प्रा. के. वि. बेलसरे यांच्या लिखाणात एक खूप छान वाक्य आले आहे.  Life transcends reason म्हणजे आपलं जीवन विचारांच्या पलीकडे असल्याने काही गोष्टी सांगता येत नाहीत. आपण पाहतो, एखाद्यांचं सगळं अगदी ठीक सुरळीत चालू असते. नियमित आहार, विहार, विश्रांती या दिनचर्या पाळणाऱ्या एखाद्याला दुर्धर व्याधी जडल्याचं समजतं. अचानक एखाद्याला अपघातात अपंगत्व येतं. जन्मत:च एखादं बाळ विकलांग म्हणून जन्माला येतं. या साऱ्याची कारणमीमांसा आपल्या बुद्धीच्या, विचारांच्या स्तरांवर आपण करू पाहतो, पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आपण नराश्यवाद, निरीश्वरवादाकडे झुकायला लागतो. तात्त्विक, वैचारिक बठक पक्की करण्याऐवजी, नाण्याची दुसरीही बाजू असू शकते, नव्हे असेलच ह्य़ा विचाराऐवजी आपण अधिकाधिक भोगवादी, अश्रद्ध होऊ लागतो. श्रद्धा आणि विश्वासाचा पाया एकदा डळमळीत झाला की जगण्याला दिशा दिसत नाही. आनंदाचा मार्ग बंद होऊन जातो. आयुष्य अर्थहीन वाटू लागतं. खरा अर्थ समजण्यासाठी अंतरंग साधना हवी. त्यासाठी वज्रासनाचा सराव करू या.
वज्रासन
 बठकस्थितीतील विश्रांती, दोन्ही पाय लांब करा. हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवी टाच उजव्या सीटखाली घ्या. डावा पाय गुडघ्यात दुमडून डावी टाच डाव्या सीटखाली घ्या. जर गुडघे, व नडगी दुखत असतील तर त्याखाली पातळ उशी अथवा नॅपकीनची घडी ठेवा. दोन्ही हात मांडय़ांवर, हात कोपरात सल, शिथिल, पाठकणा समस्थितीत ठेवा. काही काळ या स्थितीत बसून लक्ष श्वासावर एकाग्र करा.
खा आनंदाने ! – हलकं-फु लकं
वैदेही अमोघ नवाथे (आहारतज्ज्ञ ) vaidehiamogh@gmail.com
आजच्या जमान्यातील गाणी ऐकणं तर सोडाच, पण अशा गाण्यांविषयी बोलणंसुद्धा आजी-आजोबांना परवडत नाही. म्हणजे इंटरेस्ट नाहीच, पण रेडिओवर ‘पंछी बनू, उडती फिरू मस्त गगन में’ गाणं लागलं तर लगेच मन पिसासारखं भूतकाळात उडायला लागतं! तर आजी-आजोबांनो, असा हलकेपणा आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी आपला आहारसुद्धा तसाच हलका असायला हवा म्हणजे अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि  शरीराच्या हालचालीसुद्धा सहज होतात.  अनुभवाने तुम्हालाही हे पटत असेल की जेव्हा पचन व्यवस्थित तर मन शांत, मन शांत तर झोप शांत आणि झोप शांत तर दुसरा दिवस उत्साहाने भरलेला! बरोबर ना?
हलका आहार –
कमी चरबीयुक्त पदार्थ-गाईचे दूध किंवा त्यापासून बनवलेले ताक, मुगाची पिवळी किंवा सालीसकट हिरवी डाळ, मोड आलेले मूग किंवा मटकी, हातसडीचा तांदूळ, ज्वारी, नाचणी, जव, राजगिरा, फळभाज्या जसे दुधी, पडवळ, दोडकी, भोपळा, पालेभाजी – चवळी, माठ, सीझनल फळे, सैंधव मीठ, मसाल्यांमध्ये जिरा पावडर, धणे पावडर, दालचिनी, आलं, हिंग, हळद, तिखट नसलेली लाल मिरची वगैरे.
