अपर्णा देशपांडेadaparnadeshpande@gmail.com

शिक्षण हा खूप महत्त्वाचा विषय करोनाच्या काळात दुय्यम असल्यासारखाच गणला गेला.  लहान-मोठी, सगळीच मुलंमुली घरात, संगणकावर जमेल तसं शिकत होती. नियमित शिक्षणवर्गाची, परीक्षांची सवय सुटलेली असताना त्यांनाही भरकटल्यासारखंच झालं. या सगळ्यात एकीकडे आई-वडिलांची चिंता वाढत होती आणि घराघरांत त्यावरून शाब्दिक खडाजंगीही! पण काहीही असलं, तरी आपल्या मुलांना आपल्यालाच समजून घ्यावं लागेल. प्रोत्साहित करावं लागेल. कारण घडलेला विपरीत बदल त्यांच्यासाठी अनपेक्षितच होता.

विचारवंत आणि लेखिका अ‍ॅग्नेस रेपली यांनी म्हटलंय, की ग्रहणक्षम मेंदूला शिक्षणापासून रोखणं आणि तर्कहीन मेंदूवर शिक्षण लादणं हे दोन्ही अशक्य आहे. या त्यांच्या विचारांचा प्रत्यय गेल्या दीड-दोन वर्षांत घराघरांत आला. सगळ्या जगाचे व्यवहार ठप्प झाले होते. त्याला शिक्षणही अपवाद नव्हतं. काही विद्यार्थ्यांनी त्या काळात ऑनलाइन पद्धतीनं अनेक ‘शॉर्ट टर्म कोर्सेस’ करून घेतले, तर अनेकांना तो वेळ सत्कारणी लावणं फारसं जमलं नाही. मुलांची अडचण आणि घालमेल पालकांना समजत नाही अशातला भाग नाही, पण इतका मोठा काळ मुलांना घरातच बघून त्यांचा त्यांच्याही नकळत स्वत:वरचा ताबा सुटतो आणि कुठल्याही इतर विषयावरून रागाची गाडी मुलांच्या ‘घरातच रिकामं असण्यावर’ घसरते.

दोन महिन्यांपूर्वीचा प्रसंग. सफल मान खाली घालून शांत बसला होता आणि त्याचे वडील- सुधीरराव त्याच्यावर ओरडत होते. ‘‘इतके महिने झाले नुसता घरात बसलाय! काही तरी नवीन कोर्स कर, मिळेल ती नोकरी कर, नाहीतर त्या भय्याच्या दुकानात जाऊन वाणसामानाच्या पुडय़ा बांध! पण असा माझ्यासमोर रिकामं बसू नकोस. माझं बी.पी. वाढतं.’’ आई बिचारी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती.

‘‘अहो, अभ्यास करतोय तो. रिकामा कुठाय? आणि या परिस्थितीत त्याचा काय दोष? इंजिनीअर झालाय तो. एव्हाना आधी ठरलं होतं तसं ‘एम.बी.ए.’चं कॉलेज सुरूही झालं असतं. हा एकटाच आहे का अशा परिस्थितीत? बाकीही अनेक मुलं वाट बघतच आहेत ना प्रवेश परीक्षा कधी होतेय याची?’’

‘‘कॉलेज कॅम्पसमधून चांगली नोकरी मिळत होती. ती यानं घेतली नाही. मॅनेजमेंट करायचं भूत होतं ना मानगुटीवर! आता हेही नाही, आणि तेही नाही. बसा घरात बोंबलत!’’ सुधीरराव कडाडले.  सफलनं शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला, ‘‘बाबा, मी ज्युनिअर मुलांचे ऑनलाइन क्लासेस घेतोय सध्या. अगदीच रिकामा नाहीये. आणि आता ‘सी.ई.टी.’ होतेय. मिळेलच मला एखादं चांगलं कॉलेज.’’ त्यावर बाबांनी हताशपणे ‘आता देवच वाली आहे’ अशा अर्थानं वरती हात दाखवले.

दरवर्षी साधारण मार्चमध्ये होणारी ‘सी.ई.टी.’ करोना साथीमुळे सहा-सात महिने उशिरा झाली. ‘कॅ ट’ ही प्रवेश परीक्षा मात्र पूर्वनियोजित काळातच झाल्यानं प्रवेश प्रक्रिया आणखीनच गुंतागुंतीची झाली आणि मुलांना त्याचा खूप त्रास झाला. असं सगळंच अनिश्चित असताना मुलांची मानसिक स्थिती कशी असेल हे आपण समजून घ्यायला हवं. कारण आज यश मिळवण्याइतकंच अपयश पचवता येणं हेही मोठं आव्हानच आहे.

‘‘काय रे, लागला ना बारावीचा निकाल? आणि तुझी बहीणही दहावीला होती ना या वर्षी?’’ बाहेर भेटलेल्या सम्राटला कॉलनीतल्या काकांनी विचारलं.

