scorecardresearch

डेरेदार होत चाललेला ‘उद्योगवृक्ष’

एक महावृक्ष घडण्याची सुरुवात एका बीच्या रुजण्याने होते, तशी ‘आम्ही उद्योगिनी’ची सुरुवात झाली ती घरच्या घरी सुरू केलेल्या छोटय़ा उद्योगाने.

chaturang
(आपला व्यवसाय दुबईपर्यंत नेणाऱ्या उद्योगिनी.)

आरती कदम

मराठी माणसांना उद्योगधंदा जमत नाही, असं मानण्याच्या काळात पुरुषांनाच नव्हे, तर प्रामुख्याने स्त्रियांना, विशेषत: शैक्षणिकदृष्टय़ा आणि आर्थिकदृष्टय़ा निम्न स्तरातल्या, गावखेडय़ातल्या, त्याचबरोबरीने शहरातल्या सुमारे १५ हजार स्त्रियांना उद्योगाचा यशस्वी मार्ग दाखवणारी ‘आम्ही उद्योगिनी’ संस्था आता ऐन पंचविशीत पोहोचली असून विविध उपक्रमांच्या समावेशाने अधिकाधिक परिपक्व होते आहे.

एक महावृक्ष घडण्याची सुरुवात एका बीच्या रुजण्याने होते, तशी ‘आम्ही उद्योगिनी’ची सुरुवात झाली ती घरच्या घरी सुरू केलेल्या छोटय़ा उद्योगाने. माहेरची आंबा उत्पादने घरी येणाऱ्या लोकांना विकण्याचा उद्योग सुरू करणाऱ्या आईच्या पोटी जन्मलेल्या मीनल ढमढेरे (मीनल मोहाडीकर)यांच्यात उद्योगाचे ते बीज रुजले नसते तरच नवल होते. एकटीने सुरू झालेला हा प्रवास आज ‘आम्ही उद्योगिनी’च्या डेरेदार वृक्षाखाली विसावला आहे.
मीनलताईंचे बाबा, आजोबा, मामा सगळेच उद्योगातले. लग्न होऊन मोहाडीकरांच्या घरी आल्या, तर तेथेही उद्योग होताच.मीनलताईंचे सासरे राम मोहाडीकर हे ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे अनेक वर्षं सेक्रेटरी होते. आणि चुलत सासरे प्रकाश मोहाडीकर हे साने गुरुजी विद्यालयाचे संस्थापक होते.त्यामुळे सतत उद्योगधंद्याच्याच गोष्टी. ‘पॅरामेडिकल’ची पार्श्वभूमी असणाऱ्या, प्रत्यक्ष उद्योगधंदाचा अजिबात गंध नसलेल्या मीनलताईंनी बाळंतपणानंतर नुसते घरी बसायला नकार देत एक दिवस ठरवले, की आईच्या पावलावर पाऊल ठेवायचे, पण बाहेर पडून. पुण्याहून मुंबईला आलेल्या मीनलताईंना ना बसची सवय होती, ना ट्रेनची. पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता येणार नव्हते. त्यांनी ‘वनिता समाज’तर्फे भरवल्या जाणाऱ्या एका प्रदर्शनात एक स्टॉल लावला. आपल्याच मामाच्या ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांच्या आंबा उत्पादनांचा. एकामागोमाग प्रदर्शने सुरू झाली. स्त्रियाच काय, तेव्हा मराठी पुरुषही नव्हते फारसे उद्योगविश्वात. पण खाद्यपदार्थाना बाजारपेठ मिळवून देणे हेच त्यांनी आपल्या व्यवसायाचे ध्येय ठरवले. तेव्हा मीनलताई वयाने लहान आणि प्रकृतीने किरकोळ होत्या. एकाने त्यांच्या तोंडावरच म्हटले, ‘‘ये लडकी.. और बिझनेस करेगी?’’ तेव्हापासून मीनलताईंनी बाहेर पडताना साडीच नेसायची, असे ठरवले. थोडे पोक्त वाटतो आपण त्यात म्हणून! आता उद्योग-विक्री सुरू झाली होतीच. आंबा उत्पादनांबरोबर, मसाले, भडंग अशा खाद्यवस्तूंचा समावेश झाला. मंत्रालयात तेव्हा ‘कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह स्टोअर’ १०० रुपये घेऊन एक टेबल लावायला द्यायचे. तेथेही विक्री सुरू झाली. मग हळूहळू शाळा, बँका, हॉस्पिटल्समधल्या महिला वर्गापर्यंत उत्पादनविक्री सुरू झाली. काही जणी जोडल्या गेल्या. त्याही उत्पादने विकू लागल्या. मीनलताईंनी त्यांना कानमंत्र दिला. ज्या ठिकाणी स्त्री नोकरदारांची संख्या जास्त आहे तेथेच जायचे, एखाद्या मैत्रिणीच्या ओळखीने ‘लंच टाइम’मध्येच जायचे आणि दर महिन्याच्य २५ ते ५ तारखेदरम्यानच जायचे, कारण तो काळ पगाराचा असतो. तेव्हा ना एटीएम होती, ना यूपीआय, ना इंटरनेट, ना ऑनलाइन मार्केटिंगचे जाळे पसरवणारी ॲप्स! प्रत्यक्ष आणि रोखीचा व्यवहार.

