अनेक वर्षं एकत्र संसार सुरू आहे; म्हणजे त्या नवरा-बायकोचं नातं आनंदी, सुखी आहे, असं म्हणता येईल का? कोणत्या भावनांनी त्यांना इतकी वर्षं बांधून ठेवलं आहे ते त्यांना सांगता येतंय का?कारण नाती घट्ट करायची असतील तर अनेक भावनांना आपल्या जगण्यात मुरवावं लागतं. राग, लोभ, मत्सर या भावना आयुष्यात असणारच आहेत, त्यांना आपण सहृदयतेने, विश्वासाने, आपुलकीने कसं दूर करू शकतो हा खरा भावनांचा खेळ.

आजच्या युद्धखोर जगात, ‘प्रेमाने जग जिंका’ या संतवचनाकडे कसं बरं पाहावं? ‘प्रेम ही वैश्विक भावना’ असेल तर आजच्या विश्वात अहंकार, द्वेष, आक्रमकता, क्रोध, क्रौर्य, परपीडन, अविश्वास, असुरक्षितता अशा सर्व नकारात्मक भावनांनी ठाण मांडलेलं का दिसत आहे? मानवी मेंदूत नकारात्मक भावनांइतकंच सकारात्मक भावनांचं अस्तित्व असताना त्या कुठे आणि का बरं लुप्त होत आहेत?

प्रेम ही भावना खूप व्यापक आहे. एक तर निसर्ग, परमेश्वर, प्राणी-पक्षी असं सर्वांवर, एकमेकांवर आणि स्वत:वरही प्रेम करावं या अर्थाने. दुसरं, प्रेमामध्ये अनेक सूक्ष्म सकारात्मक भावनांचा अंतर्भाव आहे. त्यात माया, ममता, स्नेह आहे. आस्था, करुणा, सहसंवेदना आहे. कनवाळूपणा, आपुलकी, जवळीक, काळजी आहे. समर्पण, त्याग, बांधिलकी, सुरक्षितता आहे. विश्वास, आनंद, उत्साह आहे. त्याअर्थी प्रेम ही एक अत्यंत बहुआयामी, प्रबळ, सुंदर आणि विशुद्ध भावना आहे. या भावनेत खोटेपणा, दूषण, तिरस्कार, कडवटपणा, दुस्वास अपेक्षित नाहीये. परंतु अति-प्रेम हे मत्सर, हेवा, चिंता यांनाही जन्म देऊ शकतं. अशा अनेक पदरांमुळे प्रेम ही भावना गुंतागुंतीचीही बनते. असे असले तरी ती आयुष्याला रूक्षतेपासून, कोरडेपणापासून, अलिप्ततेपासून वाचवते आणि भावनांचे सुंदर विश्व तयार करते. नाती या सुंदर विश्वातूनच जन्म घेतात. त्यासाठी आपण नेमकं काय करतो आहोत? आपल्या भावनांची, आपल्या नात्यांची जबाबदारी आपण घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं?

मधुरा आणि सत्यजीत आलटून-पालटून एकमेकांबद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचत होते. बराच वेळ तो ऐकल्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘एवढंच आहे का तुमच्या नात्यात? परस्परांबद्दल सांगण्यासारखं चांगलं काही नाहीच का?’’ दोघे एकदम शांत झाले. एकमेकांकडे आणि माझ्याकडे बघत नंतर त्यांची नजर खालीच गेली. थोडा वेळ शांततेत गेला. एकमेकांबद्दलच्या सकारात्मक गोष्टी त्यांना आठवाव्या लागत होत्या. ‘‘लग्नाला २६ वर्षं झाली आहेत तुमच्या. कोणकोणत्या छान भावनांनी तुम्हाला इतकी वर्षं बांधून ठेवलं ते तरी सांगा…’’ काही मोजक्या भावनांपुढे त्यांची गाडी काही जाईना. आज असंच होताना दिसतं. राग, लोभ अशा भावनांपलीकडे त्यांचे विचार जातच नाहीत. भावनांच्या छटा तर कोसो दूर. सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ डॉक्टर संदीप केळकर यांनी त्यांच्या ‘जावे भावनांच्या गावा’ या पुस्तकात म्हटलं आहे, ‘‘भावनांच्या भाषेची मशागत करावी लागते. मुलांसाठी घर हे ‘भावनांच्या शाळेचं प्राथमिक दालन’ असतं. असंख्य भावनांचे तरंग घरामध्ये उमटत असतात. घरातील प्रत्येक व्यक्ती, पालक, मुलं, ज्येष्ठ पालक, वगैरे या भावनांबद्दल जागरूक आहेत अथवा नाहीत, यावर संपूर्ण कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं.’’ प्रत्यक्षात किती घरांमध्ये असं भावनांचं शिक्षण होतं? उदाहरणार्थ, एखादं कुटुंब सर्कस बघून आलं तर, ‘‘तुला हा खेळ बघून भीती वाटली का?’’

