scorecardresearch

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : सामूहिक आत्महत्येची मानसिकता

जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे आत्महत्या करण्यासाठी गंभीर पाऊल उचलण्यास सहमती देतं तेव्हा कौटुंबिक आत्महत्या होते.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

डॉ. शुभांगी पारकर
सामूहिक आत्महत्या का घडत असतील, या प्रश्नामागे अनेकदा खूप मोठं आर्थिक नुकसान, दारुण अपमान ही कारणं असू शकतात, पण त्याहीपेक्षा मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही, कोणीच आपल्याला यातून सोडवू शकणार नाही, ही नैराश्याची भावना हे कारण मुख्य असतं. अर्थात याला गाजलेलं बुराडी प्रकरण अपवाद. एखादा म्हणतो आणि घरातले सगळे सदस्य मृत्यूला मिठी मारायला कसे तयार होतात हा गूढ प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. काय असू शकेल सामूहिक आत्महत्येमागची मानसिकता..

जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे आत्महत्या करण्यासाठी गंभीर पाऊल उचलण्यास सहमती देतं तेव्हा कौटुंबिक आत्महत्या होते. गेल्या २-३ वर्षांत कौटुंबिक आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडे महाराष्ट्राला अस्वस्थ करणारी, हृदय पिळवटून टाकणारी एक घटना आपण बातम्यांत वाचली, ती म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या वनमोरे कुटुंबातल्या नऊ जणांनी सामूहिकपणे विषप्राशन करून केलेली आत्महत्या. १ कोटी रुपयांचं सावकारी कर्ज घेऊन ते फेडता न आल्याचं आणि त्यांचा कर्जदारांनी अतोनात मानसिक छळ केल्याचं चिठ्ठय़ांमध्ये लिहून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी जाहीर झालं होतं, परंतु पोलिसांच्या तपासानुसार या आत्महत्या नसून हत्या आहेत आणि त्या प्रकरणी त्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे, मात्र त्यानिमित्तानं आठवल्या त्या गेल्या काही वर्षांतल्या सामूहिक आत्महत्या.

अशीच एक थरार निर्माण करणारी दुर्दैवी घटना दिल्लीत बुराडी येथे घडली होती. एकाच कुटुंबातल्या ११ जणांनी आत्महत्येचा करार करून सामूहिक आत्महत्या केली होती. घरातल्या सगळयांत ज्येष्ठ असलेल्या स्त्रीचा मृतदेह एका खोलीत पलंगावर सापडला होता, तर उर्वरित दहा मृतदेह लोखंडाच्या ग्रिलला हात-पाय बांधून, डोळयावर पट्टी बांधून लटकलेले आढळले होते. घटनास्थळी पोलिसांना एक डायरीही मिळाली होती. या कुटुंबातला धाकटा भाऊ ललित याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ‘कुटुंबाचा कर्ताधर्ता’ अशी जबाबदारी देण्यात आली होती. पोलिसांना मिळालेल्या डायरीतून गूढ माहिती समोर आली. डायरीत असं नमूद केलं होतं, की ललित त्याच्या स्वप्नांतून त्याच्या मृत वडिलांशी सतत संपर्कात राहिला होता आणि त्याच्या अंगात त्याच्या वडिलांचं प्रकटीकरणही होत होतं. त्यांनी दिलेल्या सूचना तो त्यांच्याच आवाजात हुबेहूब देत असे. साहजिकच या कुटुंबाचा ललितच्या अंगात प्रकटणाऱ्या वडिलांच्या आत्म्यावर गाढ विश्वास होता. ललितच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या त्या डायरीत घरातल्या सदस्यांनी कशा पद्धतीनं आत्महत्या करावी, काय धार्मिक विधी करावेत, हा आदेश होता. या सर्व सूचनांचं कुटुंबानं पालन केल्यास या जगातल्या वाईट गोष्टींपासून एक महान शक्ती त्यांचं रक्षण करील, असं वचन त्यानं दिलं. त्यामुळे ते सर्वजण भारावलेले होते. आपल्या देशात अंगात येणं वा वारं येणं हे सर्वत्र होत असतं. पण आत्महत्या केल्यानंतर आपलं रक्षण होईल यावर १५ ते ७५ या वयोगटातल्या ११ व्यक्तींचा विश्वास कसा बसला, हा मती कुंठित करणारा प्रश्न सर्वसामान्यांप्रमाणे मानसशास्त्रज्ञांनाही पडला. धार्मिक विचारसरणीच्या भ्रमात लोक कसे मतिहीन बनतात याचं हे उत्तम उदाहरण. मे २०२२ मध्ये दिल्लीतच एका स्त्रीनं पतीच्या करोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर नैराश्यग्रस्त होऊन आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केली होती. आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त होऊन तिनं हा टोकाचा निर्णय घेतला होता.

