– श्रद्धा राजेश

साखर दुधात विरघळली तरी तिची चव ती राखून असते, पण अनेक जणी कुटुंबातील प्रत्येकासाठी काही ना काही करताना स्वत:ला त्यात अशा विरघळवून टाकतात की त्यांचं अस्तित्वच स्वतंत्रपणे ओळखू येत नाही. तुमच्याही बाबतीत तसं होत असेल तर ‘ती’ च्या सारखं काही करायलाच हवं…

आज सकाळी अंगात कणकण होती म्हणून ती बिछान्यातून उठली नव्हती. खरं तर दोन दिवसांपासूनच तिला अशक्त, अस्वस्थ वाटत होतं, पण कुणाला सांगणार? नवऱ्याचे निवृत्तीपूर्वीचे शेवटचे दिवस म्हणून तो कामात मग्न. मुलगा आणि सून पायाला भिंगरी लावत धावपळ करण्यात गुंग. नातू तीन वर्षांचा. त्याला काय सांगणार?

हेही वाचा – मोडक्या व्यवस्थेचे कठोर वास्तव

घरातली ही मंडळी साडेआठला घराबाहेर पडली की ती आणि नातू दिवसभर एकत्र. एरवी तिला हे सगळं आवडत होतं. नव्हे, तिनंच स्वत: हा घरातला ‘जॉब’ घेतला होता. पण आताशा तिला जरा त्रास होत होता. तिचा स्वभाव तसा शांत, पण या वेळी तिला वाटत होतं, कुणाला तरी माझ्या चेहऱ्यावरून कळेल की, मला बरं नाही ते. पण दोन दिवस कुणीच तिची तिला हवी तशी दखल घेतली नाही. अखेर शारीरिक आणि मानसिक ताण सहन न होऊन आज तिला तापच भरला.

सात वाजता नवरा उठला तेव्हा बायकोला झोपलेलं बघून त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं तिला घाईघाईनं उठवलं. ‘‘अगं आज शेवटची महत्त्वाची मीटिंग आहे माझी. काल सांगितलं होतं ना तुला. झोपून काय राहिलीस? ऊठ पटकन. आज तुझ्या हातची कोथिंबीर वडी द्यायला सांगितली होती ना मी.’’ बोलणं संपवून तो बाथरूममध्ये पळाला. सून आत आली. ‘‘आई, काय हो आज उठला नाहीत. म्हणजे काल सांगितलं असतं तर मी लवकर उठून केलं असतं सगळं…आता सगळाच गोंधळ होणार.’’ तीही घाईघाईने निघून गेली.

उशीवर तिचे गरमगरम अश्रू पडत राहिले… ती तशीच झोपून राहिली. नंतर कधीतरी त्या ग्लानीतच तिला झोप लागली. अचानक जाग आली तेव्हा घड्याळात अकरा वाजले होते. ती कानकोंडी होऊन बाहेर आली तर घरात कुणीच नव्हतं. नातू कुठे गेला? तिनं घाबरून सुनेला फोन केला. ‘‘हॅलो आई, तुम्हाला झोप लागली होती. आम्हाला सगळ्यांनाच निघायचं होतं त्यामुळे लेकाला आईकडे ठेवलं आज. चला ठेवते मी फोन. काम आहे.’’

‘आई, तुम्हाला झोप लागली म्हणाली’ असं ही म्हणाली म्हणजे ते दिसलं हिला, पण का लागली हे विचारावंसंही नाही वाटलं? तिला नाही मुलाला नि नवऱ्यालाही नाही. तिला अगदी एकटं वाटलं. तशीच हताश होऊन बसली असताना तिला एक फोन आला. तिनं नाइलाजानं फोन उचलला. ‘‘अगं बाई हो का. अच्छा मग मी काय करू? चालेल. तुम्ही म्हणाल तसं. निघते मी. अंगात अशक्तपणा असतानासुद्धा तिनं साडी बदलली आणि खाली येऊन रिक्षात बसली…

संध्याकाळी सगळे घरी आले तर घराला कुलूप, असं कधी झालं नव्हतं. ती घरी असायची म्हणून कोणीच चावी घेऊन जात नव्हतं. एक तास वाट बघून चावीवाल्याला बोलावलं. पैसे गेले यापेक्षाही न सांगता कुठे गेली याचा सगळ्यांना राग आला होता. सुनेनं स्पष्टच सांगितलं, ‘‘मी दमून आले आहे. रोज आई आणि मी करतो स्वयंपाक. आज एकटीनं मला जमणार नाही. बाहेरून मागवा काही.’’

जेवण झालं तरी ती आली नाही तेव्हा मात्र सगळे चिंताग्रस्त झाले. अशी कधीही नाही गेली न सांगता. कुठे गेली असेल? काही झालं असेल का तिला? सगळ्यांच्या मनात फक्त प्रश्न, पण त्या प्रश्नांची उत्तरं देणारी मात्र गायब होती. रात्री खूप उशिरा दाराची घंटा वाजली. सगळे जागेच होते.

