आपल्या वयाची ऐंशी वष्रे उलटल्यावरही अत्यंत सकारात्मक, समाजाला ऊर्जा पुरविणारी, जगण्याचे प्रयोजन, दिशा देणारी, मरगळलेल्या मनांना टवटवीत करणारी चिरतरुण व्यक्तिमत्त्वे खरे तर आपल्या समाजाचा भक्कम आधार आहेत. योगकार्याची पन्नाशी गाठणारी ‘घंटाळी मित्र मंडळ संस्था’ स्थापन करणारे योगाचार्य व्यवहारे, समाजातील उपेक्षित गटाला आपलेसे करून आनंदवनाचे विधायक कार्य उभारणारे बाबा आमटे यांचे कार्य कर्मयोग, भक्तियोग व ज्ञानयोग या त्रयींवरच आधारित आहे. ‘अगतिक मनांना गतीचे गीत’ देणाऱ्या या संस्था खऱ्या अर्थाने ‘योग कर्मसु कौशलम्’चा परिपाठ आहेत. आपल्यातही शक्तीचे हे बीज आहेच. ते अंकुरित करण्यासाठी आपली आजची साधना!
आसन
बठकस्थितीत सुखासनात स्थिर व्हा. पाठकणा समस्थितीतच असू दे. दोन्ही हात खांद्यांच्या उंचीवर सरळ लांब, जमिनीला समांतर ठेवा. हातांची बोटे परस्परांपासून दूर करून हातांचा पंजा श्वास घेत ताणून घ्या. श्वास सोडत सोडत हाताच्या मुठी आवळा. बोटांवर येणारा ताण, हालचाल यावर लक्ष एकाग्र करा. ५ ते १० वेळा ही कृती करा. शरीराला, मनाला तरतरी येण्यासाठी अत्यंत फायदेशीर.

शोधला ‘मजबूत’ उपाय
१९५७ साली सिव्हिल इंजिनीयर झाल्यावर मी बांधकाम क्षेत्रातील कंपनीत रुजू झालो व पुढे ३५ वर्षे महाराष्ट्रासह आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये काम केले. ९१-९२ मध्ये कामानिमित्त इराकमध्येही वास्तव्य करण्याचा योग आला. कामात सतत गुंतलेलो असल्याने निवृत्तीनंतरचा वेळ खायला उठू लागला. त्यामुळे सगळ्यात आधी दहिसरच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद झालो.
मी सिव्हिल इंजिनीअर असल्याचे मित्रांना कळताच त्यांनी त्यांच्या अनेक समस्यांचा माझ्याकडे लकडा लावून मला भंडावून सोडले. आमच्या फ्लॅट्समध्ये गळती आहे, कॉलमला तडे गेलेत अशा सुरुवातीच्या समस्यांनी नंतर आरसीसीशी निगडित प्रश्न उपस्थित करत मला खिंडीत पकडले. ३५ वर्षांच्या अनुभव गाठीशी होता, मात्र पूल बांधणे, अ‍ॅक्वाडक्ट्स उभारणे अशी मोठी कामे केल्याचा अनुभव होता. घरातल्या अशा प्रश्नांशी थेट संबंध कधी आलाच नव्हता. मग निश्चय केलाच की इमारतींची गळती, आरसीसीचे काम (कॉलम, बीम, स्लॅब्स) यांचा सखोल अभ्यास करायचा. मग अधाशासारखी या विषयांवरची पुस्तके, दस्तावेज, लेख गोळा करून त्यांचा फडशा पाडला. अनेक अभियांत्रिकी संस्थांतर्फे मुंबईत चर्चासत्रे पार पडतात, त्यांना न चुकता हजेरी लावू लागलो. त्यामुळे परदेशातील तज्ज्ञ लोकांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. १९९३ पासून या कामी लागलो होतो, स्वतला झोकून देऊन काम केले. बायको म्हणायची देखील तुम्ही ‘एचसीसी (हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी)पेक्षा हार्डवर्क करत आहात.’ ही कौतुकाची थाप समजून मी कामात व्यग्रच राहिलो.
