सहजीवनाचा भक्कम वृक्ष

अभिनयाचं क्षेत्र फार बेभरवशाचं! आज प्रचंड काम तर उद्या एकदम बेकार, असंही घडू शकतं. त्याचा भावनिकदृष्टय़ा माझ्यावर परिणाम होत असे. कधी कधी खूप उदास, निराश वाटायचं.

अभिनयाचं क्षेत्र फार बेभरवशाचं! आज प्रचंड काम तर उद्या एकदम बेकार, असंही घडू शकतं. त्याचा भावनिकदृष्टय़ा माझ्यावर परिणाम होत असे. कधी कधी खूप उदास, निराश वाटायचं. अशा वेळी मला भक्कम आधार असायचा उदयचाच! त्याच्या प्रोत्साहनामुळे, रिकाम्या वेळात माझे छोटे छोटे उपक्रम चालायचे. काव्यवाचन, निवेदन, नाटय़वाचन, कथांचे अभिवाचन. त्यानंतर मालिकांमधूनही माझं काम सुरू झालं. अशा वेळी घरातल्या कामांच्या बाबतीत उदयवर अधिक जबाबदारी पडते, जी तो आनंदाने पार पडतो. मात्र कधी थोडं चेष्टेत आणि थोडं रागात म्हणतो, ‘मी मुद्दाम स्वैपाक शिकत नाही. नाही तर तोसुद्धा मलाच करावा लागेल.’ सांगताहेत अभिनेत्री इला भाटे आपले पती डॉ. उदय भाटे यांच्याबरोबरच्या ३६ वर्षांच्या सहजीवनाविषयी.

आमचा प्रेमविवाह! यंदा आमच्या लग्नाला ३६ वर्षे पूर्ण झाली आणि लग्नापूर्वी जवळपास सहा र्वष मी व उदय एकमेकांना ओळखत होतो. उदय, माझ्या दादाचा शाळेपासूनचा वर्गमित्र. आम्ही दोघंही पार्लेकर. काही तरी निमित्ताने किंवा बहाण्याने आमचं एकमेकांच्या घरी जाणं-येणं होत असे. माझ्या व उदयच्या मनातल्या भावना, आम्ही बोलून दाखवल्या नसलो तरी दोन्ही घरच्या मंडळींनी त्या ओळखल्या होत्या. तेव्हाची एक गंमत आठवते, मला खालून येताना पाहिलं की पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून धावत घरात जात उदयची धाकटी बहीण त्याला सांगायची ‘दादा, इला आली’ मग तो पटकन् हाफ पँट बदलून फुल पँट घालायचा. मला हाफ पँट आवडत नाही म्हणून.. आणि लग्नानंतर मात्र घरातच नाही तर पार्ला मार्केटमध्ये जातानाही तो बिनधास्त हाफ पँट घालू लागला.
आमच्या लग्नाला कोणाच्याच घरून विरोध नव्हता. पण लग्न, माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरच व्हावं असं माझ्या आईला व मलाही वाटत होतं. मी पाच वर्षांची असताना माझे वडील गेले. आईने मोठय़ा हिमतीने मला व अविनाशदादाला वाढवलं. दादा इंजिनीअर होऊन ७५ साली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. एस.एस.सी.ला मेरिटमध्ये आल्यावर मी डॉक्टर होणार हे माझ्यासकट सगळ्यांनी गृहीतच धरलं होतं. १९७६ साली मी इंटरसायन्सला असताना आमचा साखरपुडा झाला तेव्हा उदय एम.बी.बी.एस. होऊन इंटर्नशिप संपवून नोकरीला लागला होता. संधी मिळालेली असूनही परदेशी न जाता इथेच आई-वडिलांजवळ राहण्याचा त्याने निर्णय घेतला. त्याचा मला आनंद झाला.
