scorecardresearch

आयुष्याचा ‘मक्सद’

लहानपणीच ‘तू कोण होणार?’या प्रश्नाचं माझं उत्तर होतं, ‘चार्ली चॅपलिन..’ मला माझं ‘रोल-मॉडेल’ तेव्हाच सापडलं होतं..

लहानपणीच ‘तू कोण होणार?’या प्रश्नाचं माझं उत्तर होतं, ‘चार्ली चॅपलिन..’  मला माझं ‘रोल-मॉडेल’ तेव्हाच सापडलं होतं.. एक प्रकारे जीवनाचा अर्थ सापडला होता, आयुष्याचा ‘मक्सद’ सापडल्यासारखं वाटत होतं.. त्याच प्रवासात १४ फीचर फिल्म्स, ५०हून अधिक लघुपट, चार मालिका बनवता-बनवता स्वत:चा असा एक एकनिष्ठ प्रेक्षक बनवू शकल्याचं समाधानही गाठीशी बांधलं आहे. आतापर्यंतची ही वाटचाल अपघातानं समोर आलेल्या वळणांतून घडलेली नाही तर त्या प्रत्येक टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांतून झालेली आहे आणि त्या जबाबदारीचं समाधान मोठं आहे.

माझा जन्म कराडचा. वडील अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याते असल्यामुळे लहानपण तिथेच गेलं. निमशहरी छोटेखानी गाव, कृष्णा नदीत पोहणं, सायकलवर गावभर भटकणं, विटी-दांडू, शेतं, गुऱ्हाळं हे सगळं माझ्या लहानपणच्या फ्लॅशबॅकचा भाग आहेत! वडिलांची पुण्याला बदली झाली आणि आमचं कुटुंब पुण्याला आलं.
कराडच्या मित्रमंडळींच्या विरहापेक्षा मला दुसऱ्याच एका गोष्टीची ताटातूट होण्याची भीती वाटत होती, नाटक! कराडच्या काही शिक्षकांनी एक व्यक्तिमत्त्व विकासवर्ग सुरू केला होता आणि त्यात दुसरीपासून मी गाणी-गोष्टी-नाटक-नाच-भाषण काय म्हणाल ते करायला सुरुवात केली होती. आता पाचवीत कराड सोडून या मोठय़ा शहरात हे सगळं मिळणार का, अशी भीती घेऊन मी पुण्यात पाऊल टाकलं. हे पहिलं वळण! हे पचवणं सोपं नव्हतं.
आम्हा दोघा भावंडांना मॉडर्न हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. मी कराडमध्ये चौथीत स्कॉलरशिप मिळवली होती. भावानं चौथी आणि सातवीतही मिळवली होती. त्यामुळे पुण्यातही मी सातवीत स्कॉलरशिप मिळवून दाखवायला हवी अशी ईर्षां होती- जी मी पूर्णही केली. आता अशा मुलानं इंजिनीअर (नाही तर डॉक्टर) व्हायचं असा रिवाजच होता (भावानं तो इंजिनीअर होऊन पुढे पूर्णही केला. अगदी पुणे विद्यापीठाचं अभियांत्रिकी शाखेचं सुवर्णपदकही मिळवलं!) शाळेत मुद्दाम प्रयत्न न करता पहिला-दुसरा नंबर येण्याची मला खोड लागली होती. पण त्याचा पुस्तकी कीडा असण्याशी संबंध नव्हता. उलट आपण किती टारगट आहोत असं भासवायचीच मला आवड