|| अपर्णा देशपांडे
हल्ली लहान मुलंही आपली ‘प्रायव्हसी’ जपताना दिसतात. कु णी त्यांच्या खोलीत राहिलेलं त्यांना आवडत नाही. आपल्या वस्तू आणि खेळण्यांना कु णी हात लावलेला त्यांना चालत नाही. कु णी तरी आपल्याला काही करण्यासाठी टोकतंय हे त्यांना आवडत नाही. विभक्त कु टुंबपद्धती आणि एकच मूल असण्याचा एक परिणाम असलेल्या या मुलांना ‘मला, माझं, माझ्यापुरतं’ या मानसिकतेतून बाहेर काढणं, सगळ्यांत मिळून-मिसळून राहण्याची, ‘शेअरिंग’ची सवय लावणं हे नवीन पालक पिढीसाठी आव्हानात्मक ठरू लागलं आहे.   

‘‘आ ई, हे आजी-आजोबा कधी जाणार गं?’’ बारा वर्षांच्या रोहननं विचारलं आणि स्वयंपाक करता करता चित्राचा हात थांबला. सातच दिवसांपूर्वी आलेल्या तिच्या आई-वडिलांबाबत रोहन विचारत होता. ते तिला खटकलं, तरी संयम ठेवत तिनं विचारलं, ‘‘का रे? तुला छान खेळायला आजोबांसारखा पार्टनर मिळाला ना! तुला तर आवडतात ते!’’

‘‘हो, आवडतात, पण माझी ‘प्रायव्हसी’ जाते ना! आजोबा येता-जाता डोकावतात खोलीत, मी काय करतोय ते बघायला. मला नाही आवडत. मला माझं माझं काय काय करायचं असतं. त्यांनी टोकलेलं, ‘अभ्यास कर’ म्हटलेलं, रिमोट आपल्याकडेच ठेवलेला मला नाही आवडत.’’  रोहननं आजोबांची तक्रार करता करता गाडी थोडी वेगळ्या वळणावर नेली आणि म्हणाला, ‘‘शाळा झाली की माझ्याकडून माझा मोबाइल काढून घेता तुम्ही. आता मला माझा मोबाइल हवाय.’’ ‘माझा मोबाइल’ हे शब्द त्यानं कसे ठसक्यात उच्चारले हेही चित्राच्या नजरेतून सुटलं नाही. रोहनला कुणी कशासाठी दटावणं हा प्रकारच माहिती नव्हता. आजोबांचं रागावणं हा अपमान वाटत होता त्याला. चित्राला खूप आश्चर्य वाटलं. याला ‘प्रायव्हसी’ हवी? हे कुठून आलं याच्या मनात?

मुलाच्या एका प्रश्नानं तिच्या मनात दडपून झोपवलेला भुंगा जागा झाला. तिनं तात्पुरती त्याची समजूत काढली, पण ती अस्वस्थ झाली होती. असं का म्हणाला असेल तो? त्याला घरात कुणी तिसरं असण्याची सवयच नाही हे कारण आहे का? नात्यातल्या इतर भावंडांशी फारसा संपर्क नाही, त्याच्या खोलीत कुणी तिसरं येतंच नाही, म्हणूनच तो सुरुवातीला ‘आजी-आजोबा माझ्या खोलीत झोपायला नको’ असं म्हणाला होता का? मग याला माणसांची सवय कशी लावू? त्याच्या बाबांचे आई-वडील इथे येऊन राहू शकत नाहीत. अशानं रोहन माणूसघाणा होत जाईल ना! अशा असंख्य विचारांचा गुंता झाला तिच्या मनात.

चित्रानं काळजीनं हे सांगितल्यावर मुलांसाठी समुपदेशन करणाऱ्या रोहनच्या आजीला हसू आलं. ‘‘अगं, कोवळी माती आहे ती. आकार देऊ तसे बनतीलही, पण जुन्या काळातील घटासारखे हे घट कसल्याही वातावरणात तसेच टिकून राहतील अशी अपेक्षा चुकीची ठरेल. त्यासाठी कुंभाराला विशेष मेहनत घ्यावी लागणार गं. पूर्वीपेक्षा आताचा बदलाचा वारा जास्त सोसाट्याचा, ऊन जास्त कडक आणि पाऊसही बेभरवशाचा आहे ना? मग सगळ्या बदलत्या वातावरणात आजच्या घटांनी अगदी पूर्वीच्यांसारखाच चिवटपणा दाखवावा ही अपेक्षा आपण कशी ठेवू शकतो?’’

‘‘आई, पण चांगलं-वाईट  यातला फरक समजणं, चांगले संस्कार, वाटून घेण्याची वृत्ती, मूल्यं आणि नैतिकता, याचा काळाशी काय संबंध? काळ कुठलाही असो; वाईट ते वाईटच ना!’’ चित्रा म्हणाली.

