गृहपाठ तर हवाच.. | Homework is a must things project book school study amy 95 | Loksatta

गृहपाठ तर हवाच..

गृहपाठ म्हणजे बाजारातून विकतच्या वस्तू आणून केलेला प्रकल्प नाही किंवा घरातील मोठय़ा माणसांनी पूर्ण करून दिलेला प्रकल्प नाही

गृहपाठ तर हवाच..

मेघना जोशी

गृहपाठ म्हणजे बाजारातून विकतच्या वस्तू आणून केलेला प्रकल्प नाही किंवा घरातील मोठय़ा माणसांनी पूर्ण करून दिलेला प्रकल्प नाही किंवा
न समजता या पुस्तकातून त्या वहीत किंवा या वहीतून त्या वहीत काही लिहिणंही नाही. तर समजण्यासाठी वाचणं हाही गृहपाठ आहे, वाचलेलं परत परत वाचणं हासुद्धा गृहपाठच असतो आणि आज काय शिकलोय ते आसपास पाहणंही गृहपाठाचाच एक भाग आहे.

एकदा शाळा सुटता सुटताच दोन मातापालक शाळेत आल्या, एकीला आम्ही बोलावलं होतं आणि दुसरी आम्हाला भेटायला आली होती. दोघींचा मुद्दा एकच होता, तो म्हणजे गृहपाठ. पहिली पालक मुलाचा गृहपाठ रोजच्या रोज स्वत:च करून देत होती तर दुसरी आमच्याकडे मुलीची तक्रार घेऊन आली होती त्यांची मुलगी रोजचा गृहपाठ करण्यासाठी मार्गदर्शिका हव्यात म्हणून (तयार उत्तरांचं गाइड) हट्ट करून बसली आहे, तिला सर्व विषयांच्या मार्गदर्शिका पाहिजेच आहेत आणि गाइड खरेदी करण्याएवढी आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. दोघींची कारणं वेगळी होती, पण दोघीही ताणाखाली होत्या.

पहिलीला वाटत होतं आपल्या मुलाचं काही चुकू नये, त्याचा गृहपाठ अपूर्ण राहू नये आणि त्यामुळे त्याला वर्गात शिक्षा वगैरे होऊन त्याची मानहानी होऊ नये. त्यामुळे ती रोज त्याचा गृहपाठ स्वत: पूर्ण करून देत होती. बरं, आता त्याबद्दल बोलतानाही आमचा गृहपाठ, आमचा अभ्यास, आमची शाळेची वेळ असा उल्लेख करत होती. एकदोनदा मला हसूही आलं थोडंसं. तर दुसरी, मुलीचा शाळेचा वेळ, टय़ुशनचा वेळ, येण्याजाण्याचा वेळ हे सगळं करण्यात मुलीची कशी तारेवरची कसरत होते आणि त्यामुळे तिला गृहपाठ करायला कसा वेळच पुरत नाही, त्यामुळे ती करत असलेली गाइडची मागणी अगदीच अवाजवी नाही, हे तिला कसं पटतंय, पण सध्या तिच्या कुटुंबातील काही समस्यांमुळे ती मुलीची मागणी कशी पूर्ण करू शकत नाही यावरच अडकून पडली होती.

यातलं पहिलं उदाहरण सार्वत्रिक नाही हे मान्य, पण मुलांचा गृहपाठ लपूनछपून पूर्ण करणाऱ्या पालकांची संख्याही अगदीच कमी नाही हेही तितकंच खरं. दुसरं उदाहरण तर सार्वत्रिक आहे. मुलांचा गृहपाठ हा अनेक पालकांसाठी खर्चीक विषय ठरतोय, कारण अनेक ठिकाणी गृहपाठ करून घेण्याचे क्लासेसही पाहायला मिळतात आजकाल. गृहपाठ यासाठीचा सोपा शब्द म्हणजे ‘घरचा अभ्यास’. घरचा म्हणजे शाळेच्या वेळेबाहेर घरी असतानाचा आणि अभ्यास म्हणजे सराव किंवा पुनरुक्ती करणं किंवा अर्थ जाणण्यासाठी पुन्हा नीट वाचणं. मग जे काही एकदा शिकलेलं आहे त्याचा सराव पालकांनी करायचा का? बरं शिकण्यासाठी खर्च झाला असेल, तर सरावासाठी अधिकचा खर्च गरजेचा आहे का? आणि सरावासाठी क्लासची गरज आहे का? या सगळय़ाचं उत्तर ‘नाही’ असंच येईल, तेव्हा आपल्याला गृहपाठाचा खरा अर्थ समजेल.

