पूर्वी आजीआजोबांकडे शाळेच्या सुट्टीत राहायला जाणं म्हणजे धमाल असे. आजोळही त्यांची वाट पाहात असायचं नि नातवंडंही तिथे जायला उत्सुक असायची. पण काळ बदलत गेला तशी ती धमाल नि उत्सुकताही कमी होत गेली. काय घडलंय नेमकं? आजीआजोबांसाठी दुधावरची साय असलेल्या या नातवंडांच्या बाबतीत नेमकं कुणाचं काय चुकतंय? रात्रीच्या साडेनऊच्या ‘सह्याद्री’च्या बातम्या ऐकून काकांनी टीव्ही बंद केला, ते झोपाळ्यावरून उठले आणि झोपायच्या खोलीत जायला निघाले. काकू स्वयंपाकघरात दिवसाच्या अखेरची आवराआवर करत होत्या. गेल्या चार-पाच वर्षांपासून काका-काकूंचा रोजचा दिवस बहुतकरून असाच संपायचा. काकांनी हॉलमधले दिवे घालवले आणि झोपण्यासाठी आत जाऊन आडवे होतात, तोच शेजारच्या स्टुलावरचा लँडलाइन वाजला. काकू स्वयंपाकघरातून ओरडल्या, ‘‘फोन घ्या.’’ हेही नेहमीचंच! हेही वाचा - ईतिश्री : थोडीसी बेवफाई? मुंबईहून त्यांची लेक विनी बोलत होती. ‘‘बाबा, आईला फोन द्या ना!’’ हेही नेहमीचंच होतं. काकांना प्रश्न पडायचा, ‘या मुलांना मी फोन घेतल्यावर माझ्याशी दोन शब्द बोलायला काय होतं?… एकदम, आईला फोन द्या!’ पण समवयस्क मित्रमंडळींचे अनुभव लक्षात घेता त्यांच्या हे लक्षात आलं होतं, की बऱ्याच घरांत यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. तोवर काकू हात पुसत पुसत फोनजवळ येऊन उभ्या राहिल्या होत्या. ‘‘आई, मला उद्या अचानक ऑफिसच्या कामासाठी पुण्याला जावं लागतंय. आशीष कालच बंगळूरुला गेलाय, पुढच्या रविवारी येईल. पिंटूच्या शाळेला उद्या सुट्टी आहे आणि दोन दिवस झाले, सरुबाई येत नाहीयेत. उद्या मी पिंटूला सकाळी जाता जाता तुझ्याकडे सोडेन आणि संध्याकाळी पुण्याहून परतताना तुझ्याकडून घेऊन जाईन.’’ पिंटू बऱ्याच दिवसांनी पूर्ण दिवस आजी-आजोबांकडे राहणार होता. व्हिडीओ कॉलवर आजी-आजोबा त्याला बघायचे, सणासुदीला भेटी व्हायच्या, पण आजी-आजोबांकडे सुट्टीत राहायला येणं कित्येक दिवसांत झालेलं नव्हतं. आता थोडा मोठाही झाला होता तो. दुसऱ्या दिवशी सकाळीच काकूंनी काकांना बाजारातून गुलाबजाम करण्यासाठी तयार पिठाचं पाकीट आणायला धाडलं. घरात खेळायला सापशिडी, व्यापार वगैरे बैठे खेळही घेऊन यायला सांगितलं. ‘‘तुमचा मोबाइल आधी लपवून ठेवा. माझा फोन साधा आहे, त्यामुळे त्याला पिंटू हात लावणार नाही. तुमच्या स्मार्टफोनला हात लावला तर उगाच तुमच्यात धुसफुस नको…’’ अशीही तंबी त्यांनी काकांना दिली. ‘‘अगं, तू हे सगळं आणायला सांगतेयस आणि मी आणीनही. पण त्याला हे सर्व आवडणार आहे का? मागे त्यानं गुलाबजाम आवडीनं खाल्ले, म्हणजे या वेळीही खाईल कशावरून?’’ काकांनी हे म्हणताच पुढचा अर्धा-पाऊण तास दोघांत खटके उडत राहिले. अखेरीस काकांनी खरेदीची यादी केली आणि ते बाजारात निघून गेले. बेल वाजली. दरवाजात पिंटू आणि विनी. ‘‘आई, आता मी थांबत नाही. खूप ट्रॅफिक आहे. संध्याकाळी येते, तेव्हा गप्पा मारू. मग उशिरा निघेन मुंबईला. पिंटू, आजी-आजोबांना त्रास देऊ नकोस हं!’’ असं म्हणतच विनी निघूनही गेली. पिंटू पायांतल्या बुटांसकट तरातरा जाऊन सोफ्यावर बसला. काकूंनी स्वयंपाकघरात जाऊन त्याला हाक मारून बोलावलं. पिंटूनं ऐकलं ना ऐकल्यासारखं केलं. त्यांनी पुन्हा त्याला हाक मारली. ‘ये इथे, तुझ्या करता गंमत आणल्ये बघ.’ असं दोन-तीनदा बोलावल्यावर तो तसाच बुटासह आत गेला. ‘‘आजोबांचा फोन कुठाय?’’ पिंटूचा पहिला प्रश्न. तेवढ्यात काकूंचा फोन वाजला. विनी बोलत होती, ‘‘आई ऐक, मी पिंटूसाठी बर्गर ऑर्डर केलाय. येईल थोड्या वेळात. पैसे पेड केले आहेत, नंतर फोन करते.’’ थोड्या वेळानं तो बर्गर आला! काकू गमतीनं त्याला म्हणाल्या, ‘‘मलापण दे रे थोडा तुझा बर्गर… बघू तरी कसा लागतोय ते!’’ पिंटूनं लगेच बर्गर पाठीमागे लपवला. काकूंना जाणवत होतं, की पिंटू आता कुणी वेगळंच मूल झालाय! आजीनं केलेल्या खाऊत, आजी सांगत असलेल्या गोष्टी, गाणी या कशात त्याला रसच नव्हता. काकांनी त्याच्यासाठी रुळावर फिरणारी छोटी रेल्वे आणली होती. त्यांनी पिंटूसमोरच एकेक भाग जोडून रेल्वेला किल्ली देऊन ती सुरू केली. ती गोल गोल धावू लागली. पण जेमतेम दोन मिनिटांत पिंटूचा त्यातला रस संपला. तो ‘फोन द्या’ , म्हणून भुणभुण करू लागला. काकूंकडे भरपूर ‘पेशन्स’ होते, पण काका मात्र त्याच्या मागणीमुळे अस्वस्थ झाले. अखेर आजोबांचा मोबाइल एकदाचा त्याच्या हातात पडला, नव्हे त्याच्या अखंड मागणीला कंटाळून दिला गेला. आता पिंटूला कोणाशीच बोलायचं नव्हतं. सोफ्यावर लोळण घेऊन, तो मोबाइलशी अखंडपणे खेळत राहिला. आजीनं गुलाबजामसाठी तयार पिठाचं पाकीट हातात घेऊन ते कात्रीने कापायला घेतलं पण तिचा सगळा उत्साह मावळून गेला. तिनं ते तसंच कपाटात ठेवून दिलं. थोड्या वेळानं रोजच्यासारखेच काका-काकू दोघंच जेवायला टेबलावर बसले. काकूंनी पिंटूला एक-दोनदा जेवायला बोलावलं, पण उत्तर नाही!काका सांगत होते, ‘‘सकाळी गुलाबजामचं पीठ आणायला गेलो होतो, तेव्हा राखे वहिनी भेटल्या होत्या. ‘काय विशेष?’ म्हणून विचारत होत्या. मी म्हटलं, ‘विनी पिंटूला आमच्याकडे सोडून ऑफिसला जातेय. म्हणून ‘दुधावरच्या सायी’साठी आजीची ही खटपट!’ दुकानातून बाहेर पडताना त्या मला म्हणाल्या, ‘पण काका, हल्ली दुधाच्या सायीला लोण्याचा स्निग्धपणा नाही हो! म्हणायला साय, पण तशी ती कोरडीच. आपण आपलं म्हणायचं!’ आता पिंटूकडे बघून समजतंय मला असं का म्हणाल्या असतील.’’ हेही वाचा - ‘ती’ च्या भोवती : विस्तारलेल्या आईपणाचा प्रत्यय! पुढची जेवणं न बोलताच उरकली. जेवण झाल्यावर काकूंनी विनीला फोन लावला. ‘‘अगं, तो काही केल्या जेवायला येत नाहीये. फोन हातातून खालीच ठेवत नाही.’’ विनी म्हणाली, ‘‘दे त्याच्याकडे फोन.’’ त्याचं आणि त्याच्या आईच्या बोलण्यावरून आजींनी अंदाज बांधला काय झालं असेल ते. पिंटूनं फोन आजीकडे सोपवला आणि परत तो हातातल्या फोनमध्ये गुंतून गेला. विनी म्हणाली, ‘‘जाऊ दे. तू त्याच्या मागे लागू नकोस. तो तसाच आहे. फोन सोडत नाही हातातून. मी त्याच्यासाठी पास्ता मागवते. खाईल तो. पास्ताचे पैसे पेड करतेय. बाबांना सांग, नाही तर ते उगाच वैतागत राहतील. रात्री उशीर होईल बहुतेक. त्यामुळे पिंटूला घेऊन लगेच निघेन मी रात्री.’’काकू आतल्या खोलीत जात म्हणाल्या, ‘दूध तरी आता पूर्वीसारखं मलईदार कुठे राहिलंय?… मग साय कोरडीच असणार!’फोनवरच्या गेममधले गोळ्या मारल्याचे, तलवारी एकमेकांवर आदळल्याचे आवाज येत राहिले… मध्ये मध्ये पिंटूच्या आरोळ्याही. gadrekaka@gmail. com