होती! मैदानी खेळ खूप आवडायचे. पोहणं, फुटबॉल आणि क्रिकेट.. चित्रकलेच्या परीक्षाही उत्साहानं उत्तीर्ण झालो. अशा वातावरणात शाळेच्या स्नेहसंमेलनाचं नाटक बसवायची वेळ आली. जोशीबाई आणि एकपात्री प्रयोगांसाठी प्रसिद्ध असणारे चांदेकर सर यात पुढाकार घेत आणि माझ्या कराडहून येऊन थोडंसं ढेपाळलेल्या मनाला होमग्राऊंडवर आल्यासारखं वाटलं. मग मी नाटकं, नाटय़वाचन, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन यांचा सपाटाच लावला. एरवीचा बुजरेपणा स्टेजवर चढताच जातो हे लक्षात आल्यावर मी आणि त्या-त्या सरांनीही मला स्टेजवर धाडण्याचा धडाकाच लावला.  मी आठवीत असताना पु. ल. देशपांडेंचं ‘पुढारी पाहिजे’ हे वगनाटय़ आंतरशालेय नाटय़ स्पर्धेत बसवायचं ठरलं. मी त्यातल्या इरसाल गावकरी नायकाची -रोंग्याची भूमिका करायचं ठरलं (पुढे कळलं की मूळ संचात ही भूमिका निळूभाऊ  फुले करायचे). सहकारी चळवळीचा विचार तमाशाच्या ढंगात बांधलेला हा वग. शालेय पातळीसाठी त्याचं थोडं सुलभीकरण केलं गेलं होतं. पण त्या माझ्या भूमिकेनं शाळेत खूपच दंगा उडवून दिला. येता-जाता पोरं मला ‘ए रोंग्या’ अशी हाक मारू लागली. आजच्या भाषेत बोलायचं तर मी स्टार झालो!! ही नटाची ओळख मला इतकी मनोमन पटली, की मी नट व्हायचं पक्कंकेलं..! हा माझा विचार खरंच खूप आतून आलेला, मन:पूर्वक होता हे आजही आठवतंय.. आमचे इंग्रजीचे देशपांडे सर वर्गात सर्व विद्यार्थ्यांसमोर आमच्या इंग्रजीतून मुलाखती घ्यायचे- इंग्रजी बोलण्याचा सराव म्हणून.. अशाच एका मुलाखत सत्रात त्यांनी मला विचारलं, ‘‘तू पुढे आयुष्यात काय होणार?’’ मी उत्तर दिलं ‘‘चार्ली चॅपलिन..!’’
‘‘का?’’ त्यांनी विचारलं.
‘‘कारण त्यानं आपल्या अभिनयातून जगावर न पुसता येण्याजोगा ठसा उमटवला..’’ माझं उत्तर.
मला आठवतंय ते केवळ वर्गासमोर भाव खाण्याचं उत्तर नव्हतं. हसू, प्रेम, भटकेपणा, एकटेपणा, उत्कटता या सगळ्यांसहित म्हटलं तर गंमत करत पण खूप गंभीर गोष्ट सांगू शकणारा लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-अभिनेता असा तो संपूर्ण कलावंत होता. देश-भाषांच्या पलीकडे जाणारा होता. मला ‘रोल-मॉडेल’ सापडलं होतं.. एक प्रकारे जीवनाचा. त्या वयाच्या मर्यादांमध्ये का होईना- अर्थ सापडला होता, जीवनदृष्टी मिळाली होती आणि आयुष्याचा ‘मक्सद’ सापडल्यासारखं वाटत होतं.. आजही ते सापडलेलं माझ्यासाठी तितकंच निरागसपणे खरं आहे.
