|| अपर्णा देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आईवडिलांनी मुलांचे मित्र व्हावं, असं म्हणता म्हणता आई-वडील म्हणूनच त्यांच्या असण्यात जो आदरयुक्त धाक असतो, तो हरवला. मुलांना मोकळीक देणं, घरात खुलं वातावरण असणं योग्यच. पण त्याचा अर्थ असा नाही, की मुलांची एखादी गोष्ट खटकल्यावर पालकांनी आपली नापसंतीही व्यक्त करू नये. मुलांशी नेमकं  कसं वागावं याविषयी पालकांमध्ये जास्त गोंधळ आहे? की त्यांचं वागणं दुटप्पी आहे? पालकांनी यावर गंभीरपणे विचारकरायला हवाय…

उंच स्टुलावर चढून भिंतीवरचं कोळ्याचं जाळं काढणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे बघून शोभाताई ओरडल्या, ‘‘अहो, काय करताय हे? खाली उतरा आधी! तरुण पोरं आहेत घरात. त्यांना सांगू ना! उगाच पडलात बिडलात, हाड मोडलं, तर के वढ्याला पडेल ते?’’

‘‘अगं होतंय तोवर करायचं! पोरांना कशाला सांगतेस लगेच? दिवाळी आलीय तोंडावर. आणि तू शंभर वेळा ओरडशील तेव्हा कुठे मुलं ऐकतील कदाचित. वर्षही संपेल तोपर्यंत!’’ नाइलाजानं खाली उतरत, हात झटकत शरदराव म्हणाले.

नवऱ्याचे हे शब्द दिवसभर शोभाताईंच्या मनात घुमत राहिले. त्या विचार करू लागल्या, खरंच, हे असंच होतं हल्ली. मुलं पटकन ऐकत नाहीत, मग आपणच काम हातावेगळं करून टाकू म्हणत पालकच सगळी कामं उरकतात. मुलांपर्यंत जातच नाहीत. परवाचीच गोष्ट- मुलांना सांगितलं होतं, ‘आज मुंबईहून मामा येणार आहेत. उद्या  सकाळी लवकर उठून तयार राहा. त्यांना एका ठिकाणी नेऊन सोडायचं आहे.’ पण मुलं रात्री जागत बसली आणि सकाळी वेळेवर उठलीच नाहीत. शेवटी शरदरावांनीच गाडी काढली. कडक शिस्तीच्या मामांसमोर आपल्यालाच ओशाळल्यासारखं झालं होतं. आणि शिस्तीचं म्हणावं, तर मामाच का, आपले आईवडीलसुद्धा किती शिस्तीचे होते! पहाटे उठणं, रात्री लवकर झोपणं, संध्याकाळी हात-पाय धुवून देवासमोर पसायदान म्हणणं, अशा गोष्टी अंगी भिनलेल्या सहजप्रवृत्ती म्हणून आपण करत होतो. कधी चांगल्या सवयी लागल्या हे समजलंच नाही. पाढे पाठ केल्याशिवाय जेवणाचं ताट मिळत नसे लहानपणी. आपण किती शिस्तीत वाढलो नाही? आपल्या पालकांनी घालून दिलेले नियम आणि शिस्तच आज स्थिर आयुष्य जगण्यास कारणीभूत आहे…’ हा विचार आला आणि शोभाताई चमकल्या. आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या पुंजीत नेमकं कोणतं दान टाकणार आहोत? आपण त्यांना योग्य ती शिस्त लावण्यात कमी पडतोय का? या विचारानं त्या अस्वस्थ झाल्या.

