सिद्धी महाजन  
अव्याना, अरियाना आणि विवान ‘जेन अल्फा’ पिढीतील तीन बाल वैज्ञानिक. रस्त्यातल्या एका दृश्याने त्यांना विचार करायला भाग पाडलं आणि त्यातून सुरू झाला एक शोध… त्यासाठी त्यांच्या मदतीला आला, कुणाच्याही खिजगणतीत नसलेला चिंचोका. त्यातून तयार झाला उद्याच्या जागतिक चिंतेवरचं उत्तर ठरू शकणारा चिंतामणी, एक अत्यंत बहुमूल्य व शाश्वत पर्यावरणीय तोडगा ‘प्लास-स्टिक’. त्यांना ‘द अर्थ प्राइज’ हा १ लाख डॉलरचा जागतिक पुरस्कार मिळवून देणारा. काय प्रेरणा आहे या संशोधनामागची? हे सांगणारा लेख.

‘‘देवोनियां रत्न घेतला चिंचोका।

दिला कवडी एका चिंतामणी॥’’

संत नामदेवांच्या अभंगातील ही अजरामर प्रतिमा मानवाच्या आंधळ्या मूल्यदृष्टीवर अगदी नेमकं बोट ठेवते. आपल्याकडे असलेली एखादी अमूल्य, अलभ्य आणि मोलाची गोष्ट गमावून अत्यंत क्षुल्लक गोष्टीला कवटाळण्याची मानवी विसंगती या दोन ओळींत अत्यंत प्रभावीपणे सामावलेली आहे. मूल्यमापनाचा हा गढूळ दृष्टिकोन समाजात सर्वत्र दिसतो. पण जयपूरच्या अव्याना मेहता आणि अरियाना अग्रवाल या दोन सोळा वर्षांच्या मुलींची कथा या प्रतिमेकडे एका विलक्षण, उरफाट्या आणि आशादायी शक्यतेने पाहायला शिकवते. चिंतामणीच्या आंधळ्या शोधात हातातला चिंचोका फेकून न देता, जगाने क्षुल्लक ठरवलेल्या गोष्टीमध्येच अत्यंत मोठ्या, क्रांतिकारक शक्यतेचं बीज शोधायला ही कथा आपल्याला प्रवृत्त करते.

चिंचेचा गर काढून झाल्यावर उरणारी बी म्हणजेच चिंचोका. आपल्या सगळ्यांच्याच घरी हा चिंचोका अगदी सहज कचरापेटीत फेकला जातो. बाजारात या चिंचोक्याचं मूल्य जवळजवळ शून्य किंवा नगण्य आहे. परंतु विज्ञानाच्या सूक्ष्म आणि सखोल नजरेत कोणतीही नैसर्गिक वस्तू तिच्या केवळ बाह्य रूपामुळे वा टाकाऊपणामुळे क्षुल्लक ठरत नाही. तिच्या आत दडलेले जैविक व रासायनिक गुणधर्म, तिची सूक्ष्म आण्विक रचना आणि तिच्यातून निर्माण होऊ शकणारी नवनवीन प्रयोगांची शक्यता, यावरच तिचं खरं आणि वास्तविक मोल ठरत असतं.

अव्याना, अरियाना आणि त्यांचा वर्गमित्र विवान छावछरिया यांनी अगदी याच वैज्ञानिक नजरेतून टाकाऊ चिंचोक्याकडे पाहिलं. आणि त्यांच्या तीव्र कुतूहलातून जन्माला आला ‘प्लास-स्टिक’ (Plas- Stick) हा जलस्रोतांमधून मायक्रोप्लास्टिक वेगळं करण्याच्या दिशेने विकसित केलेला एक अत्यंत बहुमूल्य व शाश्वत पर्यावरणीय तोडगा. या नावीन्यपूर्ण प्रयोगाला प्रतिष्ठित ‘द अर्थ प्राइज २०२६’ चा जागतिक पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे, संपूर्ण भारतातून हा मानाचा पुरस्कार पटकावणारा त्यांचा हा पहिलाच बालवैज्ञानिक संघ ठरला आहे.

‘आपल्याला डोळ्यांनी स्वच्छ आणि पारदर्शक दिसणारं पाणी खरंच पिण्यासाठी शुद्ध असतं का?’ या एका अत्यंत साध्या, पण खोलवर विचार करायला लावणार्‍या प्रश्नाने या ऐतिहासिक प्रवासाची खरी सुरुवात झाली. राजस्थानमधील ग्रामीण आणि निमशहरी भागांना भेटी देत असताना एके दिवशी अव्याना आणि अरियानाच्या नजरेस पडले पिण्याचं पाणी साठवण्यासाठी वापरले जाणारे मोठे निळे प्लास्टिकचे कंटेनर्स. उन्हाच्या तीव्र तापमानात तासनतास राहणार्‍या या कंटेनर्समधलं पाणी वरवर पाहता एकदम स्वच्छ, नितळ आणि निर्मल दिसत होतं.

