अजित कानिटकर
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यासाठी न्याय मिळावा या मागणीसाठी ‘जंतर मंतर’ येथे अनेक कुस्तीपटूंनी एकत्र येऊन आंदोलन केले. त्यावर देखरेख समिती स्थापून चौकशीचे आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन मागे घेतले गेले असले तरी स्त्री क्रीडापटूंचे लैंगिक शोषण आणि या क्षेत्रात स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक हे चित्र नवीन नाही. वीस वर्षांपूर्वी या विषयावर केलेल्या एका देशव्यापी अभ्यासात जे प्रश्न समोर आले होते, ते अजूनही तसेच आहेत. या अभ्यासात सहभागी समुपदेशक डॉ. ज्योती कानिटकर यांनी मांडलेला परिस्थितीचा हा आलेख..
खेळाडूंचे अनुभवच बोलके!
भारतातील स्त्री खेळाडूंच्या परिस्थितीबद्दल झालेल्या अभ्यासासाठी देशभरातील स्त्री खेळाडूंकडून प्रश्नावली भरून घेतली होती, तर खेळाडूंच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. या सर्वच मुलाखती बोलक्या होत्या. क्रीडा क्षेत्रात स्त्रियांचा मार्ग खडतर आहे असे म्हणताना त्यांना किती लहानमोठय़ा गोष्टींना तोंड द्यावे लागते, याचे चित्र त्यातून समोर येते. एका खेळाडू मुलीने सांगितले, ‘‘एकदा एका स्पर्धेसाठी आम्ही उत्तर भारतातील एका राज्यात गेलो होतो. स्पर्धा संपल्यानंतर संध्याकाळी सर्वजण एका ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला गेलो. आम्ही तीन-चारच मुली होतो. त्या वेळेस तिथे उपस्थित काही पुरुष स्पर्धकांनी आमच्यावर शारीरिक बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना पुरून उरलो, कारण आम्ही जुडो खेळाडू होतो!’’ दुसरा अनुभव मुंबईतल्या दोन जिम्नॅस्टिक खेळाडू मुलींचा- ‘‘आम्ही जेव्हा सराव करत असतो तेव्हा काळी हाफ पॅन्ट आणि राखाडी रंगाचा टी-शर्ट घालतो. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळेला मात्र आम्हाला जिम्नॅस्टिकचा सूट घालावा लागतो. सरावाच्या वेळी आम्ही जिम सूट घालू शकत नाही. कारण जिम सूट घातल्यावर आजूबाजूने येणारे-जाणारे लोक आमच्याकडे निरखून पाहात राहतात. त्यांना जरी सांगितलं, तरी ते बघण्याचे सोडत नाहीत किंवा थांबू नका सांगितले तरी निघून जात नाहीत.’’ एका मुलीने सांगितलं, ‘‘ माझी भारताच्या शिबिरासाठी निवड झाली होती. पण माझ्या पुरुष मार्गदर्शकांनी मला मुद्दामहून पाठवले नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझी वागणूक चांगली (म्हणजे त्याच्या आज्ञेत राहणारी?) अशी नव्हती आणि आमचे बोलणे आक्रमक (?) होते.’’
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून या लेखाची सुरुवात करते, भय इथले संपत नाही! गेले काही दिवस भारतीय महिला कुस्ती खेळाडूंनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनी क्रीडापटूंमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. दिल्लीत जंतर मंतर येथे या महिला कुस्तीगीर उपोषणालाही बसल्या होत्या. रोजच्या रोज याविषयीच्या काहीना काही बातम्या प्रसिद्ध होत आहेतच. या सर्व बातम्या वाचत असताना असे वाटले, की खरेच गेल्या वीस वर्षांत आपल्या देशात क्रीडा क्षेत्रात आणि विशेषत: त्यामध्ये सहभागी स्त्री खेळाडूंच्या बाबतीत काय घडते आहे? हा प्रश्न मनात पडल्यानंतर सहजच २००४ मध्ये ‘भारतीय स्त्रीशक्ती’ या आमच्या संस्थेने केलेल्या एका सविस्तर अभ्यासाची आणि त्यातील निष्कर्षांची आठवण झाली.