‘‘मॉम, आम्ही या वीकेंडला विकीच्या फार्महाऊसवर जातोय. शनिवारी दुपारीच निघू.’’ तनयानं सरळ आपला कार्यक्रम जाहीर केला. आईची परवानगी नाही मागितली. आईला अर्थातच ते खटकलं. आज निदान आपली मुलं न लपवता, सांगून सगळं करतात हे जरी योग्य वाटत असलं, तरी मुलीनं असं कुणाच्या फार्महाऊसवर जाणं आपल्याला अजिबात पटलेलं नाहीये, हे चेहऱ्यावर न जाणवू देता मीनाताईंनी विचारायला सुरुवात के ली, ‘‘मुक्कामी का जाताय? कोण कोण आहे? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणं नाही जमणार का? मुली किती आहेत? ’’

‘‘आता तूपण प्रियाच्या आईसारखे ‘ऑर्थोडॉक्स’ प्रश्न विचारणार आहेस का? आमचं ठरलंय गं सगळं. सांगते रात्री क्लासवरून आल्यावर.’’ हे बोलत तिनं स्कूटर सुरू केली आणि आई काही बोलण्याआधीच वेगात निघूनही गेली.

लहानपणापासूनच मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक दिल्यानं आता नेमक्या कोणत्या शब्दांत मुलीला ‘जाऊ नकोस’ म्हणावं याचा विचार करत मीनाताई तिथेच उभ्या होत्या. ‘हल्ली हे असं का होतंय? का आपण पटकन तनयाला विरोध नाही केला? मुलांना फटकारताना आपली जीभ का चाचरते? ती दुरावतील किंवा दुखावली जातील, असं वाटून आपण गप्प बसतो का? आपणच घेतलेल्या सुधारणावादी भूमिकेमुळे आता आपण अचानक जुन्या मतांचे वाटू अशी भीती आपल्याला वाटते का? बदललेल्या जगण्याशी हातमिळवणी करताना आपणच ओढून घेतलेल्या नव्या कातड्याखाली आपले संस्कार गाडले जात आहेत. हे बरोबर नाही. वागण्यातील कृत्रिमता कधीच मनाला भिडत नसते. आता लेक घरी आली की कडक शब्दात तिला ‘नाही’ म्हणायचं. काय महाभारत व्हायचंय ते होऊ देत.’ असा विचार करत मीनाताई घरात आल्या तर खऱ्या, पण आपल्या कडक शब्दांची धार केव्हाच बोथट झाली आहे, हे जाणवून त्यांना खूप अगतिक वाटत होतं.

मीनाताईंच्या आईनं त्यांना वेळोवेळी जाणीव दिली होती, ‘‘मीने, पोरांना वेळच्या वेळी ठामपणे नाही म्हणायची सवय लाव तू! लहानपणीच थोडं नियमात बसवावं. पाक घट्ट झालेले लाडूही वळत नाहीत गं! मग ही तर स्वतंत्र विचारांची पोरं आहेत. नको तिथे ढील दिली की पतंगही भरकटतोच.’’ आईनं सल्ला दिला होता, पण मीनाताईंना वाटायचं, की जुन्या काळातल्या शिस्तीचे नियम आज कसे लागू होतील? मुलांशी मित्रत्वानं वागायचं, तर थोडं त्यांच्या कलानं घ्यावंच लागतं. पण आता वाटतंय, की  कोणत्या विषयात किती कलानं घ्यावं, याचं गणित जरासं बिघडलंच.

संध्यासमोर तिची भाची बाहेर जाण्याची तयारी करत होती. खरंतर त्या दिवशी घरात सगळ्या मावस-मामे भावंडांचा मेळावा होता, काही भाचेमंडळीही येणार होती. ‘‘शानू, तू बाहेर निघालीस? आज सगळे येत आहेत ना घरी?’’ संध्यानं विचारलं.

‘‘हो गं मावशी, पण आमच्या इंजिनीअरिंगच्या फ्रें ड्सचं ‘जी.टी.’ (गेट टुगेदर) आहे आज. मी येईन रात्री अकरापर्यंत.’’

‘‘अगं, तुझ्या घरी जमतायत ना सगळे? महिनाभर आधीच ठरलं होतं ना हे?’’ आवाजात शक्य तितकं मार्दव आणत मावशीनं विचारलं.

‘‘चिल मावशी! धिस इझ लाईफ.’’ ओठांवरून लिपस्टिक फिरवत शानूबाई बोलल्या आणि पर्स उचलून उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या.

संध्याला राहावलंच नाही. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाऊन तिनं विचारलं, ‘‘तू  शानूला सांगितला नव्हतास का आजचा आपला प्लॅन?’’