मात्र विज्ञानाचं मुख्य वैशिष्ट्य हेच असतं की, ते केवळ वरवर दिसणार्‍या दृश्यावर समाधान मानत नाही. ते डोळ्यांना सहज न दिसणार्‍या, सूक्ष्म आणि अदृश्य गोष्टींचा आग्रहाने शोध घेत असतं. ते कंटेनरमधील पाणी पाहून त्यांच्या मनात प्रश्न उमटला, नितळ दिसणारं हे पाणी खरोखरच विषमुक्त असेल का? प्रदूषण हे नेहमीच कारखान्यांच्या धुराड्यांतून ओकल्या जाणार्‍या काळ्याकुट्ट धुरासारखं किंवा नदीच्या पात्रावर तरंगणार्‍या प्लास्टिकच्या बाटल्यांसारखं नुसत्या उघड्या डोळ्यांना वरून दिसेलच असं नाही. जैव-विघटनशील नसणार्‍या प्लास्टिकचे मोठे साचे ऊन, वारा आणि पाण्याच्या घर्षणाने कालांतराने सूक्ष्म कणांत म्हणजेच ‘मायक्रोप्लास्टिक’मध्ये (५ मिलीमीटरपेक्षा लहान कणांत) बदलतात. हे मायक्रोप्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण माती, नद्या, विहिरी, तलाव आणि पिण्याच्या पाण्याच्या विविध स्रोतांमध्ये सहज मिसळतात आणि अन्नसाखळीद्वारे मानवी शरीरापर्यंत बिनदिक्कत पोहोचतात.

प्लास्टिक विघटित होऊन अदृश्य झालं म्हणजे ते या पर्यावरणातून नाहीसं झालं, असा भ्रम बाळगणं अत्यंत धोकादायक आहे. उलट अशा प्रकारे न दिसणार्‍या सूक्ष्म प्लास्टिकमुळे मानवी आरोग्याला आणि जलचरांना होणारा धोका शतपटीने वाढतो. कारण हे कण मानवी रक्तात, फुप्फुसांत आणि अगदी पेशींच्या पातळीवर जाऊन गंभीर आजार निर्माण करू शकतात. याच गंभीर जाणिवेने या तरुण संशोधकांचं लक्ष जलप्रदूषणातील मायक्रोप्लास्टिकच्या भयानक समस्येकडे वेधलं गेलं. आता त्यांच्यासमोरचा मुख्य वैज्ञानिक प्रश्न अधिक कठीण आणि आव्हानात्मक होता. जे सूक्ष्म कण साध्या डोळ्यांनी दिसतच नाहीत, ते पाण्यातून सहजासहजी वेगळे कसे करायचे?

सामान्यत: मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जागतिक समस्येसाठी अवाढव्य आणि अत्यंत महागडी साधनं लागतात, अशी आपली सर्वांचीच एक सहज समजूत असते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरणीय संकटावर काही उपाय शोधायचा असेल तर करोडो रुपयांची उपकरणं, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि अत्यंत क्लिष्ट तंत्रज्ञान आवश्यक असेल, असंच सर्वांना वाटतं. परंतु अव्याना, अरियाना आणि विवान यांनी आपल्या आसपासच्या रोजच्या जगतात सहज उपलब्ध होणार्‍या निसर्गदत्त वस्तूंकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहायला सुरुवात केली. आणि त्या शोधात त्यांच्या नजरेस पडला, एक साधासा चिंचोका, ज्याचा प्रवास नेहमी कचर्‍याच्या कुंडीत संपतो.

चिंचोक्याच्या बियाण्यांमध्ये बहुगुणी नॅचरल पॉलिमर (Polysaccharides) आढळतात. चिंचोक्याची बारीक पूड करून ती दूषित पाण्यात मिसळली असता, ती एक नैसर्गिक ‘कोॲग्युलांट’ म्हणजेच संकलन घटक म्हणून कार्य करते. पाण्याच्या पात्रात पसरलेले सूक्ष्म मायक्रोप्लास्टिकचे कण या चिंचोक्यांच्या बारीक भुकटीतील घटकांकडे आकर्षित होतात आणि त्यांचे मोठे पुंजके किंवा समूह तयार होतात. यानंतर या प्रक्रियेत चुंबकीय घटक जोडले जातात. त्यामुळे मायक्रोप्लास्टिकचे तयार झालेले हे समूह ‘चुंबकीय गुणधर्म’ धारण करतात. शेवटी एका साध्या चुंबकीय विभाजनाच्या प्रक्रियेद्वारे हे सर्व समूह पाण्यापासून अवघ्या काही मिनिटांत पूर्णपणे वेगळे केले जातात.

