सुवर्णा दामले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनिर्मितीची आणि आपल्या अस्तित्वानं आजूबाजूचं जग फुलवण्याची असामान्य क्षमता ‘त्या’ दोघींमध्ये आहे. यातली एक ‘ती’, अर्थातच स्त्री आणि दुसरी आहे माती! हवामानाचा बेभरोशी कारभार आणि इतरही कारणांमुळे अनेक जण शेतीकडे पाठ फिरवत आहेत, अगदी घरातले पुरुषही, पण ती मात्र ठामपणे उभी आहे, मातीचं देणं देत, तिलाच आपली सुखदु:खं सांगत, ‘रक्तामधली ओढ मातीची’ सार्थ करत.

‘वर्ल्ड सॉईल डे’ अर्थात ‘जागतिक मृदा दिना’च्या (५ डिसेंबर) निमित्तानं मातीशी घट्ट नातं असणाऱ्या आणि ते  टिकवून अधिक संपन्न करणाऱ्या काही शेतकरी स्त्रियांच्या या कथाव्यथा..!

ठेका पद्धतीने शेती घेणे याचा अर्थ ज्याची शेती ठेक्यावर घेतली आहे त्याला ठरलेली रक्कम द्यायची असते. त्यानंतर त्या शेतमालकाचा त्या शेतीतील उत्पन्नात कोणताही वाटा नसतो. हा ठेका हंगामी स्वरूपाचा असतो आणि शेतीची गुणवत्ता बघून रक्कम  ठरवली जाते.

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात ६५ टक्के स्त्रिया शेतीत काम करतात. शेतीतलं त्यांचं बहुतेक काम किचकट, वेळखाऊ आणि सतत चालणारं असलं तरी शेतीतल्या अशा प्रकारच्या कामांमुळेच स्त्रियांचा मातीशी जास्त संपर्क येतो. म्हणूनच स्त्रियांचं मातीशी- जमिनीशी नातं हे अधिक जिव्हाळय़ाचं, मायेचं असतं. हे नातं रुजवणं, टिकवणं आणि वाढवणं हे पारंपरिक सण आणि प्रथा यातही दिसून येतं. बहुतेक ठिकाणी पीक लावण्यापूर्वी आणि पीक काढतानाही मातीची/ जमिनीची पूजा केली जाते. ही पूजा स्त्रियाच करतात. याशिवाय वेगवेगळय़ा भागांत इतरही काही प्रथा दिसून येतात, ज्या स्त्रियांचा संबंध मातीशी जोडलेला असल्याचा दाखला देतात. पण त्याच्या पलीकडे जात ही मातीच आपल्या कुटुंबाला जगवते आणि आपल्याला भावनिक आधारही देते हे प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या काही भूमिकन्यांच्या या संघर्षकथा.

कमलताई वाकोडेंचं माय मातीवरचं प्रेम असंच. त्यांचं बालपण शेतात, मातीत खेळण्यात गेलं, इतकं, की त्या स्वत:ला सीतेसारखी ‘भूमिकन्या’ मानतात. लग्न झाल्यावर कमलताईंच्या सासरी स्वत:ची शेती नव्हती. सर्व जण मजुरी करायचे. त्याप्रमाणे कमलताईही कधी नवऱ्याच्या सोबत तर कधी एकटीनं, इतर स्त्रियांबरोबर मजुरीला जायच्या. मात्र दुसऱ्यांच्या शेतात काम करताना स्वत:ची जमीन घेण्याची स्वप्नं त्या बघायच्या. पण कमलताईंच्या नवऱ्याचा विचार मात्र वेगळा होता. मजुरी करून पोट भरायचं आणि काही पैसे अडचणीसाठी शिल्लक ठेवायचे इतकंच त्यांच्या पतीचं मर्यादित धोरण. कमलताईंनी मात्र या मर्यादित चौकटीबाहेर पडत आपलं स्वत:ची जमीन घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

