स्त्रियांचे सैन्य सर्वप्रथम उभारणारा गणपती हा आपला देव आहे! स्त्रियांच्या अंगच्या गुणांना योग्य वाव देणे म्हणजे गणपतीने आरंभिलेले काम पुढे नेणे होय. स्त्रिया ‘अबला’ आहेत म्हणून त्यांना पुढे येऊ न देणे, त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेणे या गोष्टी गणेशभक्तांनी त्याज्य मानल्या पाहिजेत.
गणपती हे महाराष्ट्रीयांचे आवडते दैवत आहे. राजकारण आणि रंगभूमी ही मराठी माणसांची आवडती क्षेत्रे आणि त्याच क्षेत्रात गणपतीचे कार्य अनन्यसाधारण स्वरूपाचे असे आहे! हा गणपती आपण ज्या ज्या गोष्टींचा प्रेरक म्हणून मानतो, त्या त्या गोष्टी आपल्या आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करणे, त्याचे गुण अंशरूपाने का होईना, आपल्या अंगी बाणविणे ही गणपतीची खरी पूजा होय!
 श्रीसमर्थ रामदासस्वामी हे श्रीरामाचे अनन्यभक्त. ते म्हणतात, ‘दास म्हणे रघुनाथाचा, गुण घ्यावा।’ आपले जे उपास्य दैवत असेल त्याच्याच गुणांचे अनुकरण करणे, त्याच्या वागण्या-सवरण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्तविणे म्हणजेच त्याची खरी उपासना होय! नुसतेच जपजाप्य, आरत्या, उपासतापास करणे म्हणजे देवपूजा असे नव्हे. आपणा हिंदूंचा प्रत्येक देव हा अन्यायाविरुद्ध लढलेला आहे, अक्षरश: लढलेला आहे! लक्षपूर्वक पाहिले तर आपल्याकडच्या प्रत्येक देवाच्या हातात सतत शस्त्र धरलेले आढळेल. आपण देवपूजेच्या प्रारंभी आवाहन करतो त्यातही त्याला ‘सशक्तिकं सायुधं’ असे पाचारण करतो; म्हणजे सर्व शक्तींसह, सर्व आयुधांसह, सर्व हत्यारांसह आपण गणपतीला निमंत्रित करत असतो आणि तो शस्त्रास्त्रांनी सज्ज असतानाच आपण त्याची पूजा करून आशीर्वादासाठी त्याची प्रार्थना करीत असतो. प्रत्येक देव जी आयुधे धारण करतो ती केवळ शोभेसाठी नव्हेत, तर लढण्यासाठी धारण केलेली असतात आणि देवांची ही लढाई अन्यायाविरुद्ध, दुराचाराविरुद्ध, दुष्टांविरुद्ध आणि समाजकंटकांविरुद्ध असते. देवांचे हे गुण जर सर्वसामान्य जनतेतील प्रत्येकाने आत्मसात केले, हा आदर्श नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने यथाशक्ती वागावयाचे ठरविले तर तो समाज सर्व जगातच आदर्श मानला जाईल यात काय संशय?
 अशा आदर्श समाजाचा आदर्श देव असे ज्याला सार्थपणे म्हणता येईल असा गणपती हा देव आहे. तो आनंदाचा उपभोग घेणारा, जीवनाचा अर्थ जाणणारा, स्वत:बरोबरच दुसऱ्याचीही काळजी घेणारा असा देव आहे! गणपतीची पूजा करताना त्याने ज्या ज्या क्षेत्रात अतुलनीय कर्तृत्व बजावले आहे, त्या त्या क्षेत्रात जी माणसे सध्या कार्यरत आहेत, झटत आहेत, त्यांचे कौतुक करणे, त्यांचे गुणगान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, हीसुद्धा एकप्रकारे गणेशाची पूजा, त्याची उपासना होय! सैन्यात पराक्रम करणाऱ्या वीरांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे, त्यांना यथाशक्ती साहाय्यभूत होणे हेसुद्धा एकप्रकारचे गणपतीचे कार्य आहे! कला-कौशल्य, नृत्य-नाटय़ अशा ठिकाणी जे धडपड करतात, काही कर्तृत्व गाजवितात, त्यांच्या गुणांचे कौतुक करणे हीसुद्धा गणपतीची उपासना होय! विद्येच्या मंदिरात जे नावलौकिक कमावतात, नवीन नवीन शोध लावतात, उत्तम यंत्रे तयार करतात, समाजाला नवे विचार देतात, निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने आपली लेखणी झिजवतात, त्या साहित्यिकांना, कलाकारांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करणे, त्यांच्या कलागुणांना यथाशक्ती आश्रय देणे हीसुद्धा गणपतीची पूजा होय!
