satsangदेहाच्या जाणिवेचा त्याग करून सर्वामध्ये वस्त्रहीन हिंडणं-वावरणं हे धाडसच होतं. महादेवीचं हे दुर्मीळ धाडस भारतीय स्त्रीवादाच्या इतिहासात महत्त्वाचं आहे. स्वत:च्या स्त्री देहाचं महत्त्वच कमी करत  त्यांनी निरंजन ज्योतीसारखी देवाशी एकरूप झाल्याची जाणीव मनात सतत तेवत ठेवली.
काया काजळली तरी मला काय त्याचे?
 काया उजळली तरी मला काय त्याचे?
 मला काय त्याचे आता, काया असो कशी
 अंत:शुद्ध गुंतले मी चन्नमल्लेशाशी
 एका रूपसुंदर मुलीचे- तरुण मुलीचे हे उद्गार थोडे आश्चर्याचेच म्हटले पाहिजेत. पण तिचं असं बोलणंच काय, तिचं सगळं वागणं- वावरणं- नव्हे, तिचं सगळं जगणंच लोकविलक्षण आणि म्हणून आश्चर्याचं वाटतं.
महादेवी हे तिचं नाव. बाराव्या शतकात कर्नाटकातल्या उडतडी नावाच्या शिमोग्याजवळच्या एका लहानशा गावी ती जन्मली. आई-वडील शिवभक्त होते. तो काळ होता धार्मिक आंदोलनांचा. महाराष्ट्रात तेव्हा चक्रधरांचा महानुभाव संप्रदाय मूळ धरून होता. शैव आणि गाणपत्य तर होतेच, पण भागवत संप्रदायाची ध्वजाही उभारली गेली होती. त्या वेळी कर्नाटकात अल्लमप्रभू आणि त्यांचे शिष्य बसवेश्वर यांच्या वीरशैव किंवा लिंगायत संप्रदायानं बिदरजवळ कल्याणी नगरीत आपलं स्वतंत्र प्रभावक्षेत्र निर्माण केलं होतं.
महादेवीचे आई-वडील या संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांचे दैवत होतं शिवमहेश्वर. वयात येता येताच महादेवी त्या शिवशंकराला म्हणजे चन्नमल्लिकार्जुनाला आपलं सर्वस्व मानून राहिली. असं सांगतात, की त्या प्रदेशाचा राजा कौशिक तरुण महादेवीच्या देखण्या रूपाच्या प्रेमात पडला आणि त्यानं ती नाही म्हणत असतानाही तिच्याशी लग्न केलं. मात्र महादेवी त्याला आपला पती मानायला तयार नव्हती. तिचं मन चन्नमल्लिकार्जुनापाशी गुंतलं होतं, मग भले देह राजाच्या स्वाधीन असेना का!
ती तर राजापुढे सर्व वस्त्रं टाकून निखळ उभी राहिली आणि राजाच त्या साहसानं वरमून गेला. मग महादेवी तशाच अवस्थेत घर सोडून निघाली. रानावनात हिंडत ती कल्याणीला बसवेश्वरांच्या अनुभव मंडपात पोचली. तिथे तिची आणि अल्लमप्रभूंची झालेली चर्चाही मोठी उद्बोधक आहे. प्रभुदेवांनी तिचं वैराग्य तपासलं आणि ते तिच्या ज्ञानवंत बोलण्यानं प्रभावित झाले. वस्त्रहीन अवस्थेत तिचं वावरणं त्यांना नवलाचं वाटलं. तिचे केस खूप मोठे होते. मोठे आणि दाट. तिनं त्या केसांमध्येच स्वत:ला लपेटून घेतलं होतं. जर वस्त्रहीन राहायचं तर मग हे आवरण तरी कशासाठी? महादेवीनं उत्तर दिलं,
पिकल्यावाचून रंग फळाचा बदलत नाही पुन्हा
मन्मथमुद्रा पाहून तुम्हा होतील ना यातना!
या हेतूने देह झाकला, छळू नका हो मला
चन्नमल्लिकार्जुन देवाच्या अधीन झालेलीला
अजून माझा देह तरुण आहे. माणसांच्या वासना जागृत होऊ शकतात. त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून हे आवरण. अन्यथा मला त्याची गरज नाही.