‘‘हो काका. चांगली ग्रेड मिळालीय. आता तिची अकरावी आणि माझी इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.’’

‘‘तुमचं बरं आहे रे! ‘कोविड बॅच’ ना तुमची. सगळं आयतं पडलंय झोळीत! आमच्या परागसारखी भयानक स्पर्धा झेलत, मान मोडून अभ्यास तुम्हाला नाही करावा लागला.’’ काकांच्या या खोचक बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे सम्राटला माहिती होतं. कारण ‘कोविड बॅच’ म्हणून सतत होत असलेली हेटाळणी त्याला नवीन नव्हती. तो म्हणाला, ‘‘काका, तुमचं बरोबर आहे. पण आमच्या ‘कोविड बॅच’च्या मुलांना जन्मापासूनच ऑनलाइन शिकण्याची सवय होती का? अचानकच या पद्धतीचा सामना करावा लागला आम्हाला. आणि परीक्षा कधी होणार? नेहमीसारखी लेखी होणार की तोंडी? ऑनलाइन होणार की शाळेत? फक्त बहुपर्यायी प्रश्न असतील की विस्तृत? सगळा अभ्यासक्रम असेल की मोजका?, याबद्दल खूप संदिग्धता होती. इकडून तिकडून उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यामुळे झटून अभ्यास तर आम्हीही केलाच. पण अत्यंत तणावाखाली. आता जे झालं त्यात आमचा काय दोष ना काका? आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं आणि त्यातून उत्तम मार्ग निवडणं जे आमच्या हातात आहे, ते आम्ही करतोय. येऊ मी? कागदपत्रं झेरॉक्स करायची आहेत.’’ सम्राटनं आपली बाजू मांडली, पण ‘खोचक काकां’ना ती किती पटली ते त्यांनाच माहीत.

करोना काळात सगळ्या जगात उलथापालथ झाली असताना आपली शिक्षण व्यवस्था, परीक्षा वेळापत्रक आणि एकूणच यंत्रणा यांवर फारच वाईट परिणाम झाला. मुलं घरातच होती. आणि सुरुवातीचा फार मोठा काळ शाळा-कॉलेज पूर्णपणे बंद असल्यानं एकदम रिकामी होती. अत्यंत अभूतपूर्व अशा काळातून सगळे जात असताना परीक्षा आणि त्याचं मूल्यमापन हा प्रश्न ऐरणीवर होता. बऱ्याचशा परीक्षा रद्द झाल्यानं अत्यंत तोकडय़ा पद्धतीनं मूल्यमापन झालं. त्यामुळे कुशाग्र बुद्धीचे, सर्वसाधारण आणि सुमार  कामगिरी करणारे विद्यार्थी कागदोपत्री गुणांच्या बाबतीत बहुतांशी एकाच पातळीवर आले. जे घडलं त्यात मुलांचा दोष नाही, हे बऱ्याच पालकांना नक्कीच समजतं. पण असलेल्या वेळेचा मुलांनी पूर्ण उपयोग करावा, नवीन नवीन कौशल्यं आत्मसात करावीत, अशी पालकांची इच्छा असते.

राजेशच्या घरात वेगळाच ताण सुरू होता. त्याची राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची वयोमर्यादा संपत आली होती. तीन वर्षांपूर्वी दिलेल्या परीक्षेनंतर मनासारखी पोस्ट न मिळाल्यानं त्यानं पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि परीक्षा खूपच लांबल्या. चांगलं पद मिळाल्यावर लग्न करू, म्हणत त्याचं लग्नाचं वयही वाढत गेलं. ‘‘डोकं फिरवलंय याच्या हट्टानं! सध्या कारकून म्हणून आहेस ना कामाला? मग मिळेल त्या मुलीशी लग्न करून मोकळा हो ना. आता किती अंत बघणार आहेस आमचा?’’ अप्पा राजेशवर जाम चिडले होते.

‘‘परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत यात माझा काय दोष? त्यात पुन्हा संयुक्त परीक्षा ऐन वेळेवर लांबणीवर टाकावी लागली. याआधी पण असंच झालं. नाही तर आतापर्यंत निवड होऊन मी मार्गी लागलो असतो ना? वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनी नेमकं काय करायचं, या बाबतीत स्पष्टता नव्हती. मला चांगलं पद आणि पगार मिळेपर्यंत मी लग्न करणार नाही.’’ राजेशनं जाहीर केलं.

वृषालीला २०२० मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं होतं. ‘जी.आर.ई.’ परीक्षेत तिनं उत्तम गुण मिळवले होते. पण करोना काळात सगळं गणित बिघडलं आणि आईचा सूरही बदलला. ‘‘बघ बाई, तुझ्यासाठी शैक्षणिक कर्ज घ्यायला आम्ही तयार होतो. पण आता या मधल्या काळात बाबांच्या व्यवसायाला कसा फटका बसलाय बघतेयस ना तू? हे अमेरिकेचं खूळ काढून टाका डोक्यातून आता!’’

