मशागत मेंदूची : मेंदूतले नकाशे

नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते प्रौढ वयाच्या कुठल्याही माणसाच्या मेंदूत त्याक्षणी काय चाललं आहे, हे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कळू शकतं. त्याच्याच माध्यमातून मेंदू आणि आपलं वागणं यावर चांगला प्रकाश पडला आहे.

‘जा ‘ ण ‘ पा ‘ ल ‘ क ‘ त्वे
डॉ. श्रुती पानसे यांनी ‘मेंदू व शिक्षण’ या विषयात पीएच.डी. केली असून  यासंबंधी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करतात. आतापर्यंत त्यांची दहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यासह अनेक दैनिके व नियतकालिके यांमधून त्यांनी सातत्याने लेखन केले असून मेंदू व आपली जडण-घडण या विषयावर त्या कार्यशाळांचे आयोजनही  करतात.

नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते प्रौढ वयाच्या कुठल्याही माणसाच्या मेंदूत त्याक्षणी काय चाललं आहे, हे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कळू शकतं. त्याच्याच माध्यमातून मेंदू आणि आपलं वागणं यावर चांगला प्रकाश पडला आहे. यामुळे प्रत्येक वयातलं शिक्षण आधिक चांगलं कसं होईल, त्यातल्या अडचणी कशा दूर करता येतील हे समजू शकतं. मेंदूचं मुलांच्या बौद्धिक वाढीतलं योगदान सांगणारा लेख दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी.
आ पण कोणत्या वेळी काय करायचं हे प्रत्येक वेळी मेंदूच ठरवत असतो. मात्र आपल्या स्वत:च्या मेंदूत काय चाललंय, याची माहिती मात्र आपल्याला नसते. मेंदूची एक ठरावीक आकृती आपल्याला माहिती असते. त्यात मेंदूचे काही भाग दाखवलेले असतात. मात्र या विभागांच्या आत काय चालतं आणि याचा शिक्षणाशी काय संबंध आहे, हे जाणून घेणं अतिशय मजेशीर आहे. स्वत:साठी तर ही माहिती प्रत्येकाला हवीच. तसंच, जे पालक, शिक्षक किंवा अन्य नात्याने मुलांसोबत राहतात- त्यांनाही हे माहीत हवं.
आपल्या मेंदूत शिकण्याची प्रक्रिया कशी चालते हे बघणं मजेशीर असतं. माणसाचा मेंदू हा निसर्गाशी कसा  जोडलेला आहे, हे आपल्याला निसर्गातल्या उदाहरणांवरूनच समजून घेता येतं.   
निसर्गात काही आकृत्यांची रचना एकसारख्या पद्धतीची दिसते. जसं, झाडाला भरपूर फांद्या फुटलेल्या असतात, त्या फांद्यांना छोटय़ा छोटय़ा फांद्या फुटत जातात, ही रचना. मुळांचीही रचना तशीच असते. मुख्य मुळांना अनेक उपमुळं फुटलेली असतात. वीज चमकून जाते, तेव्हा रेषारेषांची एक मोठी आकृती दिसते. परागकणांच्या मधल्या गोलाभोवती सर्वदिशांनी असलेल्या पाकळ्या, कोळ्यांचं जाळं, मोरपीस अशांच्या आकृतीत मध्ये एक केंद्र किंवा रेषा असते आणि त्याच्या बाजूने अनेक रेषा फुटलेल्या असतात.
सोबतच्या चित्रात जे झाड दिसतं आहे, साधारण तशाच रचनेच्या पेशी आपल्या मेंदूमध्ये असतात. आपल्या ‘शिकणाऱ्या पेशीं’ची म्हणजेच न्यूरॉन्सची रचना ही अशीच असते.

