेय.
संपूर्ण सदानी समाजालाच वर्णेकरांनी कसं आपलंसं केलं याचीही एक गंमत आहे. चारी बाजूने नडलेल्या या लोकांनी लग्न करायचं म्हटलं तरी गावातील पुरोहितांची फी त्यांना न परवडणारी. त्यामुळे ही मंडळी लग्नाशिवाय एकत्र राहात. त्यामुळे सामाजिकरीत्या एकत्र वावरण्यावर बंधनं येत. यासाठी वर्णेकरांनी दोन युवकांना नागपुरात आणून लग्नविधी शिकवण्यासाठी पाठवलं. या विधीत सदानी भाषेतील नाचगाणी मिसळून त्याचाही नवा अभ्यासक्रम बनवला आणि केवळ १०१ रुपयांत अनेक लग्ने लागली. एकाच मांडवात दोन पिढय़ांवर अक्षता पडल्या. या वाटचालीत कसोटीचे क्षणही अनेक आले, पण कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रसंग तरून गेला.
अशोक व अलका या उभयतांच्या कष्टाला आलेलं फळ नागपूरकरांना अलीकडेच म्हणजे २०१५ च्या जुलैमध्ये पाहायला मिळालं. नागपूरमधल्या विविध संस्थांमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात या सदानी समाजातील मुलांनी ४० ते ५० संस्कृत श्लोक अर्थासकट म्हटले. तसंच इंग्रजी/हिंदीमधून सांगितलेल्या आसामातील ऐतिहासिक महापुरुषांच्या गोष्टी, खणखणीत स्वरात म्हटलेला गीतेचा १५ वा अध्याय, योगासनांची प्रात्यक्षिकं, शिस्तबद्ध कवायत, कथ्थक/कोळी नृत्यं.. सगळंच कसं दृष्ट लागण्याजोगं. तीन दिवस चाललेला त्यांचा हा कौशल्य दर्शन सोहळा प्रसिद्धी माध्यमांनीही टिपला. यापेक्षाही मोठं समाधान म्हणजे चवथ्या/पाचव्या वर्गातून बाहेरगावी शिकायला गेलेल्या मुलामुलींपैकी काही उत्तम शिक्षण घेऊन बरेच पुढे गेलेत, तर इथेच शिक्षण घेतलेल्या काहींनी पोलीस/शिक्षक अशा वाटा निवडून गुलामीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवलीय.
अलका वर्णेकर म्हणाल्या की, ‘‘हे सर्व घडू शकलं ते आम्हा दोघांमधील साहचर्याने व सामंजस्याने. उपक्रमांच्या आखणीत अशोकचा सिंहाचा वाटा, तर ती योजना अमलात आणण्यात माझा. शिवाय गणिताचे अभ्यासक असल्याने उपलब्ध सामग्रीतून उत्तर (सोल्यूशन) काढण्याचं तंत्र दोघांनाही अवगत. कमीत कमी गरजा व जास्तीत जास्त तडजोडी हा आमच्या जगण्याचा फॉम्र्युला. ‘या बांधवांना पुढे आणायचं’ या एकाच ध्यासाने सुचेल ते करत गेलो, बदल्यात भरभरून प्रेम मिळालं आणि परिवर्तनाला सुरवात झाली.’’ म्हणूनच पूर्वी.. चारों ओर घना अँधीयारा पंथहीन है समाज सारा, कभी न होगा यहाँ सवेरा.’ म्हणणारी इथली मुलं आता ठामपणे म्हणताहेत..
होगा दूर घना अँधीयारा, होगा निश्चित नया सवेरा।
हाँ यही भाग्य है मेरा, हाँ यही है स्वप्न है मेरा

या देवकार्याला हातभार लावण्यासाठी
संपर्क- अशोक वर्णेकर
०९९५७८१०२१०
ashok@warnekar.net
utthanct@gmail.com
waglesampada@gmail.com