डॉ. नीता ताटके
प्रत्येक व्यक्तीला योग्य आहाराची गरज असतेच, मात्र खेळाडूंच्या आहाराकडे अधिक जबाबदारीने पाहण्याची गरज असते हे विनेश फोगटच्या उदाहरणामुळे सगळ्यांच्याच लक्षात आले. १०० ग्रॅम वजन वाढल्याने तिला स्पर्धेतच भाग घेता आला नाही साहजिकच पॅरिस ऑलिम्पिकमधले तिचे आणि पर्यायाने भारताचे पदक हुकले. त्यासाठीच आवश्यकता असते योग्य क्रीडा आहारतज्ज्ञांची.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४. भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज मनू भाकर हिने १० मीटर पिस्तूलबाजीमध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक आणि नंतर सांघिक प्रकारात सरबज्योतसह दुसरे कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. या पार्श्वभूमीवर ५० किलोच्या वजनी गटात खेळणार्या विनेश फोगटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. विनेशचा पहिलाच सामना यापूर्वी चार वेळा जागतिक अजिंक्यपद मिळवलेली, २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकची विजेती आणि आत्तापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा न हरलेल्या जपानच्या सुसाकीबरोबर होता. प्रेक्षागृहात ‘सुसाकी’ चा नारा लावत तिला प्रोत्साहित करणारे जपानी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०-२ अशी आघाडी घेऊन सुसाकी हिने आपली विजयी वाटचाल सुरू केली खरी, मात्र हा सामना संपायला शेवटचे काही सेकंद उरले असताना, तोडीस तोड खेळी करून विनेशने तीन गुण मिळवले आणि हा सामना ३-२ ने खिशात घातला. त्यानंतर युक्रेनच्या ओकसाना लिवाच (७-५) आणि क्युबाच्या लोपेजमा (५-०) या दोघींविरुद्ध दणदणीत विजय मिळवीत ती कुस्तीमध्ये अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेली पहिली भारतीय खेळाडू ठरली. भारताचं एक सुवर्ण किंवा रौप्यपदक तिथेच निश्चित झालं. मात्र इथेच विनेशसाठी अडथळा निर्माण झाला. नियमाप्रमाणे अंतिम सामन्याच्या आदल्या संध्याकाळी वजन करताना विनेशचं वजन थोडं जास्त भरलं. ते कमी करण्यासाठी विनेशने रात्र धावून काढली, तिच्या शरीरातलं रक्त काढण्यात आलं, तिचे केस कमी करण्यात आले, मात्र असे अनेक उपाय करूनही अंतिम सामन्याच्या आधी विनेशचे वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याने ती या स्पर्धेतून बाद झाली. असं म्हणतात की, विनेशच्या शरीरामध्ये ‘पाण्याचं संतुलन राखण्यामध्ये’ (हायड्रेशन) गडबड झाली आणि याच्या परिणामस्वरूप विनेशला आणि पर्यायाने भारताला एक पदक गमवावं लागलं. ‘हायड्रेशन’ – पाण्याचं संतुलन ही सर्वांनीच सांभाळण्याची बाब, खेळाडूंनी, विशेषत: स्त्री खेळाडूंना याबाबत खूपच काटेकोर असावं लागतं. पाणी पिण्याचं महत्त्व आपल्याला कितीही माहिती असलं, तरी सारखं पाणी प्यायला कंटाळाच येतो. हवा जरा थंड असली, वातानुकूलित वातावरण असलं तर पाणी मुद्दाम प्यावं लागतं. साधारणपणे ‘तहान लागली की पाणी प्या’, अशी मनाची धारणा असते. पाणी प्यायल्यानं वजन वाढतं, त्यामुळे वजनी गटातील खेळाडू तर पाणी पिणं टाळतात, ज्याचा शरीरावरती अनावश्यक ताण येऊ शकतो. खेळाचा सराव करताना ओटीपोटावर ताण येऊन लघवीचे थेंब गळणं म्हणजे ‘तणावजन्य मुत्र असंयम’ (stress urinary incontinence) याचं प्रमाण स्त्री खेळाडूंमध्ये खूप जास्त असतं, असं झालं तर लज्जित होण्याची वेळ येऊ नये म्हणूनही स्त्री खेळाडू आवश्यकता असतानाही पाणी पीत नाहीत. पाण्याचे योग्य संतुलन हे खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी अत्यावश्यक असतं, हे खेळाडूंना माहितीही नसतं. ‘भरपूर पाणी प्या’ अशा सरसकट सूचना दिल्या जातात. खेळाडूंचे वजन, त्यांचा खेळ आणि त्यांची शरीर प्रकृती याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं. ‘लघवी पाण्यासारखी, बिन रंगाची व वासविरहित’ असणं हे पाण्याचं संतुलन योग्य असण्याचं साधं मोजमाप आहे.