‘‘प्राण्यांचे खेळ बघताना आनंद झाला की वाईट वाटलं’’,
‘‘झोपाळ्याचा खेळ बघून उत्कंठा वाटली, काळजी वाटली की ताण आला?’’, असं भावना केंद्रस्थानी ठेवून बोललं जातं का? हे बोलणं म्हणजे भावनांचं व्यक्त करणंच आहे.

आजच्या जगात ‘बुद्ध्यांका-’ (Intelligence Quotient) बरोबर ‘भावनांक’ (Emotional
Quotient.) हा शब्द हळूहळू सर्वांना परिचित होत आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस पार इतर ग्रहांवर पोहोचला, पण पृथ्वीतलावरच्या त्याच्या जगण्यातील आनंद, समाधान मात्र तो हरवत चालला आहे. लौकिकार्थाने यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता उपयोगी पडत असेलही, परंतु सुखी होण्यासाठी, नात्यांमध्ये सुरक्षित वाटण्यासाठी, त्याला या बुद्धिमत्तेस भावनांच्या अभिव्यक्तीची जोड द्यावी लागणार आहे. भावनांकाच्या विचारात, भावनांची जाणीव, वेगवेगळ्या भावना ओळखणं त्यांचं संतुलन आणि मग प्रत्यक्ष अभिव्यक्ती अशा सगळ्याच गोष्टी येतात. कधी आपण खूप आनंदात असतो. आवडत्या मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीला निघालोय.

थट्टा, विनोद, धमाल चालू आहेत. अचानक गाडीमध्ये अनपेक्षित बिघाड होतो. आपण अशा ठिकाणी आहोत, की लगेच मदत मिळण्याची शक्यता दुरापास्त. आपली केलेली प्रवासाची योजना गडबडते. अशा वेळी आपल्या भावना बदलायला लागतात. कुणी वैतागतं, कुणी शांत राहून परिस्थिती संयमानं हाताळतं, कुणी अस्वस्थ होतं तर कुणी चिंताग्रस्त…! व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तशी भावनांची अभिव्यक्ती. खरं तर ही परिस्थिती हाताळायची तर भावनांचं व्यवस्थापन करता यायला हवं ना? चिडून, वैतागून, चिंता करून अडचणीतून मार्ग कसा निघणार? म्हणून आपल्या भावनांची सुयोग्य हाताळणी महत्त्वाची. त्यातून भावनांवर संयम ठेवता आला तर भावनांची अभिव्यक्ती संयत राहील नि मेंदूचा विचारांचा कप्पा (cognitive brain) कार्यक्षमपणे काम करेल. प्राप्त परिस्थितीत आपल्या हातात काय आहे नि आपल्या हातात काय नाही ते लक्षात येईल. हातात असलेल्या गोष्टींमध्ये उपलब्ध पर्याय काय, जसं जवळचं गाव, तेथील गाडी दुरुस्त करणार्‍याची उपलब्धता, जाणार्‍या-येणार्‍या गाड्यांमधील कोण, काय मदत करू शकेल इत्यादी. मग लक्षात येईल, की परिस्थिती इतकी काही बिकट नाही.