या सर्व कौटुंबिक आत्महत्या सामूहिक करारानुसार घडलेल्या आहेत. विकल परिस्थितीत माणसांची मनं तशीही भावनिकरीत्या प्रभावित केली जाऊ शकतात आणि त्या वेळची परिस्थिती किती कमकुवत आहे यावर या टोकाच्या निर्णयाचा प्रभाव ठरवला जातो. अशा कुटुंबातल्या सदस्यांकडे वैचारिक स्वायत्तता होती का किंवा त्यांना कुठल्या कारणानं दबावाखाली आणलं गेलं आहे वा त्यांना एखाद्या औषधाच्या प्रभावाखाली काबूत ठेवलं होतं का, या गोष्टींचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं. बुराडी मृत्यूप्रकरणी चौकशीअंती ललितच्या डायरीच्या आधारे एक अत्यंत धार्मिक कारण समोर आलं. तो स्वत: इतर सदस्यांवर आंधळी जरब आणि मानसिक पकड घट्ट ठेवतो. धार्मिक परंपरांचा पगडा बसवतो. बुराडीकांडात या कुटुंबाची कुठली सामाजिक वा आर्थिक विवंचना नजरेत आली नव्हती. ललितला घरातल्या सगळया सदस्यांची नि:संदिग्ध निष्ठा मिळाली होती. त्यानं बनवलेला मृत्यूचा सापळा कुटुंबाला या दुष्ट जगापासून वाचवण्याची आवश्यक रणनीती असल्याचं त्यानं, किंबहुना त्याच्यात ‘संचारणाऱ्या’ त्याच्या पित्यानं पटवून दिलं होतं. या घटनेकडे पाहाता, ललितला मानसिक आरोग्याची समस्या असावी. त्याशिवाय इतकं अवास्तविक आणि अतार्किकपणे सगळय़ांच्या जीवाला मृत्यूच्या गर्तेत सहज लोटण्यासाठीचा अनैसर्गिक भ्रम त्याला झाला नसता. इतर सगळेच मानसिक विकाराचे बळी असतील का, याबद्दल सांगणं कठीण आहे. पण त्यांच्यातल्या कुणालाही तर्कसंगत विचार करून भ्रमित ललितला काबून ठेवणं त्या वेळी तरी जमलं नाही. सगळे अतरंगी धार्मिक विधींच्या गूढ गुंगीत पोहोचलेले होते.