आज त्यांचं वय आहे ६२ वर्ष. वयाच्या पंधराव्या वर्षी जेव्हा लग्न झालं तेव्हा तारुण्यात पाऊल ठेवणाऱ्या कमलताईंना शेतीची, मातीची एवढी ओढ का होती? त्याचं जे उत्तर त्या देतात त्यातून त्यांचं मातीशी असलेलं घट्ट  नातंच समोर येतं, ‘‘आमची सकाळ मातीच्या स्पर्शानं व्हायची आणि दिवसभरातली खाणंपिणं, खेळणं, झोपणं सगळं काही मातीमध्येच, मातीच्या साक्षीनं व्हायचं. घरही शेणामातीच्या सारवणाचं. चूल मातीची आणि स्वयंपाकाची काही भांडीसुद्धा मातीचीच होती. तेव्हा मातीतून तयार करायचं आणि उपयोगानंतर पुन्हा मातीत मिसळायचं असंच चक्र होतं.’’ असं असताना लग्नानंतर मात्र स्वत:च्या हक्काची माती नाही, ही जाणीव त्यांना खूप अस्वस्थ करणारी आणि दुर्बलतेची जाणीव निर्माण करणारी होती. कमलताईंसारखा अनुभव अनेक स्त्रियांचा. त्या सांगतात, ‘‘त्यांच्या दोन ‘माय’ आहेत. एक जन्म देणारी माय आणि दुसरी धरणी माय, माती माय. या दोन्ही माय आमच्यासाठी सारख्याच महत्त्वाच्या आहेत.’’

कमलताईंच्या दोन्ही माय लग्न झाल्यावर दुरावल्या होत्या. त्यामुळे कसंही करून आपली स्वत:ची जमीन असायला हवी, असा ध्यास त्यांनी घेतला. पहिल्या दोन अपत्यांनंतर कमलताईंनी नवऱ्याला ठेक्यानं शेती करायला राजी केलं आणि थोडी पडीक शेती कमी पैशांच्या ठेक्यावर घेतली. त्याच शेतीवर छोटंसं खोपटं उभारून कमलताईंचा संसार सुरू झाला आणि काही वर्ष मातीशी तुटलेलं नातं पुन्हा जुळलं. आधी दुसऱ्याचं शेत ठेका पद्धतीनं करता करता स्वत:ची ऐपत थोडी वाढवली आणि मग सुरुवातीला दोन एकर शेती विकत घेतली. विशेष बाब म्हणजे ही शेती पूर्णपणे कमलताईंच्या नावानं खरेदी करण्यात आली, कारण पैशांपासून इतर सर्वच बाबींमध्ये कमलताईंचा सिंहाचा वाटा होता. काही वर्षांनंतर कमलताईंनी पुन्हा दोन एकर जमीन घेतली आणि एकूण चार एकर जमीन कमलताई व त्यांच्या पतीच्या नावानं झाली. याशिवाय इतर आठ एकर शेतीदेखील त्या ‘ठेक्या’नं करत आहेत. आज त्या स्वत:च्या शेतात राबताहेत. पीकं घेताहेत. स्वत:बरोबर कुटुंबालाही आत्मसन्मानाचं जगणं देत आहेत. भाजीपाला, कापूस, चणा, गहू, तूर, सर्वच पिकं कमलताईंच्या शेतात डौलानं वाढताहेत.