आपण त्यातील सकारात्मक बाबींची नोंद घेतो, तरी बरं, गाडी रात्री-अपरात्री बंद पडली नाही; कारागीर मिळून दुरुस्त व्हायला हाताशी वेळ आहे, हवा चांगली आहे, आजूबाजूला सावली देणारे डेरेदार वृक्ष आहेत, खाण्याच्या पदार्थांचा भरपूर साठा आहे. मग आपण खूपच चांगल्या परिस्थितीत आहोत हे लक्षात येतं आणि मन शांत होतं. आपण विचार करायला लागतो तसतसे पर्याय दिसायला लागतात आणि भावना अधिकाधिक स्थिर होत जातात. निष्कारण केलेल्या काळजीने दुसर्‍यांच्या चिंता वाढवणं, वैतागणं, चिडून वादविवाद होणं आता थांबतं. अचानक अडचण आली तरी आपल्याबरोबर असणार्‍या मंडळींचा उत्साह मावळत नाही. वेगळ्या गोष्टीतला आनंद सापडायला लागतो.

आपल्या आठ मूलभूत भावना आहेत. राग, भीती, आनंद, घृणा, दु:ख, आश्चर्य, अपेक्षा व स्वीकार. या आठांमधील दोन भावना एकत्र आल्यावर तिसरीच भावना निर्माण होते. उदा. आनंद आणि स्वीकार या दोन भावना एकत्र आल्या की त्या ‘विश्वास’ या भावनेला जन्म देतात, तर भीती आणि अपेक्षा धास्ती किंवा घालमेल या भावनेला जन्म देतात. भावनांचा हा शब्दकोश समृद्ध नसेल तर आपल्या जाणिवांना नेमक्या भावनेचं कोंदण घालता येत नाही. पर्यायाने व्यक्त करायचं असतं एक, पण व्यक्त होतं दुसरंच. यातून संवादात फटी राहतात. मग संवाद साधण्यात अडचण येते. सुसंवाद होण्याऐवजी विसंवाद किंवा गैरसमज होण्याच्या शक्यता वाढतात. मग आपण, ‘‘मला असं म्हणायचं नव्हतं’’ असं स्पष्टीकरण देतो. निकोप, संवादी, समंजस नाती भावनांच्या सुयोग्य आणि नेमक्या अभिव्यक्तीतून निर्माण होतात. त्यामुळे आपल्या भावनांचं व्यवस्थापन आणि नात्यांचं व्यवस्थापन हातात हात घालून जातं. जर आपला स्वसंवाद सकारात्मक असेल तर तो सकारात्मक विचारांचीच साखळी तयार करतो. त्यातून मग सद्भावना निर्माण होतात आणि अशा सद्भावनांची परिणती रचनात्मक वर्तनात होते. दोन माणसांचं असं परस्परांशी होणारं सकारात्मक वर्तन प्रगल्भ असतं आणि त्यातून परस्पर विश्वास निर्माण होऊन नात्यांचे बंध घट्ट होत जातात. अशा नात्यांमध्ये माणसांना सुरक्षित वाटतं. त्यातून त्या नात्याला स्थैर्य मिळतं.

भारतात पालकत्व किंवा एकंदर नाती सांभाळण्यात सामान्यपणे जबाबदार्‍या आणि कर्तव्यांची पूर्ती यावर भर राहिला आहे. मात्र नात्यांमध्ये भावनांची अभिव्यक्ती फार महत्त्वाची. ‘‘मी आजारी असले ना डॉक्टर, की औषधांची वगैरे सगळी काळजी घेतली जाते. पण शेजारी बसून बोललं, डोक्यावरून हात फिरवला, तर हळव्या झालेल्या मनाला आश्वस्त वाटतं, उभारी येते, दुखणं लवकर बरं होतं.’’ असं काही जणींचं म्हणणं; पण हे लक्षातच येत नाही अनेकांच्या. आपली पंचेंद्रियंही अनेक भावनांना जन्म देत असतात. महागड्या सुगंधी अत्तरांचा शरीरावर मारा करण्याऐवजी, झाडाखाली पडलेल्या सड्यातील एखादं बकुळीचं, प्राजक्ताचं फूल तळहातावर घेऊन बघा. त्याचा मुलायम स्पर्श त्वचेला सुखावतो. त्याचं नाजूक, देखणं रूप नेत्रसुखद असतं. श्वास भरून त्याचा सुगंध हुंगताना प्रसन्न वाटतं. झाड सोडून भुईवर अलगद विसावणारी ही फुलं आपल्याला शांतवतात.

