डॉ. रश्मी करंदीकर

‘‘ माझ्या पोलीस कारकीर्दीतल्या प्रवासात मला सुरुवातीपासून साथ लाभली ती एका अत्यंत सुज्ञ आणि सहृदय वरिष्ठांची- तेव्हाच्या पोलीस अधीक्षक आणि आताच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांची. सहकाऱ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या, वेळप्रसंगी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या आणि खाकी वर्दीच्या बाहेर मोठय़ा बहिणीप्रमाणे स्नेह देणाऱ्या अर्चना त्यागी यांचा नुकताच राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला. यानिमित्ताने त्यांच्याबद्दल..’’ 

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

अर्चना त्यागींचा जन्म डेहराडून येथे झाला. त्यांच्या घरात शैक्षणिक वातावरण होते, त्यामुळे त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून ‘एम.फिल.’ करण्याचा निर्णय घेतला. तिथेच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात माहिती मिळाली. त्यांनी या स्पर्धा परीक्षेची तयारी करून पहिल्या प्रयत्नात ती उत्तीर्ण केली. त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. महाराष्ट्रात त्यांनी सातारा, रत्नागिरी, ठाणे (ग्रामीण), मुंबई, इथे विविध पदे भूषवली. त्या मुंबई येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना अनेक अटीतटीचे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न त्यांनी अतिशय कौशल्याने हाताळले. त्यासाठी त्यांना ‘महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. स्त्रिया आणि बालकांचे प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळणे हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. स्त्रिया आणि मुलांची मानवी तस्करी रोखण्याकरिता त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या कामावरून प्रेरित होऊन राणी मुखर्जी अभिनीत ‘मर्दानी’ हा हिंदी चित्रपटदेखील बनला आहे.

अप्पर पोलीस महासंचालक (पोलीस हाऊसिंग) अर्चना त्यागी यांना नुकतेच त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले. मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या हस्ते त्यांना ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझ्याकडे होते. आपण ज्यांच्या हाताखाली आपल्या पोलीस सेवेची सुरुवात केली, त्यांना हे पदक घेताना पाहणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. तो अनुभवता अनुभवता माझे मन भूतकाळात कधी पोहोचले ते मलाच कळले नाही..

   ही गोष्ट आहे २००५ च्या फेब्रुवारी महिन्यामधली. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधील खडतर प्रशिक्षण संपवून मी माझ्या ‘डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट’साठी नाशिकहून रत्नागिरीला निघाले होते. माझ्यासाठी ते प्रशिक्षण खडतरच होते. मुंबईमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली, मैदानी खेळांची किंवा व्यायामाची साधी तोंडओळखदेखील नसलेली, मंत्रालयातील कक्ष अधिकारीपदाची १० ते ६ या वेळेची, चांगल्या सुट्टय़ा, चांगले वेतन, अशी तुलनेत सुखासीन नोकरी करणारी मी. पोलीस खात्यात जायचा निर्णय मी घेतला तेव्हा माझ्या घरच्यांसाठीदेखील तो धक्काच होता. सरळ सेवेने थेट भरती झालेल्या तीन स्त्री अधिकारी माझ्या आधी पोलीस खात्यात ‘डीवायएसपी’ (पोलीस उपअधीक्षक) पदावर होत्या. पुरुषी वर्चस्व असलेल्या या खात्यात माझ्यासारख्या साध्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मुलीचा कसा निभाव लागणार, याची चिंता माझ्या आईला भेडसावत होती. त्यातच ती दुर्धर आजाराने ग्रस्त होती. तिच्या या अतिशय कठीण काळात मला प्रशिक्षणासाठी तिच्यापासून दूर नाशिकला जाणे भाग होते. दर रविवारी इतर सर्व वर्गमित्रांचे आई-वडील, कुटुंबीय त्यांना भेटायला यायचे. मात्र माझ्या घरी हे शक्य नव्हते. आई अंथरुणाला खिळलेली होती. तो तणाव माझ्या मनावर होता. सतत घरची आठवणी येई. त्यातच शारीरिक श्रमांची सवय नाही. याचा व्हायचा तो परिणाम झाला. माझा पाय प्रशिक्षणादरम्यान दोन वेळा फ्रॅक्चर झाला. बॅण्डेज घातलेल्या पायाचा भार सांभाळत, कुबडय़ा घेऊन पहिल्या मजल्यावरच्या क्लास रूमसाठी चढउतार करत माझे प्रशिक्षण सुरू होते. त्यादरम्यानच माझी आई गेली. तिच्या निधनानंतर दोन महिन्यांनी प्रशिक्षण संपवून मी रत्नागिरीला नोकरीत रुजू होण्यासाठी निघाले होते. ट्रेनमधून उतरताना मनात वेगवेगळे विचार होते. आईला, सगळय़ात जवळच्या व्यक्तीला नुकतेच गमावले होते. समोर संपूर्णपणे नवीन आणि पूर्णपणे पुरुषप्रधान क्षेत्र उभे होते. इथे काम करणे आपल्याला जमेल का, हा प्रश्न भेडसावत होता. इथे काम करायचे की राजीनामा देऊन सरळ परत मंत्रालयातील पूर्वीच्या पदावर जायचे, असे नाना विचार घेऊन रत्नागिरी शहरात संध्याकाळच्या वेळी जाऊन पोहोचले. एकटीच. सर्व सामान घेऊन शासकीय विश्रामगृह गाठले. इथे आपण काय काम करणार? उद्या किती वाजता कार्यालयात जायचे? असा सगळा विचार सुरू असताना अर्ध्या तासात निरोप आला, ‘एसपींनी (पोलीस अधीक्षक) पोलीस मैदानावर बोलावले आहे.’