अर्थात बुराडी प्रकरण तर्काच्या पलीकडे जातं. भारतात धार्मिक भावुकता, अंधविश्वास आणि तंत्रमंत्राची मुळं आपल्या समाजात अगदी खोलपर्यंत आजही रुजलेली आहेत. अनेक बळीही यामुळे अनेकांनी एकत्रित येऊन दिले आहेत. आत्महत्येचे करार सामान्यत: सामाजिक आर्थिक विवंचना, सामाजिक पत ढासळणं- जिथे पीडितांना असहाय्य वाटून उज्ज्वल भविष्य दिसत नाही, नैराश्यासारखे गंभीर मानसिक आजार किंवा आपण हे असं मृत्यूप्रद धाडस एका दैवी कारणासाठी किंवा जगाला वाचवण्यासाठी करतो आहोत ही दृढ विश्वासप्रणाली, अशा अनेक कारणांमुळे घडलेले असू शकतात. कौटुंबिक आत्महत्येच्या अशा अनेक प्रकरणांमध्ये एक निर्णायक घटक असतो, तो म्हणजे या कल्पनेला खतपाणी घालणारी त्या कुटुंबातली सक्षम व्यक्ती. बऱ्याच वेळा ती व्यक्ती कुटुंब चालवणारी मोठी व्यक्ती किंवा म्होरक्या असते. ती पूर्ण बारकाईनं कौटुंबिक आत्महत्या पूर्णपणे सफल होईल या दिशेनं नियोजन करत असते. अशा व्यक्तीस आव्हान देणं इतरांना जमेल असं नाही, कारण एखाद्या जटिल परिस्थितीत सगळेच होरपळत असतात. अशा पूर्ण कुटुंबाचा काबू अधिकारवाणीनं घेत असलेल्या व्यक्तीस विरोध करायचा, तर विरोध करणाऱ्याला त्याहून प्रचंड ऊर्जा आणि उच्च प्रेरणेची गरज भासते. घरातल्या भ्रमित आणि भावुक झालेल्या इतर व्यक्ती त्यावेळी आपल्याला साथ देतील याची कोणाला खात्री नसते. घरातल्या व्यक्ती कधी अपरिपक्वतेनं, कधी भयानं, कधी सूचकतेचे बळी ठरल्यानं वा एकटे पडल्यानं मृत्यूच्या सापळय़ात अलगद उतरतात. कुटुंबातल्या सदस्यांचा बाहेरच्या जगाशी आणि वास्तवाशी पूर्णपणे संबंध तोडला जातो आणि त्यामुळे चार भिंतीत बंद ठेवून या व्यक्तींच्या मनावर पूर्ण कब्जा मिळवण्यात सामूहिक आत्महत्येचं नियोजन करणारी व्यक्ती यशस्वी ठरते. या जाळय़ातून बाहेर पडण्यासाठी घरातली एक व्यक्ती जरी सतर्क आणि सावध राहिली तर या आत्महत्या रोखता येणं शक्य आहे. बिहारमधल्या एका कुटुंबातल्या पाचही सदस्यांनी गरिबी, उपासमार, आर्थिक संकट, महागाई, बेरोजगारी यामुळे जीवाला कंटाळून गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. मुख्यत्वेकरून भारतात या अशा कारणानं कौटुंबिक आत्महत्या होतात. या आत्महत्या शेवटच्या क्षणी अचानक होतात असं नाही. कर्जदार त्यांना कित्येक महिने अपमानित आणि सामाजिकदृष्टय़ा नामोहरम करून सोडतात. सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागल्यानं निराशेनं आणि असहाय्य होऊन ही मंडळी आत्महत्या करतात.

घरच्या कर्त्यांधर्त्यांला अशा खच्चीकरण झालेल्या परिस्थितीत मनोमन खात्री पटलेली असते, की आपल्यामागे इतरांचा वाली कुणीही नाही. त्यामुळे ते कुटुंबाला भावुकपणे मृत्यूच्या गुहेत खेचतात.बंगळूरूच्या एका प्रकरणात एका कुटुंबात सतत भांडणं होत असल्यानं त्यातला पुरुष रागारागानं घरातून निघून गेला. तेव्हा त्याची पत्नी, मुलगा आणि लग्न झालेल्या दोन मुलींनी नऊ महिन्यांच्या आणि अडीच वर्षांच्या मुलांना आपल्यामागे उपाशीपोटी मरायला ठेवून आत्महत्या केली होती. यात पराकोटीचं भावनिक आंदोलन जाणवतं. कुटुंबातील सगळय़ांनीच सारासार विचार करायची शक्ती गमावल्याचं दिसून येतं. अशा कौटुंबिक आत्महत्या जगभर उच्च शिक्षण घेतलेल्यांमध्येही पाहायला मिळतात. त्यामागचं आत्महत्येचं नियोजनही चित्तथरारक असतं. बहुधा मागे ठेवलेल्या चिठ्ठयांमध्ये ते सापडतं. तर्कशुध्द आणि जीवनाला पुष्टी देणारे निर्णय घेण्याची असमर्थता हे याचं दुर्दैवी वैशिष्टय. प्रक्षेपित ओळख Projective identification ही यामागची मनोविश्लेषणात्मक संकल्पना मानली गेली आहे, जी या सगळय़ांच्या मनात आत्महत्येबद्दल सहानुभूतीच्या भावना निर्माण करते. कौटुंबिक आत्महत्यांमध्ये सगळयांनाच मरायचं होतं हा सिद्धांत चुकीचा आहे. लहान, निरपराध मुलं तर हकनाक मारली जातात. कुटुंबातला एखादा वा काही सदस्य जेव्हा अशा भेसूर कल्पना मांडतात तेव्हा घरातल्या कोणीतरी यातलं गांभीर्य ओळखायला शिकलं पाहिजे.