या त्यांच्या कामाला ठोस वळण मिळाले, ते जेव्हा त्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर’ च्या स्त्री विभागाच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा. या कामादरम्यान त्यांनी अक्षरश: महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक जणींमध्ये गुणवत्ता होती, घरच्या स्तरावर अनेक जणी काही ना काही करत होत्या. त्यांना बाहेर पडण्याची संधी हवी होती, योग्य ती बाजारपेठ हवी होती आणि मुख्य म्हणजे उद्योगासाठीचे योग्य मार्गदर्शन हवे होते. त्या वेळी त्या ‘चेंबर’चे त्रमासिक काढत होत्या. त्यात अनेकींच्या यशोगाथा, उद्योगासाठी ‘नेटवर्किंग’चे जाळे कसे पसरवता येईल याची, तसेच शासनाच्या विविध योजना यांची माहिती दिली जात असे. त्याची चर्चा करत असताना १९९७ मध्ये ‘लोकप्रभा’चे संपादक प्रदीप वर्मा आणि पुष्पा त्रिलोकेकर यांनी ‘आम्ही उद्योगिनी’ची कल्पना सुचवली आणि सुरू झाला प्रवास उद्योगिनी घडवण्याचा. त्याच वेळी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ यांनी ‘प्रियदर्शिनी’ ही प्रामाणिकपणे उद्योग करणाऱ्या स्त्रियांना कमी व्याजदरात कर्ज देण्याची योजना आणली. तर ‘सारस्वत बँके’ने ‘उद्योगिनी’ याच नावाने योजना आणली. या योजना अशा गरजू स्त्रियांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हेच मीनलताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे काम. ‘आम्ही उद्योगिनी’चे सारे काम विनामूल्य सुरू होते आणि आजही आहे. पण त्यांच्यातली उद्योजिका स्वस्थ बसली नव्हती. त्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून, ‘कझ्युमर शॉपी’च्या माध्यमातून स्वत:मधली उद्योगिनी जिवंत ठेवली होतीच. त्यातून मिळालेल्या पैशांच्या ‘सीएसआर’मधून काही प्रमाणात आवश्यक तो खर्च होत होताच.

पसारा वाढत चालला होता, त्याला आकार येण्यासाठी दर महिन्याला एक बैठक घ्यायला सुरुवात झाली. पहिल्या बैठकीला २५ जणी होत्या. सगळे विनामूल्य असल्याने बैठकीची जागा ठरली ती साने गुरुजी विद्यामंदिरातील हॉलची. सासरे प्रकाश मोहाडीकरांनी उद्योगिनींना दिलेले हे प्रोत्साहन होते. या बैठकीतून अनेक गोष्टी फळाला येऊ लागल्या, मुंबईतल्या उद्योगिनींचा उत्साह पाहून पुण्यातही एक ऑफिस काढायचे सुचवले गेले. तिथेही ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांचा हॉल मिळाला. पण तो फक्त अमावस्येच्या दिवशी उपलब्ध असायचा, कारण इतर दिवशी समारंभांना भाडय़ाने दिला जायचा! घौडदौड सुरूच होती. ‘आम्ही उद्योगिनी’च्या झाडाला आता अनेक पारंब्या फुटू लागल्या होत्या. मुंबई व परिसरात दादर, विलेपार्ले, गोरेगाव, कांदिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, त्यापलीकडे नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर.. आणि आज तब्बल १२ जिल्ह्यांत ‘आम्ही उद्योगिनी’ सुरू झाले. प्रत्येक ठिकाणी १००० जणी आणि बरोबरीने नाशिकमध्ये निशिगंधा मोकल, औरंगाबादमध्ये ज्योती दाशरथी, नागपूरमध्ये कांचनताई गडकरी, या सख्याही जोडल्या गेल्या.