 माझा इंटरसायन्सचा निकाल लागला आणि मला मोठाच धक्का बसला. केमिस्ट्री प्रॅक्टिकलमध्ये मी काठावर पास झाले होते. असं कसं झालं मला कळेचना. इतर विषयांमध्ये चांगले गुण असूनही माझी मेडिकलची अ‍ॅडमिशन अगदी थोडय़ा मार्कानी हुकली. मी अगदी खचून गेले. त्या वेळी आईने आणि उदयने मला सावरलं, धीर दिला. उदयच्या प्रेमाने मला उभारी मिळाली. ‘डॉक्टर होऊन उदयबरोबर काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून काही आभाळ कोसळलेलं नाही- पॅरामेडिकल विषयाचं शिक्षण घेऊन मी उदयला पूरक काम करू शकेन’ या विचाराने मायक्रोबायॉलॉजी घेऊन बी.एस्सी. करायचं ठरवलं. बी.एस्सी.ची परीक्षा झाली आणि पंधरा दिवसांत माझं लग्न झालं. लॅब टेक्नॉलॉजीचा डी.एम.एल.टी. हा कोर्स मी लग्नानंतरही करू शकेन, त्यासाठी लग्न लांबवायला नको असा वडीलधाऱ्यांचा निर्णय मी निमूटपणे मान्य केला.
आमचं लग्न झालं तेव्हा डॉ. उदय ग्रँटरोडला गजानन क्लिनिकमध्ये नोकरी करत होता. पगार होता पाचशे रुपये. माझे सासरे निवृत्त झाले होते. घराची जबाबदारी उदयवर होती. घरी उदयचे आई-वडील व धाकटी बहीण. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांनी उदयने कर्ज काढून वर्सोव्याला दवाखान्यासाठी जागा घेतली. मलाही तिथे पॅथॉलॉजीची लॅब सुरू करता यावी म्हणून दोन गाळे घेतले. ऑक्टोबर १९७८मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उदयचा दवाखाना सुरू झाला आणि अगदी पहिल्या दिवसापासून उदयकडे रुग्ण यायला लागले.
आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने लोकांना पटकन आपलंसं करण्याचा त्याचा स्वभाव, अभ्यास व परिश्रमाने आत्मसात केलेलं अचूक निदानकौशल्य आणि रुग्णांना दु:ख विसरायला लावून हमखास हसवण्याची त्याची हातोटी या गुणांमुळे हा हा म्हणता उदय त्याच्या रुग्णांचा प्रिय फॅमिली डॉक्टर नव्हे तर प्रिय फॅमिली मेंबरच बनला. सुरुवातीला काही दिवस माझे सासरे कौतुकाने उदयच्या दवाखान्यात जायचे. त्याला जमेल ती मदत करायचे. दिवसभराचे मिळालेले पैसे उदय बाबांच्या हातात देत असे, त्या वेळी अभिमानाने आणि आनंदाने फुललेला बाबांचा चेहरा मला आजही आठवतोय.
माझा कोर्स पूर्ण झाला. लॅब सुरू करण्यापूर्वी प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून मी लॅब टेक्निशियनची नोकरी करत होते आणि आम्हाला बाळाची चाहूल लागली. सगळेजण खूप खुशीत होते. पण दैवाच्या मनात काही वेगळंच होतं.. माझी अवेळी प्रसुती झाली. प्रीमॅच्युअर बेबीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले. पण..  सुहृदांच्या आधारामुळे मला व उदयला हा आघात सोसण्याचं बळ मिळालं. दु:खाचे दिवस माणसातली नाती अधिक घट्ट करतात असं वाटतं. पुढे ८२च्या जानेवारीत आमच्या कन्येचं, ऋचाचं आगमन झालं आणि आम्ही सुखावलो. उदयची प्रॅक्टिस जोरात सुरू होती. त्याच्या दवाखान्याच्या शेजारीच मी लॅब सुरू करायची असा विचार होता. पण घर आणि छोटय़ा ऋचाला सांभाळून मला इतक्या लांब सकाळ-संध्याकाळ जाणं जमेल असं वाटेना. मी पाल्र्यातच काम सुरू केलं. आपल्या शिक्षणाचा आपण उपयोग करतोय या समाधानात मी होते.