देहाच्या जाणिवेचा त्याग करून सर्वामध्ये असं हिंडणं-वावरणं हे प्रचंड धाडस होतं. महादेवीचं हे दुर्मीळ धाडस भारतीय स्त्रीवादाच्या इतिहासात फार महत्त्वाचं आहे. तिनं स्वत:च्या स्त्री देहाचं महत्त्वच कमी करून टाकलं आहे. देह म्हटला की वासना आल्याच. तिनं दोन्ही गोष्टींना दूर सारलं आहे आणि एखाद्या निरंजन ज्योतीसारखी देवाशी एकरूप झाल्याची जाणीव मनात सतत तेवत ठेवली आहे. ही जाणीवच सतत तिच्या वचनांमधून दिसते, ऐकू येते, जाणवते.
महादेवीचं बहुतेक सगळं आयुष्य रानावनात एकटीनं भटकण्यात गेलं. उत्तरायुष्य तिनं श्रीशैलावरच्या कदलीबनात काढलं. तिच्या वचनांमधून ऐकू येतो तो साऱ्या निसर्गातूनच ईश्वरीय साक्षात्काराचा दिव्य स्वर. शिवाच्या भेटीची तिची तळमळ, त्याच्या विरहाचं दु:ख आणि त्याला शोधताना हळूहळू जग आणि अंतर्मन यांच्या मधल्या अशुद्धांवर केलेली मात यातून शेवटी ती तिच्या चन्नमल्लेशाशी एकरूप होण्याच्या अनुभवापर्यंत पोचली आहे.
मिठू मिठू बोलणाऱ्या राव्या रे वेल्हाळा
तुवा पाहिला का?
कुहूकुहू सादवीत गाणाऱ्या कोकिळा
तुवा देखिला का?
गुणगुण करणाऱ्या भ्रमरांनो सांगा,
तुम्ही का पाहिला?
जळाकाठी खेळणाऱ्या हंसांनो रे बोला,
तुम्ही का देखिला?
डोंगरात नाचणाऱ्या मोरांनो सांगा रे
दिसला का तुम्हा?
माझा चन्नमल्लेश तो कुठे आहे सांगा,
मला कुणीतरी सांगा!
असं उदास उत्कट गाणं तिनं रचलं आहे. स्वत:ला तिनं पुन्हा पुन्हा घासून पुसून स्वच्छ करून घेतलं आहे. चंदन कितीही तोडलं तरी गंधहीन होत नाही. सोनं कितीही तापवलं तरी काजळून जात नाही. ऊस कितीही पिळला तरी त्याची गोडी उणावत नाही. तसं माझं हीनपण मी कितीही दूर केलं, तरी माझी श्रद्धा मनापासून दूर होत नाही. अशा निष्ठेनं तिनं कितीतरी वचनं गायिली आहेत.
नुसत्या वरवरच्या उपासनेला लोक कदाचित भुलतील, पण त्यानं देव भुलणार नाही याची तिला खात्री होती. ईश्वरी उपासनेची वाट स्वत:च्या अंतर्बाह्य़ शुद्धतेतूनच जाते हे तिनं पुन: पुन्हा सांगितलं आहे. कर्मकांडात गुंतलेल्यांना देव भेटणार नाही असं स्पष्ट बजावताना तिनं म्हटलं आहे.
पूर्णतेला जाणारी भक्ती नाही
आणि दृढतेला अनुसरणारी सेवा नाही
प्रसन्न होईल कसा शिव त्या माणसाला?
मन क्षुद्र ठेवलं तर कसं मिळे त्या स्वामीला?
स्मरणाचे मणी अखंड ओढणाऱ्या मूढा,
असा कसा पावेल चन्नमल्लिकार्जुन तुला?
वीरशैवांनी या वनवासिनीला अक्का म्हटलं आहे. त्यांची ती अक्कमहादेवी आहे. तिची वचनं सांप्रदायिक परिभाषेत त्यांनी
 शिरोधार्य मानली आहेत. पण ती त्या संप्रदायापलीकडे जात साऱ्याच परमार्थमार्गीयांसाठी स्मरणीय होऊन राहिली आहेत.
अरूणा ढेरे  – aruna.dhere@gmail.com