समाज बदलत चालला, तशी समाजातील माणसांची गरजही बदलत चालली. या सदरातून आपण या बदलत्या गरजा भागवणाऱ्या संस्था, संघटनांची माहिती घेत आहोत. या वेळी आपण लहान मुलांसाठी असलेल्या हेल्पलाइन्सची माहिती घेणार आहोत. भरलेल्या घरात, आपल्याच माणसांसोबत राहाणाऱ्या लहान मुलांना कधी कधी मदतीची गरज भासते, तर कधी अनाथ, निराधार लहान मुलांना मदतीचा हात हवा असतो. हे मदतीचे हात कोणते ते पाहू.
मुंबई पोलिसांची लहान मुलांसाठी एक हेल्पलाइन आहे. तिचा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे – १०३. अडचणीत असलेली लहान मुले या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. आपल्या व्यथा सांगू शकतात. पोलीस दलातील काही प्रशिक्षित महिला पोलिसांची नियुक्ती या हेल्पलाइनसाठी करण्यात आली आहे. मदतीची अपेक्षा करणाऱ्या मुलांना आवश्यक ती मदत केली जाते. अडचणीत किंवा संकटात असणाऱ्या मुलांच्यावतीने अन्य मोठय़ा व्यक्तीही या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागू शकतात.
दुसरा क्रमांक आहे – १०९८. मोबाइल व लँडलाइन दोन्ही दूरध्वनींवरून या क्रमांकावर विनामूल्य आणि २४ तासांत केव्हाही संपर्क साधता येतो. ‘चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन’ या संस्थेतर्फे ही हेल्पलाइन चालवली जाते. केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाशी ही हेल्पलाइन संबंधित आहे. अनाथ, हरवलेली, भरकटलेली, आजारी, दुर्लक्षित, बालमजूर, संकटग्रस्त, शोषित, एकाकी, जखमी, छळ सहन करणारी, असहाय अशी मुले या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. अर्थात, लहान मुलांना या क्रमांकाविषयी माहिती असतेच असे नाही. शिवाय संपर्क साधणे शक्य होतेच असे नाही. अशावेळी त्यांची व्यथा माहीत असणाऱ्या मोठय़ा व्यक्तींनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या मुलांना मदत मिळू शकते. त्या मुलांची माहिती, ठिकाण, समस्येचा तपशील सांगितल्यावर एका तासाच्या आत संस्थेचे सदस्य येऊन मदत करतात. संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे हक्क संस्थेला आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या लहान मुलांची सोय बालसुधारगृहात केली जाते. गरज भसल्यास त्या मुलांना अन्य संस्थेकडे सुपूर्द केले जाते. कधी कधी हरवलेल्या मुलांसाठीही त्यांचे पालक या हेल्पलाइनवर संपर्क साधतात. लहान मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी व त्यांना भावनिक पाठबळ देऊन मार्गदर्शन करण्यासाठी ही ‘चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन’ संस्था कार्यरत आहे. त्यांचे कार्य देशभरातल्या ८३ शहरांमधून चालते.
पुढच्या आठवडय़ापासून  आपल्या आरोग्याशी संबंधित हेल्पलाइन्सची माहिती घेणार आहोत.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
contract farming
शेतमजूर ते शेतकरी!