 आणखी एक माती मायची लेक, छबीताई ठाकरे. छबीताईंचा नवरा व्यसनी होता, लग्नानंतर जरी सासरी संपन्नता, पंधरा एकर शेती होती, तरी नवऱ्याच्या व्यसनामुळे आणि मारहाणीमुळे त्यांना कष्टाचं जीवन जगायला लागलं. शिवाय शेतीचंही सर्व त्यांनाच बघावं लागायचं. कारण उत्पन्नासाठी शेतीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यांना पहिलं अपत्य झालं, त्याला मानसिक विकलांगत्व होतं. छबीताई व्यसनी नवरा आणि मानसिक विकलांग मुलाला सांभाळून पंधरा एकर शेतीचा व्याप एकटीच्या बळावर पुढे नेत होत्या. त्यात त्यांची शेती नदीकाठी असल्यामुळे दरवर्षी पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान व्हायचं. अशातच व्यसनाधीनतेमुळे पती गंभीर आजारी पडले आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला. आता त्या पूर्णपणे एकाकी झाल्या, पण तरीही त्यांची पावलं शेतीची वाट चालतच राहिली. कुटुंबातल्या किंवा गावातल्या लोकांनी त्यांना कसलीही मदत किंवा सहकार्य केलं नाही. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती, मदत करायला कुणी नाही, मुलाचं परावलंबित्व आणि विधवा असण्याचा सामाजिक कलंक, अशा परिस्थितीत न डगमगता केवळ मातीच्या, शेतीच्या आधारानं छबीताईंनी सर्व काही सांभाळलं. पंधरा एकर शेतीमधला एकही तुकडा कधी विकायचा विचार केला नाही की ‘ठेक्या’नं कुणाला दिला नाही.

एवढे कष्ट करण्याची ताकद, एकटीनं सर्व पेलण्याचं बळ छबीताईंना कुठून मिळालं? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या मातीवरल्या प्रेमात आहे. त्या सांगतात, ‘‘लग्नानंतर मला केवळ शेतीनं सुख दिलं, इतर सर्वानी केवळ त्रास आणि जबाबदारीचं ओझं दिलं!’’ काहीही झालं तरी रोज शेताकडे येण्यामागे त्यांचा उद्देश सर्व त्रासांपासून, तणावापासून दूर जाणं हाच होता. त्या आपली सगळी दु:खं त्या मातीला सांगायच्या. गावात, घरी सतत काही जबाबदारी, काही अपेक्षा, काही बोलणी, काही बंधनं असतात. शेतात मात्र काही बंधनं नाहीत, काही अपेक्षा नाहीत. अनेक वर्षांनंतर आज आता कुटुंबातली मंडळी, गावकरी त्यांची स्तुती करताहेत, की कुणाच्या मदतीशिवाय छबीताईंनी अनेक संकटांचा सामना करून आपली शेती सांभाळून ठेवली.

 जमिनीशी स्त्रियांचं नातं कसं घट्ट आहे, हे ठसवणारं आणखी एक प्रातिनिधिक उदाहरण आहे आणखी एका विधवेचं, वसूताईंचं. त्यांच्या नवऱ्यानं आत्महत्या केली. दोन्ही मुलं शेती करायला उत्सुक नाहीत आणि वसूताईंनाही जमीन विकून टाकायला सांगताहेत. पण त्यांना वाटतं, की या जमिनीनं त्यांच्या सुखात आणि दु:खातही सांभाळून घेतलं, त्यांना साथ दिली. तशीच ती त्यांच्या मुलांना आणि सुनांनाही सांभाळून घेईल.  वसूताई म्हणतात, ‘‘माझी शेती जरी थोडी असली, तरी मी मरेपर्यंत ती मला सांभाळेल आणि मुख्य म्हणजे तिथून मला कोणी हाकलणार नाही, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.’’ वयानुसार अनेक व्याधींनी ग्रस्त वसूताई जसं जमेल तसं शेतीत काम करतात. गरिबी, आजारपण, विधवा असण्याची व्यथा किंवा भविष्यात मुलं सांभाळतील किंवा नाही, अशा सर्व चिंता त्यांनी त्यांच्या मातीला सांगितल्या आहेत. तीच त्यांचा सांभाळ करेल असा ठाम विश्वास त्यांना आहे. वसूताई जेव्हा घरी असतात, तेव्हा त्यांचं दुखणं डोकं वर काढतं. मात्र ज्या वेळी त्या आपल्या दुखऱ्या पायांनी शेतात कामं करतात, तेव्हा मात्र दुखण्याचा विसर पडतो, हा त्यांचा प्रत्यक्षातला अनुभव.   

