मंजिरी घरत अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणानुसार १८ ते २४ वयोगटातल्या ५५ टक्के मुलींना ‘अँटी एजिंग’ उत्पादनं वापरणं महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आताची ‘जनरेशन झी’ ही आधीच्या पिढीनं जे चाळिशीत वापरलं, ते विशीतच वापरत आहे. ‘अँटी एजिंग’ या आकर्षक शब्दानं सुरू होणाऱ्या उत्पादनांना असलेला खप आणि त्यातून उभा राहिलेला प्रचंड मोठा आंतरराष्ट्रीय बाजार डोळे दिपवणारा आहे. तरुण दिसण्याच्या वाढत्या मानसिकतेचे, त्यामागच्या वास्तवाचे विविध पैलू उलगडून दाखवणारा हा विशेष लेख. मोनानं ऑनलाइन मागवलेलं चेहऱ्यावर लावायच्या सिरमचं पार्सल घरी आलं. संध्याकाळी मोना ऑफिसमधून आल्यावर आईनं ते तिच्या ताब्यात देत किमतीची सहज चौकशी केली. ‘‘अगं, साडेसातशेला मिळाली १५ मिलीची बाटली डिस्काऊंटमध्ये!’’ मोना आनंदात चित्कारली. ‘‘काय? एवढीशी बाटली, इतकी महाग?’’ आई जवळजवळ किंचाळलीच. ‘‘आई, तुला कळायचं नाही. ट्रेण्डिंग आहे ते. कसले सॉलिड रीव्ह्यूज आहेत माहितीये याचे फेसबुक, इन्स्टावर. तुला सांगू, यापेक्षा जे मोठे ब्रॅण्ड्स आहेत ना, त्याच्या किमती तर दोन दोन हजारांत आहेत.’’ ‘‘आधीच चेहऱ्याला आणि केसांना लावायच्या जवळजवळ १०-१२ बाटल्या, तितक्याच टय़ुब्स दिसताहेत घरात. इतके पैसे अशा गोष्टींवर उडवायला आहेत का आपल्याकडे? आणि समजा असले, तरी याची खरंच काही गरज आहे का?’’ आई चिडून पुटपुटत म्हणाली. सरासरी आयुर्मान सातत्यानं वाढत असल्यामुळे ‘वय होणे’ ही तशी सापेक्ष कल्पना आहे. आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू नयेत असं कुणाला नाही वाटत? अंतर्यामी ही इच्छा पुरातन काळापासून माणूस बाळगून आहे. त्यातही स्त्रिया याबाबतीत अधिक संवेदनशील. इजिप्तची राणी क्लिओपात्रा गाढवीच्या दुधानं रोज स्नान करायची म्हणतात, ते का होतं? तर गाढवीच्या दुधात (इतर प्राणिजन्य दुधापेक्षा) जीवनसत्त्व अ, खनिजं, मेदाम्लं, अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड, असं सर्व विपुल असल्यामुळे त्वचेची स्निग्धता, पोत सुंदर होतोच, पण मृत पेशींना काढून टाकणं, त्वचेतल्या प्रथिनांच्या निर्मितीला चालना देणं ही कामगिरी या दुग्धस्नानानं होते, असं मानलं जातं. आपल्याकडेही पूर्वीच्या काळी राण्या-महाराण्या दुधात केशर घालून त्यानं स्नान करायच्या. त्यातही हाच दुहेरी उद्देश, की आज तर माझी त्वचा सुंदर, तजेलदार दिसायला हवीच, पण पुढे वाढत्या वयाबरोबर त्वचेत जे बदल होतील, तेही रोखण्याचा प्रयत्न करायचा. थोडक्यात, वय थोपवण्याचा अर्थात ‘अँटी एजिंग’चा परिणाम साधण्याचा ध्यास आणि आस काही नवीन नाही. घरगुती पातळीवर हे किंवा असे उपाय जगभर बऱ्यापैकी होत होतेच. जैविक घडय़ाळाचे काटे उलटे फिरवण्यासाठी ‘बोटॉक्स’ (एक प्रकारचं इंजेक्शन) किंवा ‘फेस लिफ्ट सर्जरी’ किंवा काही विशिष्ट अवयवांची प्लास्टिक सर्जरी करून अनेकजण चेहऱ्यांचं तारुण्य जपतात, देहाला आकर्षिक बनवतात. हा ‘अँटी एजिंगचा’ प्रकार आपल्याला परिचित आहे. पण कोणतीही शस्त्रक्रिया न करता (non- invasive) चेहऱ्यावरील वय पुसण्यासाठी अनेकविध आधुनिक उपाय आता उपलब्ध आहेत. त्यात झपाटय़ानं प्रगती करणाऱ्या नॅनो तंत्रज्ञानानं बनलेली स्किन केअर उत्पादनं आहेत, रेडिओफ्रीक्वेन्सीनं कोलॅजिन निर्मिती वाढवण्याचा उपाय आहे किंवा आपल्याच रक्तातला ‘प्लाझ्मा’ वेगळा करून त्याचं इंजेक्शन देण्याचा उपाय आहे. शिवाय पोटात घेण्याची विविध ‘सप्लिमेंट्स’, असा अँटी एजिंगचा बाजार तुफान वेगानं विस्तारित होत आहे. ग्राहकांसाठी आरोग्य क्षेत्रात ‘इम्युनिटी बूस्टर’ हा जसा उत्पादनांवरचा एक आकर्षित करणारा ‘क्लेम’ ( दावा) आहे, तसाच पर्सनल केअर आणि कॉस्मेटिक मार्केटमध्ये ‘अँटी एजिंग’ ही संकल्पना जुनी झाली असली तरीही एक परवलीचा शब्द आणि चलनी नाणं आहे. अर्थात वाढणारं वय, एजिंग थांबवता तर येत नाहीच. तिथे परतीचा प्रवास नसतोच. मग ‘अँटी एजिंग’ म्हणजे नेमकं काय? वाढत्या वयाच्या दृश्य खाणाखुणा थोपवण्याचा प्रयत्न, की वयानुसार होणारे बदल ओळखून ते होऊ नयेत किंवा कमी प्रमाणात घडावेत आणि शारीरिक, बौद्धिक क्षमता टिकाव्यात यासाठीचे प्रयत्न करणं? तर ‘एजिंग’च्या संकल्पनेत हे दोन्ही आयाम आहेत. अंतर्गत आणि बाह्य ‘एजिंग’ असे दोन प्रकार यात आहेत. वैज्ञानिकदृष्टय़ा ‘अँटी एजिंग’ म्हणजे वयोमानानुसार शरीरात जे जैवरासायनिक बदल होतात ते थोपवणं किंवा त्यांची गती कमी करणं आणि येऊ घातलेल्या व्याधींना प्रतिबंध करणं. हे कसं साध्य करायचं यासाठी भरपूर संशोधन चालू आहे. आपलं वार्धक्य कसं असेल, आपण लवकर म्हातारे दिसायला लागू का? वगैरे बाबी या आनुवंशिक- म्हणजे आपल्या जनुकांवर नक्कीच काही प्रमाणात अवलंबून असतात. पण आपला सभोवताल, जीवनशैली, व्यसनं, प्रदूषण, ताणतणाव, गॅजेट्सचा वापर, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, अशा घटकांचाही प्रभाव वय वाढण्याच्या प्रक्रियेवर होतो. या प्रक्रियेमागे नेमक्या कोणत्या घडामोडी शरीरात होतात, याविषयी अधिक संशोधन होत आहे आणि बरेच सिद्धांत आहेत. ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ हा त्यापैकी एक. आपल्या शरीरात अस्थिर आणि सक्रिय मुक्त ऑक्सिजन कण (फ्री रॅडिकल्स) तयार होण्याचं प्रमाण वाढतं, हे फ्री रॅडिकल्स शरीरातल्या पेशींना, विशेषत: पेशीतल्या ‘मायटोकॉण्ड्रिया’ या ऊर्जाकेंद्राला दुखावतात. त्यामुळे दाह (इन्फ्लमेशन) आणि अनेक आरोग्य समस्यांचा जन्म होतो. दुसरं कारण म्हणजे शरीरातल्या मूळ पेशींचं (स्टेम सेल) कार्यही वय वाढतं तसं मंदावतं. आतडय़ातल्या