त्या वेळी ‘जागर’ संस्थेचे वासुदेव पाळंदे (गुरुजी) वेगळी बालनाटय़ चळवळ रुजवू पाहात होते. राजा-राणी-राक्षस-परी या बेगडी जगापेक्षा मुलांच्या अनुभवातलं नाटक त्यांनी स्वत: तयार करावं म्हणून ‘प्रसंगनाटय़दर्शन स्पर्धा’ आयोजित करत होते. आमच्या शाळेतल्या काही गणित-शास्त्र आदी विषयांच्या शिक्षकांना आमच्यासारख्या हुशार मुलांना ‘नादी लावण्याचा’ तो उद्योग आहे असं वाटायचं, पण या दर वर्षी होणाऱ्या स्पर्धा म्हणजे मला राखीव कुरणच मिळालं. या स्पर्धामध्ये भाग घेता घेता माझं आयुष्य, अनुभव याकडे बघणं, त्यातून नाटय़निर्मिती करावंसं वाटणं, मुळात कलेचं प्रयोजन हे अशी अनुभवनिर्मिती आहे आणि त्यातून आपल्याला स्वत:, स्वत:चं आयुष्य अधिक उमगत जातं हे समजणं आणि हे करताना मिळणारा आनंद हा या सगळ्याचा गाभा आहे.     
हे जाणवणं- या सगळ्याची प्रगल्भता नक्कीच वाढत गेली असं आज जाणवतंय.. आपण गट जमवू शकतो, त्यांना नेतृत्व देऊ  शकतो, एका दिशेनं त्यांना प्रेरित करू शकतो, सादरीकरणापर्यंत तो उत्साह टिकवून धरू शकतो- असे नवीन शोध लागत होते. नकळत लेखन-दिग्दर्शनाचे धडे गिरवले जात होते.
दहावीला भरपूर (बोर्डात येणाऱ्यांपेक्षा थोडेच कमी) मार्क मिळवले तरी माझं मन तोपर्यंत खूप मार्क्स-सायन्स-इंजिनीअरिंगच्या चाकोरीला प्रश्न विचारू लागलं होतं.. आईनं स्वत: हौशी रंगभूमीवर काम केल्यामुळे तिला हे माझं वेड समजत होतं, पण ‘कला क्षेत्रातल्या असुरक्षिततेची’ भीती होती! त्यामुळे चारच तास कॉलेज आणि इतर वेळी नाटक करू देणाऱ्या वाणिज्य शाखेचा स्वीकार केला. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात शिकायला लागल्यावर ‘निदान सी.ए. तरी हो’- असा सल्ला कुणी कुणी दिला.. पण तोपर्यंत मी नव्या जोमानं नाटक करत ‘जागर’ संस्थेलाही जाऊन मिळालो होतो. रात्रीच्या तालमी, चर्चा, वाचन या जगण्याशी मन जोडलं गेलं होतं. त्या उत्साहात मी चक्क जी. ए. कुलकर्णीच्या कथेवर एकांकिका लिहून पुरुषोत्तम करंडकात सादरही केली. ती वाईट झाली हेही माझ्या लक्षात आलं नाही- इतका मी धुंदीत होतो. जी.एं.नी मला पत्रोत्तर लिहून परवानगी दिली हा कैफ मला पुरे होता. पाळंदे गुरुजींनी माझ्यावर खूप प्रेमानं शाळा-शाळांमध्ये अनुभव-सादरीकरणाचा नवा विचार पोचवण्याची जबाबदारी दिली. मी ती ‘पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या’ उमेदीनं पार पाडायला लागलो. शालेय नाटकांच्या या चळवळीतून मला जग नव्यानं कळत होतं. आपण सुखवस्तू घरात जन्मल्यामुळे मिळालेली स्वस्थता आपण इतर आयुष्य शोधत स्वखुशीनं अस्वस्थतेत रूपांतरित करायला हवी, याचं थोडं भान येऊ  लागलं होतं.