खेळाडूंच्या आहारातला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रथिने (प्रोटिन्स). स्नायूंची दुरुस्ती (repair),पुनर्प्राप्ती (recovery) आणि उच्चतम कामगिरीसाठी प्रथिने हा अत्यंत महत्त्वाचा घटक. ‘इस्ट्रोजेन’ व प्रोजेस्टेरोन’ या दोन्ही ‘हार्मोन्स’च्या पातळ्या मुलींच्या शरीरात सतत बदलत असतात, त्यानुसार मुलींची प्रथिनांची गरजही बदलते. शारीरिक ताण, ऊर्जेचा वापर व योग्य खाणं याचं प्रमाण मुलींमध्ये व्यस्तच असतं. त्यामुळे या घटकाकडे खेळाडू मुलींनी खूप काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. ‘प्रथिनं का व किती, कशी व केव्हा घ्यायची’ हे खेळाडूचं वय, तिचं वजन, खेळ व व्यायामासाठी घालवलेला वेळ यावर अवलंबून असतं. दिवसभर संतुलित आहार न घेता, नुसती प्रथिनं खाल्ली तर त्याचा शरीराला काहीही उपयोग होत नाही. प्रथिनं खाल्ल्यानं पोट भरतं, पोट भरल्यावर खेळाडू व्यवस्थित जेवत नाहीत आणि मग ही प्रथिने शरीरामध्ये पचत नाहीत. जादा झालेली प्रथिनं, कार्बोदकांमध्ये बदलतात आणि प्रथिनं म्हणून त्याचा शरीराला काहीही उपयोगच होत नाही. बर्याच वेळेला दहा रुपयाचं केळं जे करू शकतं त्यासाठी शंभर रुपयांची प्रथिनं शरीरामध्ये ढकलली जातात, ज्याचा उपयोग होण्यापेक्षा हानीच जास्त होते. खेळाच्या मैदानावरती तर बर्याच वेळेला सोबत असलेल्या बाटलीमध्ये ‘प्रोटिन डिं्रक’ अगदी नियमितपणे दिसतं, बाजारामध्ये सुद्धा प्रथिनेयुक्त पदार्थ आता मुबलक प्रमाणात मिळतात. मात्र ते खरोखरच उपयोगी आहेत का? हा कळीचा मुद्दा बाजूला राहाताना दिसतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रथिनं खूप महत्त्वाची आहेत, आपल्या रोजच्या न्याहारीपासून प्रथिनं खायला सुरुवात केली पाहिजे, हे खेळाडू, प्रशिक्षक, पालक यांनाही ठाऊक असतं, मात्र याबद्दल योग्य नियोजन हे तज्ज्ञांमार्फत होणं आवश्यक आहे.
पोहण्यातली आंतरराष्ट्रीय खेळाडू मिहिरा खोपकर, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाची आहारतज्ज्ञ होती. पाणी, प्रथिनं आणि खेळाशी निगडित असलेल्या स्त्री खेळाडूंचा आहार याबद्दल मिहिराचा अभ्यास चांगला आहे. भारत आणि इतर देशांत खाण्यावरती परिणाम करणारे घटक खूप वेगळे असल्याचं तिनं आवर्जून सांगितलं. भारतामध्ये आहार ही फक्त एक खाण्याची बाब नसून तिला सामाजिक मूल्य व प्रतिष्ठा आहे. प्रांत, जात, धर्म, सणवार यानुसार खाण्याचे पदार्थ बदलत जातात. सगळेच मांसाहार रोजच्या रोज करत नाहीत, काही घरांमध्ये तर तो पूर्ण वर्ज्य असतो. याबाबतीतही खाणारा मुलगा असेल तर अपवाद केला जातो, मुलींनी मात्र बहुतांश सर्व बंधने पाळायची असतात. उपासतपास, नैवेद्याचे जेवण, ‘पुरुषांचे झाल्यावर स्त्रियांचे जेवण’ या प्रथा परंपरा बहुसंख्य घरांमध्ये पाळल्या जातात आणि यामध्ये खेळाडू स्त्रियांच्या ‘आहार वेळापत्रकाचा’ बोजवारा उडायला वेळ लागत नाही. एखादी पंजाबी खेळाडू जे खाईल ते महाराष्ट्रातली खेळाडू खाणार नाही, त्यामुळे शिबिरासाठी निवडलेल्या वेगवेगळ्या प्रांतातील खेळाडूंसाठी आहारतक्ता बनवणे हे फारच आव्हानात्मक काम असते.
