पुण्याचे अशोक बसेर व भाग्यश्री बसेर, दोघेही सत्तरी पार केलेले, योगसाधनेतून स्वत:ला गवसलेला आनंदाचा, आरोग्याचा ठेवा इतरांनाही मिळवून देण्याचा त्यांनी वसा घेतलाय. गेली २१ वर्षे ते या सेवेत कार्यरत असून आज पुण्यासह राज्यभरातील १६६ केंद्रांत सुरू केलेले व हजारो साधकांसाठी नियमितपणे चालणारे योगवर्ग व त्यासाठी घडवलेले ३५० ते ४०० कार्यकर्ते ही बसेर दाम्पत्याची आजवरची पुण्याई. मानवतेच्या सेवेसाठी नि:स्वार्थीपणे चाललेलं हे बसेर पती-पत्नीचं काम, निवृत्तीनंतर पुढे काय, या प्रश्नाचं ओझं घेऊन जगणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावं.

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या या पंक्तीतील आशय जगण्यात आणणारी एक जोडी म्हणजे पुण्याचे अशोक बसेर व भाग्यश्री बसेर. सत्तरी पार केलेल्या (अशोकजी ७८ वर्षे व भाग्यश्रीताई ७२ वर्षे) या दोघांशी बोलताना त्यांच्या वागण्यातील सौजन्य, विचारांची प्रगल्भता आणि हृदयातील स्नेहाचा झरा सतत जाणवत राहतो. योगसाधनेतून स्वत:ला गवसलेला आनंदाचा, आरोग्याचा ठेवा इतरांनाही मिळवून देण्याचा त्यांनी वसा घेतलाय. भारतीय योग संस्था या ५० वर्षांची परंपरा असणाऱ्या मूळ दिल्लीच्या सेवाभावी संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात विनामूल्य योगप्रसार करण्याचं कार्य ते गेली 21 वर्षे करत आहेत. आज पुण्यासह मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर येथील एकूण १६६ केंद्रांत सुरू केलेले व नियमितपणे चालणारे योगवर्ग व त्यासाठी घडवलेले ३५० ते ४०० कार्यकर्ते ही बसेर दाम्पत्याची आजवरची पुण्याई. मानवतेच्या सेवेसाठी नि:स्वार्थीपणे चाललेलं हे बसेर पती-पत्नीचं काम, निवृत्तीनंतर पुढे काय, या प्रश्नाचं ओझं घेऊन जगणाऱयांसाठी प्रेरणादायी ठरावं.

बसेर दामप्त्य मुळातच तब्येतीविषयी प्रचंड जागरूक. सारसबागेत दररोज फिरायला जाण्याचा त्यांचा नेम. त्यांच्या जीवनाला टर्निंग पॉइंट मिळाला तोही याच ठिकाणी. १९६६ चा तो काळ. भारतीय योग संस्थेचे संस्थापक प्रकाशलाल यांनी देश-विदेशात योगप्रसार करण्यासाठी अनेक राज्यांत, देशांत आपले कार्यकर्ते पाठवले होते. त्यातील चार जणांनी पुण्यात येऊन सारसबागेत फिरायला येणाऱयांना योगाभ्यास शिकवायला सुरुवात केली. बसेर जोडपंही कुतूहलाने या वर्गाला बसू लागलं. त्यांची शिकवण्याची पद्धत व उद्देश बघून दोघंही प्रभावित झाले. शिक्षक कार्यकर्त्यांच्या सराईत नजरेने यांना हेरलं व संस्थेच्या कामाची पूर्ण माहिती देऊन ‘अब ये क्लास तुमही संभालो…’ म्हणत त्या वर्गाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकून ते परत गेले.

आता खरी परीक्षा होती. तोवर ९० साधक वर्गाला येत होते, पण आपल्याबरोबरच शिकणारे शिक्षकाच्या भूमिकेत दिसल्यावर ही संख्या रोडावत एकदम खाली सातवर आली. अशोकजी म्हणतात, “तरीही आम्ही चिकाटी सोडली नाही. टिकून राहिलो. हळूहळू लोकांचा विश्वास मिळत गेला. मग शिबिरांचा धडाका सुरू केला. त्यातून कार्यकर्ते मिळाले. त्यांना रोज दीड तास याप्रमाणे महिनाभर प्रशिक्षण दिलं. त्यामुळे साधकांची संख्या वाढली.” त्या वेळी वर्गावर्गांत अध्ययन सूचना देण्याचं काम अशोकजी करत, तर प्रात्यक्षिकांची जबाबदारी भाग्यश्रीताइभकडे होती. अशा मेहनतीमुळे आज पुण्यात निगडी ते मांजरी व कात्रज ते लोहगाव अशा चारही दिशांना संस्थेचे एकूण ८१ वर्ग सुरू आहेत. यात वेगवेगळ्या शाळा, शासकीय कार्यालयं, कंपन्या, महिला वसतिगृह, व्यसनमुक्ती केंद्र, नारी सुधारगृह, उद्यानं… अशी अनेक ठिकाणं अंतर्भूत आहेत.

