किन्नरी नेरुरकर
कष्ट करण्याची तयारी आणि प्रतिकूल परिस्थितीत संयम दाखवणं हे बहुतांशी स्त्रियामध्ये उपजतच असतं. मात्र दुष्काळानं ओस पडलेल्या विदर्भ, मराठवाड्याच्या मातीत कष्ट, संयम आणि जिद्दीनं जमीन कसणार्‍याही अनेक ‘एकल’ शेतकरी स्त्रियाआहेत, ज्यांनी नवर्‍याच्या आत्महत्येनंतर विरोध, उपेक्षा आणि अनिश्चिततेतून मार्ग काढत शेतवावरात ‘स्वावलंबन’, ‘स्वातंत्र्याचं’ बीज तर पेरलंच; पण स्वत:च खतांची निर्मिती करत सेंद्रिय शेती सुरू केली. आणि ना. धों. महानोरांच्या शब्दांतलं …मातीतून चैतन्य गाऊ लागलं! उद्याचा (८ मार्च) ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ शेतकरी स्त्रियांना समर्पित आहे, त्यानिमित्ताने या एकल शेतकरींच्या जिद्दीचा हा प्रेरणादायी प्रवास.

ती एक सर्वसामान्य स्त्री, घरातल्यांसाठी, कुटुंबासाठी राबणं इतकंच तिला माहीत. मात्र घेतलेल्या कर्जापायी शेतकरी नवर्‍याने आत्महत्या केल्यानंतर तिला शेतकरी होत घराबाहेर पडणं भाग पडलं. आज तिनं स्वकर्तृत्वावर चुकीच्या सामाजिक चालीरीती आणि पुरुषी व्यवस्थेच्या कपटव्यूहात टिच्चून-टिकून ही शेतजमीन नुसती कसली नाही तर फुलवली, बहरवली, वाढवली आहे. पूर्वी नवरा करत असलेल्या रासायनिक शेतीचं रूपांतर या शेतकरी ्त्रिरयांनी सेंद्रिय शेतीत केलं आणि आपला संसार कष्टाने पुन्हा उभा केला. स्वत: आशेने जगल्या आणि आपल्या मुलांनाही जगण्याची प्रेरणा दिली. आज या एकल शेतकरी आत्मविश्वासाने शेतात राबताहेत आणि त्यांची मुलं शिक्षण घेत आईच्या कष्टाचं सार्थक करत आहेत. या एकल शेतकरी ्त्रिरयांनी असं नेमकं काय केलं?

एकल शेतकरी ्त्रिरयांसाठी शेती पुन्हा सुरू करणं म्हणजे केवळ पिकं लावणं नव्हे, तर निर्णय घेणं, शिकणं होतं. जमिनीच्या कागदपत्रांपासून पिकांच्या निवडीपर्यंत, बियाणं-खत-फवारणीपासून बाजारपेठेतील व्यवहारांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांना नवं शिकावं लागलं. हातात अधिकार नव्हते पण तरीही जबाबदारी स्वीकारत त्यांनी शेती समजून घेतली. एके काळी जमीन ओसाड पडलेली,पण त्यात योग्य खत, पालापाचोळा वापरून जमिनीचा पोत त्यांनी सुधारला. या ्त्रिरयांनी सेंद्रिय शेती करून रासायनिक शेतीसाठी होणारा खर्च पूर्णत: थांबवला. काहींनी पडीक शेतजमीन ओलिताखाली आणली तर काही जणींनी नवरा कसत असलेल्या जमिनीत स्वत: पीक घ्यायला सुरुवात केली. नवर्‍याने आत्महत्या केल्यावर पहिला प्रश्न स्वत:चा आणि मुलांच्या पोटापाण्याचाच होता, म्हणून सुरुवातीला अर्धा एकर शेतीत कुटुंबापुरतंच पीक घेण्यासाठी या ्त्रिरया शेतीत उतरल्या. आपल्याला हे जमतंय, असा आत्मविश्वास आल्यावर त्यांनी सेंद्रिय शेतीची वाट धरली. पिकांसाठी लागणारं ‘दशपर्णी’ आणि ‘गांडूळ खत’ त्यांनी स्वत:च बनवायला सुरुवात केली. या खताचा फायदा असा झाला की, पूर्वी होणारी रासायनिक खतांची खरेदी बंद झाली.

