डॉ. विनोद शहा आणि मीना शहा या पती-पत्नीच्या सहजीवनाने आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या ‘जनसेवा फाऊंडेशनने’ गेल्या २८ वर्षांत अपार परिश्रम घेऊन वृद्धाश्रम, ग्रामीण रुग्णालय, नर्सिग स्कूल, अपंग सेवा, निराधार पुनर्वसन केंद्र, आदर्श गाव योजना, मोफत शौचालये अशा विविध सेवाभावी उपक्रमांच्याद्वारे समाजापुढे सामाजिक कार्याचा आदर्श ठेवलाय आणि त्यांच्या यशात, आनंदात हे दाम्पत्य आपल्याही आयुष्याचा महोत्सव साजरा करत आहेत..
‘‘पाच एक वर्षांपर्यंत आमच्या किल्ल्याच्या वाटेवर सकाळी सकाळी पोतराज समाजातील काही मुलं (अंगावर सपासप आसूड मारून भीक मागणारी) व त्यांच्या आया कामाला(!) जाण्यासाठी आरशात बघून चेहरे रंगवताना दिसत. त्यांचा मागोवा घेतला तेव्हा समजलं की अशी ४०० कुटुंबं सिंहगडरोड परिसरातील पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागे तंबू ठोकून उघडय़ावरच राहात होती. त्यांच्या मुलांचा अंधारलेला भविष्यकाळ स्पष्ट दिसत होता. मी माझे पती,
डॉ. विनोद शहांना म्हटलं, ‘यांचं आयुष्य आपल्याला बदलता येईल का?.. त्यांना शिकवू, पायावर उभं करू, सुजाण नीतिमान नागरिक बनवू..’ गोरगरिबांविषयीची कणव रक्तातच असणाऱ्या यांनी हा विचार तात्काळ उचलून धरला. आम्ही त्या मुलांच्या पालकांना भेटलो. त्यांना समजावलं आणि सर्व मुलांना जवळपासच्या शाळांत घातलं. त्याआधी ससूनमधून त्यांचे जन्मदाखले काढले. शालोपयोगी साहित्य, कपडालत्ता तर त्यांना दिलाच शिवाय ज्यांच्या शाळा लांब होत्या त्यांच्यासाठी स्कूलबसची व्यवस्था आणि दुपारच्या जेवणाची सोयही केली. एवढंच नव्हे तर ही मुलं शिक्षणात मागे पडू नयेत म्हणून विशेष मार्गदर्शनाची तरतूद आणि शाळा सुटल्यावर खेळांच्या प्रशिक्षणासाठी क्रीडा शिक्षकाची नियुक्ती.. असे चौफेर प्रयत्न केल्यामुळे केवळ या समाजातीलच नव्हे तर पुणे शहरात रस्तोरस्ती भीक मागणाऱ्या हजारभर मुलांचं भविष्य बदलून गेलंय. यातील अनेक मुलं आता आपापल्या शाळांमधून विविध स्पर्धात चमकत आहेत. त्यांची प्रगती पाहून, आम्ही घेतलेले कष्ट आता कष्ट राहिले नाहीत, त्यांचे आनंदाचे झरे झालेत..’’ पुण्यातील ‘जनसेवा फाऊंडेशन’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक दुर्बलांचं अंधारलेलं जीवन प्रकाशमान करणाऱ्या मीनाताई शहा आपल्या असंख्य उपक्रमातीत एकाची जन्मकथा सांगत होत्या.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन
डॉ. विनोद शहा व मीना शहा या दाम्पत्याने १५ जानेवारी १९८८ रोजी स्थापन केलेल्या ‘जनसेवा फाऊंडेशन’ने गेल्या २८ वर्षांत अपार परिश्रम घेऊन वृद्धाश्रम, ग्रामीण रुग्णालय, नर्सिग स्कूल, आया-वॉर्डबॉय प्रशिक्षण केंद्र, अपंग सेवा, निराधार पुनर्वसन केंद्र, आदर्श गावे योजना, मोफत शौचालये, १५ गावांत आरोग्यसेवा.. अशा विविध सेवाभावी उपक्रमांच्याद्वारे समाजापुढे सामाजिक कार्याचा आदर्श ठेवलाय आणि त्यांच्या यशात, आनंदात ते आपल्याही आयुष्याचा महोत्सव साजरा करत आहेत.
