scorecardresearch

गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘आयुष्याचा परीघ व्यापक झाला’’

सध्या २२ देशांत या कंपनीचा माल निर्यात होतो. त्यांच्या संशोधनास पेटंटही मिळाले आहे. अमेरिका, जर्मनी आदी देशांतून त्यांच्या कामाची प्रशंसा झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| मुग्धा बखले-पेंडसे शुभांगी जोशी-अणावकर

Jayjaykar20@gmail.com

मराठीतून शिकल्यामुळे फायदाच जास्त झाला. मी माझ्या गावात, शेतात राहू शकलो. इंग्रजी माध्यमात शिकलो असतो तर मला बालपणापासूनच नाशिकमध्ये म्हणजे माझ्या गावापासून दूर जावं लागलं असतं. गावामध्ये राहिल्यामुळे मी लढवय्या बनलो. मला गावी चार किलोमीटरपर्यंत सायकलवरून जाणं माहीत आहे आणि अमेरिकेत हजारो किलोमीटर्स विमानाने जाणंही माहीत आहे. मला अमेरिकेत इंग्रजीतून प्रेझेन्टेशन्सही देता येतात आणि मला मी मराठी प्राथमिक शाळेत घेतलेले धडे आजही आठवतात. म्हणजे माझ्या आयुष्याला व्यापक परीघ मराठीमुळे मिळाला.

मनोहर शेटे हे नाशिकच्या ‘एम अँड एम इंडस्ट्रीज’चे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी आहेत. २००४ पासून ही कंपनी सेंद्रिय शेती औषधांचे उत्पादन करते आहे. सध्या २२ देशांत या कंपनीचा माल निर्यात होतो. त्यांच्या संशोधनास पेटंटही मिळाले आहे. अमेरिका, जर्मनी आदी देशांतून त्यांच्या कामाची प्रशंसा झाली आहे. वेगवेगळ्या देशात सरकारी/बिनसरकारी समित्यांवरही सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी मनोहर यांनी ‘टी. सी. एस.’ आणि ‘महिंद्र अँड महिंद्र’मध्ये संगणक क्षेत्रात काम केले आहे. महाविद्यालयात असताना १९९३मध्ये त्यांनी ‘युवकांना आवाहन-विवेकानंद’ हे पुस्तक लिहिले. मनोहर यांनी नाशिकच्या इंजिनीयरिंग कॉलेजमधून इंजिनीयरिंग पूर्ण केलं. त्यापूर्वी त्यांनी ‘कर्मवीर थोरात मुरकुटे कॉलेज’मधून अकरावी-बारावी पूर्ण केले. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या मूळ गावातल्या- दिंडोरीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्णपणे मराठीतून झाले होते. खेडेगावातून येऊन, मराठी माध्यमातून शिकूनही त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेणे हे अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामध्ये त्यांना माध्यमामुळे, भाषेमुळे काही अडचणी आल्या का आणि त्यांनी त्यावर कशी मात केली हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.

प्रश्न – मनोहर, दहावीनंतर आपलं शिक्षणाचं माध्यम पूर्णपणे बदललं. या बदलाशी तुम्ही कसं जुळवून घेतलंत? विशेषत: खेडगावातून शहरात आल्यावर हे कसं जमवलंत?

मनोहर : खरं सांगायचं तर तेव्हा थोडा न्यूनगंड निर्माण झाला होताच. सुरुवातीला एक दोन महिने आपल्याला हे जमू शकणार नाही, असंही वाटलं. पण ग्रामीण भागातून आलेली मुले जन्मत: लढाऊ  वृत्तीची असतात. आव्हान स्वीकारण्याची जिद्द त्यांच्यात असतेच. त्यामुळे शब्दकोशाचा आधार घेऊन, न समजलेला अभ्यासाचा भाग पुन्हा पुन्हा वाचून त्यावर मात केली. बहुतांश मुले आणि शिक्षकही मराठी माध्यमातूनच आले असल्यामुळे तेही आम्हाला समजून घ्यायचे आणि मदत करायचे.