याच काळात ‘जागर’मध्येच सती भावेशी मैत्री झाली. खूप वाचन करणारी, इंग्रजी न घाबरता बोलणारी, तिसरेच नवे विचार मांडणारी, वाद घालणारी ही मुलगी आम्हा काही मुलांच्या अजाणता पुरुषी संवेदनांना धक्का देणारी होती. सुमित्रा भावे या तिच्या आईशी ओळख झाली आणि आमच्या नव्यानं तयार होणाऱ्या नाटय़-गटाला ‘फ्रेण्ड, फिलॉसॉफर, गाइड’ मिळाली. समाजशास्त्राची आणि समाजकार्याची पदवी घेऊन तिनं अनेक र्वष समाजकार्याचं अध्यापन केलं होतं. आता ती सामाजिक संशोधनाच्या क्षेत्रात होती. या मायलेकी बरोबरीच्या नात्यानं भांडू शकायच्या, खिदळू शकायच्या- दोघींचंच कुटुंब ऐटीत चालवायच्या. त्यांच्याकडे अनिल आणि सुनंदा अवचट,   कमलताई पाध्ये, गौरी देशपांडे, देवीदास बागूल,  श्री. पु. भागवत इतकंच काय नानासाहेब गोरेही अचानक भेटायचे. सुमित्रामुळेच रोहिणी भाटे, अशोक केळकर यांच्यासारखी अनन्यसाधारण माणसं जवळून दिसली. आम्हा नवीन विचाराची मिसरूडं फुटणाऱ्यांना ही पर्वणीच होती. सुमित्रानं लेखन-वाचन, चित्रकला, शिल्पकला, नाटय़-नृत्य-गायन- सर्व कलांचं आंतरिक नातं आणि त्यांच्या आस्वादाचं आयुष्यातलं स्थान याचं भान देऊन माझ्या जगण्याचा पोतच बदलून टाकला.  हे माझ्या आयुष्यातल्या अनेक वळणांना मागे टाकणारं मोठं वळण होतं.
अशा नाटककारांची नाटकं करू या- अशा विचारात असणाऱ्या आमच्या गटाला सुमित्रानं आमच्या अनुभवातली नाटकं आम्ही लिहावीत- असं प्रोत्साहन दिलं आणि एकीकडे बालरंगभूमी आणि दुसरीकडे मोठय़ांची नाटकं या दोन्हींच्या मधल्या अडनिडय़ा वयाच्या आम्ही ‘अनुभव’ या आमच्या गटाची स्थापना केली. ‘प्रश्न’- हा आमचे विद्यार्थिदशेतले प्रश्न मांडणारा दीर्घाक आणि ‘पळसाला पाने पाच’ हे पाच तरुण-तरुणींच्या एकत्र रहाण्याच्या प्रयोगाबद्दलचं म्युझिकल दोन अंकी नाटक आम्ही सादर केलं. पु. ल. देशपांडेंपासून अनेकांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आमची नवी ओळख आम्हालाच करून दिली. विद्या बाळांनी ‘स्त्री’ मासिकात आमच्या या आगळ्या ग्रुपबद्दल- आमच्या मैत्रीच्या स्पिरिटबद्दल मला लेख लिहायला सांगितला.
आमच्या ‘ग्रुप’ची मतं तयार होऊ  लागली होती. जात-धर्म-वर्ग यांनी विघटन झालेला समाज, त्यातले कळत-नकळत होणारे शोषणाचे प्रकार, असमानता या गोष्टी उमजत गेल्यावर मुळातच जास्त अधिकार, सत्ता यांसह जन्मलेल्यांनी आपणहून आपल्या प्रिव्हिलेजेसचा त्याग केला तर अनेक लढय़ांची गरजच संपून जाईल, असा तेव्हा निरागसपणे वाटलेला विश्वास आजही मनात आहे. तसं वर्तन अवघड आहे पण प्रयत्न केला पाहिजे- नुसत्या विचारांमध्ये बुचकळ्या मारून काय उपयोग असंही वाटू लागलं. याच प्रकाशात स्त्री-मुक्तीचा विचारही उमजू लागला. पुरुषाचा पुढाकारच स्त्रीला न भांडता तिचं बरोबरीचं स्थान देऊ  शकेल- असा विचार बरोबरीच्या पुरुषी मित्रांना भांड-भांडून पटवावंसं वाटायला लागलं. आया-बहिणी आणि मैत्रिणी यांना आपल्या जरा पुरुषीपणाच्या पलीकडे जाऊन केलेल्या विचारानं किती समाधान मिळतं हे दिसत असताना कुठला अट्टहास पुरुषांना सांस्कृतिक वर्चस्व कवटाळायला उद्युक्त करतो, असा प्रश्न पडू लागला.
