डॉ. नीता ताटके
क्रीडा क्षेत्रात दीर्घ काळ टिकून राहायचं असेल तर संयम, सातत्य महत्त्वाचं असतंच, पण यासोबतच गरजेचं असतं, मानसिक स्वास्थ्य उत्तम असणं. खेळाडूंच्या भावना, मानसिक आरोग्य समजून त्यांना अत्युच्च कामगिरीसाठी तयार करण्यात क्रीडामानसतज्ज्ञांचं योगदान मोठं असूनही आपण भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रीडामानसतज्ज्ञांच्या कामाला किती महत्त्व देतो? याविषयी सांगणारा लेख.
‘पी. व्ही. सिंधूने मोडला अपयशांचा दुष्काळ! जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला’, ‘मीराबाईने इतिहास घडवला! राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधणारी पहिली भारतीय स्त्री’, ‘राष्ट्रकुल मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारताचे महिलाराज! पाच सुवर्ण व एक रौप्य अशी दमदार कामगिरी’!गेल्या दोन महिन्यांतल्या या बातम्या वाचून काय मस्त वाटलं ना! या खेळाडूंच्या पदकप्रदान समारंभात भारताचा झेंडा वर जाताना आपण टीव्ही-दूरचित्रवाणीवर, समाजमाध्यमांवर बघितल्यावर आपल्याही अंगावर रोमांच उभे राहिले! खरं ना? या पदकविजेत्या कामगिरीमागे या खेळाडूंची अनेक वर्षांची कठोर तपश्चर्या, त्यांच्या प्रशिक्षकांची मेहेनत, त्यांच्या प्रशिक्षणासाठी ओतला गेलेला प्रचंड पैसा, फिजिओथेरपीस्ट’, आहारतज्ज्ञ, तंदुरुस्ती प्रशिक्षक अशा तज्ज्ञांची फौज या सगळ्याचेच योगदान आहे. मात्र या स्त्रिरया जरी खेळाडू असल्या तरी त्या प्रथम ‘माणूस’ आहेत, त्यांना भावभावना आहेत, त्यांनाही रोज सकाळी पाच वाजता उठून दहा किलोमीटर धावायला जायचा, व्यायाम करायचा कधी कधी कंटाळा येतो, यश-अपयशाची भीती वाटते, ताण-तणावांचा कोंडमारा सहन करायला लागतो, अगदी आइस्क्रीम, जिलबी असं गोड काही खाण्याचा मोहही होतो. अशा अनेक मनस्थितीतून जाणार्या या स्त्रियांच्या मागे त्यांना प्रोत्साहित करणारी, मनापासून समजून घेणारी, त्यांचा आत्मविश्वास, भीती अशा सकारात्मक तसेच नकारात्मक विचारांवर काम करणारी एक ‘शक्ती’ उभी असते.
मीराबाई चानू. नोंगपोक काकचिंग या मणिपूरच्या छोट्याशा गावातली ही मुलगी वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षीही जड पाण्याचे हंडे सहज उचलून मैलोगणती चालत असे. लहानखुरी चण, पण प्रचंड ताकद असलेल्या मीराबाईने वयाच्या १२ व्या वर्षी स्पर्धेसाठी वजन उचलण्याचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि अगदी वयाच्या १६-१७ व्या वर्षी राष्ट्रीय पदक पटकावलं. २०१४ मध्ये स्कॉटलंडच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. मात्र २०१६ च्या ‘रियो ऑलिम्पिक’मध्ये पदक जिंकण्याची अपेक्षा असलेल्या मीराबाईने साफ निराशा केली. तिच्या ‘क्लीन अँड जर्क’ स्पर्धेमध्ये तिला एकदाही वैध पद्धतीने वचन उचलता आले नाही आणि ‘डिड नॉट फिनिश’ असा अपयशाचा शिक्का बसून ती स्पर्धेतून बाद झाली. सतत आठ-नऊ वर्षं केलेली मेहनत अशा प्रकारे काही मिनिटांत पाण्यात गेलेली बघून, प्रचंड अपराधी जाणिवेने मीराबाई पूर्णपणे खचली. निराशेच्या गर्तेत गेली आणि ‘‘आता बस्स… पुरे!’’ म्हणत खेळ सोडण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली. मीराबाईला परत खेळाकडे वळविण्यामध्ये ‘‘खेळात यश-अपयश असतंच, झालं ते गेलं, आता पुढचं बघ’ असं म्हणून भक्कम आधार देणारी आई, ‘‘तुला नक्की जमेल’’ हा विश्वास देणारे तिचे प्रशिक्षक, यांच्याबरोबरच एक तिसरी ‘शक्ती’ही मीराबाईच्या मागे उभी राहिली होती.
पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ असा तिच्याच मायभूमीवर सरळ पराभव करून परदेशात खेळलेल्या स्पर्धांमध्ये चार वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. या आधी तिने २०२४ मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली होती. अनेक वेळा स्पर्धांच्या उपांत्य व अंतिम फेरीत गेलेल्या सिंधूला सातत्याने विजेतेपदाने हुलकावणी दिल्याने ती त्रस्त झाली होती. आपल्या कामगिरीविषयी चर्चा करायला तिने थेट ‘किंग कोहली’ऊर्फ विराट कोहलीची सुद्धा भेट घेतली होती. जपानच्या विजयानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सिंधूने ‘‘मी नियमित सराव तर करत होतेच, मात्र गेली काही वर्षं आत्मसन्मान व आत्मविश्वास जपण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते’’ हे मोकळेपणे मान्य केले. हा आत्मविश्वास, आत्मसन्मान जपण्यासाठी मदत करणारी एक ‘शक्ती’ तिच्याही मागे उभी होती.
ही ‘शक्ती’ कोणती? ती आहे क्रीडामानसतज्ज्ञांची. निराशेच्या गर्तेतून पद्धतशीरपणे खेळाडूंना बाहेर काढणं, राग, द्वेष, चीड, हताशा, तसेच आनंद, समाधान या संमिश्र भावना हाताळणं, मनाला आधार देणं, उभारणं, याबरोबरच खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वानुसार विविध मानसतंत्रांच्या पद्धतशीर वापराने खेळाडूंची कामगिरी सर्वोत्तम होईल, त्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारी, प्रामुख्याने स्त्री क्रीडामानसतज्ज्ञ असणारी फौज ज्यांचा चेहरा लोकांसमोर येत नाही, ज्यांची नावं समाजाला माहिती नसतात, मात्र खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार्या या फौजेचा भारताच्या क्रीडा यशात मोलाचं योगदान आहे.
आपल्या ‘शिवछत्रपती पुरस्कार’ विजेत्या खेळाच्या कारकीर्दीनंतर अवनीला (नाव बदलले आहे) क्रीडामानसतज्ज्ञ म्हणून भारताच्या राष्ट्रीय शिबिरात भारतीय स्त्री कुस्तीपटूंबरोबर काम करण्याची मोठी संधी मिळाली. प्रामुख्याने दिल्ली-हरियाणाच्या खेळाडूंचा भरणा असलेल्या या स्त्री खेळाडूंशी संवाद साधताना हरियाणवी लहेजा असलेली त्यांची भाषा आणि आपली मुंबईची हिंदी यांच्यात नेहमीच पेच निर्माण होई , पण त्यापेक्षाही त्या खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, पालक या सर्वांचाच ‘हमे तो खेलना हैं, इसमे दिमाग का क्या काम है?’ हा दृष्टिकोन बदलायला सुमारे एका वर्षाचा कालावधी गेला. क्रीडामानसशास्त्राकडे बघण्याचा भारतीय खेळाडूंचा दृष्टिकोन अजून खूप प्रगल्भ व्हायला हवा हे ‘पॅरिस ऑलिम्पिक’च्या अनुभवावरून जाणवलं. ऑलिम्पिक आयोजकांनी खेळाडू राहतात त्या ‘ऑलिम्पिक व्हीलेज’मध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. ऑलिम्पिकच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच ‘माइंड रूम’ची स्थापना करण्यात आली होती. तिथे ध्यानधारणा (Meditation), पूर्ण विश्रांती (Relaxation)), कल्पनाचित्रण (Visualization) या मानसिक पद्धती, ज्याचा क्रीडामानसतज्ज्ञ खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात, त्यासाठी खास सोय करण्यात आली होती. परदेशी खेळाडू सातत्याने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर दिसत होते, तिथे भारतीय खेळाडूंचा वावर तसा बराच कमी होता. या सुविधेची उपयुक्तता जाणवणं, ती मनात भिनणं आणि नियमित शारीरिक व्यायामासारखाच त्याचा सातत्याने वापर करणं यासाठी आपल्याला बरीच मजल मारायची आहे.
आज कौतुकाची बाब म्हणजे अनेक पुरुष संघाच्या क्रीडामानसतज्ज्ञही स्त्रियाच आहेत, या स्त्रियांचे अनुभव या क्षेत्रातील आव्हाने जाणवून देतात. पुरुषांच्या संघाबरोबर काम करणार्या एक स्त्री क्रीडामानसतज्ज्ञाला ‘‘आमचा जोश, जिगर, राग, द्वेष, पौरुषत्व तुम्हाला काय कळणार?’’ असा थेट प्रश्नच पहिल्या भेटीत विचारण्यात आला. तीसुद्धा त्यांना पुरून उरली आणि या संघाने तिला सहकार्य करायला सुरुवात केली. संघाच्या कामगिरीतही फरक पडायला लागला आणि कालांतराने त्यांच्या देहबोलीतून तिच्याबद्दल आदर व्यक्त व्हायला सुरुवात झाली. असाच एक वेगळा अनुभव सेनादलांच्या खेळाडूंबरोबर आल्याचा एका स्त्री क्रीडामानसतज्ज्ञांनी सांगितलं. सेनादलाच्या सामाजिक शिष्टाचार पद्धतीनुसार अगदी पहिल्या सत्रापासून सर्व खेळाडू तिच्याशी अत्यंत आदबीने वागत होते, तिने वापरलेल्या वेगवेगळ्या मानसतंत्रांनाही सहकार्य करत होते, पण कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे, आपण आणि त्यांच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी आहे हे तिला सतत जाणवत होतं. ताणतणाव, अपयश, नकारात्मकता हे विषय तर हसण्यावारीच नेले जात होते. एका सत्रामध्ये एकजण नकळतपणे बोलून गेला ‘‘औरतों के सामने हम रोते नहीं हैं’’ त्याक्षणी तिला या खेळाडूंची नस सापडली आणि खर्या अर्थाने तिने या खेळाडूंबरोबर यशस्वी कामगिरी पार पाडली.