सामाजिक कार्याचा वारसा डॉक्टरांना रक्तातूनच मिळाला. त्यांचे आजोबा, मामा आणि काका स्वातंत्र्यसैनिक होते. साने गुरुजी तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. मोहन धारिया त्यांच्या घरी येत व राहत असत. डॉक्टरांच्या ‘जनसेवा फाऊंडेशन’चे ते (धारिया) प्रमुख आधारस्तंभ होते. मोठय़ा बहिणीचा आदर्श समोर ठेवून डॉक्टरांनी वैद्यकीय अभ्यासक्रम निवडला आणि प्रथम एम.बी.बी.एस. आणि नंतर एम.डी. (फिजिशियन) ही पदवी संपादन केली. पुण्यातील बी. जे. मेडिकल महाविद्यालयात शिकताना त्यांचा ससून हॉस्पिटलच्या रुग्णांशी संबंध येई. घरून आणलेली चटणी-भाकरी आठ/आठ दिवस पुरवून खाणारे गरीब रुग्ण त्यांनी तिथे बघितले. उपचारानंतर न्यायला कोणी न आल्याने जागेअभावी बऱ्याच रुग्णांना रुग्णालयाबाहेर सोडून देण्यात येई. हे पाहतानाच अशा निराधार गरीब रुग्णांसाठी काम करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार आज त्यांच्या संस्थेच्या १० सामाजिक कार्यापैकी एक खास ससूनसाठी राखीव आहे. तिथे बाहेर सोडून दिलेल्या व निराधार रुग्णांची संस्थेच्या आधारगृहात किंवा अगदीच शक्य नसेल तर अन्यत्र व्यवस्था लावणं हे त्या उपक्रमाचं काम.
‘जनसेवा फाऊंडेशन’च्या कामाची ख्याती आता सर्वदूर पसरल्याने पुण्यात कोठेही कोणी रस्त्यावर असाहाय्य स्थितीत पडलेलं दिसलं की संस्थेचा वा डॉक्टरांचा फोन घणघणतो. याच कामासाठी तैनात केलेली एक रुग्णवाहिका लगेच निघते. संस्थेच्या पानशेत परिसरातील आंबी गावी उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या व्यक्तीवर उपचार होतात आणि ती सावरल्यावर त्या निराधाराच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. अशा प्रकारे माणसात आणलेल्या अनेकांचे शेकडो किस्से डॉक्टरांपाशी आहेत.
आंबी गावात उभारलेलं रुग्णालय, ज्यामुळे आजूबाजूच्या दुर्गम भागातील ६५ गावांतील लोकांची सोय झालीय. ती जमीन (पाच एकर) डॉक्टरांना त्यांचे एक रुग्ण केशवराव ढापरे यांनी दान दिली. या अद्ययावत रुग्णालयात गोरगरिबांसाठी नि:शुल्क सेवा दिली जाते. औषधे, टॉनिकेदेखील मोफत. जे तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा दूरदूरच्या शंभरएक गावातील गावकऱ्यांसाठी शासनाच्या मदतीने दोन अद्ययावत रुग्णवाहिकांतर्फे घरपोच आरोग्यसेवा दिली जाते. संस्थेच्या डोळ्यांच्या रुग्णालयामध्ये तर दरवर्षी हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडतात. अर्थात नि:शुल्क.