आणि ते निर्णायक वळण आलं. कॉलेजचं तिसरं र्वष होतं. सुट्टीत मी आणि माझा मित्र सुधीर पलसाने हिमालयात ट्रेकला गेलो. आणि तिथे आम्हाला चक्क सतीचं पत्र आलं- ‘‘इथे खूप नव्या घडामोडी घडताहेत. आई एक फिल्म करणार आहे, आपण सगळ्यांनी त्यात असायचंय..!’’ आम्ही हरखून गेलो. आम्ही परत आलो आणि कळलं की खरंच सुमित्राच्या ‘स्त्री-वाणी’ या संशोधन प्रकल्पातर्फे त्यांनी केलेल्या दलित स्त्रियांच्या अभ्यासाचे अनुभव आणि निष्कर्ष चित्रपट रूपानं मांडायचं सुमित्रानं ठरवलं होतं. तिच्या प्रकल्पप्रमुख डॉ. फ्रान्सिस यासस यांनी या जगावेगळ्या विचाराला मान्यताही दिली होती. मी, सुधीर, सती, सुनील गोडसे, पत्रकार विद्या कुलकर्णी आणि इतर काही असा आमचा सहकाऱ्यांचा गट बनला. डिजिटलच काय पण व्हिडीओ कॅमेरेही फारसे नसण्याचा तो काळ. चित्रपट कसा बनवतात हे अजिबात माहीत नसलेले आम्ही सगळे..! चित्रपट तंत्र शिकणार कसं? सुमित्रानं सर्वासाठी अभ्यासाची पद्धत तयार केली. व्ही.सी.आर. भाडय़ानं आणून एकेक कॅसेट ‘पॉज’ करत करत आम्ही बघायचो. शॉट्स समजून घ्यायचो. कॅमेरा अँगल्स न्याहाळायचो, लायटिंगचा शोध घ्यायचो.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या पी. के. नायरसाहेबांनी आम्हाला स्टीनबेक मशीनवर उत्तम लघुपट बघायला दिले. सुमित्रानं तिचे लहानपणचे शेजारी आणि मित्र असलेले छायाचित्रकार डेबू देवधर यांना बोलावून घेतलं. डेबूंना आमच्या अभ्यासाचं महत्त्व समजत होतं आणि सुमित्राच्या आपली संहिता आपणच लिहिणारी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्याच्या निर्णयाला त्यांचा पाठिंबाही होता. आम्ही योग्य दिशेनं चित्रपटतंत्र आत्मसात करत चाललो होतो याची खात्री डेबूंनी सुमित्राला दिली.. एक प्रकारे आमचा पहिला लघुपट ‘बाई’ ही आमची एक कार्यशाळाच होती. त्या चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आणि महोत्सवांबरोबरच वस्त्या-वस्त्यांमध्ये ‘बाई’चे झालेले शोज हे आमचं सर्टिफिकेट होतं. मी १६ मि.मी. प्रोजेक्टर चालवायला शिकलो. ते धूड खांद्यावरून नेऊन वस्तीत फिल्म दाखवणं- हा एक अविस्मरणीय अनुभव असायचा. बायका फिल्मविषयी न बोलता स्वत:च्याच ‘स्टोऱ्या’ सांगू लागायच्या. हळूहळू आम्हाला उमजलं की हेच तर आपल्याला साधायचं होतं! हीच या माध्यमाची खरी गम्मत होती. खरी वस्ती, वस्तीतल्या बायकांकडून आम्ही करवून घेतलेला नैसर्गिक अभिनय, खऱ्या फाटक्या कपडय़ांतून, मोडक्या पत्र्यांतून, बिना मेकअपच्या चेहेऱ्याच्या त्वचेतून, सुमित्राच्या अभ्यासातून आलेल्या अस्सल अनुभव आणि भाषाशैलीतून, चित्रचौकटीतून उलगडणारं वास्तव हा आम्हाला आमचा प्रामाणिक आविष्कार वाटत होता. त्या वेळी चित्रपट माध्यमाची जाणवलेली- उमजलेली ही मूलतत्त्वं आमचा अविभाज्य भाग बनून गेली आहेत. अभ्यासातून सापडलेला अनुभवनिष्ठ निष्कर्ष गोष्टरूपानं सांगणं- हे आमचं चित्रनिर्मितीचं प्रयोजन आम्हाला तेव्हा सापडलं- ते आजही अबाधितच आहे.