मेंदूतल्या विविध क्षेत्रांना चालना
आपल्या मेंदूत वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारी वेगवेगळी क्षेत्रं आहेत. त्या त्या क्षेत्रातले न्यूरॉन्स सिनॅप्स तयार करतात. नवीन भाषा कानावर पडत असेल तर मेंदूतल्या भाषाविषयक क्षेत्रात सिनॅप्स तयार होतात. समजा नवीन भाषेतलं गाणं वेगळ्याच प्रकारच्या वाद्यावर, वेगळ्याच पद्धतीने संगीतबद्ध होऊन कानावर पडत असेल, तर मेंदूतली भाषा + संगीतक्षेत्र इथे सिनॅप्स तयार होतात. अशा नवीन संगीतावर जर स्वत: नृत्य करायला मिळालं, तर फारच चांगलं. कारण इथे नुसतं श्रवणाचं काम नाही तर काही तरी कृती करायला मिळते. तेव्हा, मेंदूच्या विविध केंद्रांना चालना मिळते. असा शिकण्याचा अनुभव छान स्मरणात शिरतो.

सिनॅप्स तयार होणं म्हणजेच शिकणं. प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक असतं. त्याच्या बाजूने अनेक शाखा फुटलेल्या असतात, या शाखांना डेन्ड्राइट्स (Dendrites) म्हणतात. या शिवाय प्रत्येक न्यूरॉनला एक लांब धागा असतो, त्याला अक्झॉन (axon) म्हणतात. जेव्हा आपण एखादी नवी गोष्ट शिकतो. एखादं नवं गणित शिकतो किंवा गोष्ट वाचतो, सायकल चालवायला शिकतो, पोहायला शिकतो किंवा नव्या माणसाला भेटतो. वेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊन नवीन वातावरण, वेगळी भाषा अनुभवतो, त्या वेळेस आपल्या मेंदूतले न्यूरॉन्स गतिमान होतात आणि एक अक्झॉन दुसऱ्याला जाऊन मिळतो. त्यांच्यात सिनॅप्स तयार होतात. दोन अक्झॉन्सच्या मध्ये एक छोटीशी फट असते.
प्रत्येक नव्या अनुभवाच्या वेळी आपल्या मेंदूत असे सिनॅप्स तयार होत असतात. अशा वेळी एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला विद्युत-रासायनिक संदेश देत असतो. हे काम अतिशय वेगात होतं. मेंदूत अशा न्यूरॉन्सची संख्या अब्जावधींच्या घरात असते.
जन्माला यायच्या आधी मेंदूत सुटे सुटे न्यूरॉन्स असतात. जन्माला आल्यापासून मूल जसजसं एकेक गोष्ट शिकत जातं, तसतसं त्याच्या मेंदूत सिनॅप्स तयार होतात. उदा, पहिला वहिला प्रकाशाचा अनुभव, माणसाच्या स्पर्शाचा अनुभव, बोलणं सुस्पष्टपणे कानावर पडण्याचा अनुभव – या साऱ्या अनुभवांचे सिनॅप्स तयार होत असतात.
हे सिनॅप्स तयार होण्याचं काम आयुष्यभर चालूच राहतं.
*  जन्मापासून दोन र्वष कोणतीही नवी गोष्ट शिकण्याचा वेग अफाट असतो. या काळात मुलांना जसे अनुभव मिळतील ते सर्व मेंदूत साठवून ठेवण्याची त्याची क्षमता असते. म्हणून ही पहिली दोन र्वष त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात.
*  दोन ते सहा, सहा ते आठ, आठ ते बारा असे काही कालखंड वैशिष्टय़पूर्ण आहेत. या शिकण्याची गती वेगवानच असते. मात्र ० ते २ या वयोगटाइतकी नसते.