  ‘दशपर्णी’ खत करण्यासाठी जंगलात जनावरं खात नसलेल्या सीताफळ, कडुलिंब, घाणेरी, रुईची पानं, पपई, धोत्रा, कणेरे, सदाफुली, करंज अशा दहा झाडांचा पाला या शेतकरी ्त्रिरया एकत्र करतात आणि त्यात गोमूत्र, पाणी, शेण घालून तीन दिवस भिजवत ठेवतात, त्यातून तयार केलेल्या अर्काची फवारणी पिकांवर केली जाते. गांडूळ खताची निर्मितीही अशीच केली जाते. यवतमाळच्या ‘प्रेरणा ग्रामविकास संस्थे’ने सुरुवातीला या ्त्रिरयांना गांडूळ विकत घेण्यासाठी मदत केली आणि याविषयी प्रशिक्षण दिलं. या संस्थेच्या सचिव माधुरी खडसे सांगतात, ‘‘अशा किती तरी एकल शेतकरी ्त्रिरया आहेत ज्यांच्या नवर्‍याकडे हक्काची मोठी शेतजमीन असतानाही पूर्ण शेतजमीन कधी कसलीच गेली नव्हती, मात्र या ्त्रिरयांनी स्वबळावर पूर्ण शेती ओलिताखाली आणली. या सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा दर्जा तर सुधारला शिवाय शेतकरी कुटुंबीयांच्या आजाराचं प्रमाण कमी झालं. आपसूक दैनंदिन जगणं आणि शेतासाठी लागणारा खर्च आटोक्यात आला.’’

त्यातलीच एक यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या तिरझडा गावची वैशाली देवतळे. हातात नऊ महिन्यांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा असताना तिच्या नवर्‍याने शेतीतल्या कर्जामुळे आत्महत्या केली. नवर्‍याच्या अंत्ययात्रेच्या दिवशी सासरच्यांनी मुलांसहित वैशालीला माहेरी सोडली ती परत घेऊन न जाण्यासाठीच… भावानेही साथ दिली नाही आणि तिचं माहेरचं छत्रही हिरावलं गेलं. काही दिवस गावातल्या एकीकडे राहिल्यावर वैशालीने सासरच्यांकडे तिच्या हक्काची मागणी करायला सुरुवात केली. सासरच्यांनी तिला राहायला जागा दिली, पण ती शेतजमिनीजवळच्या एका गोठ्यात… ज्यात दिवे नाहीत, दरवाजाला कडी नाही. नवर्‍याने आत्महत्या केल्यावर पुढचं सगळं आयुष्य मुलांसोबत जगायचं कसं, अशा परिस्थितीत असताना वैशाली जिकिरीने उभी राहिली. तिची कष्टाशी ओळख होती, पण शेती तिच्यासाठी पूर्ण नवखी होती. बियाणं विकत घेण्यापासून बाजारात कापूस विकण्याची सगळी कामं तत्पूर्वी नवराच करत होता. वैशालीने ही सगळी जबाबदारी मोठ्या धैर्याने उचलली आणि तिची शेती पिकवली. दशपर्णी आणि गांडूळ खत स्वत: तयार करू लागली. रासायनिक शेतीचं रूपांतर सेंद्रिय शेतीत करत शेतीवरचा खर्च कमी केला. आज पाच एकर शेतीत वैशालीने कापूस फुलवला आहे. अनेक वर्षं गोठ्याच्या जागेत राहिल्यावर किती तरी वर्षांनी वैशालीने सरकारी योजनेतून घर बांधलं. या गोठ्याच्याच जागेत बांधलेल्या घरात ती तिच्या मुलांसोबत राहतेय. मुलगी बारावी इयत्तेत आहे आणि मुलगा ‘आयटीआय’चं शिक्षण घेत आहे.

वनिता शेंडे या एकल शेतकरीच्या शेतात जेव्हा या वर्षी चार क्विंटल गहू आणि तुरीची पिकं डोलायला लागली तेव्हा तिचा आनंद व्यक्त करण्यापलीकडे होता. २००४ मध्ये वनिताच्या नवर्‍याने आत्महत्या केली. शेती आणि मुलीच्या लग्नात झालेल्या ५० हजार रुपयांच्या कर्जासाठी त्याने हे पाऊल उचललं. मुलगा शिक्षण घेत होता. वनिताने कंबर कसली. ‘रोजगार हमी योजने’तून शेतात विहीर खणली. तूर, गहू, मिरची पिकवली. खरीप आणि रब्बी दोन्ही पिकं घ्यायला लागली. आज वनिताचं शेत बहरलेलं आहे…