या अनुभवानं भारावल्यानंतर चित्रपट कलेच्या प्रेमात पडण्यावाचून काही रस्ताच दिसत नव्हता. मी माझं बी.कॉम. उरकलं व मी आणि सुधीरने फिल्म इन्स्टिटय़ूटची परीक्षा दिली. मी दिग्दर्शन आणि तो छायाचित्रण या अभ्यासक्रमांना निवडलोही गेलो. देशभरातून होणाऱ्या या निवडीत आपण आहोत या भावनेनंच मला इतकं जबाबदार वाटू लागलं की हा अभ्यासक्रम गंभीरपणे करून तो देशाच्या उपयोगी येणाऱ्या चित्रनिर्मितीत (सुमित्राबरोबर ‘बाई’ पद्धतीचे लघुपट करत) केला नाही तर मोठाच देशद्रोह होईल असा माझा प्रामाणिक दृष्टिकोन होता. त्यामुळे बरोबरीच्या कुणी अगम्यवादी कलात्मक तर कुणी धंदेवाईक आकर्षक चित्रनिर्मितीची स्वप्नं पहाणाऱ्या आणि कुणी इन्स्टिटय़ूटच्या सुरक्षित वातावरणात सशस्त्र क्रांतीच्या डाव्या गप्पा मारणाऱ्या सगळ्यांमध्ये मी माझ्या छोटय़ाशा ध्येयावर स्थिर होतो. माझं शिक्षण चालू असतानाच आम्ही ‘पाणी’ हा दुसरा लघुपट बनवला. त्यालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तोही आम्ही खेडोपाडी दाखवू लागलो. ‘एफटीआयआय’च्या थोडय़ा आंग्लाळलेल्या आक्रमक वातावरणात मराठी माध्यमवाला माझ्यासारखा मुलगा प्रथम बुजून गेला. पण हळूहळू ‘बाई’ लघुपटाच्या वेळी मी चक्क मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीचा अनुभव घेतला.
 माझा -आमच्या स्व-अभ्यास गटात झालेला- अभ्यास माझ्या उपयोगी पडत होता तसतसं बरोबरीच्या मंडळींमध्ये मला एक स्थान मिळू लागलं. या काळात मी (आणि माझ्याबरोबर सुमित्रानंही- एकलव्याप्रमाणे) जागतिक चित्रपट अभ्यासला. त्यामुळे भोवतालच्या छोटय़ाशा परिघापलीकडे चित्रपट माध्यमाच्या वापराच्या, परिभाषेच्या, शैलीच्या किती अपरिमित परी आहेत हे कळल्यावर मनाच्या कक्षा खूपच रुंदावल्या. त्याचबरोबर जागतिक चित्रपटांपुढे आपली चित्रपटसृष्टी तुच्छ मानणाऱ्यांचा गोंधळही दिसू लागला. आपली, आपल्या समाजासाठी, आपण स्वत: विकसित केलेली चित्रपटशैली हा आपला शोधाचा रस्ता हवा हे जाणवलं. त्याचप्रमाणे आयुष्यही विशिष्ट चाकोरीतून घालवायलाच हवं- असं नसू शकतं असा विश्वासही या जागतिक चित्रपटांमधल्या जीवनानुभवानं दिला.