गृहपाठ म्हणजे बाजारातून विकतच्या वस्तू आणून केलेला प्रकल्प नाही किंवा घरातील मोठय़ा माणसांनी पूर्ण करून दिलेला प्रकल्प नाही किंवा न समजता या पुस्तकातून त्या वहीत किंवा या वहीतून त्या वहीत काही लिहिणंही नाही. तर समजण्यासाठी वाचणं हाही गृहपाठ आहे, वाचलेलं परत परत वाचणं हासुद्धा गृहपाठच असतो आणि आज काय शिकलोय ते आसपास पाहणंही गृहपाठाचाच एक भाग आहे. पण गंमत अशी होते, ती मी अनुभवलीय म्हणून सांगते, मुलांना वर्गात वर्तुळाचा परीघ आणि क्षेत्रफळ काढायला शिकवल्यावर जर का म्हटलं, की तुमच्या घराच्या हॉलमध्ये जेवढय़ा वर्तुळाकार वस्तू असतील त्या पाहा, त्यांची यादी करा आणि त्यापैकी पाच वस्तूंचा परीघ आणि क्षेत्रफळ काढून आणा. दुसऱ्या दिवशी त्याबाबत विचारणा केली तर दोन प्रकारची मुलं असतात, पाचच्या जागी दहा वस्तूंचं क्षेत्रफळ किंवा परीघ काढणारी आणि अपूर्ण काम केलेली वा काहीही न केलेली, यातल्या दुसऱ्या गटातल्या मुलांशी बोलल्यावर असं लक्षात येतं, की अनेकदा या गृहपाठाची कोणीतरी मोठय़ा माणसानं खिल्ली उडवलेली असते आणि त्यामुळे त्यांचा समजही गृहपाठ म्हणजे फक्त काहीतरी लिहिणं असा झालेला असतो. त्यामुळेच अनेकदा राष्ट्रीय किंवा राज्य स्कॉलरशिप अगर एन.टी.एस. (नॅशनल टॅलेंट सर्च) मिळवलेल्या मुलांनाही एल.पी.जी. गॅस वा सिलेंडर, प्रेशर कुकर अशा साध्या साध्या गोष्टींची ओळख नसते, असं पाहायला मिळत असतं, त्याची खंत वाटते.

खरंतर, लहानपणापासून गृहपाठ करून घेण्यासाठी एक छोटंसं तंत्र आपण वापरू शकतो. जे मी वापरलंय म्हणून ठामपणे सांगते. मुलं शाळेतून आल्यावर खेळ वगैरे रोजचा दिनक्रम त्यांना करू द्यावा आणि मग आपण आपली कामं करता करता त्याला आज मी काय काय केलं ते सांगायला सुरुवात करावी. जसं की, मी आज ऑफिसला जाताना रिक्षा केली किंवा आज माझी मैत्रीण आपल्या घरी आली होती. मग हळूहळू त्याला विचारावं, की आज शाळेत काय काय शिकवलं? तू काय केलंस? त्यातलं घरी काय पाहता किंवा करता येईल? आपोआपच शाळेत जे काही शिकवलं असेल त्याची पुनरुक्ती होते. मला संस्कृत अजिबात येत नव्हतं वा अजूनही नीटसं येत नाही, पण माझ्या मुलाशी संस्कृतबाबत असा अभ्यास करून घेताना, मला माहीत नसलेल्या गोष्टी सांगण्याचा आनंद त्याला मिळत होताच त्याशिवाय मला सुभाषितांची वगैरे माहिती देताना आपोआप त्याची पुनरावृत्ती होत होती, म्हणजे गृहपाठ होत होता.