 वरवर पाहता सगळं छान चाललं होतं. पण आत खोलवर कुठे तरी, काही तरी टोचत असावं जे माझं मला नीटसं उमगलं नाही. पण उदयला मात्र ते जाणवलं. तो म्हणाला, ‘तू तुझं काम मनापासून करतेस पण तू आनंदी दिसत नाहीस. तुला आनंद मिळेल असं दुसरं काही करायचं का?.. नाटक आवडतं ना तुला.. हौस म्हणून नाटकात काम केलंस तरी हरकत नाही.’ नाटक खूप आवडायचं मला. कै. नंदा पालकर हे माझे वडील. त्यांच्याकडून नाटकाची आवड माझ्यात आली असणार. अगदी लहान असताना मी बालनाटय़ातून कामं केली होती. नववीत असताना ‘महाराणी पद्मिनी’च्या काही प्रयोगांत राणीच्या सखीची भूमिका केली होती. पुढे १९७६ मध्ये ‘आम्ही लटिके ना बोलू’मध्ये लहानशी भूमिका, दूरदर्शनवर एखादी नाटिका व गजरा कार्यक्रमात सहभाग एवढाच काय तो अभिनयाचा ‘दांडगा’ अनुभव होता गाठीशी! लग्नापूर्वीचा! मी ढीग म्हणेन, मला नाटकात काम करायचं आहे. पण काम देणार कोण?
माझ्या सुदैवाने १९८६मध्ये अशी एक संधी चालून आली. अरुण जोगळेकर ‘अपराधी’ नावाचं नाटक बसवत होते, एका भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. प्रदीप वेलणकरांनी माझं नाव सुचवलं आणि हो-नाही करता करता माझी निवड झाली. नाटकाची तालीम व पुढे प्रयोग करताना मी इतकी आनंदात होते, वाटलं- इतकी र्वष आपण नाटकापासून कसे दूर राहू शकतो? मी उत्साहाने घर, लॅब आणि नाटक या तीन दगडांवर पाय ठेवण्याची कसरत करू लागले. माझे दिग्दर्शक आणि अनुभवी सहकलाकार यांच्याकडून मी अभिनयाचं शिक्षण घेत होते. पण मी नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या आवाजावर खूप टीका झाली. आता सांगून खरं वाटणार नाही, पण त्या वेळी माझा आवाज तारस्वरातला, कानाला फारसा न सुखावणारा होता. याबाबतीत कोण मार्गदर्शन करू शकेल अशी विचारणा केल्यावर सर्वानी एकच नाव सांगितलं, डॉ. अशोक रानडे. एवढय़ा मोठय़ा व्यक्तीला कसं विचारायचं ‘मला तुम्ही शिकवाल का?’ मला भीतीच वाटत होती. उदय म्हणाला, ‘घाबरतेस काय? विचारून तर बघ.’ मी ‘दुसरा सामना’ नावाचं नाटक करत होते. विक्रम गोखल्यांबरोबर; ते मला रानडे सरांकडे घेऊन गेले. तो माझ्या आयुष्यातला अत्यंत भाग्याचा दिवस. सरांनी मला केवळ आवाज जोपासनाशास्त्राचे धडे दिले नाहीत तर अभिनयाकडे पाहण्याची एक वेगळी, स्वतंत्र दृष्टी दिली.