सुमित्राची अभ्यास प्रकल्पाची नोकरी चालू होतीच- जोडीनं लघुपटांचे प्रयोग सुरू झाले. त्या अभ्यास प्रकल्पांमध्ये मी लेखनिक-मदतनीस म्हणून सहभागी होऊ  लागलो. स्त्री-शक्तीचा गांधीवादी विचार, स्त्रियांच्या मनातली मिथकं असे ते अभ्यास प्रकल्प होते. खेडोपाडी शिबिरांची व्हिडीओ चित्रीकरणं करू लागलो. त्या स्वांत सुखाय काळात चित्रपट बनवणं हे सुद्धा यशस्वी करिअर बनवून भरपूर पैसा मिळवायला हवा असंच काही नाही- अशी एक कार्यकर्त्यांची विचारसरणी तयार झाली आणि आयुष्याकडून फारशी मागणीच उरली नाही. सगळ्याच गोष्टींत मज्जा यायला लागली. समानधर्मीयांचं काम आणि जीवन एकरूप झालेलं आमचं नवं कुटुंबच तयार होत गेलं. शेवटी सुमित्रानं नोकरी सोडली आणि मध्यमवयात पूर्णवेळ चित्रनिर्मिती स्वीकारण्याचं धाडस केलं.
लघुपटनिर्मितीत आम्ही समाधानी असताना अचानक ‘चाकोरी’ हा आमचा लघुपट आणखी एक मोठं वळण घेऊन आला. सायकल चालवायला शिकणाऱ्या एका ग्रामीण तरुणीची ही गोष्ट. आदिवासी, अंगणवाडी सेविकांपसून ते १४ आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधल्या प्रेक्षकांपर्यंत सर्वाना खूप आवडली. National Film Development Corporation (NFDC) चे व्यवस्थापकीय संचालक रवी गुप्ता यांनी आम्हाला फीचर फिल्म बनवण्यासाठी पाचारण केलं. शरीर-विक्रय करणारी स्त्री माता होते तेव्हा तिला सोसाव्या लागणाऱ्या मानखंडनेवर सुमित्राला डॉक्युमेंटरी करायची होती. त्या अभ्यासातल्या दु:खद कहाण्यांच्या विचारांतून तिनं ‘दोघी’ या पहिल्या फीचर फिल्मची संहिता लिहिली. ‘दोघी’नं त्या वर्षी ११ राज्य पुरस्कार, ३ राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून आम्हाला मराठी चित्रपटसृष्टीत ढकलूनच दिलं. आणि सामाजिक लघुपट बनवणारे आम्ही या चित्रपटसृष्टीचे भाग होऊन गेलो. त्याचबरोबर सर्व लघुपट-चित्रपट देशी-विदेशी महोत्सवांमध्ये दाखवताना जगप्रवासही केला. निरनिराळे मानव-समूह, निसर्ग, त्यांची सामाजिक-सांस्कृतिक जडणघडण आणि यांचं दर्शन घडवणारे त्यांचे चित्रपट असा खजिनाच सापडत गेला. त्या पटलाच्या पाश्र्वभूमीवर आत्मपरीक्षण सुरू झालं. आणि अनेक सामाजिक प्रश्न घेऊन निर्माते आमच्याकडे येत राहिले आणि त्या प्रश्नांना कलात्मक न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत राहिलो.  