विविध प्रसंगांत, नात्यांमध्ये, विशेषत: जवळकीच्या नात्यांमध्ये अनुभवलेल्या भावनांची दखल घेण्यासाठी, धावत्या आयुष्यात थोडा ठेहराव येऊ द्या. त्या भावना मनात पाझरू द्या. तो पाझर अनुभवा. नात्यांचे वेगळे अर्थ उमगतील. मग ते अर्थ बोलण्यातून, वर्तनातून व्यक्त होतील. आपली नाती यंत्रवत न राहता ती मानवी बनतील. नात्यांना एक वेगळं परिमाण मिळेल. याउलट, भावना मनात दाबून ठेवल्या तर कोंबलेल्या पुस्तकांचं कपाट उघडल्यावर ती जशी धडाधडा अंगावर येऊन पडतात तसंच भावनांचंही होतं. हेच जर विविध विषयांवरच्या पुस्तकांचं वर्गीकरण करून ती नीट लावली, तर हवं ते पुस्तक हव्या त्या वेळी मिळतं. भावनांची जाणीव ठेवली तर त्यांना समजून घेता येतं आणि मग त्या-त्या भावनेची योग्य हाताळणी करून तो प्रसंग समंजसपणे आणि परिपक्वतेने हाताळता येतो. अनेक वर्षं एकत्र असलेल्या जोडप्यांनी हे ध्यानात घ्यायला हवंच.

विचार, बुद्धी आणि भावना ही माणसांची शक्तिस्थानं आहेत. या दोन्हीच्या सुयोग्य समन्वयातून मनुष्य स्वत:ची आणि पर्यायाने समाजाची उन्नती करत राहतो. करोना साथीच्या काळात सर्व मानवी जग जरी असुरक्षितता, भीती, चिंता या भावना तीव्रपणे अनुभवत होतं, तरी जगभरचे डॉक्टर्स, संशोधक आणि या क्षेत्रातील इतर अनेक तज्ज्ञांनी एकत्र येऊन त्या अवघड काळातही करोनाची लस तयार केलीच ना! तिने लाखो जीवांना वरदान दिलं. निसर्गदत्त भावना आणि विचारांच्या आपल्या मेंदूचा आपण नेहमीच सन्मान करायला हवा. या मानवी मेंदूमुळेच नाती निर्माण करण्याची क्षमता माणसाला लाभली आहे. भावनिक आणि वैचारिक देवाणघेवाणीतून संवाद निर्माण होतो. भावनांचा संवाद हा शब्दांइतकाच स्पर्शातूनही होत असतो. आपल्या देशात स्पर्श हा नेहमीच अस्पर्शित विषय राहिला आहे. परंतु भावनांचं संक्रमण हे स्पर्शातून फार परिणामकारकपणे होत असतं. पती-पत्नी नात्यापासून सुरू होणारी दोन माणसांमधील जवळीक भावनांच्या सातच नव्हे तर अनेकरंगी इंद्रधनुष्याने नात्याला एक सुरक्षिततेची आणि स्थैर्याची किनार देत असते. बाहेरच्या जगात काहीही चाललेलं असू दे, आपलं आणि आपल्या भोवतीचं जग भावनांनी समृद्ध करून परस्परांतील नाती प्रेममय आणि संपन्न करू या…!

uvankulk57@yahoo.co.in