प्रश्न:  पण मग  इंजिनीयरिंगला गेल्यावर काय झालं? ते उच्च शिक्षण घेणं जड गेलं का? का तिथेही बहुतेक मुले मराठीच होती?

मनोहर : नाही. तिथलं चित्र वेगळं होतं. मी इंजिनीयरिंग करत असतानाच्या काळात तिथे महाराष्ट्रा बाहेरील मुलेही प्रवेश घेऊ  लागली होती. आणि ती मुले इंग्रजी माध्यमातीलच असल्यामुळे जवळजवळ ५० टक्के इंग्रजी माध्यमातील मुलं व ५० टक्के मराठी माध्यमातील मुलं असं प्रमाण होतं. पण अकरावी, बारावीला इंग्रजी विषयाची सवय झाली होती. त्यामुळे फारशी अडचण आली नाही. फक्त कधी काही लोकांसमोर अथवा वर्गात इंग्रजीतून बोलण्याची वेळ आली तर प्रश्न निर्माण व्हायचा. किंवा परिषदा, तोंडी परीक्षा, मुलाखती, एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करताना जरा भीती वाटायची. पण भाषेत थोडं इकडे तिकडे झालं तरी आमचं तांत्रिक ज्ञान इंग्रजी माध्यमातील मुलांपेक्षा चांगलं असल्यामुळे आम्ही प्रादेशिक भाषेतील मुलं बाजी मारायचो. त्यामुळे आमचीच निवड  व्हायची. त्यांचा भाषेतील वरचढपणा परीक्षेतील गुणांमध्ये प्रतिबिंबित होत नसे.

प्रश्न: अरे वा! काय कारण असावं या मागचं असं तुम्हाला वाटतं? कारण त्या मुलांपेक्षा तर तुम्हाला जास्त अडचणी होत्या..

मनोहर : हो पण मला वाटतं, मराठीतून आम्ही प्राथमिक शिक्षण घेतल्यामुळे विषय समजून घेऊन आम्ही अभ्यास करत असू. त्यामुळे आमच्या मूलभूत संकल्पना पक्क्य़ा होत्या. याउलट इंग्रजी माध्यमातील मुले पाठांतर करून अभ्यास करत असत. मग तुम्हांला विषय समजला असो वा नसो. अलीकडे एक सव्‍‌र्हेक्षण करण्यात आलं होतं, त्यात असं आढळलं होतं की जवळजवळ ९७ टक्के आय.ए.एस. अधिकारी, आय.पी.एस. अधिकारी प्रादेशिक भाषेतून शिकलेले असतात आणि अधिकतर गावामधून अथवा उपशहरांमधून आलेले असतात. पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अथवा महसूल खात्यातील अधिकारी तर १०० टक्के प्रादेशिक भाषेतून शिकलेले असतात. इतकंच काय प्रादेशिक भाषेतील मुलं स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जास्त टिकतात, असा माझा अनुभव आहे.

प्रश्न:  फार महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत तुम्ही. नोकरी करायला लागल्यानंतर पुढे काय झालं?

मनोहर :  माझी कॉलेजमधल्या कॅम्पस मुलाखतीमधून ‘महिंद्रा अँड महिंद्रा’मध्ये निवड झाली होती. तिथे व्यवस्थापकीय मंडळामध्ये दाक्षिणात्य लोक जास्त होते. त्यांच्याशी आम्हांला इंग्रजीतूनच बोलावे लागे. त्यामुळे आमच्या इंग्रजी बोलण्यामध्ये सुधारणा झाली.

प्रश्न: नोकरीनंतर तुम्ही व्यवसायामध्ये आलात. तुमचा अन्य भाषिक लोकांशी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील परदेशी लोकांशी संबंध येतो. तेव्हा तुम्हाला त्यांच्याशी इंग्रजीमधून बोलताना अडचणी येतात का? आल्या का?