मुंबईतून ‘अपना बाजार’च्या माध्यमातून अनेक उद्योगिनी जोडल्या गेल्या. गावागावांतील महिला मंडळे जोडली जाऊ लागली. त्यांना संघटित करण्याचे काम ‘आम्ही उद्योगिनी’तर्फे होऊ लागले. दर महिन्याच्या बैठकीला साऱ्या जणी एकत्र येत, आपापल्या उद्योगाची, त्यातील समस्यांची चर्चा करत. यातूनच नेटवर्किंगचे जाळे पसरू लागले. या सर्व स्त्रियांचे उत्पादन करणे सुरू होते, पण योग्य ती बाजारपेठ मिळवून देणे, बँकांची कर्जे मिळवून देणे, शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे काम होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे होते ते या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम! आपण आपल्या बळावर उद्योग करू शकतो, हा विश्वास त्यांना मिळू लागला. औरंगाबादच्या वनिता दंडे. कोरफडीपासून सौंदर्यप्रसाधनं तयार करण्याचा घरच्या घरी सुरू केलेला त्यांचा उद्योग. आज त्यांची स्वत:ची फॅक्टरी आहे. सोनाली कोचरेकर या डाएटिशीयन. भरडधान्यांपासून २५ प्रकारचे पौष्टिक लाडू त्या तयार करतात. आज त्यांची कंपनी पब्लिक लिमिटेड झाली असून लवकरच ‘आयपीओ’ येतो आहे. सुलभा धोंडिए यांचा हौस म्हणून सुरू केलेला पर्सचा उद्योग. आज त्याचं मॅन्युफॅक्चिरग युनिट डोंबिवली येथे आहे. स्वत: ७५ वर्षांच्या सुलभाताईंचा उद्योग आता त्यांच्या मुली सांभाळत आहेत. अशाच बुलढाण्याच्या रेखा बोरकर. त्यांचा हौस म्हणून सुरू केलेला मशीन एम्ब्रॉयडरीचा उद्योग आता इतका वाढला, की त्यांच्याकडे २२ जणी कामाला आहेत. टाळेबंदीत सिंधुदुर्गमध्ये अडकलेल्या विनीता शिरोडकर यांनी आपलं आधीचं ज्ञान वापरून काजूचा उद्योग सुरू केला. आज त्यांच्याकडेही १५ जणांना काम मिळाले आहे. टाळेबंदीच्याच काळात नागपूर येथील ‘गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्थे’च्या उद्योगिनींनी काही लाख कापडी पिशव्या बनवून अनेकींना आपल्या पायावर उभे केले. तर औरंगाबाद येथील काही जणींनी एकत्र येऊन पोळीभाजीचे डबे देऊन तब्बल ५० लाख रुपयांचा उद्योग केला. अशा अनेकींची नावे सांगता येतील. ज्यांनी आपल्या हौसेला, कामाला उद्योगात बदलवले. १५ हजारांपेक्षाही जास्त स्त्रिया. ज्यांच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवणे गरजेचे होते. असे पाठीवर हात ठेवून बळ देण्याचे काम ‘आम्ही उद्योगिनी’ गेली २५ पेक्षा जास्त वर्षे करत आहे.

जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या ‘आम्ही उद्योगिनी’च्या वृक्षाची पाळेमुळे प्रदर्शनांच्या मार्फत आता राज्याबाहेर दिल्ली, बंगळूरू येथे, तर देशाबाहेर दुबई, शारजाहपर्यंत पसरली आहेत. परदेशी आतापर्यंत ३०० उद्योजक जाऊन आले. राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विविध योजनाची माहिती या उद्योगिनींपर्यंत पोहोचवली जाऊ लागली आहे. ‘महाराष्ट्र स्टेट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ तसेच ‘मायक्रो, स्मॉल, मिडीयम एंटरप्रायजेस’, महिला धोरणांतर्गत एकमेव महाराष्ट्रात राबवली गेलेली योजना. अशा विविध योजना शासनातर्फे पूर्णत: विनामूल्य आणि उद्योगिनी तयार करण्याच्या उद्देशानेच राबवल्या जातात. त्याअंतर्गत असलेले दिल्ली येथील प्रगती मैदानावरील प्रदर्शन. पहिल्या वर्षी २० स्टॉल लावले गेले होते. टाळेबंदीच्या काळात मागे पडलेल्या काही गोष्टी पूर्वपदाला येत आहेत. ही प्रदर्शनेही जोमाने सुरू होतीलच.

‘आम्ही उद्योगिनी’ची पुढची पिढीही आता या वृक्षाच्या सावलीत वाढू लागली आहे. ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज’च्या (एयूपीबीएक्स) अंतर्गत भारताबाहेरील उद्योजकांनाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू असून आलेल्या ४०० प्रस्तावांतून १७ जणांची निवड एयूपीबीएक्स पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

पंचविशीत रसरसून वाढलेला ‘आम्ही उद्योगिनी’चा वृक्ष पानं, फळांनी भरगच्च होत होत अधिक डेरेदार होतो आहे. तो असाच बहरत राहील, अनेक उद्योगिनी, उद्योजक घडवत राहील यात शंका नाही.
arati.kadam@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:00 IST

संबंधित बातम्या