काळ बदलला. पैशाचं आयुष्यातलं महत्त्व मोठं झालं आणि ‘भावना’ लहान झाली. शेजारधर्म लुप्त झाला. नात्यांची वीण सैल पडू लागली. पूर्वीचं ‘मामाचं गाव’ मागे राहिलं. कुटुंबव्यवस्थेतील विचारपूर्वक ठरवलेल्या गोष्टी नामशेष झाल्या. ‘इथे असावा प्रेम जिव्हाळा…’ हे म्हणण्याची खरी गरज निर्माण झाली. अशा व्यवस्थेत वाढणारी मुलं भविष्यात कुणाचे तरी जोडीदार होणार आहेत… या भावनांची जाणीवच हल्लीच्या पिढीत विकसित होत नसेल तर?

ही गोष्ट साधारण १९७०-७५ मधली आहे. माझा एक काका त्या वेळी लंडनमध्ये राहत होता. त्याच्या शेजारच्या सदनिकेत एक वयस्क आजोबा एकटेच राहत होते. एकदा त्यांच्या लक्षात आलं, की त्यांच्या दारात ठेवलेल्या दुधाच्या बाटल्या, वर्तमानपत्रं ४-५ दिवस आत नेली जात नाहीयेत. त्यानं बेल वाजवून पाहिलं. त्याला वाटलं आजोबा गावाला गेले असतील. पाच दिवस झाले. शेवटी त्याने न राहवून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी दार फोडलं तर आत आजोबांचा सडलेला मृतदेह…! माझा काका इतका शहारला. ज्या देशातल्या माणसांना कुणाच्या मृत्यूचीही दखल घ्यावीशी वाटत नाही, अशा देशात मला नाही राहायचं असं ठरवून तो भारतात परतला.

आज पन्नास-साठ वर्षांनंतर अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. हा देश वेगळा, व्यक्ती वेगळी, पण अवघ्या २५ वर्षांची. नाताळच्या सुट्टीमुळे वसतिगृहामधली बरीचशी मुलं सुट्ट्यांना घरी गेली होती. त्याच देशात राहणारा या मुलाचा भाऊ त्याला बोलावत असूनही अभ्यासासाठी त्यानं वसतिगृहातच राहायचं ठरवलं. त्याला सर्दी-खोकला झाला होता. मग ताप आला. इकडे आई-वडील चिंतित झाले. नंतर एक दिवसभर त्यानं फोन उचलले नाहीत. भावाने काळजीने तिथल्या ऑफिसला फोन केला. कुणाला काहीच माहीत नव्हतं. प्रत्यक्ष परिस्थिती बघायला ते गेले तेव्हा दार उघडलं नाही म्हणून पोलिसांना बोलावलं तर या तरुण मुलाचा मृत्यू झालेला…! हा आजारी आहे, काही दिवस खोलीबाहेर पडला नाहीये, याची दखल कोणीही घेतली नव्हती.

मला आठवलं, ३५ वर्षांपूर्वी माझी मुलं अगदी लहान असताना, माझ्या पलंगाची मच्छरदाणी सकाळी ठरावीक वेळेत निघाली नाही तर खाली राहणार्‍या काकू लगेच विचारायला यायच्या. ‘‘ठीक आहे ना गं सगळं…? त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून माझ्या खोलीची खिडकी दिसायची. आज ३५ वर्षांनंतर मी ज्या इमारतीत राहते तिथल्या काकूंचा मी सहलीला असताना फोन आला. ‘‘खूप दिवसात दिसली नाहीस तू… वॉचमनला विचारलं तर त्यालाही माहीत नव्हतं. सगळं ठीक आहे ना…?’’ मला इतकं विशेष वाटलं. तेव्हापासून मी प्रत्येक सहलीला जाताना त्यांना सांगून जाते. खरं तर शहर वाढलं तशी आमच्या इमारतीच्या भोवतीची गजबज वेगवेगळ्या कारणांनी खूप वाढली आहे. पण असे दखल घेणारे, आश्वासक, मदतीला तत्पर असे शेजारी असल्याने कुणालाच ही इमारत सोडून जावीशी वाटत नाही. सरसकट असं चित्र आहे, असं कुणीही म्हणणार नाही. पण या गोष्टी आता दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं, की आपला समाज फार एककल्ली/ व्यक्तिकेंद्री होत चालला आहे.