मनोहर : नाही. कारण आत्तापर्यंत काही गोष्टी लक्षात आल्या आहेत, कोणीच परिपूर्ण नसतो.  प्रत्येकाचं इंग्रजी वेगवेगळंच असणार आहे. आणि भाषेचा उपयोग माहितीची, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी होणार असतो. तांत्रिक गोष्टी, तंत्रज्ञान याची देवाणघेवाण करताना आपलं बोलणं दुसऱ्याला नीट कळलं आहे याची खात्री करुन घेतली की संवाद पूर्ण होतो.  त्यामुळे काही अडचण येत नाही.

प्रश्न: तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही कोणतं माध्यम निवडलंत?

मनोहर : आमच्या मुलीसाठी आम्ही पहिल्यापासून ठरवून, विचार करून निर्णय घेऊन मराठी माध्यमाची शाळा निवडली, कारण एक तर आम्ही दोघेही मराठी माध्यमातून शिकलो आहोत. आणि आमचा असा ठाम विश्वास होता की मराठीतून शिकल्यामुळे तिला व.पु.काळे, शंकर पाटील समजतील आणि पुढे जाऊन तिला हवं तर ती जे.के.रोलिंग ही वाचू शकेल. ती सातवीपर्यंत मराठी माध्यमात आणि आठवी ते दहावी सेमी-इंग्रजी माध्यमात शिकली. तिला त्यामुळे कविता वगैरे छान समजतात. आम्ही जे लहानपण अनुभवलं ते तिलाही अनुभवता आलं. पुढे अकरावी-बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन तिने सिएटल येथे ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’मध्ये पदवी प्राप्त केली. यंदा ती अमेरिकेत ‘ जेनेटिक कॉन्सिलर’ (आनुवंशिक सल्लागार) होईल.

प्रश्न:  वा! तुम्हां दोघांचं अभिनंदन! तुम्ही जाणीवपूर्वक मुलांना मराठी माध्यमात शिकवण्याचा निर्णय घेतलात. पण त्यावेळी प्रवाहाच्या विरुद्ध जाताना नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कारण त्यावेळी इंग्रजी माध्यम बऱ्यापैकी फोफावायला सुरुवात झाली होती. शिवाय तुम्हाला आपली मुले काळाच्या ओघात मागे पडतील का अशी भीती वाटली नाही का?   

मनोहर : त्यावेळी ७० टक्के मुलं ही इंग्रजी माध्यमात आणि ३० टक्के मुलं मराठी माध्यमात जात असत. त्यांना न्यायला येणारी गाडी, त्यांचा गणवेष हे कुठेतरी छाप पाडणारं होतं. पण त्याच वेळी ही खात्री होती की हे सर्व बेगडी आहे व आपल्या भाषेपासून दूर आहे. आम्हा दोघांनाही साहित्याची खूप आवड आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की मराठीतून शिकल्यामुळे ती आपलं साहित्य, वेगवेगळ्या लोकांचं तत्त्वज्ञान ती वाचू शकेल, कविता करू शकेल. शिवाय या विचारावर आम्ही ठाम होतो की जरी ती अभ्यासक्रमात थोडीफार मागे पडली तरी चालेल, पण आयुष्य जगताना लागणारी जीवनकौशल्ये तिला मराठीतच शिकता येतील. म्हणजे इंग्रजीतून न शिकण्याच्या तोटय़ापेक्षा ही मिळकत जास्तच.

प्रश्न:  नक्कीच. त्यामुळे या मुलांची नाळ आपल्या संस्कृतीशी जोडलेली राहते, त्यांना आपल्या भाषेत छान व्यक्तही होता येतं, मुलांचं व आपलं भावविश्व सारखं राहातं. 

