स्वयंपाकघरातील प्रत्येक अन्नपदार्थावर आपले आरोग्य अवलंबून असते. सतत झिजणाऱ्या शरीराचे आहाराने पोषण करावे व चुकीच्या आहाराने होणाऱ्या आजारांपासून शरीराचे रक्षण करावे, असा उदात्त हेतू चरकाचार्यानी आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आहारामुळे जसे शरीराचे पोषण होते, तसेच चुकीचे आहार पदार्थ खाल्ल्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. याकरिताच कोणते पदार्थ खावेत व कोणते खाऊ नयेत, याचे ज्ञान आपल्याला असणे गरजेचे आहे.
काही आजार, तर असे असतात की, खाण्या-पिण्याचे पथ्य पाळले तर, ते आजार उद्भवतच नाहीत किंवा झाले तरी आटोक्यात राहतात. उदा. – रक्ताची कमतरता, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोग अशा प्रकारच्या बऱ्याचशा व्याधी या सदोष आहारानेच उत्पन्न होत असतात व योग्य आहाराने बऱ्यादेखील करता येतात. कारण काही अन्नपदार्थामध्ये एखादा विशिष्ट आजार कमी करण्याचे गुणधर्म असतात. उदा. :- ‘आवळा’ हा रक्तातील साखर कमी करून इन्सुलिन या हार्मोन्सनिर्मितीला चालना देतो. त्यामुळे आपोआपच मधुमेह हा आजार नियमित आवळासेवनाने आटोक्यात आणता येतो, तर त्याच पद्धतीने साखर या कृत्रिम पदार्थ सेवनाने हाच मधुमेह आजार वाढीस लागतो. िलबू, मोसंबी, संत्रे, आवळा, सफरचंद, डािळब या फळांच्या नियमित सेवनाने ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात व त्यामुळे हृदयाची रक्ताभिसरण क्रिया ही वार्धक्यापर्यंतही व्यवस्थित चालू राहते.
पांढरी विषे- साखर, मदा, साबुदाणा, मीठ, वनस्पती तूप या पदार्थाना आयुर्वेदामध्ये ‘पांढरी विषे’ असे म्हणतात. कारण हे पदार्थ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित कृत्रिम पद्धतीने बनविलेली आहेत व या पदार्थाच्या सेवनानेच जास्तीत जास्त आजार निर्माण होतात. उदा. – आम्लपित्त, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयरोग, मधुमेह, त्वचाविकार, हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरॉसिस) दंतविकार, पचनाचे विकार, मलावष्टंभ असे अनेक विकार या पदार्थाच्या अतिसेवनाने निर्माण होतात, म्हणून हे पदार्थ आहारामध्ये घेणे टाळले पाहिजेत.
दर शनिवारी या सदरातून आपण कोणते अन्नपदार्थ खाऊ नयेत याबद्दलची माहिती घेऊ व त्यानंतर कोणते अन्नपदार्थ शरीराच्या व मनाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत याबद्दलची माहिती घेऊ  जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याची  योग्य काळजी घेता येईल.
डॉ. शारदा महांडुळे