आज रात्री वाट पाहायची आणि सकाळी पोलीस स्टेशनला जायचं असं ठरवलं होतं. पण झोप कोणालाच येत नव्हती. दारात तिला बघून मुलगा पटकन तिच्याजवळ गेला. तिचा हात धरून आता घेऊन आला. तिच्याजवळ बसून म्हणाला ‘‘कुठे गेली होतीस गं. किती काळजी वाटली.’’ सूनसुद्धा जवळ आली.

नवरा लांबून बघत होता, पण नजरेत काळजी स्पष्ट दिसत होती. ती हेलावली. वाटतंय म्हणजे काहीतरी.

‘‘अरे…’’ घशातल्या हुंदक्याने तिला पुढे बोलवेना. सुनेनं पटकन पाणी आणलं. पाणी पिऊन शांत झाल्यावर सकाळपासून पहिल्यांदाच ती हसली. मुलाला जवळ ओढत म्हणाली. ‘‘अरे इथेच तर होते. सूनबाईच्या घरी. दोन दिवस बरं वाटत नव्हतं. अस्वस्थ होते, पण तुमच्या कोणाच्या लक्षातच आलं नाही, सकाळी ताप भरला होता म्हणून झोप लागली. पण आई उठली नाही तर साधं विचारायचाही प्रयत्न कुणी केला का?’’

नवऱ्याकडे बघत, ‘‘अरे माझ्या माणसानेसुद्धा विचारलं नाही. मी अजिबात तक्रार करत नाहीए, खरंच सांगते. हे घरात राहणं, सगळ्यांना सांभाळणं हे सगळं मला मनापासून आवडतं. पण तुम्ही सगळे विसरूनच गेलात रे की मी आहे. मलाही दुखतं-खुपतं कधी कधी. तुमच्यासाठी मी एक अदृश्य शक्ती होते जी बिनबोभाट सगळी कामं करत होते. आनंदात होते. म्हणून तेही मी स्वीकारलं, पण तुम्हापैकी कुणाचंही काही बिनसलं की चेहऱ्यावरून मी ओळखते असं तुम्हीच म्हणता ना. मग तुम्हा कोणालाच माझा चेहरा दिसला नाही का?’’

हेही वाचा – सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा

‘‘सकाळी उदास होऊन बसले असताना हिच्या आईचा फोन आला. आपलं पिलू माझी आठवण काढत होता. ‘आजीला काय झालं? आज झोपली का ती? तिला डॉक्टरकडे नेऊ या? तिला खायला देऊ या?’ अशा एक ना अनेक गोष्टी विचारत होता… आणि मग लक्षात आलं की चूक माझी आहे. तुमची नाही. मी स्वत:ला विसरले. वाहून घेतलं. अरे, गणपतीचं वाहन उंदीर आहे, पण त्याचीही जागा ठरलेली असतेच ना. तो नसला की चैन पडते का आपल्याला? मग मीच कशी माझी जागा बनवली नाही इथे? हिच्या आईनं आग्रह केला म्हणून गेले त्यांच्याकडे. अरे, दुधात साखर विरघळली तरी आपली वेगळी चव राखून असतेच ना. अर्थात हे मी चिडून नाही बोलत. पण विचार येतातच ना. आता बरं का सूनबाई. मी आणि तुझी आई उद्या दिवसभर बाहेर जाणार आहोत. मुलाचे, म्हणजे माझ्या आणि तुझ्याही काय करायचं ते ठरव तू पण आता अधूनमधून माझीही एक सुट्टी असणार आहे.’’ म्हणत मुलाला केसात हात घालून तिनं कुरवाळलं. त्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं जणू ती पुन्हा ताठपणे उभी राहिली.

सुनेलाही तिनं जवळ घेतलं.

‘‘सूनबाई मी ज्या चुका केल्या तू करू नकोस. आतापासूनच एक दिवस स्वत:चा ठेव.’’ तिनं न बोलता होकारार्थी मान हलवली…

त्यांच्या खोलीत आल्यावर नवरा बाजूला बसल्यावर मात्र तिचा बांध फुटला. ‘‘३५ वर्षं झाली आपल्या लग्नाला आणि अजून तुम्हाला बायको कळत नाही की कळून घ्यायची नाही? नाही, आता तुम्ही माझी समजूत काढू नका. मला नाही आवडणार ते, पण एक नक्की आहे दोन दिवसांनंतर तुम्ही निवृत्त झाल्यावर मी रोज संध्याकाळी दोन तास बाहेर जाणार. कुठे, कोणाबरोबर मला माहीत नाही, पण जाणार नक्की कारण आता मला कुणी गृहीत धरलेलं चालणार नाही.’’ असं सांगून ती शांतपणे झोपायला गेली तेव्हा तिचा चेहरा छान फुललेला होता.

एक नवी ती, तिची तिलाच नव्यानं मिळाली होती.

shubharambh.sk@gmail.com