संध्याकाळचे ६ वाजले होते. मला वाटले ‘कॉल ऑन’साठी असेल. गणवेश घालून पोलीस मैदानावर गेले. ‘एसपी कुठे आहेत?’ असे विचारले, तर एका तंबूमध्ये टेबल टाकून काम सुरू होते. समोर मैदानी परीक्षा/ कागदपत्र पडताळणीची टेबल्स. त्या वर्षांची रत्नागिरीची पोलीस भरती सुरू होती. सॅल्यूट झाल्यावर त्यांनी माझी जुजबी विचारपूस केली आणि मला लगेच काम नेमून दिले. एवढे तास प्रवास करून आल्यावर अवघ्या तासाभरात कामावर रुजू होणे, ही खऱ्या अर्थाने पोलीस कारकीर्दीची सुरुवात होती. अतिशय कडक शिस्तीच्या आणि नियमांना धरून काम करणाऱ्या त्या ‘एसपी’ होत्या, अर्चना त्यागी मॅडम!

मला आजही लख्ख आठवते, त्या दिवशी बिंदू नामावलीचा ‘जीआर’ त्या पदांना लावायचा होता.(बढती देण्यासाठीची रोस्टर पद्धत) तो रात्री ८ वाजता मिळाला. त्यानंतर सगळय़ा कर्मचाऱ्यांना बसवून प्रत्येक यादी काळजीपूर्वक तपासून रात्री १ वाजता आमचे मैदानातील कामाचे ‘पॅक अप’ झाले. तोपर्यंत त्या स्वत: तिथे होत्या. पहिल्या दिवशीचा तो कित्ता होता टीमबरोबर काम करण्याचा. असे म्हणतात की, कुणाचेही पहिले शिक्षक हे त्यांचे पहिले हिरो असतात! माझ्या बाबतीतही तेच लागू आहे. मला पोलीस दलाविषयी काहीही कल्पना नव्हती. ‘पोलीस स्टेशनची पायरी कधी चढू नये’ हे सांगणाऱ्या माझ्या घराने स्त्री पोलीस अधिकारी तोपर्यंत कधी पाहिली नव्हती. किरण बेदी ऐकून माहिती होत्या तेवढेच. अशा वेळी एक उत्कृष्ट स्त्री अधिकारी आपल्या पहिल्या ‘एसपी’ असणे हे माझ्यासाठी खूप आशादायी होते. अर्थात त्यांनी कामाच्या कोणत्याही बाबतीत स्त्री आहे म्हणून मला कधीही, चुकूनही झुकते माप दिले नाही. उलट मला जास्तीत जास्त कठोर प्रशिक्षण कसे मिळेल याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. अर्थात त्यांचे हे वागणे मी फक्त माझ्या बाबतीतच नाही, तर इतर प्रोबेशनरी ऑफिसर्सबाबतही अगदी जवळून अनुभवले.