लोकांची वृत्ती आणि धार्मिक विश्वास किंवा इतर विचारांत विकृत किंवा अस्वाभाविक सूक्ष्म बदल दिसले, की त्याचा वास्तविक पातळीवर ‘हे योग्य किंवा अयोग्य’ हा विचार झालाच पाहिजे ज्या गोष्टी मानवी जगण्यासाठी मारक घटक आहेत किंवा मानवी मूल्यांच्या विरुद्ध आहेत त्याचा सांगोपांग विचार कुटुंबात झाला पाहिजे कोणत्याही धार्मिक, आध्यात्मिक गूढ गोष्टीसाठी किंवा मोक्षासाठी एखाद्या व्यक्तीनं आत्मत्याग करणं आणि इतरांना तसं करण्यास प्रवृत्त करणं हे कधीही सामान्य असू शकत नाही. असा विचार करणारी मंडळी मानसिक पातळीवर विकृत झाली आहेत, हे ठामपणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अशी अनेक गोंधळून गेलेली कुटुंबं त्यांच्या इतर नातेवाईंकांपासून, समाजापासून अलिप्त झाल्यानं नेमकी मदत जेव्हा हवी तेव्हा ती त्यांना मिळत नाही. त्यांना मानसिक उपचारांची आपत्कालीन पातळीवर निकड असते. माझ्याकडे अशीही काही कुटुंब येऊन गेली आहेत, की ती अशा गंभीर स्थितीत अडकली होती, पण त्यांच्यातली एक व्यक्ती जागरूक राहिली,आणि वेळीच या मृत्यूच्या सापळय़ातून सर्वजण बाहेर येऊ शकले. एक घटना आठवतेय, कर्जबाजारी असलेल्या नवऱ्याने नोकरी गेल्यावर त्याच रात्री घरी आल्यावर ‘आपल्या जगण्याला आता काही अर्थ उरला नाही’ असं सांगून पत्नीला ‘बाहेर कुणाशी संवाद साधायचा नाही’ अशी ताकीद दिली. विषाची मोठी बाटली घरात आणून ठेवली आणि ‘रात्री झोपायला जायच्या आधी मुलांना विष पाजू, नंतर आपण दोघं घेऊ,’ असं त्यानं तिला सांगितलं. मात्र बायकोला हे पटलं नाही. तिनं सतर्क राहून शेजारच्या मुलाकडे चिठ्ठी देऊन आपल्या नणंदेला तात्काळ भेटायला सांगितलं. तिच्या मदतीनं नवऱ्याला आपत्कालीन विभागात आणून रुग्णालयात दाखल करून घेतलं आणि पुढचा अनर्थ टाळता आला. अशी सतर्कता कुटुंबातल्या एका जरी व्यक्तीनं दाखवली तरी सामूहिक आत्महत्या टाळता येतील.

बऱ्याच वेळा कर्जबाजारीपणा आणि गरिबी ही समस्या असल्यानं सामान्य नातेवाईकांनाही व्यावहारिक पातळीवर ‘आपण काय करणार?’ असा प्रश्न पडतो. पण या कुटुंबाच्या बिकट परिस्थितीची आणि डळमळलेल्या मानसिक स्थितीची जाणीव असलेल्या नातलगांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांना परानुभूती दाखवत त्यांच्याशी संबंध ठेवले पाहिजेत. त्यांना काहीच नाही, तरी भावनिक आधार आणि जगण्यासाठी दिलासा दिला पाहिजे. त्यांनी छोटी-मोठी मदत केली तर ‘आपण या समस्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकू’ वा ‘आपल्या पाठीशी कुणीतरी आहे’ याची जाणीव त्यांना होईल. या सगळया कुटुंबाचं मानसिक विश्लेषण, मानसिक आजारांचं निदान आणि मानसोपचार अत्यंत निकडीचे आहेत. त्यांना भावनिक आधार आणि भविष्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहण्याची प्रेरणा द्यायला हवी. ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ अशी खात्री त्यांना समाजाकडून मिळायला हवी.
pshubhangi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Insult the mindset of mass suicide mindset amy