शेजारधर्म लुप्त होत चाललाय. ‘तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघू’ असं झालंय. दारं सदैव उघडी आणि ‘आओ जाओ घर तुम्हारा…’ असणार्‍या घरांकडून आपण ‘शेजारी कोण राहतं हे माहीत नाही…’ इथपर्यंतचा प्रवास केला आहे. जसजसं तुम्ही वरच्या आर्थिक स्तरांकडे आणि खेड्यांकडून महानगरांकडे जाता, तसे हे बदल अधिक तीव्रतेने जाणवतात. समाजामधला तुटलेपणा नातेसंबंधांमध्येही आला आहे, असं अनेकांना वाटतं आहे.

पंकज फणसे यांचा लोकसत्तामध्ये ‘चार क्रांत्या आणि काचेचा संसार’ (१९ नोव्हेंबर २०२५) हा लेख प्रसिद्ध झाला होता. ते म्हणतात, ‘‘कुटुंब व्यवस्थेवर मोठे परिणाम घडवण्याची क्षमता प्राचीन काळापासून शेती, औद्योगिकीकरण, डिजिटलीकरण या प्रत्येक क्रांतीच्या वेळी दिसली आहे. यानंतरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चौथ्या क्रांतीमुळे कुटुंबसंस्थेला तडे जाऊ लागले आहेत; कारण तंत्रज्ञानाच्या रूपात आलेला अरबाचा उंट आधीच घरात घुसला आहे. आता या कुटुंबसंस्थेला वाचवायचे तर ठिकर्‍या होण्याआधी हे तडे कसे सांधता येतील हे बघणे, हे आगामी काळापुढचे आव्हान असेल…’’ त्यांनी असंही म्हटलं आहे, की विविध ॲप्समार्फत पालकत्वापासून वृद्धसेवेपर्यंत ‘आऊटसोर्स’ करणं सोपं झालं असताना, प्रत्यक्ष जबाबदारीविना जिव्हाळा जोपासण्याचं सुख मिळत असताना, भावनिक ओलाव्याशिवाय वाढलेली पिढी कशी असेल? कालच ‘वनिता मंडळ’ या रेडिओवरील कार्यक्रमात एका समुपदेशिकेने तरुण वर्गात मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण ५० ते ६० टक्के असल्याची आकडेवारी सांगितली. त्यात प्रामुख्याने प्राप्त परिस्थितीतील संभ्रमावस्था, असुरक्षितता आणि त्यातून वाढलेली चिंता आणि नैराश्य समोर येते आहे.

खरं तर भावनिक ओलाव्याच्या किती तरी जागा आपल्या समाज आणि कुटुंब व्यवस्थेत होत्या. आजोळी जाणं म्हणजे फक्त मामाच्या घरी जाणं नसायचं. एक तर ते कुटुंबांचं संमेलनच असायचं. सगळ्या माहेरवाशिणी जमल्यामुळे घराघरात मुलांचं गोकुळ असायचं. शेजारीपाजारी, गडी माणसं आणि त्यांची कुटुंबं, इतर ओळखीपाळखीचे असं जाणं-येणं असायचं, ज्यामुळे कौटुंबिक संबंधांबरोबर सामाजिक बंधही दृढ व्हायचे. खरं तर ‘तुझं-माझं’ असं काही नसायचंच. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ अनुभवलेली आधीच्या पिढ्यांची किती तरी वर्णनं पुस्तकं, नाटकं, चित्रपट आणि गप्पांमधून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहिली. मायेच्या ओलाव्याचे हे सामाजिक, कौटुंबिक झरे हळूहळू आटत चाललेले दिसतात. खरं तर माणूस हा सामाजिक प्राणी, पाच कप्प्यांमध्ये जीवन व्यतीत करत असतो.