या महत्त्वाच्या वळणालाही २१ र्वष होऊन गेली. पहिल्या ‘बाई’ लघुपटाला ३२ र्वष. माझ्या दृष्टीनं या माध्यमाच्या प्रेमात पडताना मी फक्त १७ वर्षांचा होतो.. पण आजही हे प्रेम कमी झालं नाही. माझं पहिलं प्रेम- अभिनय मधून मधून डोकं वर काढतं. नाटक ही गोष्ट आज २९ वर्षांनी  ‘शिवचरित्र आणि एक’ या नाटकात अभिनय करताना पुन्हा अनुभवली. पण एका वळणावर चित्रपट दिग्दर्शन ही वाट समोर आली आणि तिनं मला सोबत नेलं हे तर खरंच. ही सर्व र्वष मी सुमित्रा भावेंबरोबर प्रथम सहायक म्हणून आणि काही वर्षांनी सह-दिग्दर्शक म्हणून काम करत राहिलो. स्त्री-पुरुष असण्यामुळे असणारं वैशिष्टय़, वयातला फरक, सामाजिकता की कलात्मकता अशा वादांच्या शक्यता, सर्जनशीलतेच्या आकांक्षा-मर्यादा- दृष्टिकोन यांतून होऊ  शकणारे गैरसमज, मिळणारे- न मिळणारे मानसन्मान, सहकारी, कलावंत यांच्याशी असणारे मानवी संबंध, कामांची- जबाबदारीची विभागणी.. एक ना दोन- हजार संघर्षांच्या शक्यता असतानाही इतकी र्वष आमची ही टीम टिकून आहे! सुमित्रानं सर्व चित्रपटांच्या संहिता लिहिल्या आहेत, कला दिग्दर्शन आणि वेशभूषा सांभाळली आहे, मी कधीच कविता-लेखनाच्या वाटेला न गेलेला- चित्रपटांसाठी गाणी लिहू लागलो, अनेकदा आम्ही छायाचित्रण, संकलन केलं आहे, नाटकाची माझी आवड कलावंतांबरोबर तालमींमध्ये उपयोगी येते आहे.. १४ फीचर फिल्म्स, ५०हून अधिक लघुपट, चार मालिका बनवता बनवता स्वत:चा असा एक एकनिष्ठ प्रेक्षक बनवू शकल्याचं समाधानही गाठीशी बांधलं आहे. बदलत्या प्रसिद्धीच्या खेळात नवनव्या प्रसार माध्यमांच्या राजकारणात आमचं काम कधी आत्यंतिक आदरानं गौरवलं जातं तर कधी अनपेक्षित अनुल्लेखानं झाकोळलंही जातं. पण आतापर्यंतची ही वाटचाल नुसती अपघातानं समोर आलेल्या वळणांतून घडलेली नाही तर त्या प्रत्येक टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांतून झालेली आहे आणि त्या जबाबदारीचं समाधान खूप मोठं आहे. पुढे खूप मोठा रस्ता दिसतो आहे. त्यावरची वळणं अधिकाधिक अपरिचित असू देत- तर आणखी मज्जा येईल असंही वाटतं आहे. खरं तर प्रत्येक नवा चित्रपट प्रकल्प एक नवं वळण घेऊन येतो. माझ्याभोवती अगदी निकट असणाऱ्या सुमित्राबरोबरच उदारमतवादी, लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असणारे, समानता आत्मसात केलेले आणि संकुचित स्पर्धात्मकतेला फाटा देणारे असे सहयोगी आहेत. त्याचप्रमाणे कधी प्रत्यक्ष सहवासातून तर कधी आपल्या विचारधनांतून भेटत राहणाऱ्या विचारवंत- कलावंत- प्रतिभावंतांचाही एक समूह आहे. या सगळ्यांतून चित्रपटनिर्मिती, कलानिर्मितीचा आनंद लुटणारी जीवन जगण्याची ऊर्मी सतत मिळते आहे. भयानकतेचे मोठे चटके न खाता इथवर आल्याबद्दल आभारच मानायचे तर (ईश्वर वगैरे मंडळींपेक्षा) ज्यांना ते सोसावे लागतात त्यांचेच मानून न उतता न मातता आपला वसा चालू ठेवावा.. असं आज या वळणावर वाटतंय..!
सुनील सुकथनकर – vichitranirmiti@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Important decision change sunil sukthankar life

ताज्या बातम्या