राळेगाव तालुक्यातल्या तेरणी गावातली सुचिता डंभारे ही अशीच एकल शेतकरी. नवर्‍याने आत्महत्या केली तेव्हा दोन मुलं तिच्या हातात होती. सासरच्यांनी सांभाळायचं नाकारलं. इतकंच काय, तर गाव सोडायला भाग पाडलं. शेतजमीन द्यायला नकार दिला. दोन मुलांसोबत आपणही आत्महत्या करावी, असे विचार मनात येत असताना तिला काही वर्षं माहेरची साथ मिळाली, पण मुलांच्या भविष्यासाठी अखेर सासरच्यांकडे तिने हक्काची मागणी केली. सासरच्यांनी एक खोली दिली, त्यात शौचगृह नाही की अंघोळीला स्नानगृह नाही. लहान मुलांची अंघोळ नालीच्या काठावर व्हायची. आणि सुचिता तिच्या खोलीत एका ड्रममध्ये बसून अंघोळ करायची. अखेर सासरच्यांशी भांडून तिने कसायला शेतजमीन मिळवलीच. आज पाच एकर जमिनीत सुनीता मूग, सोयाबीन, उडीद, तूर आदी पिकं घेत आहे. तिचा एक मुलगा वसतिगृहात शिकत आहे, तर दुसरा मुलगा शाळेत शिकत तिला शेतीत मदत करतो. अमरावती जिल्ह्यातल्या सोनगावमधील       संगीता ठाकूर हिने नवर्‍याच्या आत्महत्येनंतर दोन एकर शेतीत मेथी, पालक, चवळी असा सेंद्रिय भाजीपाला लागवड करत कुटुंबाचा सांभाळ केला. एक मुलगी आणि दोन मुलग्यांचे शिक्षण ही बाई स्वत:च्या हिमतीवर करत आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करते. मुलांच्या शिक्षणासाठी संगीताला थोडं कर्ज घ्यायला लागलं, पण तिने ते फेडलंसुद्धा. नवर्‍याच्या निधनानंतरही मुलांचं यशस्वी भविष्य तिच्या नजरेसमोर होतं त्यासाठी तिला आधार मिळाला तो शेतीचाच. यासाठी घरात आधीपासूनच असलेल्या गायीच्या शेणापासून तिने स्वत:च खतनिर्मिती केली आणि सेंद्रिय भाजीपाला घरासाठी आणि व्यवसायासाठी पिकवू लागली.

नवर्‍याच्या आत्महत्येनंतर या एकल ्त्रिरयांना शेती सहज पिकवता आली? नक्कीच नाही. खरं तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बहुतांश पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या शेतीव्यवस्थेत याचं उत्तर शोधावं लागत नाही. शेतकरी नवर्‍याच्या आत्महत्येनंतर तर सासरकडून दूषणं मिळतात ती त्याच्या पत्नीलाच… निधन झालेल्या पतीच्या नावे शेतजमीन असली तरी त्याविषयीचे निर्णय इतर कुटुंबीयच घेतात. तिथंही बाईच्या हातात अधिकार येतच नाहीत. शेतजमीन स्वत:च्या नावे करून घेण्यापासून हा संघर्ष सुरू होतो. जमीन तिच्या नावे झाली तर तिने कसूच नये यासाठी सासरकडून किंवा पुरुष समाज व्यवस्थेकडून प्रयत्न होतात. स्वावलंबी शेती करणं म्हणजे शेती करताना आवश्यक असे सर्व छोटे-मोठे निर्णय घेणं. ते स्त्रीला घेता येणं आपल्याकडे जवळपास अशक्यच. कारण तिच्या नावावर शेतजमिनीचा तुकडाही नसतो. त्या जमिनीवर तिने फक्त राबणं अपेक्षित असतं. नवरा सांगेल ती कामं करणं, सांगेल ती पिकं पेरणं, सांगेल ते बियाणं, सांगेल तीच फवारणी करणं आणि शेवटी बाजारपेठेतसुद्धा कुठं, कधी, कोणाला विकायचं या सर्वाचा निर्णय घरातला मालक, म्हणजे पुरुष शेतकरी करणार हे ठरलेलं. पण या सगळ्या आव्हानांना पेलत या ्त्रिरया केवळ शेतीतच नव्हे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये छोटे छोटे निर्णय घेत राहिल्या. त्यांना स्वत: स्वावलंबनाचे धडे गिरवावे लागले, प्रसंगी भांडण करावं लागलं, पटवून द्यावं लागलं, विरोध सहन करायला लागला, समाजाच्या प्रचलित रीतीविरुद्धही उभं राहावं लागलं आणि असं करत या एकल शेतकरी ्त्रिरयांंनी जे पीक पेरलं ते फुलवलं.

प्रतिकूल परिस्थितीतही सोनं उगवायची ताकद आणि क्षमता तिच्या बाईपणातच असते. व्यवस्थेविरोधात उभ्या राहिलेल्या या ्त्रिरयांंना हवा असतो, फक्त ‘तू लढ’ अशा शब्दांचा आधार… शहरापासून दूर कोपर्‍यात राहणार्‍या या एकलस्त्रियांचं जगणं आणि आव्हान समजून त्यांना हा दिलासा दिला तर त्या कोरड्या पडीक जमिनीलाही जिवंत करण्याची ताकद त्यांच्यात आहे.

या सर्व एकल शेतकरी ्त्रिरयांच्या यशाचं मोजमाप करता येणं शक्य नाहीच. कारण जिथं परिस्थितीनं हरवलं होतं, तिथं जगणं आणि जगवणं या दोन्ही भूमिकेत निडरपणे स्वत:ला उभं करणार्‍या स्त्रियांचं हे यश जमिनीइतकंच खोल आहे. या स्त्रियांनी केवळ स्वत:चे संसार सावरले नाहीत तर नवर्‍याच्या अकाली मृत्यूनंतर हतबल झालेल्या स्त्रियांसमोर आदर्श ठेवला,जिद्दीचा, स्वावलंबनाचा, आत्मसन्मानाचा…!