 माझ्याकडे या विषयावरची बरीच माहिती गोळा झाली त्यातून अनेकांना सल्ले देऊन प्रत्यक्ष उपाययोजनांचा अनुभवही पदरात पडला. मग या विषयांतील तज्ज्ञ म्हणून माझे बस्तान बसले. याच शिदोरीवर २००० साली ‘रिपेअर’ वरचं माझं पहिलं पुस्तक आलं. मेथड व स्पेसिफिकेशन प्रमाणे काम करणारे अनेक कन्सल्टंट व कॉन्ट्रॅक्टर्स माझ्यासोबत आले. त्यांच्या अनुभवांमुळे आज पुस्तकाची २२ वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
 माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या मित्रांनी निवृत्तीनंतरच्या वेळेचे काय केले पाहिजे, याचा धडाच मला घालून दिला. आता रिपेअरिंगची आवश्यकता प्रदीर्घ अनुभवांमुळे न सांगता कळायला लागली आहे. आता ८० मध्ये पदार्पण केले असून सतत कार्यरत राहिल्याने आरोग्यही चांगले आहे.
जयकुमार शहा
ज्युडी डेंच
ऑस्कर विजेती ब्रिटिश अभिनेत्री आणि वयाच्या ७९ व्या वर्षांतही तितक्याच उत्साहाने कार्यरत असलेली, लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ज्युडी डेंच. शेक्सपियरच्या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अशीच त्यांची खास ओळख सांगता येईल. ‘शेक्सपियर इन लव्ह’ मधील सहाय्यक अभिनेत्रीसाठी ऑस्कर पटकावणाऱ्या डेंच यांना तब्बल ११ वेळा प्रतिष्ठित बाफ्ता पुरस्कारासाठी नामांकने, ७ वेळा लॉरियन्स ऑलिव्हर हा रंगभूमीवरील विशेष कारकीर्दीसाठीचा सन्मान, दोन वेळा गोल्डन ग्लोबचा मानाचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांमधून या वयात इतकी यशस्वी कारकीर्द असणाऱ्या बहुधा डेंच एकमेव असाव्यात. अभिनयाबरोबरच वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी दिग्दर्शनाकडेही मोर्चा वळवला. मात्र, १९९२ साली जॉफ्री पालमर याच्यासह ‘अ‍ॅज टाइम गोज बाय’ या टीव्ही मालिकेतील जीन ही त्यांची टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय भूमिका ठरली. त्याने डेंच यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांना ‘बाफ्ता’ या चित्रपट आणि टीव्हीसाठी काम करणाऱ्या संस्थेची फेलोशिप मिळाली. जेम्स बँाडच्या ‘गोल्डन आय’, ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’, ‘डाय अनदर डे’, ‘कॅसिनो रॉयल’,‘कॉन्टम ऑफ सोलास’, अलीकडच्या ‘स्कायफॉल’ मधली कणखर ‘एम’ ही त्यांच्या करिअरमधली महत्वाची व्यक्तिरेखा.
 एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर तितक्याच समर्थपणे कार्यरत असणाऱ्या डेंच म्हणजे उत्साहाचा अखंड वाहणारा झराच जणू.