सिडनीला स्थायिक झालेली ‘मानस सल्लागार’ म्हणून कार्यरत असलेली पुण्याची राष्ट्रीय खो-खोपटू वर्षा साठे-टेंबे हिचा अनुभव मात्र बरोबर याविरुद्ध आहे. मानसिक घटकांवर काम करण्याची आवश्यकता असते याचे समाजभान त्या देशात आहे, अशी मदत घेणार्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोनही नकारात्मक नसतो. राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तर सोडूनच द्या, अगदी एका ‘क्लब’ पातळीवरच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याची इच्छा असलेल्या खेळाडू स्त्रीला ‘मानसिक प्रशिक्षण’ घेण्यासाठी तिचा नवरा वर्षाकडे घेऊन आल्याचा अनुभव तिने सांगितल्यावर आश्चर्यचकित व्हायला होतं.
आपला डॉक्टरांवर विश्वास असतो, औषधांमुळे आपण बरे होऊ ही खात्री असते, त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याची लाज वाटत नाही. क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले ‘फिजिओथेरपीस्ट’, आहारतज्ज्ञ, खेळाडूंच्या शारीरिक क्षमता, ताकद, तंदुरुस्ती, लवचीकता यावर काम करणारे ‘स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग’ प्रशिक्षक यांनाही सहज स्वीकृती आहे, मात्र चिंता, हताशा याबरोबरच आत्मविश्वास, सकारात्मकता, यश-अपयश आणि प्रत्यक्ष खेळताना कोणत्याही पायर्यांवर न रेंगाळता ‘या क्षणी काय करायला पाहिजे’ याचं भान ठेवून खेळण्याची क्षमता वाढवणे अशा विविध घटकांवर काम करणार्या क्रीडामानसतज्ज्ञांना ही स्वीकृती मात्र सहज लाभत नाही. मानसिक प्रशिक्षण शिकण्यासाठी खेळाडू आणि क्रीडामानसतज्ज्ञ या दोघांमध्ये परस्पर विश्वास, सामंजस्य आणि सलोख्याचे नातं निर्माण करण्याची प्रक्रिया ही पहिली पायरी असते. खेळाडूंबरोबरच, खेळाडूंचा प्रशिक्षक व पालक यांच्याबरोबरही हा संबंध प्रस्थापित व्हायला लागतो, या सर्वांशी सहकार्य साधण्यातच आठ-दहा महिने सहज निघून जातात.
‘आम्हाला याची काय गरज आहे?’ या प्रश्नापासून ‘खरंच फायदा होतोय’ हे समजेपर्यंत खूप महत्त्वाचा आणि मोठा कालावधी फुकट जातो. खेळाडू व पालक यांच्यासाठी प्रशिक्षकांचा शब्द अंतिम असतो, ‘‘हे प्रशिक्षक इतर कुठल्याही मदतीला सहज होकार देतात, पण क्रीडामानसतज्ज्ञ म्हटला की, त्यांना असुरक्षित का वाटते हेच समजत नाही’’ अशी प्रतिक्रिया बहुसंख्य क्रीडामानसतज्ज्ञांची होती. हे प्रशिक्षक विरोधही सरळ सरळ करत नाहीत. खेळाडूंबाबत मनमोकळेपणाने माहिती न देणे, खेळाडूंशी सुरुवातीचा संवाद सोपा करण्यास मदत न करणे, खेळाडूंच्या भेटीची वेळ ठरली की त्याच वेळेला खेळाडूंना दुसरे काही काम देणे अशा विविध प्रकारे हे असहकार्य दिसून येतात. ‘दे आर हार्ड नट टू क्रॅक’ असा अतिशय समर्पक शब्दप्रयोग एकीने केला. म्हणूनच क्रीडामानसतज्ज्ञांकडेही प्रचंड संयम आणि स्वत:चा आत्मसन्मान राखण्याकडे कल असावा लागतो.
खेळ खेळणार्या बहुसंख्य स्त्रिरया स्पर्धात्मक खेळाकडे वळत नाहीत, मात्र खेळाच्या सहभागाचे त्यांना अनेक शारीरिक व मानसिक फायदे आहेत. क्रीडामानसतज्ज्ञांचे या क्षेत्रातही चांगले योगदान आहे.
स्त्रिरयांचा संघ उभारण्यातील आव्हानं, स्त्री क्रीडापटूंवर झालेले अत्यल्प संशोधन, स्त्रियांसाठी क्रीडा धोरण या काही बाबींबद्दल आपण पाहूया पुढील लेखात…!
utatkeneeta6@gmail.com