‘‘आई, आतापर्यंत गेलेही असते मी तिकडे. पण सगळेच आराखडे चुकले. आता मी पुढच्या सत्रासाठी अर्ज करते. आमच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षाच होऊ शकल्या नाहीत, शिवाय आंतरराष्ट्रीय व्यवहार, प्रवेश प्रक्रिया, सगळं बंदच होतं.’’

‘‘पण आता वय खूप वाढतंय, तू इथेच नोकरी कर.’’ आई ऐकायला तयार नव्हती. शेवटी बाबांनी मुलीची बाजू घेतली.

‘‘काय बोलतेयस तू? आलेल्या परिस्थितीला ती कारणीभूत आहे का? इतके चांगले गुण मिळवले आहेत तिनं. चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळेल तिला. संपूर्ण करिअर बदलून जाईल तिचं. आयुष्यभर काय आपल्याशी बांधून ठेवणार आहेस का तिला?’’

‘‘आधी मीही तयारच होते ना? पण आता किती उशीर झालाय! इथून पुढे कधी प्रवेश मिळणार? कधी परदेशात जाणार? वय किती वाढेल तिचं! नको तिथे तिची बाजू घेऊ नका.’’

आईची ही भूमिका बघून बाबांनी वृषालीकडे बघून ‘मी आईला समजावतो, चिंता करू नकोस’ असं खुणावलं. चुणचुणीत आणि हुशार सुकृतला पाचवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळालं. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असूनही आईवडील त्याला वेगवेगळ्या परीक्षांत भाग घेण्यासाठी नेहमी मोठय़ा शहरात घेऊन जात असत. इथून पुढे कायम शिष्यवृत्ती मिळवत शिक्षण करण्याचं त्यानं मनाशी ठरवलं होतं. त्यासाठी विज्ञान, गणित आणि कॉम्प्युटरविषयक परीक्षा देत होता. आठवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी त्यानं खूप तयारी केली होती. पण परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या. वडिलांना करोना झाला आणि त्यातून ते बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांच्या आजारपणात सुकृतच्या अनेक परीक्षा द्यायच्या राहून गेल्या. अखेर शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली, ती ऑगस्ट २०२१ मधली. आणि दोनच दिवस आधी त्याचे वडील गेले. त्याही परिस्थितीत तो परीक्षा देण्यास तयार होता. पण घरातील मंडळी आणि आईच्या विरोधामुळे त्याला घरात बसावं लागलं. करोनामुळे अगदी कोवळ्या वयातच सुकृतसारख्या मुलांना आयुष्यातील खडतर गोष्टी बघाव्या लागल्या. नुसती क्षमता असून उपयोग नाही, त्याचं सोनं करण्याची संधीही मिळायला हवी ना!

लहान लहान गावांत किंवा मोठय़ा शहरांतही काही भागांत जिथे इंटरनेटची समस्या आहे, तिथे शाळेशी संपर्क तुटू नये म्हणून गटागटानं मोठय़ा वर्गातील मुलांना एक दिवसाआड शाळेत बोलावण्यात आलं  होतं. दीपक त्यांपैकीच एक. घरी वडील त्याचा अभ्यास घेत होते. आणि त्यांच्या रागाचा पारा चढला होता. ‘‘झोपा काढल्या वर्षभर. उंडारला नुसता! बाकी मुलं कुठल्या कुठे गेली. तुला साधा ‘ल.सा.वि.’ नाही काढता येत अजून?’’

‘‘चिडू नका हो. टाळेबंदीमध्ये आधी उंडारायला परवानगी तरी होती का? आणि इथे रेंज नसल्यामुळे मोबाइलवर काहीच बघता येत नाही. कसा शिकणार तो? पुस्तकातून आपला आपण अभ्यास करण्याची सवयच नाही पोरांना.’’ मुलाची बाजू सावरायला आई आली धावून.

‘‘पण त्यामुळे किती मागे पडतोय तो.. मला विचारलं असतं त्यानं, तर मी शिकवलं असतं.’’

‘‘तुम्ही करोना डय़ुटीवर होता ना.. म्हणून नाही विचारलं त्यानं. मला समजतंय की तो मागे पडलाय, पण शिकून घेतोय शेजारच्या दादाकडून. सरांना विचारेल चुकलं तर. तुम्ही आणखी त्रागा करू नका.’’

जिथे जगणं आणि श्वासच पणाला लागले, तिथे शिक्षणाचा प्रश्न दुय्यमच गणला जाणार! पण सगळं पूर्ववत होईल लवकरच. मुलांनाही नव्यानं पुनर्बाधणी करायला थोडा वेळ लागेल. पालक सूज्ञ आहेत, ते नक्कीच समजून घेतील. कारण जे झालं, त्यात मुलांचा तर दोष नाहीये ना!