16-blogहल्ली वृत्तपत्रात सतत आत्महत्येच्या बातम्या येत असतात. कधी परीक्षेत अपयश, प्रेमभंग यांसारख्या फुटकळ तर कधी काही मोठय़ा कारणांमुळे केलेला आत्मघात! एकीकडे ही अशी पळपुटी वृत्ती तर दुसरीकडे दुर्बल, निष्कांचन जीवांचा केविलवाणा संघर्ष पाहायला मिळतो. आत्मघाताचा निर्णय घेणाऱ्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की, आयुष्यातले ‘पण’ कधीच सोपे नसतात.

जोशी आजी कोकणच्या! तरुण वयात वैधव्य आलं, मुलं नाकर्ती निघाली आणि आजींनी हातात पोलपाट घेतलं ते कायमचं! परिस्थितीने त्यांना गरागरा फिरवलं, यथेच्छ घुसळवलं, पण आजींच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं नाही की बोलण्यातली कोकणी तिरंदाजी कमी झाली नाही. एकदा बोलता-बोलता सहज बोलून गेल्या. ‘ज्या शब्दात ‘पण’ असतो तो शब्द साधा वाटला तरी अनुभवायला कठीण! जसं बालपण! छान गोंडस, पण परावलंबी. काही सांगता येत नाही की, स्वत:च्या हाताने काही करता येत नाही. त्याउलट म्हातारपण! सांगता येतं, पण कुणी ऐकतच नाही. असा हा ‘पण’ माझ्या आयुष्याला अगदी च्युइंगमसारखा चिकटलाय. निघता निघत नाहीय.’ बोलता बोलता या वाक्यावर आजी नेहमीप्रमाणे छान, खुसखुशीत हसल्या. सामान्य रूपाच्या अन् सुतरफेणी केसांच्या आजी हसल्या की चक्क सुंदर दिसायच्या.

खंबीर मनाच्या आजींनी संसाराचा गाडा शेवटपर्यंत निकराने ओढला. नाकर्त्यां पोरांसाठीही जमेल तेवढं केलं. जुना काळ, त्यामुळे फारसं शिक्षण नाही, वृत्ती कष्टाळू, पण कुणाचं सहकार्य नाही की हातात पैसा नाही. न-नाहीची नकारघंटा सूडकऱ्यासारखी घणघणतच राहिली, पण बाई हटली नाही की कुरकुरली नाही. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्यातली रसिकता छान, टवटवीत होती. माझ्या मुलीच्या प्रत्येक वाढदिवशी मोगऱ्याचा गजरा आणायच्या आणि तोंडभर हसत म्हणायच्या. ‘पियू, या फुलांसारखी प्रसन्न राहा आणि सर्वाना आनंदी कर’. कुणी देवकार्यासाठी बोलावलं तर स्वयंपाकाला आले असं न म्हणता ‘सेवा करायला आले, मी दोन हातांनी जमेल तेवढं करते, पण चार-चार हात असूनही तो मात्र या म्हातारीसाठी काहीही करत नाही.’ हे बोलताना त्यांचे ओठ हसायचे, पण डोळे मात्र बरंच काही सांगून जात.
कधीमधी मी ऑफिसला दांडी मारली की माझी हमखास फिरकी घेणाऱ्या, बोलताना कोकणी म्हणी आणि गावाकडले किस्से सांगणाऱ्या आजी आधी परिस्थितीशी आणि अखेर जीवघेण्या कर्करोगाशी झगडल्या. मग मात्र काहीशा निराश मन:स्थितीत विझून गेल्या.
घरी जोशी आजी, तर ऑफिसला जाताना दादर-ब्रिजवर ‘तो’ भेटायचा. जुन्या-पुराण्या फण्या घेऊन ब्रिजच्या कडेला विकायला बसायचा. पार थकला होता, कमरेत वाकला होता, पण कुणासमोर हात पसरताना मी त्याला कधीही बघितलं नाही. खाली मान घालून एक शब्दही न बोलता त्याचं तसं बसणं अतिशय केविलवाणं वाटायचं. आमच्या मुंबैकरांची उदारता अशी थोर की पुण्य कमवण्यासाठी मंदिराबाहेरच्या भिकाऱ्यांना, गुबगुबीत कबुतरांना, चावऱ्या कुत्र्यांना गिळायला घालतील; पण अशा कष्टकऱ्यांकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. म्हातारा असेपर्यंत कुणीही अगदी कुणीही त्याची दखल घेतली नाही. तो गेला मात्र, एकसाथ सर्वाच्या दयेला महापूर आला आणि त्याच्या पुढय़ातल्या फडक्यावर पैशांची ही रास पडली. मनात आलं, म्हातारा जिवंत झाला तर हळहळून म्हणेल..
‘हम जिंदा थे तो किसी ने देखा तक नहीं
अब चले गये हैं तो मातम मना रहे हैं।’
हे दुर्दैवी जीव तर निघून गेले, पण काव्र्हालो नावाचा एक म्हातारा अद्याप हयात आहे. गरीब, बापुडा शब्दही बिच्चारे वाटतील एवढा थकलाय; पण हिम्मत अशी की या अवस्थेतही जमेल तेवढे कष्ट करतोय. अंगण झाडणं, नारळ सोलून देणं, केरसुण्या बनवणं अशी कामं करून आला दिवस साजरा करतोय. एका डोळय़ात पडलेलं भलंमोठ्ठं फूल, थरथरणाऱ्या पायांना आधार देणारी एक काठी आणि अशक्त खांद्यावरची मळकी पिशवी हे त्याचं वर्णन! त्याच्या जीर्ण देहाचं पान गळून पडायला खरंतर एक फुंकर पुरेशी आहे, पण दैव नावाच्या छळकुटय़ा मांजराची हौस अद्याप फिटलेली नाही. ते त्याला मनसोक्त झुलवेल, खेळवेल आणि छळण्याची हौस पुरती फिटली की मेहरबान होऊन शेवटचा पडदा पाडेल; पण तोपर्यंत त्या म्हाताऱ्याची पुरती दमछाक होणार हे निश्चित!
या तिघांचं अप्रूप अशासाठी की हल्ली वृत्तपत्रांत सतत आत्महत्येच्या बातम्या येत असतात. कधी परीक्षेत अपयश, प्रेमभंग यांसारख्या फुटकळ, तर कधी काही मोठय़ा कारणांमुळे केलेला आत्मघात! एकीकडे ही अशी पळपुटी वृत्ती, तर दुसरीकडे या दुर्बल, निष्कांचन जीवांचा केविलवाणा संघर्ष! आत्मघाताचा निर्णय घेणाऱ्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की, आयुष्यातले ‘पण’ कधीच सोपे नसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार आणि वळणं असतातच. कधी एखाद्या अवघड वळणावर फारच निराश झालात तर ‘ऑल इज वेल’ म्हणत स्वत:लाच धीर द्या आणि पुढे चला. पुढच्याच वळणावर घनदाट सावली तुमची वाट पाहतेय.