वैयक्तिक कप्पा हा स्वत:चं स्वत:शी नातं दृढ करणारा असतो, तर वैवाहिक कप्पा हा जोडीदारांचं एकमेकांशी असलेलं नातं अधिक घट्ट करणारा असतो. कौटुंबिक जीवनात एकमेकांकडे सुट्ट्या, सण, कौटुंबिक कार्यक्रम, सुखदु:खाच्या घटना अशा विविध निमित्तानं जाणं-येणं-भेटणं- एकत्र येणं असतं, ज्यातून कौटुंबिक नात्यांचे बंध घट्ट होत राहतात. भारतासारख्या देशात कित्येक वेळा कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमधली सीमारेषा ही धूसर राहिलेली आहे. अनेकदा शेजार्‍यांशी, मित्र-मैत्रिणींशी असलेलं नातं हे कौटुंबिक जिव्हाळ्याचंच राहिलेलं आहे. त्यातून सामाजिक नात्यांची वीण घट्ट होत राहायची. सण-समारंभ, वेगवेगळे उत्सव, गावच्या जत्रा, देवळातील कार्यक्रम, भजन, कीर्तन, प्रवचनं असे अनेक उपक्रम सर्वांना सामावून घेणारे असतात. त्या अर्थाने दीर्घकाळ या दोन कप्प्यांचं आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आणि मोलाचं स्थान राहिलं. व्यावसायिक जीवन हे ८-१० तासांपुरतं मर्यादित होतं. सकाळ, संध्याकाळ ही खास कुटुंबासाठी असायची.

याचा अर्थ सर्वकाही अलबेल होतं असं नाही. अनेक प्रकारच्या सुविधा तुलनेनं उपलब्ध नसण्याच्या काळात, स्त्रियांवर घरकामाचा खूप शारीरिक भार यायचा. माझ्या आजेसासूबाईंनी सांगितलेला एक किस्सा मला आठवतो आहे. ‘‘गावात गिरण्या आल्या तेव्हा अनेक पुरुषांनी सुरुवातीला ओरडा केला, पण मिरच्या कुटून माझ्या नाक, घशाची किती आग व्हायची हे मला आणि माझ्यासारख्या इतर बायकांना माहिती होतं. त्यामुळे आम्ही मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला होता…’’ एका लेखात अचूक वर्णन केल्याप्रमाणे, दोन्ही कुटुंबं, इतर नातेवाईक, आसपासचा समाज यांचा दबाव इतका असे की भारतीय स्त्रीचे एका पुरुषाशी नाही तर त्याच्या सगळ्या कुटुंबाशी आणि भोवतीच्या परिस्थितीशी लग्न लागतं असं त्या काळी म्हटलं जायचं.

आज म्हणाल, मागाल त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अनेकांना त्या घेणं परवडतही आहे. त्यामुळे शारीरिक कष्टांच्या कामांचा भार कमी झाला आहे, परंतु कामांचे तास, बौद्धिक कष्ट, मानसिक ताण, एकूणच अनिश्चितता, असुरक्षितता वाढली आहे. जबाबदार्‍यांचं स्वरूप बदललं आहे. काम आणि वेळेचं गणित व्यस्त होत चालल्यामुळे कुटुंबासाठी, कुटुंबातील एकमेकांसाठी कुणाला स्वास्थ्याचा वेळच नाही. खरं तर मुळात आता कुटुंबाचा आकार तो केवढा उरलाय…! आत्ता साठी-सत्तरीत असलेली पिढी दोन किंवा एक मूल इथपर्यंत आलीच होती. त्यामुळे मुळातच एखादाच काका, मावशी, आत्या, मामा असण्याची शक्यता. मध्यमवर्गीय सुशिक्षित वर्गात ते परदेशात स्थायिक झालेले असण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे भौगोलिक ते मानसिक अंतर पुढच्या पिढ्यांमध्ये वाढतच जातं. मूल एकटं असलं की त्याला भावंड असण्याचाही प्रश्न नाही. गोकुळच नाही तर गोकुळातला आनंद मुलांना काय समजणार…? या एकत्र येण्यात किती भावनांचा परिपोष व्हायचा. विमलताई लिमये यांची एक कविता आहे. ‘‘घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती…’’