जडत्व आणणारे पदार्थ-
साखर, तेलकट, तुपकट पदार्थ, चण्याचे पदार्थ जसे फरसाण, भावनगरी वगैरे, ब्रेड, बिस्किट्स, नुडल्स, पांढरा भात, चणे – वाटाण्यासारखे वातूळ कडधान्ये, मांसाहार, शेंगा भाजी (घेवडा, गवार वगैरे), म्हशीचे दूध, दही वगैरे   
पचन सोप्पे करण्यासाठी-
* पाचक रस किंवा जठराग्नी व्यवस्थित काम करण्यासाठी जेवणादरम्यान पाणी पिण्याचे टाळावे.* वेळी-अवेळी खाणे टाळावे.* जेवण झाल्यावर शतपावली घालावी. * दुपारी न झोपता फक्त वामकुक्षी घ्यावी. रात्री लवकर झोपून, पहाटे उठावे. * एकाच वेळी अन्न घेण्यापेक्षा थोडे थोडे पण विभागून खावे. * घास मऊ  करून मगच खावा. * डाळ-तांदूळ थोडे भाजून मग धुवावे आणि शिजवण्याआधी १० मिनिटे भिजवून ठेवून मग शिजवावे.
   मक्याचा उपमा (आई-स्पेशल)
भरडलेले मक्याचे दाणे, भाजणी पीठ, लाल तिखट, हळद, तेल आणि फोडणीचे साहित्य.
तेलात फोडणी करून त्यात मक्याचे दाणे परतून घ्या. भाजणीचे पीठ भुरभुरा आणि वरून थोडे थोडे पाणी शिंपडा आणि खमंग होईपर्यंत परतत राहा. शेगडी  बंद करून, वरून डाळिंबाचे दाणे, अळशीचे दाणे घाला आणि गरम गरम आस्वाद घ्या!   
मन एवढं एवढं
जसा खसखसचा दाणा
अन् मन केवढं केवढं ?
त्यात आभाळ मायेना
बहिणाबाईंच्या कवितेप्रमाणे तुमचं आभाळाएवढं मन आहे त्यात नेहमी आम्हालाच विसावा मिळतो, पण त्या मनाच्या शांततेसाठी माझा हा अल्पसा प्रयत्न!
कायदेकानू : माहितीचा अधिकार अधिनियम- २००५
अ‍ॅड. प्रितेश देशमुख -pritesh388@gmail.com
विविध सरकारी कार्यालयांमध्ये अनेकदा आवश्यक माहिती योग्य रीतीने दिली जात नाही अथवा गोपनीय माहितीच्या नावाखाली सदर माहिती दडवून ठेवली जाते. आपण दाखल केलेल्या विविध अर्जाचे/ तक्रारींचे पुढे काय झाले याबाबत कधी थांगपत्ताच लागत नाही. अशा व या स्वरूपाच्या घटनांमध्ये आपणास माहितीच्या अधिकाराचा उपयोग करता येतो.
ज्याप्रमाणे भारतीय संविधानाने अभिव्यक्ती अधिकार दिला आहे, त्याचप्रमाणे संविधानाला माहिती जाणून घेण्याचा अधिकारही अभिप्रेत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय सरकारने २००५ साली माहितीच्या अधिकाराचा कायदा केला व त्यास राष्ट्रपतींनी संमतीही दिली.
सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, शाळा, दवाखाने व इतर सर्वच कचेऱ्यांत माहितीच्या अधिकाराचा वापर करता येऊ शकतो. अशा प्रत्येक ठिकाणी एका माहिती अधिकाऱ्याची नेमणूक करणे बंधनकारक आहे. आपणास आवश्यक विषयाच्या माहितीकरिता एका कागदावर आपले नाव, पत्ता, आवश्यक माहितीचा तपशील, दिनांक व स्थळ यांबाबत माहिती लिहून व खाली स्वाक्षरी/ अंगठा करून सदर अर्ज त्या कचेरीच्या स्वागत कक्षात/ माहिती अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावा व त्याची पोच घ्यावी. दारिद्रय़रेषेखालील व्यक्तीस अर्ज मोफत करता येतो तर इतर व्यक्तींना प्रत्येक अर्जास  १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे बंधणकारक नाही. माहिती अधिकार कायद्यात नमुना फॉर्म नसल्याने आपण सर्वसामान्यापणे करीत असलेल्या अर्जाच्या स्वरूपातच अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक माहिती ३० दिवसांत देणे बंधनकारक आहे. विहित कालावधीत माहिती न दिल्यास अपील दाखल करता येते, तसेच माहिती अधिकाऱ्यास त्याच्या नाकर्तेपणाबद्दल जबर दंडही करण्यात येतो. माहिती अधिकारात अपेक्षित माहिती न मिळाल्यासही अपील दाखल करता येते. परराष्ट्र धोरणांसंदर्भातील काही माहिती, अणुऊर्जेविषयक माहिती, संरक्षणविषयक माहिती इ. स्वरूपाची माहिती मात्र माहिती अधिकारात मागता येत नाही. केंद्र सरकारने नुकताच माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी नवीन कायदा पारित केला आहे.