संकलन-गीतांजली राणे

उपवास
नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीला अनेक आजी-आजोबांनी उपवास केला असणार. मात्र उपवास करण्याचा मक्ता आता फक्त आजी-आजोबांकडेच नाही बरं का, तर ‘फास्टिंग फॅड’ (झीरो फिगर) म्हणून तरुण मुलं-मुलीही सर्रास उपाशी राहताना दिसतात. उपवास आणि उपाशी हे शब्द एकाच अर्थाचे वाटले तरी आहारशास्त्राच्या दृष्टीने भिन्न आहेत. देवाच्या सान्निध्यात (नामस्मरण) राहणे म्हणजे उपवास. अन्नावरील आसक्ती कमी करणे म्हणजे उपवास! पण साधारण ५०-५५ वय झाल्यानंतर ‘पूर्वीसारखे’ उपवास करणे योग्य आहे का? मंदावलेली भूक, शरीराची कमी झालेली ताकत आणि विविध कारणांसाठी चालू असलेली औषधे या कारणांसाठी मी या वयानंतर उपास टाळायला सांगते. बऱ्याच वैयक्तिक / धार्मिक कारणांसाठी उपास ‘सोडवत’ नाहीत. म्हणूनच आजी-आजोबांनी ‘सोयीस्कर’ उपास कसा करावा त्याविषयी –
-उपवास काळात आरोग्याला उपायकारक-
थोडं थोडं ठरावीक वेळेत खावे, पचायला सोप्पे पदार्थ- वरी तांदूळ, राजगिरा, िशगाडा, सुरण, भोपळा, बदाम, खजूर, अंजीर, ताक थोडय़ा थोडय़ा अंतराने घ्यावेत. साधे पाणी, नारळपाणी, दुधी भोपळ्याचे सूप, ताकासारखे द्रव पदार्थ इ., शरीराची दगदग कमी करावी, एकच वेळ जेवणार असाल तर शक्यतो दुपारी जेवणे चांगले.
  -उपवास काळात आरोग्याला अपायकारक – बराच वेळ काहीच न खाणे, पचायला जड
पदार्थ- साबुदाणा, शेंगदाणे, तुपकट पदार्थ, बटाटे, हलवा इ., निर्जल उपास हानिकारक. नेहमीची कामे त्याच जोमाने चालू ठेवणे, रात्री उपवास सोडणे.

 एक दिवसाचा मेनू
सकाळी- उपवासाच्या पिठाची घावन / धिरडी (किसलेली काकडी घालून) + ताक.
मधल्या वेळी- फळ / नारळपाणी + भिजवलेले ड्रायफ्रुट्स.
दुपारी- भोपळा घातलेले वरी तांदूळ + सुरणाची भाजी + िशगाडा कढी.
संध्याकाळी- फळे.
रात्री- गायीचे / साय काढलेले दूध + राजगिरा लाडू.
वैदेही अमोघ नवाथे आहारतज्ज्ञ
काठी विथ खुर्ची
अनेक आजी आजोबांना उपयुक्त ठरेल असे एक साधन म्हणजे फोल्डेबल काठी अर्थात खुर्ची. अनेक वृद्धांना चालताना थकवा येतो, धाप लागते, पण नेहमीच लगेचच बसायला जागा मिळेल असे होत नाही. त्यामुळे फिरण्याची आवड असूनही अनेकांना घरातून बाहेर पडता येत नाही.
अशा आजी-आजोबांसाठी खास खुर्चीची सोय असलेली काठी उपलब्ध आहे. या खुर्चीवाल्या काठीचे वैशिष्टय़ म्हणजे ती वजनाला अत्यंत हलकी असते त्यामुळे आजी आजोबांना ती कुठेही सोबत नेणं सोयीचे ठरते. रस्त्यात अगदी कुठेही थांबावेसे वाटले तर फोल्डेबल काठीला जोडलेली ही खुर्ची उघडून त्यावर बसता येते. पटकन फोल्ड करता येणारी आणि तितक्याच चटकन खुर्ची म्हणून उघडणाऱ्या या काठीची अंदाजे किंमत ७९९ रुपयांपासून पुढे आहे. महत्त्वाच्या रुग्णालयाजवळील मेडिकल स्टोर्समध्ये ही खुर्ची मिळू शकते, पण ती ऑनलाइन पद्धतीने मागवू शकता. त्यासाठी पुढील वेबसाइटस्चा उपयोग होईल. त्यावरून तुम्ही ही काठी थेट आर्डर करू शकता.
 http://www.alibaba.com
http://medicomart.medicohelpline.com,
http://www.target.com या काही वेबसाइटवरून ही काठी घरबसल्या मागवता येते.