आंबी येथील निसर्गरम्य परिसरात उभे केलेल्या चार वृद्धाश्रमांविषयी शहा दाम्पत्याला विशेष ममत्व आहे. यातील एक पूर्णपणे मोफत. दोघांत नाममात्र शुल्क आणि एक सशुल्क (एन.आर.आय. यांच्यासाठी) या चौथ्या वृद्धाश्रमाचं प्रयोजन बाकीच्या तिघांचा खर्च भरून काढण्यासाठी. मात्र नाश्ता, जेवण, दूध, वैद्यकीय उपचार याचा दर्जा सर्वाना समान. दुधाची गरज भागावी म्हणून इथे गोशाळा प्रकल्पही कार्यरत आहे. ‘जनसेवा’चे सर्वच प्रकल्प एकमेकांना पूरक आहेत. रुग्णालयामुळे वृद्धांच्या उपचारांची तिथल्या तिथे सोय झाली. पण या रुग्णालयासाठी लागणाऱ्या नर्सेस, वॉर्डबॉय, आया यांचं काय? त्यासाठी संस्थेने याच आवारात नर्सिग प्रशिक्षण व वॉर्डबॉय/ आया प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यासाठी गडचिरोली, यवतमाळ, वर्धा अशा मागास भागांतील गरीब मुलं/ मुली तिथल्या जबाबदार व्यक्तींशी संपर्क साधून शोधली आणि त्यांना हे प्रशिक्षण राहण्या-खाण्याच्या खर्चासह मोफत दिलं. आजही दिलं जातं. वॉर्ड बॉयचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना तर सर्व खर्च करून वर प्रत्येकी महिन्याला ३ हजार रुपये त्यांच्या घरी पाठवले जातात. (त्यांचा तिथला रोजगार बुडतो म्हणून). प्रशिक्षणानंतर काहींना तिथेच सामावून घेतलं जातं तर काहींना इतर रुग्णालयांमध्ये नोकऱ्या दिल्या जातात. अशा प्रकारे आजवर ५०० मुलं/मुली आपल्या पायावर उभी राहिलीत.
पानशेत परिसरातील ‘जनसेवा’चे प्रकल्प १९९० पासून सुरू झाले, तर भिलारेवाडी (कात्रज) येथील समाजोपयोगी कामांना २००२ पासून गती मिळाली. कारण येथील निराधार केंद्र म्हणजे संस्थेचा मुकुटमणी. इथे कायमस्वरूपी राहणाऱ्या १७५ लाभार्थीत ६० अनाथ मुलं आहेत जी पहिली ते बारावीत शिकताहेत. इथे १०वीपर्यंत शिकून पुढे स्वयंपूर्ण झालेल्या मुलांपैकी अभिषेक समुद्र याची भेट झाली. त्याने यजुर्वेदाच्या संहितेत पदवी मिळवलीय. आता मुंबईत स्थिरावलाय. पूजापाठ सांगतो. भारावून म्हणाला, ‘मी आज जो काही आहे तो शहा सर व मॅडममुळेच.’
या निराधार केंद्रात केल्या जाणाऱ्या अपंगाच्या पुनर्वसनाचे काम हे ‘जनसेवा फाऊंडेशन’चे अति मोलाचे काम म्हटले पाहिजे. ८वी ते १२वीपर्यंत शिकलेल्या ३० अपंग मुलांना इथे दर महिन्याला प्रवेश मिळतो आणि त्यांना कॉम्प्युटर, इंग्लिश स्पीकिंग, एटिकेट्स इत्यादीचं ट्रेनिंग दिलं जातं आणि दोन महिने संपताच तिथल्या तिथे कॅम्पस इंटरव्ह्य़ूद्वारे किमान ७० टक्के उमेदवारांना नोकऱ्या मिळतात तर काही जण छोटय़ा-छोटय़ा व्यवसायाकडे वळतात. याबरोबर आसपासच्या गावातील स्त्रियांसाठी संगणक, शिवण, पाकक्रिया, पर्स बनवणे आदी व्यवसाय कौशल्याचे वर्गही चालवले जातात. त्यांना ने-आण करण्याची व्यवस्थाही मोफत केली जाते. एवढंच नव्हे तर आंबीच्या आसपासची ३० गावं संस्थेने दत्तक घेतलीत. या गावातील शाळांमधील सुविधा, वृक्षारोपण याबरोबर ८०० शौचालयांचं बांधकामही पूर्ण झालंय आणि उर्वरित ८००चं काम पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. त्याशिवाय पुण्यात ७ ठिकाणी चालणारे शतायू क्लब. औंध रोडवरचं वृद्धांसाठीचं डे-केअर सेंटर, २००२ पासून १ ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाला साजरा होणारा आनंद मेळा, ज्यात ३००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात.