एखादी नवी गोष्ट शिकली जात असते, तेव्हा सिनॅप्स तयार होतात. दोन अक्झॉन्स एकमेकांशी जोडले जातात, हे आपण पाहिलं. मात्र शिकण्याइतकाच महत्त्वाचा आहे सराव. ज्या वेळेला सराव मिळतो, तेव्हा या अक्झॉन्सवर आवरण तयार होतं. यालाच मायलिन शीथ (Myelin sheath)असं म्हणतात. याचा अर्थ, आता शिकलेलं पक्कं झालं. मात्र शिकलेल्या गोष्टीला जर पुरेसा सराव मिळाला नाही तर सिनॅप्स तयार होऊनही फारसा उपयोग नाही कारण ही गोष्ट लवकरच विस्मरणात जाते. म्हणून सराव हा अत्यंत आवश्यक. सरावाला दुसरा पर्याय नाहीच!
आता एक गमतीची गोष्ट म्हणजे, या न्यूरॉन्सची रचना आपण लक्षात घेतली. हीच रचना शिकण्याची आहे, लक्षात ठेवण्याचीही आहे. म्हणून ज्या वेळेस कोणत्याही विषयाच्या आपण नोट्स काढतो, वेळापत्रक बनवतो किंवा काही गोष्टी संगतवार लक्षात ठेवायच्या असतात तेव्हा, न्यूरॉन्सची हीच रचना कागदावर वापरून आपण या नोट्स काढू शकतो. मुलांना चौथी-पाचवीपासून ही पद्धत शिकवता येईल. याला माइंडमॅिपग/ ब्रेनमॅिपग असं म्हणतात.
नेहमी आपण मुद्दे काढतो, तेव्हा एकाखाली एक शब्द येईल असे काढतो. मात्र यापेक्षाही ब्रेनमॅिपगची पद्धत अतिशय परिणामकारक आहे, असं लक्षात येईल. टोनी बुझॉन यांनी ही पद्धत विस्तारपूर्वक सांगितली आहे.
आपल्याला जर स्वत:चा माइंडमॅप तयार करायचा असेल तर तयार करता येतो. (याविषयी पुन्हा केव्हातरी) मुलांनी स्वत: तयार केला, तर त्यांच्या नीट लक्षात राहील.  याच पद्धतीचा वापर करून नोट्स काढल्या तर लक्षात राहीलच, शिवाय परीक्षेच्या वेळेस नुसती नजर फिरवली तरी आठवेल. म्हणजे आकलन आणि स्मरण या दोन्हींसाठी हा नकाशा उपयुक्त आहे.
वय आणि शिकणं
माणूस आयुष्यभर काहीही शिकू शकतो, हे मात्र सगळ्यात खरं. उदा. आपल्या घरातलं छोटं मूल मोबाइल हाताळण्याची खोटी खोटी कृती करत एक दिवस खरंच मोबाइल फोन सहजपणे हाताळू लागतं. अशा वेळी आजी-आजोबांना त्यांचं कौतुक वाटतं. पण त्यात फार कौतुक वाटण्यासारखं काही नसतं. कारण,
१) मूल मोठय़ांच्याच अनुकरणातून शिकतं.
२) आपल्यापेक्षा मुलांचा शिकण्याचा वेग अफाट असल्यामुळे जास्त पटकन शिकतात.  
मात्र या मोबाइल फोनरूपी यंत्रावर आजी-आजोबांचा हात मात्र तुलनेने उशिरा बसलेला असतो. काही आजी-आजोबांनी तर केवळ फोन घेणे आणि बोलणे एवढय़ापुरताच त्याचा वापर शिकून घेतलेला असतो. एसेमेस वाचता येतील – करता येतील असंही त्यांना वाटत नसतं. त्या तुलनेत छोटय़ांची शिकण्याची गती आश्चर्यकारक वाटावी अशी असते.
अर्थात असं असलं तरी न्यूरॉन्स आपल्याला आयुष्यभर शिकतं ठेवायला मदत करतात. आपल्याला तीव्र इच्छा असेल, तर आपण नक्कीच कोणत्याही वयात कोणतीही गोष्ट शिकू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Human brain genetic diagram

ताज्या बातम्या