माझं नाव श्वेता! पाच वर्षांपूर्वी माझं लग्न झालं, तेव्हा आम्हा दोघांचंही ‘करिअर’ जोरात होतं. आम्हाला घर घ्यायचं होतं. त्यामुळे पहिली तीन वर्षं आम्ही बाळाचा विचारच केला नाही. पण जेव्हा विचार केला, तेव्हा बाळाची चाहूल लागेना. दोन वर्षं वेगवेगळ्या डॉक्टरांच्या क्लिनिकचे उंबरठे झिजवले. सगळ्या पॅथी झाल्या. पण गर्भधारणा होईना. तेव्हा आमचा धीर सुटायला लागला. कुटुंबाकडून सतत विचारणा सुरू होती. सुरुवातीला मी स्वत: ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानासाठी बिलकूल तयार नव्हते, पण वय वाढू लागलं तेव्हा नाइलाजाने त्याचा विचार केला खरा! पण ते इतकं शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या क्लेशकारक असेल असं खरंच वाटलं नव्हतं मला! त्यात मी नोकरी करत असल्याने, हे उपचार घेत असताना इंजेक्शन्स घेऊन तडक ऑफिसला जाणं अक्षरश: जिवावर यायचं. आम्ही दोन वर्षांचं पॅकेज घेतलं होतं.
पॅकेजचा खर्च कमी असला तरी स्कॅनिंग, इंजेक्शन्स असा आमचा खर्चाचा आकडा आठ लाख रुपयांपेक्षा जास्त गेला होता. बरं एवढं करून आमच्या प्रयत्नांना यश येईलच याची शाश्वती नव्हतीच. ही अनिश्चितता आणि दरम्यानचा काळ खूप त्रासदायक होता. डॉक्टरांनी ‘आयव्हीएफ’चा सल्ला दिल्यावर त्या उपचारांना सुरुवात झाली. सुरुवातीला बारा दिवस या केंद्रात रोज सकाळी जाऊन एका वेळी दोन इंजेक्शन्स पोटात घ्यावी लागायची. पंधराव्या दिवशी एक ट्रिगर इंजेक्शन टोचून घेतलं. त्यानंतर स्कॅनिंग आणि रक्त तपासणी झाली. पुढे ‘रिट्रिवल प्रोसिजर’साठी एक दिवस सकाळी ‘आयव्हीएफ’ केंद्रात जाऊन दाखल झाले.
तिथे भूल देऊन सगळी प्रक्रिया केली गेली. तिथे त्या दवाखान्यात एकाच वेळी दहा-बारा तरुणींची हीच प्रक्रिया सुरू होती. सगळ्यांच्या चेहर्यावर ताण आणि अनिश्चितता बघून आपलाही धीर खचायला लागतो. मीही या प्रक्रियेनंतर शरीराने आणि मनाने एवढी थकले होते की, दोन दिवस घरात अक्षरश: झोपून होते. मात्र माझ्या स्त्रीबीजाची प्रत चांगली असल्याने प्रयोगशाळेत माझ्या पतीच्या वीर्यासोबत संयोग झाल्यावर स्त्रीबीज फलित झालं. पुन्हा एका सकाळी रुग्णालयात दाखल झाले आणि त्या फलित बीजाचे शरीरात रोपण झाले.
सुदैवाने माझी पहिल्याच ‘क्लिनिकल सायकल’मध्ये गर्भधारणा झाली. पण अनेकजणींना वारंवार या चक्रातून जावं लागतं त्यांच्यासाठी ते किती क्लेशकारक असेल, असं वाटून गेलं. हा संपूर्ण काळ कमालीच्या अनिश्चिततेचा असतो. आपण इतके रुपये खर्च करतोय, शारीरिक त्रासातून जातोय, करिअर पणाला लावतोय. पण एवढं करून गर्भधारणा होईलच याची शाश्वती नसल्याने मनावर खूप ताण येतो. इतर सहकारी मैत्रिणींचे अनुभव ऐकताना सतत खंत वाटत राहते की, यांचं इतकं सगळं सुरळीत झालं मग आपल्याच वाटयाला हे का? या यातना का?