मनोहर : अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो. तिच्या बरोबरची जी मुलंमुली होती, त्यांच्यामध्ये एक गोष्ट आढळली की त्या मुलांपैकी ज्यांनी मराठीतून अथवा मातृभाषेतून शिक्षण घेतलं, ती मुलं आयुष्यातल्या आव्हानांना सामोरी जाण्यास जास्त टिकाव धरणारी आहेत. इंग्रजी माध्यमातल्या मुलांना अभ्यासाचं अथवा यश मिळवण्याचा ताण आला की ती मुलं धूम्रपान अथवा अपेयपान याकडे वळतील. पण मराठी मुले मात्र डळमळीत होत नाहीत, असं मला वाटतं. मातृभाषेतून शिकल्यामुळे त्यांच्या विचाराचा पाया पक्का असल्यामुळे हे होत असावं. तुमची जी स्थलांतरित झालेली पिढी आहे,  तुम्ही जो तिथे टिकून रहाण्यासाठी जसा संघर्ष केला, तसा कदाचित पुढची पिढी करू शकणार नाही.

प्रश्न:  विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हा चिवटपणा, या मुलांमध्ये का कमी पडत असावा? इंग्रजी माध्यमातील मुलं दोन जगात वावरत असल्यामुळे, त्या संघर्षांमुळे होतंय का? 

मनोहर : नाही. मी जेव्हा याची मीमांसा करतो, तेव्हा मला वाटतं की मराठी शाळा या मुलांना वास्तववादी बनवतात. त्यांना नेहमीच जमिनीवर ठेवतात. ही मुलं जे काही असतं तेच दाखवतात. मात्र इंग्रजी माध्यमातील मुलांचं बोलणं, वागणं, त्यांची शरीरभाषा लहानपणापासून आभासी, बेगडी, इतरांना दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी असते अनेकदा. त्यातून मग अहंगंड निर्माण होतो आणि मग या मुलांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा ती गळून जातात.

प्रश्न:  मग ही मराठी शाळांची घसरण थांबवण्यासाठी काय उपाय केले पाहिजे?

मनोहर : अजूनही एक वर्ग असा आहे की जर चांगली मराठी माध्यमाची शाळा त्यांना उपलब्ध करुन दिली तर ते आपल्या मुलांना त्या शाळेत घालायला ते तयार आहेत. सेमि-इंग्लिश शाळा हा एक चांगला पर्याय आहे. म्हणजे भाषाही राहते आणि काळाला सामोरे जाण्यासाठी मुले पण इंग्रजीसाठी तयार होतील. आत्ताच्या सरकारने भारतात एकच बोर्ड असावं म्हणून एक मसुदा तयार केला आहे. त्यानुसार आय.सी.एस.सी., सी.बी.एस.ई. आदी सर्व बोर्ड्स जातील आणि भारतभर एकच बोर्ड व अभ्यासक्रम असेल.

प्रश्न:  मराठीतून शिकल्यामुळे काय फायदा झाला आणि काय तोटा झाला?

मनोहर : मराठीतून शिकल्यामुळे फायदाच जास्त झाला. मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्याकडे बघतो. मी माझ्या गावात, शेतात राहू शकलो. इंग्रजी माध्यमात शिकलो असतो तर मला बालपणापासूनच नाशिकमध्ये म्हणजे माझ्या गावापासून दूर जावं लागलं असतं. गावामध्ये राहिल्यामुळे मी लढवय्या बनलो. आयुष्याकडे मी जेव्हा वळून बघतो तेव्हा जाणवतं की मला गावी चार किलोमीटरपर्यंत सायकलवरून जाणं माहीत आहे आणि अमेरिकेत हजारो किलोमीटर्स विमानाने जाणंही माहीत आहे. मला अमेरिकेत इंग्रजीतून प्रेझेन्टेशन्सही देता येतात आणि मी मराठी प्राथमिक शाळेत घेतलेले धडे आजही आठवतात. म्हणजे माझ्या आयुष्याला व्यापक परीघ मराठीमुळे मिळाला. इंग्रजीतून शिकलो असतो तर हे शक्य झालं नसतं.

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interview with manohar shete founder of nashiks mm industries abn