‘‘ताई, सांगितलं होतं गं. सगळ्यांबरोबर तू असायलाच हवीस, असंही म्हटलं होतं. पण हल्ली मुलींना त्यांच्या प्रोग्रॅममध्ये अडवलेलं आवडत नाही. ‘आमच्या मैत्रिणींच्या गेट टुगेदरचं काय?’ असं म्हणाली.’’

‘‘तू नक्की आईच आहेस ना तिची? घरातल्या कार्यक्रमांसाठी आपण घरी असलंच पाहिजे, शेवटी सगळी आपली माणसं आहेत, हे ठणकावून सांगायची हिंमत होत नाही का तुझी? की  मुलांसमोर आपली ‘इमेज’ सांभाळायच्या नादात संस्कार आणि शिस्त गुंडाळून ठेवलीय माळ्यावर? तिच्या बाहेर जाण्याला माझा विरोध नाहीये. दोन कार्यक्रमांचं वेगवेगळ्या दिवशी नियोजन करणं, इतकं साधं आहे ना हे! तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मुलांशी बोला ना घडाघडा.’’ संध्याचं म्हणणं बहिणीला पटलं होतं, पण… हा ‘पण’च फार अवघड होता.

‘‘पप्पा, आनंदाची बातमी आहे. आम्ही नवीन ‘एस.यू.व्ही.’ घेतली काल. येतो दुपारी दाखवायला.’’ मनोजरावांचा जावई शंतनू फोनवर सांगत होता. त्यांनी जावयाचं अभिनंदन तर केलं, पण नंतर चिंतेत पडले. नुकताच नव्वद लाख रुपयांचा फ्लॅट घेतलाय, घरात दोन स्कूटर आणि चक्क दोन कारही आहेत. मग पुन्हा ही गाडी का घेतली असावी? त्याच्या आईवडिलांशी किंवा आपल्याशी न बोलता इतका मोठा खर्च?

‘‘तुम्ही का त्रास करून घेताय? तो जावई आहे, त्यांचा त्यांचा संसार आहे. आपण नको बाई बोलायला!’’ सासूबाई बोलल्याच.

‘‘मुलगी-जावई काय फक्त कौतुक करवून घ्यायलाच आहेत का? मुलासारखं मानतो ना आपण त्याला? ढळढळीत दिसतंय की अवाजवी खर्च चुकीचे आहेत. मग हक्कानं आपलं मत सांगायला नको? गरज जेव्हा लालसेचं रूप घेते ना, तेव्हा अनिर्बंध वर्तणुकीला प्रारंभ होतो बघ. फ्लॅटसाठी दहा लाख ज्या हक्कानं दिले आपण त्यांना, त्याच हक्कानं त्यांच्याशी बोलायला हवं. नको तिथे मूग गिळून बसल्यावर त्यांचं चुकतंय हे त्यांना कोण ऐकवणार?’’ मनोजराव म्हणाले.

तनया असो, शानू असो किंवा मनोजरावांचे जावई आणि मुलगी… घरातील मोठ्या मंडळींना आता आपण बोलावं की नाही, असं वाटणं चुकीचं नाही का? जीव तोडून प्रेम करणाऱ्या ज्येष्ठांची जीभ शिस्त आणि संस्कारांच्या बाबतीत अडखळणं, हे बेलगाम जीवनशैलीला खतपाणी घालणारं आहे.

लग्नानंतर मुलांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते… अगदी मान्य! पण समोरचा चुकतोय हे दिसत असूनही न बोलणं हा अतिरेक ठरेल. ही वेळ येऊच नये, म्हणून उधळणाऱ्या घोड्यांचे लगाम त्याआधीच आवळले गेले पाहिजेत.