स्त्रियांचे सैन्य सर्वप्रथम उभारणारा गणपती हा आपला देव आहे! स्त्रियांच्या अंगच्या गुणांना योग्य वाव देणे म्हणजे गणपतीने आरंभिलेले काम पुढे नेणे होय. स्त्रिया केवळ ‘अबला’ आहेत म्हणून त्यांना पुढे येऊ न देणे, त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेणे या गोष्टी गणेशभक्तांनी त्याज्य मानल्या पाहिजेत. गणपतीच्या भक्तांनी स्त्रीच्या अंगच्या गुणांना योग्य वाव कसा मिळेल ते पाहिले पाहिजे. गणपतीच्या मनात स्त्री जातीबद्दल जो भाव होता, तो भाव जाणणे, गणपतीच्या मताप्रमाणे वागणे होय. देवालासुद्धा त्याने घालून दिलेल्या मार्गावरून चालणारी माणसे अधिक आवडतात हे ओघाने आलेच.
अशारीतीने आपल्या वागण्याने, आचरणाने आपण गणपतीला प्रिय होण्याचा प्रयत्न करणे, ‘गणेशाची गुणाने पूजा बांधणे’ हे केवळ व्यक्तिमात्राच्याच नव्हे, तर समाजहिताच्या आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीनेही आवश्यक ठरते. गणेशोपासकांनी आपल्या भक्तीला असे विधायक वळण देणे, गणपतीनेच घालून दिलेल्या, सर्वानाच आनंद देणाऱ्या आणि सर्वाचेच कल्याण साधणाऱ्या मार्गाने जाणे हीच गणेशाची खरी उपासना होय.
गणपती हा देवांचा सेनापती आणि सेनापती म्हटले की शिस्त आलीच. गणेशोपासकांनी आपल्या उपासनेला शिस्तीचे बंधन घालून घेतले पाहिजे. गणपतीची जी काही पूजा करावयाची असेल ती निव्वळ आरडाओरडा न करता शिस्तीने कशी पार पडेल ते पाहिले पाहिजे. गणेशमूर्तीचे विसर्जन करताना निघणाऱ्या मिरवणुकीतून आपल्या या शिस्तीचे अभिमानास्पद दर्शन झाले पाहिजे, विसर्जनाची मिरवणूक म्हणजे नुसता गोंधळ, विसर्जनाची मिरवणूक म्हणजे नुसता आरडाओरडा, विसर्जनाची मिरवणूक म्हणजे विचित्र अंगविक्षेप आणि तिरस्करणीय हावभाव करीत चाललेला बेबंद माणसांचा जमाव, ही परिस्थिती कुठेही दिसता कामा नये.
गणपतीबाबतच्या ज्या गौरवकथा आपल्या पुराण ग्रंथांतून रूढ आहेत, त्या सगळ्यात जशी गणपतीची बुद्धी, गणपतीचा पराक्रम वर्णिलेला आहे तशी आणखीही एक गोष्ट अंतर्भूत करण्यात आलेली आहे. गणपती हा कधी अडलेला किंवा स्वत: संकटात सापडला म्हणून दुसऱ्या कोणाला तरी शरण गेला, असे कधीही आढळणार नाही. निदान मला तरी तशा स्वरूपाचा गणपतीचा उल्लेख कोठेही आढळलेला नाही. इतर देव मात्र अडचणीत सापडले की, त्यांनी विष्णूकडे जावयाचे, विष्णूने शंकराकडे जावयाचे असा ठरलेला मार्ग नेहमीच आचरणात आणलेला आढळतो.