१९८६ ते १९९४ या काळात मी साधारणपणे वर्षांला एक नाटक करत होते. पुढे पुढे लॅबचं काम अपॉइंटमेंट घेऊन करत असे. अखेरीस, आपली खरी आवड रंगभूमी, अभिनय हीच आहे हे पक्कं लक्षात आलं. १९९४ मध्ये मी लॅब बंद केली. सासरच्या वडील मंडळींना माझं नाटकात काम करणं फारसं रुचलं नव्हतं. पण उदयच्या भक्कम पाठिंब्यामुळे मी नव्या वाटेवरून चालू लागले. प्रयोगांच्यामुळे माझ्या घरी असण्या-नसण्याच्या अनियमित वेळा, बाहेरगावचे दौरे या गोष्टींशी त्याने जुळवून घेतलं, नंतर हळूहळू आमच्या घरालाही माझ्या या नव्या कामाची सवय होत गेली. घराबाहेर पडताना कधी ऋचा रडायला लागली तर माझा पाय निघत नसे. पण उदय म्हणायचा, ‘तू काही काळजी करू नकोस, पाच मिनिटांत खेळायला जाईल बघ ती!’ तेव्हा मोबाइल नव्हते, दौऱ्यावर गेले की मी आधी एसटीडी बूथ शोधत असे. घरी काही अडचण आली तरी कामाच्या ठिकाणी मला टेन्शन नको  म्हणून उदय फोनवर काही सांगत नसे. नंतर विचारलं तर म्हणायचा, ‘घरी आल्यावर कळणारच ना तुला?’
अभिनयाचं क्षेत्र फार बेभरवशाचं! आज प्रचंड काम तर उद्या एकदम बेकार, असंही घडू शकतं. माझ्या पैशावर आमची चूल कधी अवलंबून नव्हती. त्यामुळे या चढ-उतारांचा आमच्यावर आर्थिकदृष्टय़ा परिणाम झाला नाही. पण भावनिकदृष्टय़ा माझ्यावर याचा सुरुवातीला फार परिणाम होत असे. कधी कधी खूप उदास, निराश वाटायचं. अशा वेळी मला भक्कम आधार असायचा उदयचाच! त्याच्या प्रोत्साहनामुळे, रिकाम्या वेळात माझे छोटे छोटे उपक्रम चालायचे. काव्यवाचन, निवेदन, नाटय़वाचन, कथांचे अभिवाचन इत्यादी. २००० सालापर्यंत मी मुख्यत: रंगभूमीवरच काम करत होते. पण त्यानंतर मालिकांमधूनही माझं काय सुरू झालं. शूटिंगसाठी चौदा-पंधरा तास घराबाहेर राहावं लागतं. अशा वेळी घरातल्या कामांच्या बाबतीत उदयवर अधिक जबाबदारी पडते, जी तो आनंदाने पार पडतो. मात्र कधी थोडं चेष्टेत आणि थोडं रागात म्हणतो, ‘मी मुद्दाम स्वैपाक शिकत नाही. नाही तर तोसुद्धा मलाच करावा लागेल.’ बरेच र्वष आजारी असलेल्या माझ्या आईची, आम्ही नीट काळजी घेऊ शकतो. जे उदयच्या मदतीमुळेच शक्य झालं.
१९९६मध्ये उदयने एक धाडसी निर्णय घेतला. ऑफिस टाइम प्रॅक्टिस करायची, असं त्यानं ठरवलं. दवाखान्याची वेळ केली सकाळी ९ ते दुपारी ४. संध्याकाळचा वेळ ऋचासाठी! प्रॅक्टिस अतिशय जोरात चाललेली असताना असा निर्णय घेतला म्हणून अनेकांनी त्याला वेडय़ात काढलं. पण उदय मला म्हणाला, ‘फार फार तर काय होईल? चार पैसे कमी मिळतील. तुझी काही हरकत नाही ना?’ म्हटलं, ‘मुळीच नाही. मला पैशांपेक्षा तुझा सहवास जास्त मोलाचा.’ उदय नेहमी स्वत:च्या अटींवर स्वत:च्या तत्त्वांप्रमाणेच मेडिकल प्रॅक्टीस करत आलाय. अनेक गरीब रुग्णांकडून तो पैसे घेत नाही आणि गैरप्रकारांपासून तो कायम दूर राहिलाय याचा मला खूप अभिमान आहे. उत्तम फॅमिली डॉक्टर म्हणून त्याने नवलौकिक मिळाला आहे.