राष्ट्रीय महिला आयोगासाठी
(डॉ. पौर्णिमा आडवाणी या अध्यक्ष असतानाच्या काळात) ‘स्टडी ऑन जेंडर इश्यूज् इन स्पोर्ट्स इन इंडिया’ या विषयाचा आमच्या सात जणींच्या गटाने जवळपास वर्षभर अभ्यास केला होता. ७२ पानांचा हा अभ्यास जिज्ञासूंसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या संकेतस्थळावर आजही उपलब्ध आहे.
(http://ncw.nic.in/sites/default/files/Gender%20Issue%20in%20Sports.pdf ) संकेतस्थळावर त्याचा प्रकाशन दिनांक जरी २००५ मधला असला, तरी प्रत्यक्षात महिला आयोगाला हा अहवाल आम्ही २००४ मध्ये दिला होता. एकूण सात जणांच्या भारतभरच्या गटाने जवळपास वर्षभर क्रीडा क्षेत्रातील स्त्री खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक यांच्या मुलाखती व प्रश्नावलीआधारे अभ्यास केला होता. या गटामध्ये डॉ. मनीषा कोठेकर, तेजस्विनी दाणी, प्रतिभा जाजू, रेणू जोशी, वसुंधरा नांगिया, रश्मी हरदास आणि मी अशा सात वेगवेगळय़ा अभ्यास पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया होत्या. या अभ्यासाचे निष्कर्ष आणि सध्या लैंगिक शोषणाबद्दल चालू असलेली चर्चा हे पाहिल्यानंतर असे वाटले, की वीस वर्षांत काही चित्र बदलले आहे का? बदलले असले तर कुठे आणि बदलले नसले, तर २०२३ मध्येही लैंगिक शोषणाच्या या बातम्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवणाऱ्या स्त्री खेळाडूंना का सामोरे जावे लागते आहे?
सरकारे बदलली, पुरुषी मानसिकता तीच
गेल्या वीस वर्षांत सरकारे बदलली. क्रीडा क्षेत्रालाही काहीसे चांगले दिवस आले. नुकतंच युवा महिला विश्वचषक स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या भारतीय महिला संघाने पटाकावले आहे. सिडनी ऑलिम्पिकमधील मल्लेश्वरी यांच्या पहिल्या पदकानंतर पुरुष आणि महिला गटातही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंना पदके मिळू लागली आहेत असे आशादायक चित्र दिसू लागले. केवळ ऑलिम्पिकचा विचार करता पुरुष गटात वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये कर्नल हर्षवर्धन राठोड,अभिनव बिंद्रा ही दोन ठळक नावे आहेत. त्याबरोबरीने अनेक पुरुष कुस्तीपटूही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदकांच्या मालिकेत झळकले. स्त्री स्पर्धकांमध्ये सायना नेहवाल, मेरी कोम, साक्षी मलिक, लविना बुर्गोहेन, मीराबाई चानू आणि पी. व्ही. सिंधूची दोन पदके ही स्त्री खेळाडूंसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि स्फूर्तिदायक अशाच यशाची आहेत. तथापि एकीकडे पदकांच्या संख्येत वाढ होत असताना एकूण खेळाच्या पर्यावरणामध्ये काही सकारात्मक बदल होतोय का, यासाठी २००४च्या आमच्या सविस्तर अहवालाचा पुन्हा एकदा धांडोळा घ्यावासा वाटला. त्यानंतर असे वाटले, की जमिनीवरची परिस्थिती काही बाबतीत फारशी बदललेली नाही.