आनंदाची निवृत्ती : साथ ‘सारेगम’ची
वृषाली चितळे
निवृत्तीनंतर पहिलं काय करायचं तर गाणं शिकायचं, असं ठरवलं होतं. काही दिवस क्लासला गेलेही, पण हे साठीनंतरचं काम नाही, असं अनुभवास आलं. मग शेजारच्या मुलीने मला पेटी, हार्मोनियम शिकायला सल्ला दिला. मी पेटी घेतलीही आणि खरंच मी पेटीवादनात चांगलीच रमले.
सुरुवात अगदी ‘सा रे ग म’ शिकण्यापासून होती. एवढय़ा वयस्क लोकांना शिकवतात की नाही तेही माहीत नव्हतं. पण पेटीशिक्षक एकदम शांत व उत्साही. ते म्हणाले, ‘अहो पेटी शिकायला वय नसतं.’ एकूण पेटी शिकायला छान सुरुवात झाली. जे शिकत असे ते घरी आल्यावर लगेच वाजवून पाहत असे. वेळ चांगला जाऊ लागला. बरोबर येणारी मुलं, मध्यमवयीन माणसं सर्व भेटू लागले. ओळख वाढत गेली. मग परीक्षेचाही फॉर्म भरला.
वयाचा थोडा परिणाम असतोच. लक्षात यायला थोडा वेळ लागतो. विसरायला होतं. पण मी चिकाटी सोडली नाही. पहिली परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाले. हो, आणि त्यानिमित्ताने चांगला व्यायामही होऊ लागला. कारण क्लासला थोडं लांब जावं लागतं. आता तर पेटीवर काही गाणी वाजवायलाही शिकले. त्यामुळे क्लासची उत्सुकता इतकी असते की बाहेरगावी जायचं असेल तर क्लासचा वार सहसा चुकवत नाही. आजारी असले तरीसुद्धा आणि पाहुणे आले तरीसुद्धा.
आता मी पेटीची दुसरी परीक्षा नुकतीच दिली आणि पुढच्या परीक्षाही द्यायचा विचार आहे. लहानपणापासूनची गाणं शिकण्याची सुप्त इच्छा पेटीवादनातून काही प्रमाणात तरी पूर्ण होत आहे.

आजी-आजोबांसाठी उपयुक्त वस्तू :
नेलकटर विथ मॅग्निफाइंग ग्लास

वयपरत्वे दृष्टी कमी झाल्याने वयस्कर व्यक्तींना नेहमीच्या नेलकटरने नखे कापणे थोडे कठीण जाते. काहींना हात थरथरण्यामुळेही नखे नीट कापणे शक्य होत नाही. शिवाय नखासभोवतीची कातडी कापली जाऊन इजा व्हायची शक्यता जास्त असते. अशा वेळी नेलकटरच्या वर विशालक भिंग ((magnifying glass)) लावलेले असेल तर नखे व बोट स्पष्ट दिसते व नखे कापताना होणाऱ्या इजेपासून रक्षण होते. विशेष म्हणजे वर लावलेले भिंग गरजेनुसार अ‍ॅडजस्ट करता येते. हे नेलकटर अ‍ॅमेझॉन, ई-बे अशा संकेतस्थळांवरून इंटरनेटच्या माध्यमातून मागवता येऊ शकते. त्याची किंमत १५० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आहे. लहान-मोठय़ा आकारांत व अनेक रंगांमध्ये हे उपकरण उपलब्ध आहे.
बेडसाइड हँडल
अनेक ज्येष्ठांना किंवा आजारी आजीआजोबांना अंथरुणातून उठताना आधाराची गरज असते. त्याशिवाय त्यांना पलंगावरून खाली उतरता येत नाही. अशांसाठी बेडसाइड हँडल खूपच फायदेशीर ठरू शकेल. हँडल पलंगाला वा लाकडी बेडला एकदा जोडले की त्याला असणाऱ्या खटक्यामुळे ते सहज गरजेनुसार खाली-वर करता येते. याची किंमत ४ हजार रुपयांपासून आहे व अमेझॉनप्रमाणे ऑनलाइन शॉपिंग करता येणाऱ्या अनेक संकेतस्थळांवर हे उत्पादन उपलब्ध आहे.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…