आपल्या इकडे असलेलं गरम आणि आर्द्रतापूर्ण वातावरण यामुळेही खाण्याचा शरीरावर वेगळा परिणाम होतो आणि त्यामुळे खेळाडूंचा आहार ठरवताना खेळ या गोष्टीबरोबरच या इतर बाबीही अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. परदेशी खेळाडू, परदेशी वातावरणात तयार झालेले आहारतक्ते आपल्याकडे उपयोगी पडत नाहीत, पण बर्याच वेळा ‘इंटरनेट’वर शोधताना त्यांचाच संदर्भ मिळतो. भारतातली वैविधता व परिस्थिती, भारतातलं वातावरण आणि आहाराचा आरोग्यावरती होणारा परिणाम याच्यावर फार संशोधन नाही, जे काही संशोधन आहे ते बहुतांशी पुरुषांवरती केलेलं आहे. त्यामुळे आपल्या खेळाडू स्त्रिया आणि मुलींवरती संशोधन होण्याची मूलभूत गरज आहे. प्रामुख्याने स्त्री खेळाडूंचा आहार ठरवताना, त्यांची आर्थिक परिस्थितीही ध्यानात घ्यावी लागते. सुदैवाने आपल्याकडे खाण्याचे एवढे मुबलक पदार्थ उपलब्ध आहेत की, आर्थिकदृष्ट्या उपयुक्त असा आहारतक्ता तयार करणं फार अवघड जात नाही, मात्र त्यासाठी तसा दृष्टिकोन आणि मानसिकतेची खूप गरज आहे. तसेच एकदा खाण्याचे घटक ठरवले की ते पाळण्यासाठी शिस्त, वचनबद्धता आणि सातत्य ही त्रयी खूप उपयोगी ठरते.
कुठल्याही खेळाडूचा सरसकट आहार ठरवता येत नाही. खेळाडूचा सराव हा विविध कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्यानुसार आहारामध्ये बदल करणं आवश्यक असतं. काही वेळा खेळाडू २-२ दिवस प्रवास करतात, तर काही वेळा रात्रभर ट्रेन वा बसचा प्रवास करून, दुसर्या दिवशी स्पर्धा खेळायला उभे राहतात. या सर्व वेळी आहार नियोजनाची आवश्यकता असते. जो ‘पूरक’ आहार (supplements) घेतला जातो, ते योग्य आहे ना, योग्य प्रमाणात आहे ना, ते घेण्याची खरोखरच आवश्यकता किती आहे, ते भेसळयुक्त नाहीत ना अशी अनेक प्रकारे काळजी घेणंही आवश्यक असतं. हवामान बदलानुसार आहारामध्येही योग्य तो बदल करावा लागतो. स्त्रियांचा आहार ठरवताना त्यांचा वयोगट, याबरोबरच त्यांचं मासिकपाळीतील आरोग्य, त्या काळात होणारा त्रास, लोहाची पातळी आणि शरीराच्या ‘हार्मोन्स’मध्ये होणारे विविध बदल याच्याकडे काटेकोरपणे बघणं आवश्यक असतं. मात्र बहुतांशी मुलींचे प्रशिक्षक हे पुरुष असल्यामुळे या समस्यांबाबत स्त्रिया बोलतच नाहीत, यातल्या अडचणींबद्दल बर्याच खेळाडू मुली आपल्या पालकांशीही मनमोकळा संवाद साधत नाहीत, आणि आपल्या या समस्या जर आपण सांगायला सुरुवात केली, तर आपला खेळ बंद होईल अशी भीती त्यांना वाटते त्यामुळे त्या याच्याविषयी बोलण्याचे टाळले जाते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक तसेच सांघिक असे १६ खेळ, १४ ते ४४ असा विभिन्न वयोगट, एकूण ११७ खेळाडूंच्या संघांसाठी अनुराधा शर्मा व मिहिरा खोपकर या दोघी आहारतज्ज्ञ स्त्रियाच होत्या. हॉकीसाठी ‘एरोबिक’ आणि ‘ॲनएरोबिक’ या दोन्ही ऊर्जा प्रणालींच्या मिश्रणाची आवश्यकता, तर तिरंदाजीमध्ये ऊर्जेचे क्रमवार रूपांतरण व गतिज ऊर्जेची आवश्यकता असते. काही खेळ तासभर चालणारे, तर काही थोड्या वेळातच आटोपणारे असतात. या सगळ्यांचा विचार करणार्या आहारतज्ज्ञांचे खूप आव्हानात्मक काम त्यांनी कसोशीने पार पाडले. आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला सांभाळत आपल्या आई व पती यांच्या मदतीने मिहिराने ही जबाबदारी पार पाडली होती. आपल्याला खेळाचे प्रशिक्षक, तंदुरुस्ती प्रशिक्षक, क्रिकेटमध्ये तर फलंदाजी व गोलंदाजी प्रशिक्षक अशा साहाय्यक प्रशिक्षकांची नावे माहिती असतात. यामध्ये खूप योगदान देणारी स्त्री आहारतज्ज्ञ कुठेतरी एका कोपर्यात असते अशी खंत सर्वच स्त्री आहारतज्ज्ञांनी व्यक्त केली. आहारतज्ज्ञ म्हणजे ‘जो खाण्या-पिण्याचा तक्ता करून देतो ती व्यक्ती’ एवढीच आपली संकल्पना असते.
आहारतज्ज्ञ हा खरं तर कार्यक्षमता वाढणारा आणि कामगिरी उच्च पातळीवर नेणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो हे सहज दुर्लक्ष होते. या स्त्री आहारतज्ज्ञांचे खूप कौतुक व त्यांना योग्य सन्मान व ओळख नक्कीच मिळेल या सदिच्छांसह खूप शुभेच्छाही!
tatkeneeta6@gmail.com