स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचारांमध्ये आणि लैंगिक शोषणाच्या अनेक उदाहरणांमध्ये हे ठळकपणे लक्षात आले आहे, की हे शोषण करणारे परके किंवा समाजातील अन्य व्यक्ती असण्याची शक्यता फार कमी असते. किंबहुना स्त्रीच्या कुटुंबातील, नात्यातील, संपर्कातील व्यक्ती याच लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असतात. दुर्दैवाने स्त्री खेळाडूंच्या सध्याच्या व यापूर्वीच्या अनेक घटनांमध्येही हेच चित्र अनुभवास येते. स्त्री खेळाडूंना प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ, मार्गदर्शक (कोचेस) व या खेळांचे संघटक आणि पदाधिकारी यांचा या खेळाडूंशी दररोजचा संपर्क येतो. यांच्याकडूनच स्त्री खेळाडूंना अवहेलना, टीका आणि त्याही पुढे जाऊन शारीरिक व मानसिक ताणतणाव सहन करावे लागतात. त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात, हे कुस्ती खेळाडूंच्या तक्रारीतून पुन्हा समोर आले आहे.
सुमारे वीस वर्षांपूर्वी हा अभ्यास करण्यापूर्वी माझ्या समुपदेशनाच्या कामाच्या निमित्ताने दिल्लीतील एका वयाने लहान असणाऱ्या बुद्धिबळपटूची ओळख झाली होती. तिच्या आईने क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून माझ्याशी संपर्क साधला होता. आईची तक्रार अशी होती, की उत्तम गुणवत्ता असलेली महाविद्यालयीन वयातील तिची मुलगी बुद्धिबळामध्ये फारसा रस घेत नव्हती. तिची जिंकण्याची इच्छा कमी झाली होती, किंबहुना बुद्धिबळ का खेळायचे, असा प्रश्न ती करत होती, काहीशी हताश झाली होती. एकीकडे उत्तम गुणवत्ता असताना आपली मुलगी तसा खेळ स्पर्धेत का दाखवत नाही, या चिंतेत त्या आईने मुलीसह माझी समुपदेशनासाठी भेट घेतली. दोन-तीन भेटी अशाच झाल्या. परस्पर परिचय होऊनही महाविद्यालयातील ही मुलगी मोकळेपणाने बोलेना. त्यामुळे चौथ्या भेटीच्या वेळेला मी त्या मुलीला एकटीलाच मला भेटायला सांगितले. स्पष्टपणे तिला असेही म्हणाले, की या समुपदेशनाचा तुला जर उपयोग होत नसेल तर आपण थांबूयात. सक्तीने आपण भेटण्याची काहीच आवश्यकता नाही. हे मी सांगितल्यानंतर मात्र ती मुलगी मानसिकदृष्टय़ा अक्षरश: कोसळली. पाच मिनिटे ढसढसा रडली. नंतर तिने सांगितले, की बुद्धिबळाच्या स्पर्धेच्या निमित्ताने भारतातच एका वेगळय़ा ठिकाणी प्रवासाला गेलेली असताना तिच्या एका मार्गदर्शकाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिने तो झिडकारून लावला. स्पर्धा संपल्यानंतर तिने आईला हा प्रसंग सांगितला. आईने ‘त्याकडे फार लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर. खेळावर लक्ष दे,’ अशी सोयीस्कर आणि निष्क्रिय भूमिका घेतली. आईच्या या वागणुकीचा या मुलीवर खूप खोल नकारात्मक परिणाम झाला होता. तिला आईचा प्रचंड राग आला होता आणि त्यामुळे तिचे खेळात लक्ष लागत नव्हते. खेळ सोडूनच द्यावा या मन:स्थितीपर्यंत ती आली होती. समुपदेशनाच्या या सत्रानंतर तिच्या आईला मी ही सर्व घटना समजावून सांगितली. त्या मुलीशीही आणखी एकदोन वेळा माझा संवाद झाला. या प्रसंगानंतर तिच्या मनातील या भयानक प्रसंगाच्या खोल गेलेल्या कटू स्मृती बाहेर पडल्या. जणूकाही ते ‘कॅथार्सिस’ होते असे म्हणता येईल. या घटनेनंतर गेली वीस वर्षे ही मुलगी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे ‘ग्रँडमास्टर’ म्हणून प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या मनातील हा एक साचलेला अनुभव बाहेर पडल्यानंतर बुद्धिबळाविषयी किंवा स्पर्धेविषयी तिला आणखी कुणाच्या मदतीची गरज नव्हती. या दुर्घटनेत तिचा मार्गदर्शक सहभागी होता, आणि कुणीही त्याच्याविरुद्ध आवाज उठवणारे नव्हते, हे दुर्दैव.