‘आयआयटी’, गुवाहाटीच्या नामांकित तज्ज्ञांच्या मार्गदर्शन व मदतीने या प्रयोगाची प्रयोगशाळेत अचूक चाचणी घेण्यात आली. अदृश्य कणांना एकत्र आणणं आणि नंतर चुंबकीय शक्तीने बाहेर काढणं, ही साधी पण अमोघ संकल्पना म्हणजेच ‘प्लास-स्टिक’ होय. या कल्पनेमागची सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टी त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानाएवढीच महत्त्वाची आहे. एका टाकाऊ व क्षुल्लक वस्तूची असामान्य पुनव्र्याख्या करण्याची विलक्षण ताकद या प्रयोगात आहे. एखादी वस्तू वापरून फेकून दिली की तिची जीवनकथा संपली, असं मानणार्‍या या आंधळ्या उपभोगवादी युगात ‘कचरा’ हासुद्धा एखाद्या नव्या प्रक्रियेचा कच्चा माल असू शकतो, ही ‘सक्र्युलर इकॉनॉमी’ (चक्रीय अर्थव्यवस्था)ची संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात रुजवण्याची ही नवी दृष्टी आहे.

याकडे केवळ एक पर्यावरणीय प्रयोग म्हणून पाहिलं, तर त्यातील एक महत्त्वाचा सामाजिक कंगोरा दुर्लक्षित होईल. या संपूर्ण प्रयोगाच्या केंद्रस्थानी आहेत, ‘जेन अल्फा’ पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या दोन सोळा वर्षांच्या शालेय मुली. किशोरवय हा मूलभूत प्रश्न विचारण्याचा, स्वत:ची स्वतंत्र ओळख घडवण्याचा आणि जगाकडे एका नव्या पूर्वग्रहदूषित नसलेल्या नजरेने पाहण्याचा काळ असतो. परंतु दुर्दैवाने आपल्या समाजात मुलींच्या बुद्धिमत्तेकडे आणि क्षमतेकडे अजूनही अनेकदा पारंपरिक सामाजिक अपेक्षांच्या चष्म्यातूनच पाहिलं जातं. अव्याना आणि अरियानाने त्या संकुचित चौकटीला विज्ञानाचं जालीम हत्यार वापरून सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी शाळेत शिक्षकांनी दिलेला धडा केवळ पाठ केला नाही, तर त्यांनी त्यातून स्वत:चा स्वतंत्र प्रश्न निर्माण केला. विद्यार्थी जेव्हा स्वत: प्रश्न विचारायला शिकतो, तेव्हाच तो नवं ज्ञान निर्माण करण्याच्या खर्‍या दिशेने पहिलं पाऊल टाकतो. म्हणून या प्रेरक कथेची तिसरी नायिका आहे, त्यांची अखंड जिज्ञासा.

युवा नेतृत्वाखालील अशा पर्यावरणीय नवकल्पनांचा समाजावर होणारा परिणाम (Societal Impact

of Youth- led Innovation) अत्यंत खोलवर आणि दूरगामी असतो. जेव्हा १६-१७ वर्षांचे विद्यार्थी जागतिक समस्यांवर उत्तरं शोधतात, तेव्हा ते केवळ एक वैज्ञानिक शोध लावत नाहीत, तर संपूर्ण तरुण पिढीमध्ये आत्मविश्वासाची नवी लाट निर्माण करतात. भारतभरातील हजारो शाळांमध्ये जेव्हा या मुलींनी कार्यशाळा घेतल्या, तेव्हा त्यांनी गणित आणि विज्ञानाकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलून टाकला. विशेषत: मुलींमध्ये विज्ञान विषयांची आवड निर्माण करणं आणि संशोधन क्षेत्रात स्त्रियांचं प्रतिनिधित्व (Women in STEM – विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात स्त्रियांचा सक्रिय सहभाग) वाढवणं, अशा दृष्टीने या प्रयोगाने एक क्रांतिकारी सामाजिक काम केलं आहे.

तरुण पिढी ही केवळ भविष्याची नागरिक नसून आजच्या वर्तमानातील बदलाची वाहक आहे, हे या घटनेने सिद्ध केलं. जिज्ञासेला आणि संशोधनाला वयाची, लिंगाची किंवा भौगोलिक सीमा नसावी. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या क्षेत्रांत आज जगभरात मुलींचा सहभाग हळूहळू वाढत असला, तरी समान संधी आणि योग्य प्रतिनिधित्वाचे प्रश्न अजूनही तीव्रतेने कायम आहेत. म्हणूनच अव्याना आणि अरियानासारख्या शाळकरी मुलींची ही कथा अत्यंत दिशादर्शक ठरते. त्यांनी आपल्या कृतीतून संपूर्ण समाजाला एक स्पष्ट संदेश दिला आहे, मुली कठीण प्रश्न विचारू शकतात, प्रयोगशाळेत प्रयोग करू शकतात, अपयशातून शिकून पुन्हा उभ्या राहू शकतात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनाचं खंबीर नेतृत्व करू शकतात.