मुलीनं एखाद्या विशिष्ट पार्टीला जाणं अजिबात पटत नसताना आईचं तिला नकार देताना चाचरणं वाईट नाहीये का? ठोंब्या मुलांना ‘बाब्या’ बनवत लोळत पडू देणं आणि बापानं त्यांची कामं करणंही वाईटच. खर्चाला दिलेल्या पैशांचा हिशेब विचारताना वडिलांची जीभ अडखळणंही वाईट. ‘मी तुझ्यावर मुळीच अविश्वास दाखवत नाहीये, पण तू या रकमेचा कसा विनियोग केलास ते मला सांग,’ असंही म्हणता येतं की! ‘पहिला मोबाइल उत्तम चालतोय ना, मग दुसऱ्या मोबाइलचा विषय आता अजिबात काढायचा नाही. त्यापेक्षा हवा तर एखादा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग लाव, मी पैसे देतो.’ हे कमावत्या मुलाला सांगताना वडिलांना अवघडल्यासारखं वाटणं चुकीचं. ‘मैत्रिणीशी फोनवर नंतर बोल. आधी मला या कामात मदत कर,’ हे सांगायला आईनं का कचरावं? करोनामुळे निदान स्वच्छतेच्या बाबतीत बरीच जागरूकता आलीय. नाहीतर महाविद्यालयातून आलेली मुलं न चुकता आल्याबरोबर हातपाय धूत होती का? जर उत्तर ‘नाही’ असेल तर त्याला जबाबदार कोण? नुकतंच शाळेतून आलेलं पोर आल्या आल्या मित्राला फोन करून आजचा गृहपाठ विचारत असे, तर ‘सोन्या, तुझं शाळेत बाईंच्या बोलण्याकडे लक्ष नसतं का? अजिबात असं मित्राला फोनवर विचारायचं नाही. वर्गात नीट लक्ष द्यायचं,’ हे आई-बाबा सांगत नसतील तर ते चुकीचंच नाही का? 

मुलं आपलं ऐकत नाहीयेत किंवा आपल्याला अजिबात न विचारता निर्णय घेत आहेत, हे जेव्हा पहिल्यांदा जाणवतं, तेव्हाच त्यांच्याशी निवांत बोलण्याची गरज असते. ‘तू हे करायचं नाही म्हणजे नाही!’ असं बिनबुडाचं वाक्य फेकल्यास मुलं तात्त्विक मुद्द्यांवर वाद घालून पालकांना नक्कीच निरुत्तर करू शकतात. त्यासाठी त्यांना समजेल, रुचेल, अशा पद्धतीनं समजावून सांगणं गरजेचं आहे. पूर्वी मुलांना सांभाळणं किती सोपं होतं नाही? वडिलांची नुसती चाहूल लागली तरी असतील नसतील तिथून येऊन पुस्तक हातात घेऊन बसत. ‘तोंड वर करून’ बोलायची हिम्मत नसायची (अर्थात त्यामुळे फार कमी घरांमध्ये पितापुत्रात मैत्रीचे संबंध होते हेही मान्य करावं लागेल). पूर्वी मिळतंय त्यात हवी तेवढी मजामस्ती चालायची, पण अवाजवी मागण्यांना थारा नसे. करंजी-लाडूला लज्जत होती! कष्टाची किंमत होती. नात्यांची कदर होती. दिनचर्येला आकार होता. ‘नाही’चा आदरयुक्त धाक होता.  पण आज मैत्रीचे संबंध राखताना तो ‘बडगा’, पालकांचा वाटणारा एक प्रकारचा धाक मिळमिळीत झालाय असं नाही वाटत?

आपल्याच मुलांशी वागताना आपण अत्यंत सुधारलेल्या, नवीन विचारांचे पालक आहोत, मुलांना संपूर्ण मोकळीक देणारे आहोत, त्यांना स्वतंत्र विचारांचे पंख देणारे आहोत, मग आता काही गोष्टींना विरोध केल्यास आपलं दुटप्पीपण उघडं पडेल, अशी भीती वाटते का पालकांना? मग वाटू देत की! पण जिथे हस्तक्षेपाची गरज आहे तिथे बोललंच पाहिजे.

आजच्या मुलांच्या वागण्यातला सगळा समतोल बिघडलाय असं जर वाटत असेल, तर नक्कीच त्याला कारणीभूत आहे पालकांचा चाचरता संस्कार आणि परिणामी ओशाळलेली शिस्त! तुम्हाला काय वाटतं?

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagan badaltana author aparna deshpande article discipline and discipline akp
First published on: 16-10-2021 at 00:03 IST