गणपतीच्या बाबतीत गणपतीने इतरांना संकटांतून मुक्त केल्याचे दाखले हवे तेवढे सापडतील. स्वत: गणपती संकटात सापडला नाही असे नाही; पण त्यावेळी कधी शक्तीच्या जोरावर तर कधी युक्तीच्या जोरावर त्याने स्वत:च त्यामधून मार्ग काढलेला आहे. हे जे गणपतीचे चित्र सगळ्या जुन्या कथांतून मांडण्यात आलेले आहे ते असाधारणत: अद्वितीय अशा पराक्रमी पुरुषाचे आहे. प्रत्येक अवतारात गणपतीने दुष्ट-दुर्जनांबरोबर शर्थीचा लढा देऊन यशस्वी मुकाबला केला आहे. प्रत्येक लढय़ात त्याने युद्धविषयक नवीन आणि वेगवेगळ्या कल्पना अमलात आणल्या आहेत. गणपतीचा कालखंड काही हजार वर्षांपूर्वीचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि गणपतीने आपल्या सैन्याची जी रचना केली होती ती लक्षात घ्या. प्रत्येकी २१-२१ सैनिकांचा गट पाडून, अशा गटांचे एकत्रीकरण करून त्यामधून पुन्हा एकत्रीकरण केलेल्या गटांचा मोठा गट स्थापून सैन्याची उभारणी करणे हे तंत्र गणपतीने त्या काळात अमलात आणलेले दिसते. अचंबा वाटण्यासारखी गोष्ट अशी की, आजच्या प्रगत काळातही सैन्याची उभारणी आणि मांडणी अशाच तत्त्वावर होत असते. अशाप्रकारे सैन्याची रचना करणारा गणपती हा किती दूरदर्शी, केवढा योजक आणि किती बुद्धिमान होता त्याची प्रचीती येते. बिकटप्रसंगी आवश्यक वाटल्यास स्त्रियांनाही समरांगणावर पाठविणारा, अडचणीच्या वेळी शत्रूच्या गोटात शिरण्यासाठी खोटा बहाणा करणारा, काय वाट्टेल ते झाले तरी शत्रूला नेस्तनाबूत करावयाचेच अशा जिद्दीने लढणारा आणि लढाईत यश आल्यानंतर व्यक्तिगत सुखस्वास्थ्याकडे  पाठ फिरवून आत्मोन्नतीसाठी तपाचरणाचा मार्ग धरणारा गणपती युगानुयुगे पूजला गेला नसता तरच आश्चर्य!
गणपतीची पूजा आपण का बरं करू लागलो? गणपतीने अशाप्रकारे काही लोकोत्तर कार्य केले, त्याने विद्येची सेवा केली, नृत्य, नाटय़ अशा कला मनोरंजनासाठी जन्माला घातल्या, वाढविल्या, दुष्टदुर्जनांच्या निर्मूलनासाठी हाती शस्त्र धरले, भल्यामोठय़ा सेनेचे नेतृत्व केले आणि युद्धात अंतिम विजय संपादन करून देवादिकांनाही भयमुक्त केले. ही गणपतीच्या कर्तृत्वाची जशी एक उज्ज्वल बाजू, तसे दुसऱ्या बाजूने गणपती हा खाण्या-पिण्याचा रसिक, गोडाधोडाची आवड असणारा, मोदकांवर तर मनापासून प्रेम करणारा आहे. (येथेही पुन्हा एक गंमत आहे.) भगवान श्रीकृष्णाला दह्य़ा-दुधाची, लोण्याची आवड आहे असे आपण मानतो. दही-दूध-लोणी यांच्यावर पाकशास्त्राचे संस्कार त्यामानाने खूपच कमी करावे लागतात. दुधावर तर अजिबात करावे लागत नाहीत; पण मोदक ही एक पाकशास्त्रीय कृती आहे. अन्नपदार्थावर संस्कार करून मोदक बनवावा लागतो. गणपतीच्या आवडीचा हा पदार्थ भारतीय पाकशास्त्राचाही ‘श्रीगणेशा’ करणारा असेल काय?  सांगण्याचा मुद्दा असा की, जीवनाच्या ज्या ज्या बाजू आपल्याला अधिक आनंदी आणि सुखी ठेवण्यासाठी आवश्यक असतात, त्या सर्व आघाडय़ांवर गणपतीचे अलौकिक कर्तृत्व मोठय़ा दिमाखाने मिरवताना दिसते.
(केशव भिकाजी ढवळे यांनी प्रकाशित केलेल्या ‘देवा तूंचि गणेशु’ या ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकरलिखित पुस्तकातील हा संपादित अंश)