स्त्री आणि पुरुष खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमध्ये प्रत्येकच गोष्टीत स्त्री खेळाडूंना असमान वागणूक त्या वेळी होती आणि आताही आहे. अगदी गेल्या वर्षांपर्यंत क्रीडापटूंना मिळणाऱ्या मानधनातही ही तफावत होती. आमच्या अभ्यासात स्त्री खेळाडूंनी असे सांगितले होते, की स्पर्धेच्या अगोदर मिळणाऱ्या साहित्यामध्ये सर्व खेळाडूंना एकाच आकाराचे टी-शर्ट पदाधिकाऱ्यांकडून मिळायचे. उंची, वजन याचा काहीही विचार न करता सरसकट एकाच मापाचे घट्ट-ढगळ कपडे क्रीडापटूंना देणे यासारखा आणखी वेगळा अपमान काय असू शकेल? स्पर्धाच्या ठिकाणी जाताना प्रवासाच्या सुविधेविषयी उदासीनता असणे, आरक्षण आयत्या वेळेस न मिळणे, स्पर्धेच्या ठिकाणी सुरक्षित राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था नसणे आणि ही सगळी किमान व्यवस्था व्हावी यासाठी पदाधिकाऱ्यांची मनधरणी करणे, त्यांच्या मनमानी कारभाराला निमूटपणे तोंड देणे याशिवाय त्या वेळेस व आजही अनेक स्त्री खेळाडूंना पर्याय नाही. वर्षांनुवर्षे क्रीडा क्षेत्रातील सर्व महासंघांचे अध्यक्षपद क्रीडा क्षेत्राशी अजिबात संबंध नसलेल्या अनेक जाणत्यांनी अबाधितपणे स्वत:कडे व स्वत:च्या मर्जीतील व्यक्तींकडे राखून ठेवले आहे. अर्थातच त्यामुळे हे महासंघ कसे चालावेत यावर क्रीडापटूंना व स्त्री खेळाडूंनाही काहीही बोलण्याची सोय नाही.
‘झीरो टॉलरन्स’
हे सगळे बदलण्यासाठी व विशेषत: स्त्री क्रीडापटूंचे लैंगिक शोषण होणार नाही यासाठी ‘झीरो टॉलरन्स’ ही एकच महत्त्वाची व ज्याच्यावर कोणतीही तडजोड होणार नाही अशी वरपासून खालपर्यंत सर्वाना लागू होणारी आणि प्रत्यक्षात कार्यवाही होणारी धोरण यंत्रणा अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे स्त्री क्रीडापटूंविरुद्ध कुणी गैरवर्तन केले असेल, तर त्याला तातडीने शिक्षा होणे आवश्यक आहे. एकीकडे झीरो टॉलरन्सचे धोरण असताना दुसऱ्या बाजूला शेकडो, हजारो मुली आणि स्त्रियांनी खेळाच्या क्षेत्रात यावे यासाठी त्यांना सुखद, सुरक्षित व प्रोत्साहन देणारे वातावरण अगदी छोटय़ा छोटय़ा गावांपासून ते मोठय़ा शहरांपर्यंत सर्व देशभर निर्माण होते आहेच, ते वाढवणे आवश्यक आहे. असे वातावरण असल्यानंतर खेळाडू व त्यांचे पालक त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकांची लयलूट करतील. याची उदाहरणे सायना नेहवाल, मेरी कोम, पी. व्ही. सिंधू, अंजली भागवत आणि अनेक नव्या दमाच्या खेळाडूंनी दाखवली आहे. असे नवे खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यकता आहे हे भयाचे वातावरण बाजूला होऊन सुरक्षित आणि प्रोत्साहन देणारे सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची.
(लेखिका क्रीडा मानसशास्त्र क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत आहेत.)