कामाच्या बाबतीत इतक्या कठोर शिस्तीने वागणाऱ्या त्यागी मॅडम काम संपल्यावर मात्र एखाद्या मोठय़ा बहिणीसारखी काळजी घ्यायच्या. त्यांच्या अशा वागण्यामुळे सुरुवातीला त्यांच्या कडकपणाबद्दल असलेली भीती आदरामध्ये कधी परावर्तित झाली ते कळलेदेखील नाही. रोज सकाळी ८ वाजता ‘रोलकॉल’साठी आणि रात्री ८ वाजता ‘दिवसभर काय केले’ यासाठी त्यांचा फोन व्हायचा. त्यातही दिवसभरात आमच्या भेटी झाल्या, तर माझ्या डायरीतील प्रत्येक टिपण त्या स्वत: तपासायच्या. एकदा मला रात्री १० वाजता त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, ‘‘ताबडतोब जिल्हा रुग्णालयात जा.’’ दुपारी एका आकस्मिक मृत्यूची पोलीस दप्तरी नोंद झाली होती. एका स्त्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, पण तिच्या गळय़ावरच्या खुणा अस्पष्ट होत्या. तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरने ‘ही आत्महत्या आहे’ असे सांगितले. मीदेखील माझ्या अनुभवविरहित पुस्तकी ज्ञानानुसार त्याच्या म्हणण्याला मान डोलावली आणि तसेच मॅडमनाही सांगितले. मग मॅडमनी मला शवागरात जाऊन ‘पोस्टमॉर्टेम’ प्रत्यक्ष बघायला सांगितले. पोस्टमॉर्टेम बघायचे? आता एवढय़ा रात्री? असे प्रश्न विचारण्याची सोयच नव्हती. युनिफॉर्म घातला, कॅप घातली. आणि निघाले. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी विज्ञान शाखेची असल्याने उंदीर आणि गांडुळाचे डिसेक्शन माहिती होते, पण मनुष्य देहाचे.. तेही अमावस्येच्या मध्यरात्री? रात्री बरोबर १२ वाजून ९ मिनिटांनी पोस्टमॉर्टेम सुरू झाले.  Prob. DYSP ( म्हणजे मी) स्वत: उपस्थित असल्याने तेथील डॉक्टर एकेका अवयवाविषयी अगदी व्यवस्थित माहिती देत होते. जेव्हा ‘कॉझ ऑफ डेथ’कडे आलो, तेव्हा कुणी तरी तिचा गळा दाबून तिला कसे ठार केले आहे, हे व्यवस्थित समजावून सांगितले. रात्रीच कधी तरी रूमवर परतले. आयुष्यातील पहिलेवहिले पोस्टमॉर्टेम बघितले होते. सकाळी ‘एसपी’ मॅडमनी बोलावले. खुनाचा ‘एफआयआर’ दाखल होत होता. मी डायरीत पोस्टमॉर्टेमच्या काय काय नोंदी केल्यात, हे त्यांनी तपासले आणि अर्थात पुस्तकात वाचलेले ‘फोरेन्सिक’ आणि प्रत्यक्षात अनुभवलेले फोरेन्सिक यातला फरक समजावून सांगितला. माझा गंभीर चेहरा बघून म्हणाल्या, ‘‘मग, अमावास्येला भुताची भीती नाही वाटली ना शवागृहात जाताना? मी मुद्दाम पाठवलेले तुला. तुझ्या मनात काही भीती असेल तर आताच काढून टाक. प्रत्येक  ADR (आकस्मिक मृत्यूची नोंद) हा खूनही असू शकतो. त्याप्रमाणे सर्व शक्यता काटेकोरपणे तपासल्याशिवाय निष्कर्षांवर येऊ नकोस,’’ हे त्यांचे वाक्य मनावर कायमचे कोरले गेले. त्याचा उपयोग मला सेवेत अनेक वेळा झाला, अगदी अलीकडे मी ‘डीसीपी (पोर्ट झोन)’ (पोलीस उपायुक्त) म्हणून काम पाहात असताना एका वृद्ध स्त्रीचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक ‘‘काही नाही मॅडम ‘एडीआर’ आहे,’’ असे सांगत होते. कागदपत्रे बघितल्यानंतर मी घटनास्थळ पाहिले. घरच्यांची हकीकत आणि कागदपत्रे मिळतीजुळती होती, पण मला संशय आला. तीन तासांच्या अथक चौकशीनंतर ती हत्या असल्याचे निष्पन्न झाले. आणखी एक प्रसंग तर मॅडमच्या स्वभावातला वेगळाच पैलू दाखवून गेला. एकदा चिपळूणला एक ३५ वर्षांची स्त्री स्टोव्हचा भडका उडून भाजल्यामुळे रुग्णालयात दाखल होती. ‘‘तू स्वत: जाऊन तपास, की खरोखर स्टोव्हचा भडका उडालाय का?’’ असं मॅडमनी मला सांगितलं. त्या स्त्रीचा मृत्यूपूर्व जबाबपण तोच होता. ‘स्टोव्हचा भडका उडून जखमी झाले,’ असं ती सांगत होती. त्यामुळे मला संशय वाटत नव्हता. पण जेव्हा मी रुग्णालयातल्या ‘बर्न वॉर्ड’मध्ये जाऊन तिच्याशी बोलायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या अवस्थेत रडतानाही तिला त्रास होत होता. तिला सहा वर्षांचा मुलगा होता. चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतले होते. पण ‘आता मी नीट वागीन, मुलाला नीट सांभाळीन,’ असे तो तिला सांगत होता. मुलाची पुढची सगळी जबाबदारी त्याने घेतली होती, असे तिचे म्हणणे होते. ‘‘मी तर जगणार नाही, पण बापही तुरुंगात गेला तर मुलाला कोण सांभाळेल?’’ तिच्या या प्रश्नांपुढे मी निरुत्तर होते. त्या स्त्रीच्या संवेदना मॅडमना नीट समजल्या होत्या. मलाही त्या समजाव्यात म्हणून त्यांनी मला परत तपासणीसाठी पाठवले होते. कधी कधी व्यावहारिक गोष्टी बुद्धीवर मात करतात, हा धडा मला तिथे मिळाला.  