कायम सर्वासाठी आधारस्तंभ असणारा उदय, एकदा आतून हललेलं मी पाहिला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. ऋचा बारावीत असताना तिला मलेरिया झाला- हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं- बरी होऊन ती घरी आली आणि पुन्हा ताप आला. हा मलेरियाचाच ताप उलटला आहे की आता टायफॉइड झालाय, याबद्दल दोन तज्ज्ञ डॉक्टरांची भिन्न मतं होती. कोणाच्या सांगण्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यावी कळेना. मोठा कठीण प्रसंग, ऋचाची अवस्था बघवत नव्हती. निर्णय चुकला तर..? जीवघेणी काळजी. उदयच्या डोळ्यात पाणी बघून माझा थरकाप उडाला. पण मग उदयने विचारपूर्वक निर्णय घेतला की सुरुवातीपासून ज्या डॉक्टरांनी ऋचावर उपचार केले होते, त्यांच्याच सांगण्याप्रमाणे पुढे औषधयोजना करायची. ऋचा खडखडीत बरी झाली. आम्ही निश्‍चिंत झालो. आजारपणामुळे खूप अभ्यास बुडालेला असूनही ऋचा बोर्डात कलाशाखेत पहिली आली.
 ऋचाला वाढविण्याच्या बाबतीत आमचे फारसे मतभेद झाले नाहीत. तिला मराठी माध्यमात घालण्याचा निर्णय आम्हा दोघांचा, त्याचा आम्हाला कधीच पश्चात्ताप झाला नाही. तिचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य तिला होतं. पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूटमधून अर्थशास्त्रात सुवर्णपदक मिळवून ती एम.ए. झाली. बॉस्टन कॉलेजमधून तिने डॉक्टरेट संपादन केली. २०११मध्ये आम्हाला सिद्धेश काजरेकर हा कर्तबगार  जावई म्हणून लाभला.
आमचा संसार फारच गोडीगुलाबीत, भांडणांशिवाय चाललाय असा गैरसमज नसावा. सर्व जोडप्यांप्रमाणे आमच्यातही अनेक वाद, भांडणं झाली- होतात. मतभेद झाले तरी बोलून, नीट संवाद साधून मार्ग काढता येतो, यावर माझा प्रचंड विश्वास तर उदय त्याला कीस पाडणं म्हणतो. चर्चा त्याला मुळीच आवडत नाही. पूर्वी जोराचं भांडण झालं की त्याच्या बाजूने अबोला, ज्याचा मला अतिशय मनस्ताप.. पण नंतर मूकपणे घरात गजरा आलेला दिसला की त्यावरून मी काय ते समजून घ्यायचं. आता अबोला क्वचित, पण त्यामुळे गजराही क्वचितच. उदयला स्वच्छता, टापटीप यांचं वेडच आहे. ज्याचा सुरुवातीला मला अगदी जाच वाटायचा, दडपण यायचं पण कालांतराने मलाही, वाण नाही पण गुण लागलाय असं वाटतंय. ‘तू सारखा दुसऱ्याचा विचार कर. तो कसा बरोबर आणि मी कसा चूक हेच सांग’ हा उदयचा नेहमीचा त्रागा असतो. तर ‘तू आपणहून, जीव तोडून लोकांसाठी धावतोस आणि त्यांनी जाणीव ठेवली नाही की चिडचिड करतोस.’ ही माझी नेहमीची तक्रार असते.
मात्र, पूर्वीएवढा भांडायचा उत्साह आता दोघांमध्येही उरलेला नाही. एक गोष्ट आम्हाला पक्की ठाऊक आहे की, कितीही वाद झाले तरी आमच्या नात्याची मुळं प्रेम आणि विश्वासाच्या मातीत घट्ट- खोलवर रुतली आहेत. म्हणूनच क्वचित प्रसंगी गैरसमजांच्या वादळांनी या नात्याला गदागदा हलवूनही, सहजीवनाचा हा वृक्ष भक्कम उभा आहे. बहरतो आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ila bhate telling about her successful married life with uday bhate

ताज्या बातम्या