सूक्ष्मजीवांच्या वसाहती (मायक्रोफ्लोरा) आणि एजिंग याचाही संबंध स्पष्ट होत आहे. समतोल, मोजकाच आहार (मर्यादित कॅलरीज) आणि व्यायाम ही द्विसूत्री एजिंगचे परिणाम कमी करते, असं अनेक संशोधनांत दिसून आलं आहे. वयवाढीचा सर्वात दर्शनी परिणाम दिसतो तो आपल्या बाह्य रूपावर. वयाच्या खुणा सर्वात अधिक उघड करणारे शरीराचे भाग म्हणजे चेहरा आणि केस. सुरकुत्या, खुली रंध्रं, डाग, सूक्ष्म रेषा उमटणं, त्वचा काळसर, कोरडी किंवा अगदी निस्तेज दिसणं, सैल पडणं, त्वचेची लवचीकता कमी होणं, डोळय़ांभोवती काळी वर्तुळं, चेहऱ्याचा भरीवपणा कमी होणं, असे अनेक बदल वयानुसार दिसू लागतात. हे का होतं? त्वचेच्या खालच्या आवरणांमध्ये (डर्मिस) दोन प्रकारची प्रथिनं- कोलॅजिन आणि इलास्टिन असतं. वाढतं वय, सूर्यप्रकाश, चुकीची जीवनशैली, या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन कोलॅजिन आणि इलास्टिनचं प्रमाण कमी होऊ लागतं, नवीन पेशी निर्माण होणं आणि मृत पेशी निघून जाणं ही प्रक्रियाही मंदावते. त्वचेतले स्निग्ध पदार्थ कमी होतात, आद्र्रता कमी होते. केसांमधली प्रथिनं कमी होऊन विपरीत परिणाम दिसू लागतात. वयवाढीचे असे सर्व दृश्य परिणाम दिसू नयेत यासाठी पंधरा-वीस वर्षांपूर्वी ‘अँटी एजिंग’चं बिरुद ठळकपणे मिरवणारी पर्सनल केअर उत्पादनं बाजारात मोठय़ा प्रमाणावर आली. आधी प्रचलित सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर क्रीम्समध्ये बिलकूल ‘अँटी एजिंग’ घटक नव्हते असं नाही. सनस्क्रीन वापरून त्वचेचं सूर्यकिरणांतल्या ‘अल्ट्राव्हायोलेट’ (अतिनील) किरणांपासून संरक्षणसुद्धा खरं तर ‘फोटो एजिंग’ होऊ नये यासाठी उपयुक्त. पण या नवीन उत्पादनांमध्ये ‘अँटी एजिंग’ ही संकल्पनाच केंद्रस्थानी होती आणि तेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचं बलस्थान होतं. वाढती ‘स्पेंडिंग’ कपॅसिटी वा वाढती क्रयशक्ती आणि चेहऱ्यावर वय दिसू नये ही मानसिकता अचूकतेनं हेरणारे उत्पादक, याचा मेळ झक्क बसला. चाळिशी किंवा पुढच्या स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्येही ही उत्पादनं चांगलीच लोकप्रिय झाली. २०१० च्या दशकात स्मार्टफोन, त्यात कॅमेरा, सेल्फी आणि (त्याद्वारे केव्हाही व) फुकटात फोटोचा सपाटा चालू झाला. क्लिक करा, लगेच बघा, हे साधा कॅमेरा किंवा साध्या फोनमध्ये आधी कुठे शक्य होतं? ( माणसाला आपला चेहरा अधिक सुंदर वा तरुण दाखवण्याचा अट्टहास इतका असतो, की मोबाइल फोनमध्ये चेहरा विविध ‘फिल्टर’द्वारे कृत्रिमरीत्या सुंदर ‘दाखवणारी’ अॅप्स आली आहेत आणि त्याचा सर्रास वापर केला जातो.) या सर्व वातावरणामुळे वयात येणाऱ्यांपासून वय झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्येही ‘लूक्स’बद्दल अधिक जाणीव वाढीस लागली. ब्युटीपार्लर्स स्त्रिया आणि पुरुषांसाठी ‘युनिसेक्स’ झाली. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमं, इंटरनेट आणि समाजमाध्यमांवरच्या विपुल, आकर्षक जाहिराती, त्यात खाली लिहिलेले ‘सात दिवसांत माझ्या सुरकुत्या कमी झाल्या’, ‘चेहऱ्याचा पोत सुधारला’, ‘ग्लो आला’, वगैरे स्तुतीपर रीव्ह्यू वाचून कधी एकदा आपण ऑर्डर करतोय आणि वापरतोय अशी अधीरता होऊ लागली. इंटरनेटवर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, व्यक्तीनं ज्यात रस दाखवलाय अशा विशिष्ट प्रकारच्या उत्पादनांच्या अनेक जाहिराती दिसण्याचं प्रमाण वाढतं, त्यात अधिकाधिक गुंतायला होणं मग साहजिक आहे. या उत्पादनांमध्ये मुख्यत: कोलॅजिन निर्मितीला चालना देणारे, मृत पेशी काढून टाकणारे, आद्र्रता जपणारे घटक असतात. अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्व ‘अ’ (रेटिनॉल, रेटिनॉइड्स), जीवनसत्त्व ‘क’, ‘ई’ असतं, जीवनसत्त्व ‘बी ५’ (पँटोथिनिक अॅसिड), हायलुरोनिक अॅसिड, पेप्टाइडस्, फॅटी अॅसिडस्, विविध तेलं, नियासिनामाइड, सेरामाइड, स्टेम सेल्सना चालना देण्यासाठी विविध ‘हर्बल’ घटक असतात. क्रीम्स, लोशन्स, सिरम्स, असे अनेक प्रकार यात येतात. दिवस आणि रात्रपाळी करणारी क्रीम्स (डे क्रीम, नाइट क्रीम), अँटी रिंकल, कुणी स्किन फर्मिग, एज रिव्हर्सल, ‘डी.एन.ए.’ला ‘दुरुस्त करणारी’ आणि अजून बरंच काही करणारी उत्पादनं! या सर्व प्रॉडक्ट्सचा लूक सुंदर असतो आणि त्यावर लिहिलेली माहिती वाचून तर एकदम मोहात पडायला होतं. यातली बहुतांश उत्पादनं महागच असतात. पण मार्केटिंगचा प्रभाव, विकत घेण्यासाठी अतिसुलभ ई-कॉमर्सच्या सुविधा, झटपट परिणाम हवेत ही वृत्ती, त्यासाठी परवडो वा न परवडो, पण पैसे खर्च करण्याची तयारी, यामुळे हा बाजार प्रचंड फोफावत आहे . या सगळय़ामुळे ‘अँटी एजिंग’ हे उत्पादकांसाठी अतिशय लाभदायी क्षेत्र आहे. मध्यमवयीन किंवा वयस्क स्त्री-पुरुष हा ग्राहकवर्ग स्थिर, निश्चित झाल्यावर गेल्या काही वर्षांत ‘विसाव्या वर्षांपासूनच त्वचेमध्ये बदल होणं सुरू होतं, तेव्हा ‘अँटी एजिंग’ उत्पादनं लवकर वापरणं चालू करा,’ असा या उत्पादनांचा रोख जाहिरातींमधून दिसू लागला. थोडक्यात, जागतिक पातळीवर स्किन, हेअर, ब्युटी इंडस्ट्री हे सर्वाधिक संधी असलेलं, अनेक बिलियन डॉलरचं अफाट वाढणारं मार्केट आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ७० टक्के स्त्रिया ‘अँटी एजिंग’ उत्पादनं वापरतात असं दिसलं. मुख्यत: त्वचेवरच्या सुरकुत्या, रेषा पुसाव्या, त्वचा परत सुदृढ, तजेलदार दिसावी, यासाठी. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चक्क १८ ते २४ वयोगटातल्या ५५ टक्के मुलींना ‘अँटी एजिंग’ उत्पादनं वापरणं महत्त्वाचं वाटतं. म्हणजे ही पिढी- ‘जनरेशन झी’ आधीच्या पिढीनं जे चाळिशीत वापरलं, ते विशीत वापरत आहेत. याची नेमकी टक्केवारी उपलब्ध नाही, पण हा ट्रेंड वाढता आहे. आपल्याकडेही वेगळं चित्र नाही. ‘अँटी एजिंग’ उत्पादनं वापरण्याचं वय भराभर कमी होत आहे. इंटरनेटवरून माहिती घेऊन कोलॅजिन किंवा व्हिटॅमिन सप्लिमेंट्स खाणंही वाढतंय. औषधांच्या बाबतीत जसं चुकीचे ‘स्वयं-उपचार’ (सेल्फ मेडिकेशन) होतात, ते इथेही दिसतं. चेहऱ्याच्या त्वचेत सिरम नीट शिरावं म्हणून त्याबरोबर ‘डर्मा रोलर’ ऑनलाइन किंवा दुकानांतही मिळतं. या रोलरमध्ये असंख्य सूक्ष्म सुया असतात. हे उद्योग स्वमनानं करून सुयांमुळे चित्रविचित्र दुष्परिणाम झालेली प्रकरणंही उघडकीस आलेली आहेत. अगदी विशी-पंचविशीपासून अनेकविध उत्पादनांचा, रसायनांचा मारा करावा का, हा प्रश्न साहजिक पडतो. या क्षेत्रातल्या तज्ज्ञ डॉ. अर्चना पाटील यांच्या मते, भारंभार उत्पादनं वापरू नयेत आणि त्याची गरजही नाही. ‘बेसिक स्किन केअर’कडे लक्ष द्यावं- यात फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरावं- तेही तज्ञास विचारून, उत्पादनावरचे घटक नीट वाचून. एकदा एक ब्रँड वापरायला लागलात, की तो सातत्यानं वापरून परिणाम काय दिसतोय, ते बघा. धरसोड करू नका. उद्योजक मीनल पटवर्धन यांनी तरुण मुली खूप ‘अँटी एजिंग’ आणि इतर उत्पादनं घ्यायला येत असतात यास दुजोरा दिला. मात्र अनेकजणी मूलभूत बाबी- उदा. रोज पुरेसं पाणी पिणं, पुरेशी झोप घेणं, याबाबतीत निष्काळजी असतात, असं निरीक्षण नोंदवलं. अमेरिकेतील पाहणीमध्ये स्त्रियांनी हेही ठासून सांगितलं की, या उत्पादनांवर जे दावे केलेले असतात, ते सत्य असावेत. ही जागरूकता स्वागताह्र्य आहे. डोळे झाकून, भुलून जाऊन महागडी उत्पादनं घेताना लेबलवर लिहिलंय तसा गुण खरंच येईल का, याची शाश्वती हवी. अमेरिकेत काही नामवंत कंपन्यांनी केलेल्या काही ‘अँटी एजिंग’ दाव्यांविरुद्ध स्त्रियांनी न्ययालयात तक्रारी केल्या आणि त्या खटले जिंकल्या. त्यामुळे काही दावे हे अतिरंजित असतात आणि त्यामागे पुरेसे सखोल, सबळ, शास्त्रीय पुरावे असतातच असं नाही, हे निश्चित लक्षात घ्यायला हवं. अर्थात वयानुसार आपल्या दिसण्यात, शरीरावर होणारे बदल आनंदानं स्वीकारणारा आणि स्वत:वर विविध उत्पादनांचा प्रयोग न करणारा वर्गही एकीकडे वाढत आहे. जीवनशैली चांगली ठेवण्याकडे लक्ष दिल्यास नैसर्गिकपणे वय दिसणं लांबवता येईल, फारशा बाह्य उपायांची गरज भासणार नाही. आणि उपाय करायचेच, तर मग डोळस दृष्टिकोन ठेवून, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं हे फलदायी आणि सुरक्षित होईल. (लेखिका औषधनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ असून उल्हासनगर येथील ‘के. एम. कुंदनानी फार्मसी पॉलिटेक्निक’च्या प्रभारी प्राचार्य आहेत.)