मुलं गृहपाठ कसा करतात याचं एक मजेशीर उदाहरण द्यायला मला आवडेल. शाळेत गणित शिकवताना, आलेख कागदाच्या सहाय्यानं अनियमित पृष्ठभाग असलेल्या वस्तूचे अंदाजे क्षेत्रफळ काढणं हा घटक शिकवून झाल्यावर त्याचं प्रात्यक्षिक करण्यासाठी वर्गात मी सांगितलं, उद्या प्रत्येकानं एक एक आलेख कागद आणि आपल्या परसातल्या एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे, ज्याचं आपण क्षेत्रफळ काढू. वर्गातला एकजण अळूचं पान घेऊन आला, तर एक लाजाळूची पर्णिका घेऊन आला. अळूच्या पानाला घडी घालून त्याचं क्षेत्रफळ काढण्यात पूर्ण वर्गाची कसोटी लागली आणि पर्णिकेच्या क्षेत्रफळामुळे क्षेत्रफळ चौ.मिलीमीटर असू शकतं याची मुलांना प्रचीती आली. इथे जर मुलांना पानं आणायला सांगणं हा त्यांच्यावर अन्याय आहे किंवा त्यांना त्रासदायक आहे असा पवित्रा कोणी घेतला असता, तर या सगळय़ांतली गंमत आणि अनुभव हरवला असता.

गृहपाठ हा कुणीही समोर बसून करवून घ्यायची गोष्टच नसते मुळी ती जाता जाता लक्ष ठेवून करू देण्याची गोष्ट असते. पुलंचा ‘अभ्यास एक छंद’ हा पाठ मी आमच्या एका नातेवाईकांकडे गेले असता त्यांची मुलगी वाचत होती तेव्हा तिच्या गृहपाठाच्या निमित्ताने ऐकला आणि मग मी तिला ‘व्यक्ती आणि वल्ली’तल्या काही ‘वल्ली’ ऐकवल्या. अशी देवाणघेवाणही गृहपाठाच्या निमित्तानं होत असतेच आणि ‘अभ्यास एक छंद’मध्ये पुलंनी म्हटल्याप्रमाणे एखाद्याशी मैत्री करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे आपण मैत्रीचा हात पुढे करणं. खेळापासून गणितापर्यंत कुणाशीही मैत्री करण्यासाठी स्वत: केलेला सराव उपयोगी होतो. रेणूताई दांडेकरांनी म्हटल्याप्रमाणे मूल, शाळा आणि अभ्यास यांनी निदान पंधरा वर्ष तरी आपलं जीवन पालक म्हणून व्यापलेलं असतं किंवा त्रासलेलं असतं. म्हणजे पंधरा वर्ष तरी आपण पालक म्हणून मुलांच्या अभ्यासाच्या ध्यासात असतो. तेव्हा सुरुवातीची काही वर्ष त्यांच्याबरोबर संध्याकाळचा काही वेळ घालवत शाळेत काय झालं, याची पुनरुक्ती करून घेणं एवढं प्रत्येक पालकानं नक्की जमवलं पाहिजे. बाकी कोणत्या वर्गाना गृहपाठ असावेत, कोणत्या वर्गाना नसावेत, वगैरे निर्णय आणि त्यावरच्या चर्चा तर होणारच.
joshimeghana.23@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : संधीकालच्या घनगर्द सावल्या!

संबंधित बातम्या

गेले लिहायचे राहून.. : कायदे जिंकलेले, कायदे हरलेले!
आयुष्याचा अर्थ: खल भेदण्याची आस दे!
रक्तामध्ये ओढ मातीची!
संशोधिका : मज्जासंस्थेचं चिकित्सक संशोधन!
सोयरे सहचर : मन शांतवणारे मित्र!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को, जपान बलाढ्य युरोपिय देशांपुढे आपापल्या गटांत अव्वल कसे राहिले?
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video
बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल