‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : ‘ब्र’ उच्चारताना

ऑस्ट्रेलियामध्ये २०१३ पासून ‘हाऊस रुल्स’ नावाचा असाच एक रिअ‍ॅलिटी शो लोकप्रिय आहे

(संग्रहित छायाचित्र)

मानसी होळेहोन्नूर

दूरचित्रवाणी हे आजही मनोरंजनाचे मोठे साधन समजले जाते. वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिकांपेक्षा रिअ‍ॅलिटी शोज्ना जास्त प्रेक्षकवर्ग लाभतो, हे लक्षात आल्यावर सर्वच वाहिन्या असेच कार्यक्रम करण्याच्या मागे लागतात. ही काही फक्त भारतातली गोष्ट नाही. ऑस्ट्रेलियामध्ये २०१३ पासून ‘हाऊस रुल्स’ नावाचा असाच एक रिअ‍ॅलिटी शो लोकप्रिय आहे. यामध्ये घरांची, बागेची सजावट करायची असते आणि जी जोडी हे चांगले करते त्यांना बक्षीस दिले जाते. २०१७ मध्ये आलेला या कार्यक्रमाचा पाचवा सीझन वेगळ्याच कारणासाठी गाजला होता. निकोल प्रिन्स आणि फिओना टेलर या दोन मत्रिणींची जोडी त्या भागात होती.

हा कार्यक्रम सुरू असतानाच या दोघींवर खूप टीका होत होती, कारण त्या सतत त्यांच्या प्रतिस्पर्धी स्पर्धकांवर शेरेबाजी करताना दिसायच्या. इतर स्पर्धकदेखील त्यांच्याशी तुटक वागत होते. सतत नकारात्मक बोलण्यामुळे त्यांच्याबद्दलचे जनमत अजिबात चांगले नव्हते. जेव्हा ही गोष्ट निकोल आणि फिओना यांना कळली तेव्हा त्या दोघींच्या दृष्टीने हा खूप मोठा धक्का होता. कारण त्या वाहिनीने त्यांच्या संभाषणातला नकारात्मक भाग तेवढाच दाखवला होता, बाकीचा संवाद दाखवलाच नव्हता. हे एक प्रकारचे ‘शोषण’च होते. या सगळ्यामुळे या दोघींना अनेक ठिकाणी द्वेष, रोषाला सामोरे जावे लागले. निकोलला या सगळ्याचा मानसिक त्रास झाला आणि त्यातून तिचे दारू पिण्याचे प्रमाणही वाढले. नंतर तिला यातून सावरण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. ‘वाहिनीने आपली केवळ सोयीस्कर बाजू कार्यक्रमातून दाखवून आपल्याला त्रास दिला’ हे कारण देत तिने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर खटला दाखल केला. ‘ती केवळ एक स्पर्धक आहे, त्यामुळे आम्ही तिला कोणतीही नुकसानभरपाई देऊ शकत नाही’ असा निर्मात्यांचा पवित्रा होता. मात्र ‘ती जरी कंपनीत कामाला नसली तरीही ती तिचे काम सोडून या कार्यक्रमात सहभागी झाली होती, त्यामुळे तिला इतर नोकरदारांसारखेच वागवले पाहिजे’ अशी न्यायालयाने भूमिका घेतल्यामुळे आता वाहिनीला निकोल आणि फिओनाला नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

पूर्वी म्हणायचे, की कानाने ऐकलेल्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे; पण आताच्या काळात तंत्रज्ञानाने इतके काही आभास निर्माण करता येतात, की नक्की कशावर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न पडतो. आपण अनेकदा टीव्हीवर जे बघतो, ते सगळेच स्क्रिप्टमध्ये लिहिल्याप्रमाणेच होत असते, अगदी ‘रिअ‍ॅलिटी शो’सुद्धा. कोणता स्पर्धक कधी रडेल, कधी हसेल, ज्यामुळे जास्त प्रेक्षक लाभेल अशी सगळी गणिते मांडून सगळे काही दाखवले जात असते. जे डोळ्यासमोर दिसते, त्यापेक्षा किती तरी वेगळे वास्तव असते. किती जणांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण होते याची गणनाच नसते.

एखादीच निकोल यावर स्पष्ट बोलते, नुकसानभरपाई मागते, कारण ती केवळ मनोरंजन क्षेत्रात काम करणारी एक अभिनेत्री नाही. तिचा स्वत:चा वेगळा पेशा आहे. मात्र ज्यांना याच क्षेत्रात करिअर करायचे आहे, असे अनेक जण मूकपणे हा अन्याय सहन करत असतात. कारण त्यांना माहीत असते, जर त्यांनी काही बोलण्याची हिंमत केली, तर आत्ता जे काही मिळते आहे तेसुद्धा मिळणार नाही. तर अनेकदा हा सगळा चोरीचा मामला माहीत असतो; पण त्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळणार असेल, पैसे मिळणार असतील तर ते सहन करण्याचीदेखील काही जणींची/ जणांची इच्छा असते. ‘तेलही गेले, तूपही गेले’सारखे होण्यापेक्षा स्वत:ला त्रास करून घेत उद्याची वाट बघणारे कमी नाहीत. आपल्या देशातही अशी एखादी निकोल नक्कीच असू शकते. कदाचित हे वाचून तीसुद्धा तिच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडेल, अशी अपेक्षा बाळगूया.

मातृत्वाचे कोडे

मागच्या वर्षी ‘बधाई हो’ हा चित्रपट आला तेव्हा काहींना हे अतिरंजित वाटले, तर काहींना ती त्यांचीच गोष्ट वाटली;  अशीच घटना घडली चीनमध्ये. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये एका सदुसष्ट वर्षांच्या स्त्रीने मुलीला जन्म दिला. तिआन या त्यांच्या नेहमीच्या तपासण्या करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांना कळले, की त्या गर्भवती आहेत. या वयात ही जबाबदारी झेपेल का आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ासुद्धा?’ असा प्रश्न त्यांना त्या वेळी पडला. शिवाय त्यांना दोन मुले आहेत. त्यातला एक जण ‘एकच मूल’ कायदा येण्याआधी जन्माला आलेला, तर दुसरा त्यानंतर; पण त्यांनी आणि त्यांच्या नवऱ्याने, हुयांग यांनी, हे मूल होऊ द्यायचे ठरवले. त्यामुळे ते दोघेही नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊन आई-वडील झालेले चीनमधले वयोवृद्ध पालक बनलेले आहेत.

१९७९ पासून चीनमध्ये ‘एकच मूल’ सक्ती राबवण्यात आली होती. या सक्तीचे लोकसंख्येच्या दृष्टीने काही चांगले परिणाम झाले; पण त्याच वेळी दूरगामी, घातक परिणामही बघायला मिळाले. लोकसंख्येतील तरुणांचे प्रमाण घटले, उत्पादनशील वयोगटातील लोकसंख्या कमी झाली. स्त्रियांवरही याचे शारीरिक त्याचप्रमाणे मानसिक परिणाम झाले. याचे सामाजिक परिणामदेखील हितावह नव्हते. २०१६ मध्ये सरकारने ही ‘एकच मूल’ सक्ती उठवली आणि ‘हम दो हमारे दो’ धोरण अवलंबले. दशकभरापूर्वी सरासरी चोविसाव्या वर्षी स्त्रिया मातृत्वाची जबाबदारी घ्यायच्या. तेच प्रमाण आता सव्विसाव्या वर्षांपर्यंत घसरले आहे. २०१६ नंतर ज्या प्रसूती झाल्या त्यात पहिलटकरणींपेक्षा दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे तिआन यांच्या प्रसूतीमुळे या सगळ्यावरसुद्धा परत चर्चा झाली. ‘आई होण्यासाठी वयाची धास्ती बाळगण्याची गरज नाही’ असा विश्वास यातून अनेकींना मिळाला असणार. त्यात सरकारनेदेखील ‘दोन मुलं’ धोरण राबवल्यामुळे अनेक जणी दुसऱ्या अपत्याचा परत विचार करू शकतात. लोकसंख्या नियंत्रण गरजेचे आहे, परंतु त्याच वेळी सामाजिक, आर्थिक समतोलदेखील राखला गेला पाहिजेच.

मातृत्व ही केवळ शारीरिक जबाबदारी नसते. ती तेवढीच मानसिक, आर्थिक जबाबदारीपण असते. सदुसष्टाव्या वर्षी नैसर्गिक गर्भधारणा हे खरं तर एक आश्चर्यच आहे; प्रगत विज्ञानालादेखील कोडय़ात घालणारे. आपण विज्ञानात कितीही प्रगती केली, तरीही निसर्ग आपल्यासमोर नवीन कोडे सादर करतोच. कदाचित या कोडय़ांमधून आपण नवीन काही शोध घेऊ शकू म्हणूनही असेल. तिआन आणि हुयांग यांच्या नवजात लेकीने असेच काही प्रश्न जन्मताच जगासमोर उभे केले आहेत. कदाचित त्यातल्या काहींची उत्तरे मिळतील. काही प्रश्नांच्या उत्तरातून नवीन ध्येयधोरणेही राबवली जाऊ शकतात.

‘रि-होमिंग’ बघावं करून

प्रत्येक लग्नात किंवा कौटुंबिक समारंभात स्त्रियांचं सगळ्यात जास्त लक्ष इतर स्त्रियांच्या कपडे-दागिन्यांवर असतं. पुन्हा पुन्हा तीच साडी घातली, तेच दागिने घातले तर ‘अरे परत तेच’ असं कधी डोळ्यांनी तर कधी शब्दांनी हिणवलं जातं. मात्र प्रत्येक समारंभासाठी वेगळी साडी घ्यायला, एक साडी एकदाच नेसायला सगळेच जण काही अतिश्रीमंत नसतात. गंमत म्हणजे हा प्रश्न काही फक्त भारतातलाच आहे, असं नाही. पाश्चात्त्य देशांतही हा प्रश्न थोडय़ाफार वेगळ्या परिस्थितीत का असेना आहेच. जसं की, पार्टीला जायचं आहे, जवळच्या मत्रिणीच्या लग्नाला जायचं आहे किंवा मुलाखतीसाठी जायचं आहे. बरं या सगळ्यामध्ये त्या-त्या वेळेच्या हवामानानुसार कपडे घालावे लागतात. मग जर असं प्रत्येक समारंभाला वेगळे कपडे घालायचे ठरवलं तर दिवाळं नक्कीच निघणार. पण मग काय करायचं? स्त्रियांसाठी महत्त्वाच्या बनलेल्या या प्रश्नाचं उत्तर अनेक प्रगत देशांनी जे शोधून काढलं आहे ते आपल्या समाजात थोडंफार पूर्वीपासूनच अस्तित्वात होतं.

अमेरिका, ब्रिटन, याचबरोबर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये कपडे, पस्रेस इत्यादी भाडय़ाने देणारे पोर्टल्स, दुकानं नव्याने सुरू झाली आहेत. ब्रॅण्डेड कपडे महाग असतात पण ते तुमचं सामाजिक/ आर्थिक स्थानसुद्धा दाखवतात. त्यामुळेच ‘हुर’, ‘रेनेथरनअवे’, ‘माय वॉर्डरोब’, ‘फ्रंट रो’सारखी संकेतस्थळं जे काम करतात तेच काम ब्रिटनमध्ये टॅश आणि मेरी या दोन मत्रिणींनी करायला सुरुवात केली. या दोघींनी त्यांचे जुने कपडे, पस्रेस, शूज, भाडय़ाने द्यायला सुरुवात केली. त्यांच्या मते, ही अशी सेवा सध्याच्या काळात अत्यंत गरजेची बनली आहे. स्त्रियांकडे, खास करून लहान मुलं असणाऱ्यांकडे, स्वत:च्या कपडे खरेदीसाठी वेळ नसतो. अनेकदा वाढलेल्या वजनामुळे जुने कपडे होत नसतात. अशा वेळी परत खरेदी करण्यापेक्षा जर कमी किमतीत चांगले कपडे फक्त एखाद्या कार्यक्रमासाठी भाडय़ाने मिळत असतील तर काय वाईट आहे? त्यामुळे अनेक जण नवीन कपडे घेण्याऐवजी असं भाडय़ाने कपडे घेण्याला पसंती देताना दिसत आहेत.

काही ठिकाणी एखादा ड्रेस एका वेळेसाठी भाडय़ाने घेता येतो, तर काही ठिकाणी महिन्याची ठरावीक रक्कम भरली तर तुम्हाला महिनाभर ठरावीक कपडे घेऊन जाता येतात.

आपल्याकडे पूर्वीपासून मोठय़ांचे छोटे झालेले कपडे लहान भावंडांसाठी वापरले जायचे. आई-आजीच्या जुन्या साडीतून मुलींना कपडे शिवले जायचे.आता हे सगळे जुने झाले आहे असे वाटत असतानाच भारतातही ‘फेसबुक’वरचे काही ग्रुप दिसतात, जिथे स्त्रिया जुन्या साडय़ा, ओढण्या, कधी विकतात तर कधी फुकट/नाममात्र किमतीत भाडय़ाने देतात. काही दुकानंसुद्धा आहेत जिथे वापरलेले कपडे मिळतात. लग्नात घालण्यासाठीचे खोटे दागिने तर अगदी गल्ली-बोळातल्या ब्युटी पार्लरमध्येसुद्धा मिळतात. ‘फेसबुक’वरच्या ग्रुपमध्ये जुनी साडी विकण्यासाठी एक सुंदर शब्द वापरला जातो ‘रि-होमिंग’. याचा अर्थ ‘साडीला नवीन घर देणे.’ मुळात महागामोलाचे कपडे घालणार एकदाच, मग त्यावर भरमसाट खर्च करून नंतर ते कपाटात पडून राहणं काय कामाचं? त्यापेक्षा असे भाडेतत्त्वावर घेतलेले किंवा आधी वापरलेले कपडे वापरणे हे गरिबीचे नव्हे तर शहाणपणाचे लक्षण समजले जाऊ लागले आहे.

(माहिती व छायाचित्रे स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: House rules nicole prince fiona taylor re homing abn

ताज्या बातम्या