‘प्लास-स्टिक’ला मिळालेला जागतिक पुरस्कार हा या संपूर्ण प्रवासातील एक सुवर्णमय टप्पा आहे. ‘द अर्थ प्राइज’ ही १३ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी, पर्यावरण संरक्षण, इकोसिस्टम (परिसंस्था) पुनरुज्जीवन आणि हवामान बदलासारख्या भीषण समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रतिष्ठित स्पर्धा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या चमूने भारतभरातील विविध कार्यशाळांद्वारे तब्बल ८,००० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचून मायक्रोप्लास्टिकच्या धोक्याविषयी जागरूकता निर्माण केली. मे २०२६ मध्ये या संघाची आशिया विभागातील विजेता म्हणून अधिकृत निवड झाली. त्यानंतर पार पडलेल्या जागतिक मतदानाअंती

‘द अर्थ प्राइज’च्या अंतिम फेरीत या भारतीय संघाने तब्बल १६९ देशांमधील हजारो प्रवेशिकांमधून अव्वल स्थान पटकावून जागतिक विजेतेपद आणि १ लाख डॉलरचं (सुमारे ८३ लाख रुपये) पारितोषिक जिंकलं. जयपूरच्या शाळेपासून जिनिव्हाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंतचा त्यांचा हा प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे.

एका निरुपयोगी समजल्या गेलेल्या चिंचोक्याने तीन जणांना विचार करायला व प्रश्न विचारायला शिकवलं, त्या प्रश्नाने त्यांच्या संशोधनाला एक अचूक वैज्ञानिक दिशा दिली, आणि त्या दिशेने आज संपूर्ण जगाला एका नव्या शाश्वत शक्यतेकडे पाहायला शिकवलं आहे. अर्थात, हा पुरस्कार म्हणजे या संशोधनाचा शेवट नसून, तो पुढील मोठ्या वैज्ञानिक प्रश्नांची सुरुवात आहे. विविध रासायनिक गुणधर्म असलेल्या पाण्यात ‘प्लास-स्टिक’ची प्रत्यक्ष कार्यक्षमता किती असेल? वेगवेगळ्या आकारांच्या व प्रकारच्या मायक्रोप्लास्टिकवर त्याचा परिणाम कसा होईल? मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उत्पादन करताना ही प्रक्रिया किती किफायतशीर ठरेल? आणि पाण्यातून वेगळं केलेल्या या मायक्रोप्लास्टिकची पर्यावरणाला हानी न पोहोचवता सुरक्षित विल्हेवाट कशी लावायची? या सर्व प्रश्नांची ठोस उत्तरं पुढील प्रगत संशोधन आणि व्यावसायिक पडताळणीतूनच मिळतील. त्यामुळे या प्रयोगाकडे अंतिम उत्तर म्हणून पाहण्यापेक्षा एक आशादायी वैज्ञानिक सुरुवात म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल.

आज प्लास्टिकच्या अतिवापराचं हे भयावह संकट हिमालयाच्या उंच शिखरांपासून महासागरांच्या खोल तळापर्यंत आणि मातीतून थेट आपल्या अन्नसाखळीपर्यंत सर्वत्र पसरलेलं आहे. साहजिकच, एका रात्रीत किंवा एकाच प्रयोगाने या संपूर्ण समस्येचं अंतिम निवारण होणार नाही. परंतु जगात घडणार्‍या प्रत्येक मोठ्या आणि क्रांतिकारी परिवर्तनाची सुरुवात ही भूतलावर कोठे तरी पडलेल्या एका छोट्याशा प्रश्नानेच होत असते. आकाराने चिंचोका अत्यंत छोटा, परंतु योग्य वैज्ञानिक दृष्टिकोन लाभल्यास त्यातून उद्भवणार्‍या अनंत शक्यता कधीच लहान नसतात. दृष्टिकोनाचा फरक असा की, काहींना त्यात केवळ फेकून देण्याजोगा कचरा दिसतो, तर वैज्ञानिक नजर असणार्‍यांना त्यात अलभ्य असा ‘चिंतामणी’ सापडतो. कदाचित उद्याचा जागतिक चिंतेवर उत्तर देणारा हा चिंतामणी आज आपल्या हातात किंवा आसपास असलेल्या एखाद्या अत्यंत क्षुल्लक, दुर्लक्षित वस्तूतच दडलेला असेल! inkingmysonnets@gmail.com