दर ३/४ महिन्यांनी ‘भेट एका दिग्गजाशी’, ‘नामवंतांची मुलाखत’ असे नानाविध उपक्रम (तेही डॉक्टरांचा ४० वर्षांचा मधुमेह सांभाळून) ऐकताना वाटतं की त्यासाठी यांच्याकडे वेळ आणि पैसा येतो तरी कुठून? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर म्हणाले, ‘दिवसभरातील अर्धा वेळ माझ्या व्यवसायाचा, उर्वरित फाऊंडेशनचा. दुपारी अडीचपर्यंत रुग्णांना तपासतो त्यानंतर जेवून-खाऊन आम्ही दोघं साडेतीन वाजता आमच्या संस्थेच्या कार्यालयात येतो. ते दवाखान्याशीच संलग्न आहे. तिथे आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून कामाची माहिती घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं, कंपन्यांकडून निधी (सी.एस.आर.) मिळवण्यासाठी पत्रव्यवहार, संस्थेचे हिशेब अशी असंख्य कामं वाट पाहात असतात आणि पैसा म्हणाल तर काम बघितलं की पैसा येतोच. आमचे सगळे प्रकल्प कोणाच्या ना कोणाच्या मदतीनेच उभे राहिले आहेत. या सेवाकार्यात सामान्यांपासून सन्मान्यांपर्यंत सर्वाचा हातभार लागलाय.. झालंच तर मुख्यमंत्र्यांपासून (तत्कालीन) राज्यपालपर्यंत आणि जिल्हाधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत सर्वजण माझे ओळखीचे किंवा पूर्वीचे रुग्ण. त्यांच्याकडून मी कधीही पैसे घेतले नाहीत. साहजिकच आता माझ्या या लोकांसाठी जेव्हा सरकारचे दरवाजे ठोठावतो तेव्हा प्रतिसाद मिळतोच..
जोडीदाराच्या सुखात आपलं सुख, त्यांच्या आनंदात आनंद मानला तर दोघांच्या अद्वैतांहून एखादं अद्वितीय काम कसं साकार होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शहा पती-पत्नीचं सहजीवन. खरं तर मीनाताईंचा पिंड कलाकाराचा. नृत्य, कला यांची मनस्वी आवड. परंतु लग्न झाल्या दिवसापासून (नव्हे आधीच) नवरा दर रविवारीदेखील रुग्णसेवेत गुंतलेला (प्रॅक्टिस सुरू केल्यापासून २० वर्षे डॉक्टर दर रविवारी महाड (जन्मगाव), म्हसाळा, श्रीवर्धन, कऱ्हाड अशा ठिकाणी जाऊन गोरगरिबांसाठी अत्यल्प दरात सेवा देत होते.) त्यामुळे जर पतीचा सहवास हवा असेल तर आपली आवड त्याच्या ध्येयात एकरूप व्हायला हवी, हे त्यांनी ओळखलं आणि ‘फाऊंडेशन’च्या पहिल्या दिवसापासून या कामात स्वत:ला झोकून दिलं. त्याचबरोबर घरची, मुलांची जबाबदारीही एकहाती सांभाळून या आघाडीवर डॉक्टरांना निश्चिंत केलं. मुलंही गुणवान निघाली- त्यांच्या दोन्ही मुली उच्चशिक्षित असून, धाकटा गौतम कार्डिओलॉजिस्ट असून सध्या त्याला अमेरिकेतली फेलोशिप मिळालेली आहे.
मीनाताई म्हणाल्या, प्रेमळ की कर्तव्यदक्ष असे निकष लावले तर मी दुसऱ्या (कर्तव्यदक्ष) भूमिकेत बसते असं मला वाटतं. ही भूमिकाही परिस्थितीजन्य. कारण कुणीही आपली कहाणी डोळ्यात पाणी आणून सांगू लागलं की हे विरघळलेच. त्यामुळे खरी परिस्थिती काय आहे याचा शोध घेण्याची जबाबदारी माझ्यावर आपसूकच येते. पुढे त्या गमतीने म्हणाल्या, ‘.. डॉक्टर महाराष्ट्राच्या ‘बेगर्स कमिटी’वर आहेत. त्यांच्याच समितीने कायदा केलाय की भिकाऱ्यांना पैसे देणे हा गुन्हा आहे आणि त्यासाठी शंभर रुपये दंड आकारावा. तरीही एखादा दीनवाणा भिकारी दिसला की यांचा हात खिशाकडे जातोच. मग मीही दंडाचे शंभर रुपये यांच्याकडून लगेच वसूल करते..’
‘जनसेवा’च्या कर्मचाऱ्यांमधील प्रत्येकाला प्रशिक्षण देऊन तयार करणं हे मीनाताईंचं प्रमुख काम (यात भांडीवालीपासून व्यवस्थापिकेपर्यंत सर्वजण आले). सध्या त्या प्रत्येक प्रकल्प स्वयंपूर्ण करण्यात आणि कार्यकर्त्यांची नवी फळी तयार करण्यामध्ये गुंतल्या आहेत. या दोघांच्या कामाचा झंझावात बघून आता केंद्र सरकारने त्यांच्यावर शाळकरी मुलांना संस्कारित करण्याची (सेंसिटायझेशन ऑफ स्टुडंट्स) नवी जबाबदारी सोपवलीय. त्यानुसार या वर्षांत १ लाख मुलांपर्यंत पोहोचण्याची त्यांची आखणीही पूर्ण झालीय. शिवाय केंद्र शासनातर्फे ‘फाऊंडेशन’ला महाराष्ट्र राज्यासाठी ‘रिजनल रिसोर्स ट्रेनिंग सेंटर’ सुरू करण्यासाठीही मान्यता मिळालीय. मात्र सेवेचे हे शिवधनुष्य आम्ही आमचे हितचिंतक साथीदार यांच्याशिवाय उचलूच शकलो नसलो हे दोघांनीही आवर्जून सांगितलं.
सर्वसामान्यांसाठी एवढं प्रचंड काम करणाऱ्या ‘जनसेवा फाऊंडेशन’ला अनेक राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणं साहजिकच होतं. राष्ट्रपती सन्मान मिळाला. भारतीय डाक विभागाने संस्थेच्या गौरवार्थ विशेष आवरण प्रसिद्ध केले. संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत ‘फाऊंडेशन’ला विशेष सल्लागार दर्जा देण्यात आला.
आज संस्थेची झालेली भरभराट ही या दोघांच्या सहजीवनाचा उत्तम परिपाक म्हणता येईल.

संपर्क –
डॉ. विनोद शहा- ९८२३०११७६०
कार्यालय- २४५३८७८७/८
ई-मेल- vinodshaha@hotmail.com
waglesampada@gmail.com

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Female Student Death by Suicide
“सॉरी ताई..”, म्हणत १७ वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं, लैंगिक शोषण झाल्याचा आरोप

 

-संपदा वागळे