सुरुवातीला आम्हा दोघांनाही आपल्याला मूल नाही याचा फारसा त्रास होत नव्हता. पण पुढे कुटुंबाकडून, समाजाकडून हळूहळू ताण येऊ लागला. तो वाढू लागला. त्यांचे प्रश्नांकित चेहरे बघून तो ताण इतका वाढला की, शेवटी तर मी भावनिक उद्रेकामुळे मनाने कोसळलेच. त्याचा माझ्या कार्यालयीन कामावर, माझ्या गुणवत्तेवर खूप परिणाम होऊ लागला. शेवटी वरिष्ठांनी मला जेव्हा त्याचं कारण विचारलं तेव्हा मला रडूच फुटलं. बरं हे सगळं नवर्याखेरीज कोणालाच माहीत नसतं.
आपण आपल्या इतक्या खासगी गोष्टी चारचौघांत सांगूही शकत नाही. त्यामुळे आपल्या मनाची खूप घुसमट होते. ‘आयव्हीएफ’ द्वारे मूल जन्माला घालणं हे काहीतरी अनैसर्गिक आहे,असं समाजाला वाटतं. त्यामुळे त्याचा स्वीकार नातलग करत नाहीत आणि समाजही करत नाही. प्रत्येकाला नैसर्गिक गर्भधारणेतून मूल व्हावं असंच वाटतं. खरं सांगायचं तर, या सामाजिक मानसिकतेचे एका टप्प्यावर आपणही बळी ठरतो. त्यामुळेच सरोगसी अथवा दत्तक घेणं या पर्यायांचा अगदी नाईलाज झाला तरच आपण अवलंब करतो.
आम्ही सुरुवातीला मूल दत्तक घेण्याचाही विचारही केला होता. पण ‘दत्तक विधान प्रक्रिया’ खूप किचकट असते असं लक्षात आलं. त्यामध्ये अनेक वर्षं वाया जातात. आपलंही वय वाढतं. माझ्या नवर्याचा मला खूप पाठिंबा असला तरीही खूपदा मला वाटायचं की, आईपणासाठी किती आणि कशा कशाची किंमत मोजायची आपण?
पण दोन्हीकडच्या पालकांचा आग्रह, अगदी पोटचं मूल, स्वत:चं नातवंड खेळवण्याची त्यांची अनावर इच्छा, समाजाच्या कुतूहलपूर्ण चौकस नजरा आणि स्वत:ला लागलेली मातृत्वाची ओढ याचा खूप जास्त ताण आपल्या मनावर येतो. त्यासाठी कितीही शारीरिक, मानसिक कष्टातून जावं लागलं आणि कितीही पर्याय उपलब्ध असले तरी आपण पोटच्या मुलाचाच विचार करतो.
मला आणखी एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. गर्भधारणेसाठी ‘आयव्हीएफ’चे तंत्र स्वीकारणारी स्त्री ही मनाने खंबीर आणि सकारात्मक असायला हवी. कारण तिच्या मानसिक ताणाचा त्याच्या यशावर खूप परिणाम होतो. ज्या मुली नैराश्य, धास्ती याने ग्रासलेल्या असतात. त्यांना वारंवार प्रयत्न करावे लागतात. याबरोबरच नवर्याचा आधार अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण गर्भधारणेनंतरसुद्धा कधीही काहीही होतं, होऊ शकतं. आता हेच बघा
ना मी नेहमीप्रमाणे ‘स्कॅनिंग’साठी गेले तर स्कॅनिंग होताच पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी त्यांनी मला इस्पितळात भरती व्हायचा सल्ला दिला. आणि त्याप्रमाणे मी दाखल झालेही. आपण अशा गुंतागुंतीची कल्पनाही केलेली नसते. त्यामुळे ‘आयव्हीएफ’चे उपचार घेतल्यापासून प्रसूत होईपर्यंत अक्षरश: अनेक दिव्यातून जावं लागतं.
पण खरं सांगू? आता माझ्या पोटात दिसामासाने वाढणारं माझं मूल त्या सगळ्या शारीरिक, मानसिक यातना मला विसरायला लावतं. ते लहानसं तान्हुलं कधी एकदा हातात घेतेय अशी अनिवार ओढ आणि ऊर्मी मनात दाटून येते. मला वाटतं माझं मूल जेव्हा मी हातात घेईन तेव्हा हा सगळा यातनामय काळ मी एका क्षणात विसरून जाईन…
शब्दांकन : माधुरी ताम्हणे
umadhuri.m.tamhane@gmail.com