कमलताई, छबीताई, वसूताई या काही प्रातिनिधिक शेतकरी. जमिनीवर असलेली श्रद्धा आणि अटळ विश्वास, यामुळेच त्यांना वाईट परिस्थितीमधून पुढचा मार्ग सापडला आणि यश मिळालं. मात्र यांच्यापेक्षा एकदम विपरीत परिस्थितीतही आज अनेक स्त्रिया जगत आहेत. त्या स्त्रिया अशा आहेत ज्यांच्या कुटुंबातली जमीन विकून त्याचा पैसा केला गेला, अनेकदा तर त्यांना न विचारता. जमिनीचा हा  पैसा या स्त्रियांना मिळालाच नाही, उलट तो विविध चैनीच्या, उपभोगाच्या वस्तूंवर खर्च झाला आणि ज्या स्त्रिया स्वत:च्या जमिनीवर सन्मानानं काम करत होत्या, त्या आज मजुरीच्या शोधात फिरताना दिसतात. जमिनीला ज्या कुटुंबांनी ‘मॉनिटाइझ’ केलं, पैशांत बदललं, त्या कुटुंबांमधल्या काही स्त्रियांनी दूरदृष्टी दाखवून पुन्हा थोडी किंवा कमी किमतीची जमीन घेतली आहे. त्यामुळे त्यांना काहीसं सुरक्षित वाटतं आहे.

 काळानुरूप आता स्त्रिया शेतीशिवाय इतर अनेक उपजीविकांमध्ये गुंतलेल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातलं चित्र पाहिलं तर आजही स्त्रियांना शेतीशी- मातीशी जुळलेलं काम हेच सर्वात जास्त सुरक्षित वाटतं.  ग्रामीण स्त्रियांना शेतीमध्ये काम करणं, मातीशी नातं असणं का गरजेचं वाटतं किंवा का सुरक्षित वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना बहुतांश स्त्रिया सांगतात, की हे नातं आपोआपच तयार होतं, कारण आपण ज्यांच्या संपर्कात जास्त काळ राहतो तिथे नाती आपोआपच तयार होतात. या प्रश्नाचं दुसरं उत्तर त्या असं देतात, ‘‘जमिनीत काम करण्यासाठी आम्हाला काही शिक्षण लागत नाही किंवा कोणतं प्रमाणपत्रही सादर करावं लागत नाही. मग आम्हाला शेतात काम करणं सुरक्षित, सोयीचं, महत्त्वाचं वाटणारच.’’

  लहान मुलं- मग ती स्वत:ची असोत की इतर कुणाची, त्यांच्यावर माया करणं, त्यांची देखभाल करणं, संगोपन करणं, हे स्त्रिया वात्सल्याच्या अंत:प्रेरणेतून उत्तमरीत्या करू शकतात. नेमकं हेच मातीच्या, शेतीच्या संदर्भातही लागू होतं. म्हणूनच कितीही आर्थिक संकटं आली, तरी शेती वा जमीन विकणं हा पर्याय स्त्रियांच्या समोर नसतो. तर उलट शेत किंवा जमीन नेहमीच असायला हवी, म्हणून ती राखून ठेवण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते करण्याची त्यांची तयारी असते. म्हणूनच कमलताई, वसूताई, छबीताईंसारख्या स्त्रिया जमीन टिकवतात आणि अपार कष्ट करावे लागले तरी इतर अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरतात.

 कवयित्री इंदिरा संतांची ‘मृण्मयी’ अशी शेतकरी स्त्रीच्या रूपात आपल्याला ठायी ठायी दिसते. कारण त्यांच्यातही तीच ओढ आहे. 

‘रक्तामध्ये ओढ मातीची,

मनास मातीचे ताजेपण

मातीतून मी आले वरती,

मातीचे मम अधुरे जीवन..’

(लेखिका नागपूरमधील ‘प्रकृती’ या संस्थेच्या सहयोगी संचालक आहेत.)

suvarnadamle1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Innovation unusual capacity woman world soil day chhabi tai thackeray ysh
First published on: 03-12-2022 at 00:04 IST