महाराष्ट्रात भारतीय योगसंस्थेची मुळं रुजवणारे अशोकजी संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, तर भाग्यश्रीताई संघटनमंत्री. प्रत्येक वर्गात आसन, प्राणायाम व ध्यान यांचा नियमित अभ्यास व

२ महिन्यांतून एकदा शुद्धिक्रिया करवून घेतली जाते. तसेच विविध रोगांपासून मुक्ती देणारी शिबिरेही आयोजिली जातात. हे वर्ग रोज एक तास याप्रमाणे वर्षाचे ३६५ दिवस कोणताही मोबदला न घेता चालवण्यात येतात. साधकाने सफेद पेहरावात यावं व येताना एक सतरंजी व पांढरी चादर घेऊन यावं एवढीच अपेक्षा. या वस्तू संस्थेतर्फेही अल्प दरात उपलब्ध करण्यात येतात. या वर्गांचा रोजचा अभ्यासक्रम, साधकाने पाळायचे नियम, केंद्रप्रमुखाची जबाबदारी, नवे केंद्र स्थापन करण्यासंबंधीची समग्र माहिती, संस्थेचे विविध उपक्रम, हिंदी-मराठी शब्दकोश (सूचना कळण्यासाठी)… अशा सर्व संदर्भात अशोकजींनी परिश्रमपूर्वक माहितीपत्रकं बनवली आहेत. त्यातील बारीकसारीक तपशील वाचताना त्यांचं समर्पण उमजत जातं. या अभ्यासपूर्ण योगदानासाठी त्यांना देशपातळीवर गौरवण्यात आलंय.

बसेर दाम्पत्याचा दिवस पहाटे साडेचारला सुरू होतो. रोज सकाळी साडेपाचला बाहेर पडून कोणत्या ना कोणत्या केंद्राला भेट देणे हा गेल्या अनेक वर्षांचा अलिखित नियम. त्यासाठी त्यांचा ड्रायव्हरही भल्या पहाटे डय़ुटीवर हजर असतो. नवीन वर्ग सुरू करताना पन्नास-एक कार्यकर्ते पाळीपाळीने एक-एक आठवडा योगदान देतात. बाहेरून येणाऱ्या या कार्यकर्त्यांना राहण्यासाठी जवळपासचं कमीत कमी भाडय़ाचं एखादं घर २ महिन्यांसाठी घेतलं जातं. जाण्या-येण्याचा, राहण्याचा खर्च ज्याने त्याने करायचा. जिथे रोज सकाळी जास्तीत जास्त माणसं फिरायला येतात अशी बाग निवडण्याचं काम स्थानिक कार्यकर्त्याचं. काम बघून पावसाळ्यात जवळपासची डोक्यावर छप्पर असणारी जागा विनामूल्य मिळते हा आजवरचा अनुभव. दोन महिन्यांच्या सरावानंतर साधकांमधलाच एक केंद्रप्रमुख निवडून त्याच्यावर त्या वर्गाची जबाबदारी सोपवून मंडळी परततात. भाग्यश्रीताई म्हणाल्या की, “या निष्काम सेवेसाठी आमच्या कार्यकर्त्यांची जडणघडणच अशी झालीय की, महिला कार्यकर्त्यादेखील आपल्या घरादाराची व्यवस्था लावून आपले ७ दिवस सेवा देतात. ‘आदेश आया है, जाना है।’ ही त्यांची प्रतिक्रिया. बसेरांना महाराष्ट्रात २५० केंद्रे सुरू करायची आहेत. त्यातील ठाणे हे अग्रस्थानी आहे.

कार्यकर्त्यांचं मोहळ जमा होण्याआधीची एक आठवण अशोकजींनी सांगितली. म्हणाले, “चार दिवसांचं एक निवासी शिबीर आयोजण्यासंबंधी दिल्लीहून प्रकाशलालजींचा आदेश आला. त्यांनी दिलेल्या संभाव्य तारखेला तीन महिनेच बाकी होते आणि हाताशी फक्त २० कार्यकर्ते. जागा शोधण्यापासून तयारी होती. आम्ही जिद्दीने कामाला लागलो. खूप फिरलो. अनेकांना भेटलो. ३५० शिबिरार्थी तयार झाले. पुण्यातील बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुलाची जागा ठरली. आमचा प्रामाणिक हेतू बघून शिबीर कमीत कमी खर्चात व्हावं यासाठी कॉन्टीन मालक, मंडप कॉन्ट्रक्टर, गादीवाला, फोटोग्राफर… अशा सर्वांनीच सहकार्य दिलं. त्यामुळे प्रत्येकी केवळ हजार रुपयांत राहण्या-जेवणासह चार दिवसांचा सर्व खर्च भागला. वर बोनस म्हणजे शिस्त व व्यवस्थापन यासाठी आमच्या पाठीवर शाबासकीची थापही पडली.