   मला मिळालेल्या या सर्व धडय़ांचे श्रेय या माझ्या पहिल्या गुरूकडे जाते. आणखी एक प्रसंग मला त्या वेळेचा आठवतो, रत्नागिरी पोलीस स्टेशनला एक गंभीर गुन्हा दाखल होता. त्यात ‘हस्तक्षेप’ करण्याचा प्रयत्न झाला. पण तेथील पोलीस निरीक्षकाने तो जुमानला नाही. त्याचा राग ठेवून विधानभवनात त्याला निलंबित करण्याचा ठराव मांडण्यात आला. मॅडमना हे कळताच त्या स्वत: मुंबईला गेल्या, त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना या पूर्ण गोष्टीची माहिती दिली. एवढेच नव्हे, तर ‘‘कारवाई करायचीच असेल तर ती माझ्यावर करा. मी जिल्ह्याची ‘एसपी’ आहे. माझे आदेश होते.’’ अर्थात नंतर ती कारवाई झाली नाही. पण आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्याच्या मागे एवढे खंबीरपणे उभे राहाणारे वरिष्ठ दुर्मीळ असतात. त्या परत आल्यावर तो अधिकारी त्यांना ‘थँक्स’ म्हणायला आला. त्यावरही त्यांनी ‘‘मैंने मेरी डय़ुटी की, तुम अच्छा काम करो,’’ एवढे म्हणून विषयदेखील संपवला. आपले अधिकारी, कर्मचारी आपल्या विस्तारित कुटुंबाचा भाग आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांच्याबरोबर आपण राहायला पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिले. अनेक वेळा अगदी हवालदारपासून पोलीस उपअधीक्षकापर्यंत सर्वाच्या मागे त्या कायम उभ्या राहिल्या.

  या सर्व कडक शिस्तीच्या युनिफॉर्ममध्ये त्यांचा मायेचा चेहरा लपून राहिला नाही. स्त्रियांच्या प्रश्नांकडे त्या नेहमी संवेदनशीलपणे बघण्यासाठी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात कधीच कमी पडत नाही. कामाचा भरपूर पिट्टय़ा पडल्यावर मला दर आठवडय़ाला एकदा तरी घरी बोलावून स्वत:च्या हाताने तयार केलेला पदार्थ खाऊ घालणे, मला कुटुंबीयांची आठवण येणार नाही, याची काळजी घेणे, एक ना अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी त्यांनी अतिशय मायेनं बघितल्या. माझी आई गेल्यानंतरचा तो काळ माझ्यासाठी अतिशय वाईट होता. पण त्यांनी त्या सर्व काळात बहिणीसारखे सांभाळले. स्वयंपाकाबरोबरच भाजीबाजारात जाऊन भाजी खरेदी करणे, कपडे घेताना ‘बार्गेनिंग’ करणे, हे छोटे छोटे क्षण मी त्यांच्याबरोबर अनुभवले. त्यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य व्यवस्थित सांभाळले आहे. तेच त्यांच्या ‘फिटनेस’बाबत. एवढय़ा वर्षांत त्यांचा व्यायाम आणि योगासने कधी चुकली नाहीच.

  मला प्रत्येक वेळी एक प्रश्न विचारला जातो, ‘‘तुमच्या प्रेरणा कोण?’’ पोलीस खात्यापासून कोसो लांब असलेल्या मुलीच्या आयुष्यात जेव्हा पहिली पोलीस अधिकारी येते, जी तिला पोलीस खात्याची मुळाक्षरे गिरवायला शिकवते, तिच्याखेरीज माझ्या डोळय़ासमोर कोण येणार! मला खात्री आहे, केवळ माझ्याकरिताच नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीकरिता त्यांनी महाराष्ट्रात गेल्या ३० वर्षांत केलेले प्रशंसनीय काम सतत प्रेरणदायी ठरेल.

लेखिका पोलीस अधीक्षक (नागरी संरक्षण, मुंबई) आहेत.

rashmi.karandikar2010@gmail.com