हेल्पलाइन्स

रोजची हाता-तोंडाची गाठ घालणेही त्यांना मुश्कील असते.

आपल्या समाजात सधन, सुखासीन आयुष्य जगणारा वर्ग आहे. या समाजाकडे सुबत्ता आहे. कशाची कमतरता नाही. त्यांच्या सर्व गरजा सहज भागल्या जातात. कशाची उणीव त्यांना भासत नाही. पण त्याचबरोबर याच समाजात असाही एक वर्ग आहे, ज्यांना सर्व प्रकारच्या अभावाला तोंड द्यावे लागते. त्यांच्याकडे ना सधनता, ना सुखासीनता. रोजची हाता-तोंडाची गाठ घालणेही त्यांना मुश्कील असते. अंगावर धड कपडेही नसतात. अशा वर्गातील गरजूंसाठी मुंबईतील डबेवाल्यांची संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या ‘रोटी बँके’ची ओळख आपण गेल्या आठवडय़ात करून घेतली. आज त्याच संघटनेच्या आणखी एका स्तुत्य उपक्रमाची ओळख करून घेऊ या. हा उपक्रम आहे ‘कपडा बँक’. सधन वर्गातील घरांमध्ये कपडय़ांची रेलचेल असते. घरातील सर्वासाठी कायम नवे कपडे घेतले जातात. लहान मुलांची सारखी वाढ होत असते. त्यामुळे त्यांचे कपडे तोकडे होतात. त्यामुळे प्रत्येक घरात कायम जास्तीचे, न वापरले जाणारे, पण चांगल्या स्थितीतील कपडे असतातच. हेच अडचणच होणारे, नको असलेले कपडे गरजूंची कपडय़ांची गरज भागवू शकतात. हीच कल्पना उचलून धरत डबेवाल्यांच्या संघटनेने ‘कपडा बँक’ सुरू केली आहे. तलासरी, मोखाडा, पालघर, जव्हार या आदिवासी मोठय़ा संख्येने असलेल्या भागातील गरिबांना दिवाळीत चांगले कपडे घालायला मिळावेत म्हणून या संघटनेने अलीकडेच महिनाभर असे कपडे गोळा केले. ते कपडे तिथल्या आदिवासींना नेऊन दिलेही. सोशल मीडियातून त्यासाठीचा मेसेज फिरत होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या दिवाळीचे कपडावाटप तर झाले आहे. पण पुढल्या वर्षीच्या दिवाळीसाठी ही बँक लक्षात ठेवाच. त्यासाठीच्या ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’च्या हेल्पलाइन्सशी संपर्क साधण्याकरिता त्यांच्या कार्यकर्त्यांची नावे आणि दूरध्वनी क्रमांक – सुभाष तळेकर, प्रवक्ता – ९८६७२२१३१०. मुंबई शहर – दशरथ केदारी – ८६५२७६०५४२, कैलास शिंदे – ८४२४९९६८०३. मुंबई पूर्व उपनगरे – ज्ञानेश्वर कणसे – ८४२४०८६९३५, पवन अग्रवाल – ९८२१७४३१०६. मुंबई पश्चिम उपनगरे – विठ्ठल सावंत – ९८२१९५९४९७, विलास शिंदे – ८०८२५८७१०४.

puntambekar.shubhangi@gmail.com

शुभांगी पुणतांबेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हेल्पलाइन्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Helpline

ताज्या बातम्या