रावळगाव (जि. नाशिक) या मूळ गावातील बसेर कुटुंब माहेश्वरी मारवाडी; परंतु गेली अनेक वर्षे पुण्यात राहिल्याने घराला मराठी वळण. अशोकजींनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला पुण्यातील एका कंपनीत नोकरी केली, पण रक्तातील व्यापारी गुणधर्म स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे नोकरीत असतानाच त्यांनी स्कूटरच्या क्लचसंदर्भातला व्यवसाय सुरू केला. पुढे लिपी बॉयलर ही कंपनी, पुण्यात ‘ओव्हन फ्रेश’ ब्रेडची स्वयंपूर्ण बेकरी, अॅफिस फर्निचर निर्मितीचा कारखाना… असा पसारा वाढत गेला. आजही ते अनेक व्यवधानं सांभाळतात. त्यांच्या मोठय़ा मुलाने, डॉ. स्वप्नेषूने नैसर्गिक घटकांपासून अर्क काढण्यासंबंधी संशोधन करून (यासाठी त्याचा राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मान झालाय.) सुरू केलेल्या कंपनीच्या सरकारी कागदपत्राचं काम ते बघतात. राज्य व केंद्र सरकारमध्ये सल्लागार इंजिनीअर म्हणून त्यांना मान्यता आहे. याशिवाय ट्रेडिंगचा बिझनेसदेखील सुरू आहेच. बसेरांचा दुसरा मुलगा व मुलगीही इंजिनीअर असून, आपापल्या जागी उत्तम स्थिरावले आहेत.

पुण्यातील फाटक बाग परिसरातील टुमदार बंगल्यात बसेर पती-पत्नी दोघंच राहात असली तरी माणसांच्या प्रेमामुळे त्यांच्या घरी येणाऱ्या-जाणाऱयांचा सतत राबता असतो. योगप्रसाराची कास धरल्यापासून तर दोघांना अजिबात फुरसत मिळत नाही. पहाटे उठून एका वर्गाला भेट देऊन आल्यावर सकाळी साडेआठ ते साडेनऊ स्वत:ची साधना. त्यानंतर नाश्ता. मग ११ ते २ अशोकजींची अॅफिसची कामं आणि भाग्यश्रीताई जेवण बनवण्यात व बागकामात गर्क. मग भोजन व थोडी वामकुक्षी. नंतर संध्याकाळी कुठल्या ना कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी वा कार्यकर्त्यांची मीटिंग असा दोघांचा रोजचा भरगच्च दिनक्रम. शिवाय दोघंही दरवर्षी भारतीय योग संस्थेच्या दिल्ली मुख्यालयात वेगवेगळ्या स्तरांवरील शिबिरांसाठी जातात. भाग्यश्रीताइभचं म्हणणं की, ते त्यांचं माहेर आहे. तिथे एवढं प्रेम मिळतं, की येताना पाय निघत नाही.

मनं जुळून येणं म्हणजे काय ते बसेर दाम्पत्याकडे पाहताना समजतं. त्रेपन्न वर्षांच्या सहजीवनानंतर दोघांच्याही आवडीनिवड एकसारख्या झाल्या आहेत. अशोकजी म्हणतात, “भाग्यश्री माझी केवळ सहधर्मचारिणीच नाही, तर माझी सखी, मार्गदर्शक, सहकारी, मदतनीस व टीकाकारही आहे.” भाग्यश्रीताई म्हणजे जणू उत्साहाचा धबधबाच. जरा सुचवताच ७२ वर्षांच्या त्या बाइभनी खडय़ा आवाजात स्वयंसूचना देत कमर चक्रासन, त्रिकोणासन, कोनासन अशी आसनं सहजगत्या करून दाखवली. म्हणाल्या, “हा मार्ग सापडल्यापासून म्हातारपण आमच्याकडे फिरकलंच नाही. मात्र आमचं हे जे काम उभं राहिलंय ना, त्यापाठी अनेकांचे हात आहेत हे विसरून चालणार नाही.” डॉ. राजन पटेल व शाळांचे वर्ग बघणाऱ्या त्यांच्या पत्नी कैलास पटेल यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. भाग्यश्रीताइभना फुलांच्या रांगोळ्या काढण्याचाही छंद आहे. घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत त्यांनी दारासमोर काढलेल्या नव्या-नव्या रांगोळ्यांनी होतं.

२१ वर्षांच्या सामाजिक योगदानात बसेर दाम्पत्याला ‘जनसेवा फाऊंडेशन’च्या जीवनगौरव पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले, परंतु साधकांकडून मिळणारा प्रेमाचा प्रतिसाद त्यांना लाखमोलाचा वाटतो.

असं म्हटलं जातं की, रिकाम्या हाताने आलोय आणि रिकाम्या हातानेच जाणार, पण बसेर पती-पत्नी म्हणतात, “एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना असंख्य हृदयांत जागा मिळवून जाणार…”

अशोक बसेर

ashokbaser1@gmail.com

waglesampada@gmail.com