मी रक्तदान करण्यासाठी रुग्णालयात गेले. आनंदसाठी रक्तदान करायचं होतं. त्याचे आई-बाबा सामोरे आले. आई म्हणाली, ‘द्याल ना हो माझ्या बाळाला रक्त? होईल ना तो बरा?’
काल संध्याकाळचे शुभांगीचे ‘ते’ शब्द सतत मनात घोळत राहिलेत. ‘अगं, गावाला गेले होते. बाबा वारले गं माझे. आयत्या वेळी रक्त मिळू शकलं नाही, म्हणून.’
या शब्दांनी मन थेट भूतकाळात गेलं. मला तो प्रसंग आठवला..
मी अनेक वर्षे नेमाने रक्तदान केलं. सुरुवात अशी झाली की पहिल्यांदाच आमच्या ऑफिसात एका रक्तपेढीने रक्तदान शिबीर भरवलं होतं. त्यातल्या डॉक्टरांनी सर्व डिपार्टमेंटमध्ये जाऊन रक्तदानाची माहिती, त्याचं महत्त्व सारं सांगितलं आणि मग अनेकजणांनी रक्तदान केलं. मीसुद्धा केलं. तेव्हा रक्तदान करणार म्हणजे आपण काही मोठं काम करणार, कोणाचा जीव त्यामुळे वाचेल यासारख्या गोष्टींपेक्षा एक स्पेशल सी. एल. मिळणार हा विचार मनाला जास्त पटला होता.
मग दरवेळी रक्तदान शिबिरात रक्तदान करू लागले. पण नंतरही त्या ऑफिसमधून माझी बदली झाली तरी मी वर्षांतून दोनदा रक्तदान करतच राहिले. एक-दोनदा तर कोणाला तातडीची गरज पडल्याने तीनदासुद्धा रक्तदान केलं. त्यामुळे नातेवाईक, ओळखीचे यांनासुद्धा माहीत झालं.
एकदा माझ्या मुलीचा एक मित्र तिला म्हणाला, ‘माझ्या मावसभावाचा मुलगा आजारी आहे. हॉस्पिटलमध्ये आहे. तुझी आई रक्त देईल का?’
तिने मला तसे विचारल्यावर मी ‘हो’ म्हटलं.  दुसऱ्या दिवशी तो आणि मी त्या रुग्णालयात गेलो. आम्ही त्या मुलाच्या आईवडिलांकडे गेलो. दोघेही निराश मनाने बसली होती. कॉटवर तो रुग्ण, ४-५ वर्षांचा आनंद निपचित पडला होता. तो झोपेत होता की गुंगीत होता कळत नव्हतं. तितक्यात त्याची आई रडत रडत पुढे झाली. तिने पटकन माझे पाय पकडले आणि म्हणाली, ‘द्याल ना हो माझ्या बाळाला रक्त? होईल ना हो तो बरा?’
त्यांनी माझे पाय धरल्यामुळे मी गोंधळून गेले होते. मी त्यांना उभं करत म्हटलं, ‘होईल हो तो बरा. त्याला रक्त देण्यासाठीच तर मी आलेय ना! घाबरू नका. तो निश्चित बरा होईल.’
नंतर एका डॉक्टरांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि विचारलं की तुम्ही त्याच्यासाठी रक्त देणार का? मी हो म्हणाले. त्यांनी मला माझ्याविषयी इतर दोन-चार प्रश्न विचारले. मी त्यांना विचारलं, त्या बाळाची तब्येत कशी आहे हो?
ते क्षणभर माझ्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले, ‘का? त्यावर तुम्ही रक्त देणार की नाही ते ठरवणार आहात का?’ मी म्हणाले, ‘नाही. तसं नाही. तो खूप मलूल. थकलेला वाटला म्हणून विचारलं.’
ते म्हणाले, ‘खरं सांगायचं तर आशा खूपच कमी आहे. मात्र हे त्याच्या पालकांना सांगू नका.’
मी पटकन म्हणाले, ‘छे, छे. अहो  असं कसं सांगीन?’
डॉक्टरांनी विचारलं, ‘मग तुमचं काय ठरलं?’
‘अहो रक्त तर मी देणारच आहे, पण तो मलूल वाटला म्हणून मी विचारलं.’ हे म्हणताना त्या बाळाच्या आईचा लाचार चेहरा, तिने माझे धरलेले पाय हे सारं आठवलं.
मी रक्त दिलं आणि सम्या-माझ्या मुलीचा मित्र याच्याबरोबर त्या बाळाच्या आईबाबांना भेटले. ती दोघं उठून उभी राहिली आणि मला म्हणाली, ‘दिलंत रक्त?’
मी मानेनेच होकार दिला. बाळाची आई म्हणाली, ‘आता तो बरा होईल.’
काय बोलावं मला सुचत नव्हतं. खोटं सांत्वन करण्याची हिंमत नव्हती. मी काही वेळ फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. माझा दुसरा हात तिने पकडला होता. मी तो हात सोडवून घेतला. डोळ्यांनीच दिलासा देत मी निरोपाचा हात हलवला.
रक्तदानाची खरी महती मला तेव्हा कळली होती..
दोन दिवसांनी बातमी कळली. आनंद गेला.
आज वाटतंय, बरं झालं तेव्हा रक्त दिलं ते. नाही तर त्या माऊलीला वाटलं असतं हिने रक्त दिलं नाही म्हणून माझा बाळ गेला. त्या बाळाला मी वाचवू शकले नाही. पण आपला ‘आनंद’ रक्त न मिळाल्याने वाचला नाही अशी सल तरी तिला राहिली नसेल. याचं आज समाधान वाटतं.