नाती भावनांशिवाय कोरडी, तुटक राहतात. बदलत्या विवाह आणि कुटुंब व्यवस्थेत अनेक कारणांनी या भावनांचाच अभाव दिसतो. ‘कुपोषित’ हा शब्द आपण अन्नाशी जोडतो, पण भावनांच्या कुपोषणाचं काय? हे भावनांचं अन्नग्रहण कसं असावं याबद्दलही किती विचार आहे. सूर्यास्ताच्या पुढे-मागे, सगळ्यांनी मिळून स्वयंपाकघरात खाली बसून गप्पा मारत, आनंदात जेवायचं. दिवसभराच्या घडामोडी, आपले विचार, भावना एकमेकांसोबत वाटून घ्यायच्या. जेवताना नकारात्मक बोलायचं नाही. सणावारी ताटातल्या पदार्थांचे रंग, ताटाभोवतीची रांगोळी यांचा डोळ्यांनी आनंद घ्यायचा. शुभकार्यातील सनईचे सूर कानांना सुखावतात. उदबत्तीचा दरवळ, परसातील फुलांचा सुगंध आपल्या नाकात, संवेदनांत भरून राहतो. प्रत्येक पदार्थाचा स्पर्श वेगळा. तो अनुभवण्यासाठी हातानं जेवायचं. सगळ्यात मज्जा जिव्हेची. तिखट, तुरट, कडवट, आंबट, खारट, गोड अशा सर्व चवींच्या पदार्थांचा जेवणात समावेश असायचा. आरोग्य आणि ऋतुमानाप्रमाणे पोषक पदार्थांचा विचार होता. जेवणापूर्वी म्हणायच्या प्रार्थनेत, ‘‘उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म…’’ ही उदात्त भावना आहे. जेवून उठण्यापूर्वी ‘‘अन्नदाता सुखी भव…!’’ ही कृतज्ञतेची भावना व्यक्त करूनच उठायचं. कारण ते अन्न ताटात येण्यासाठी किती जणांचे हात लागलेले असतात. मुलाला भरवणं हा वात्सल्यभावाचा आविष्कार आहे.

आता मात्र आपलं जेवण ज्याच्या त्याच्या सोयीनं कुठल्याही वेळी आणि कुठल्या ना कुठल्या स्क्रीनसमोर होतं. कुटुंब व्यवस्थेतील अशा काही विचारपूर्वक ठरवलेल्या गोष्टी आपणच नामशेष केल्या आहेत. अशा कुटुंब व्यवस्थेत वाढलेली मुलंच कुणाची तरी उद्याची संभाव्य जोडीदार असणार आहेत. त्यांच्या भावनिक जाणिवा सजग न करण्याला, बोथट करणार्‍या किंवा अनेकानेक भावनांच्या अस्तित्वाची जाणीवच विकसित न व्हायला कोण जबाबदार, हा स्वत:ने स्वत:ला विचारायचा प्रश्न आहे.

सारा आनंद पैशाने विकत घेता येतो अशा जीवनशैलीत आपल्या वाणी आणि कृतीमध्ये, स्पर्शातून व्यक्त होणार्‍या माया, ममता, आस्था, सहसंवेदना, ओढ, क्षमा, ऋजुता, संयम, आदर, मन:पूर्वक कौतुक अशा अनेकानेक भावना नात्यातून हळूहळू लुप्त होत चालल्या आहेत. दोन वेगळ्या, स्वतंत्र व्यक्तींचं वैवाहिक नातं या भावबंधांनीच तर बांधलं जात असतं. त्यातले ‘भाव’च हरवले तर ‘बंध’ तरी कसे टिकणार…? कौटुंबिक आणि सामाजिक नाती ही तर मग फारच पुढची गोष्ट. पुढच्या लेखात या भावनांबद्दल अधिक सविस्तर बोलू…

vankulk57@yahoo.co.in