‘‘बरोबर. पण हे संस्कार काय आभाळातून पडणार आहेत? की तुमच्या त्या ‘ब्लू टूथ’नं त्याच्या मेंदूत टाकता येणार आहेत? चित्रा, तुम्ही भावंडं लहान होता, तेव्हा आपण किती जण एकत्र राहात होतो. जे अन्न घरात शिजवलंय ते विनातक्रार खावं लागे तुम्हाला. जे काही होतं ते वाटून खात होता तुम्ही. अचानक येणाऱ्या पाहुण्यालादेखील प्रेमानं आपल्यातला घास काढून दिला जायचा. आज मात्र रोहनला जे आवडतं तेच तू करतेस किंवा तेच बाहेरून आणलं जातं. साहजिकच आहे ते! तुमचा सगळा

आनंद तुम्ही त्याच्यात बघता. प्रत्येक बाबतीत त्याची इच्छा आणि तो म्हणेल तेच प्रमाण! मग तुम्ही केलीत तशी बारीकसारीक तडजोड आणि गोष्टी विभागून घेणं  हे तो कसं शिकणार गं? तुम्ही मुलंसुद्धा घर घर किंवा शाळा शाळा खेळताना आम्हा मोठ्यांना तुमच्यात येऊ देत नव्हता. तुम्हालाही ‘प्रायव्हसी’ लागायची. फरक इतकाच, की तुम्ही बरीच भावंडं असायचा आणि आमचं चोरून, बारीक लक्ष असायचं.’’

‘‘मग मी काय करू आता?’’

‘‘जाणीवपूर्वक काही गोष्टी कर. आजचा काळ पालकांकडून अधिकाधिक कौशल्यांची मागणी करणारा काळ आहे. जेव्हा काही वेगळा पदार्थ तू करशील, तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या हातानं त्याला तो आपल्या सखूबाईला किं वा शेजारी, नाही तर कधी मावशीबाईला द्यायला सांगत जा. हा मेला टाळेबंदी प्रकार आटोपला की त्याला मावस, मामेभावंडांमध्ये मिसळायची सवय कर. कधी तरी इमारतीतल्या सगळ्या मुलांना एकत्र बोलाव. रोहनला आपल्या वस्तू, क्रिकेटचं सामान, गोष्टींची पुस्तकं त्यांच्याबरोबर वाटून घ्यायला लाव. जेव्हा मुलं नेहमी घरी येतील, तेव्हा ती टी.व्ही.पुढे कमीत कमी वेळ बसतील असे खेळ खेळायला लाव. जेव्हा जमेल तेव्हा रोहनला बॅडमिंटन  किंवा पोहण्याचा प्रशिक्षण वर्गही लाव. त्यानं सर्वांगीण व्यायाम होईल, सगळ्या मुलांमध्ये मिसळायची सवय होईल.’’

आजीनं चित्राला अनेक साधे-सोपे उपाय सांगितले होते आणि चित्राच्या मनातला भुंगा थोडा  शांत झाला.

अमेरिकन मानसतज्ज्ञ व्हर्जिनिया अ‍ॅक्सलाईन यांनी ‘डिब्स इन सर्च ऑफ सेल्फ’ या पुस्तकात छोट्या मुलांच्या एकलकोंड्या विश्वात शिरण्याचे सोपे मार्ग सांगितले आहेत. त्यांच्या मते आपण मुलांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर फार पटकन ‘लेबल’ लावून मोकळे होतो. त्याऐवजी ती असं का वागत आहेत हे समजून घेणं अधिक आवश्यक आहे.

विशाखाच्या घरातही असंच काही सुरू होतं.

‘‘बघ ना संदीप, हा अर्पित किती अडून बसलाय. लग्नाला यायचंच नाही म्हणतोय. आता याला एकटं कसं सोडणार घरात?’’ विशाखा नवऱ्याजवळ तक्रार करत होती.

‘‘अर्पित, काय झालं बेटा, तू का नाही म्हणतोयस?’’

‘‘बाबा, मला एखादा दिवस तरी एकटं राहू देत ना! मला प्रायव्हसी द्या ना जरा!’’ न समजून विशाखा आणि संदीप एकमेकांकडे बघत राहिले.

‘‘प्रायव्हसी? अरे, तू शाळेतून आल्यावर आई घरी येईपर्यंत एकटाच असतोस की तासभर. तुला एकटं राहावं लागू नये म्हणून जिवाचा आटापिटा करतो आम्ही आणि तू आहेस की…’’

‘‘तसंच आवडतं मला. मोठ्या आवाजात गाणी लावता येतात, कु णी न टोकता व्हिडीओ गेम खेळता येतो. मला हरवायचं आहे त्या विक्रांतला गेममध्ये. त्याचे १००० पॉइंट्स जमलेत आणि माझे फक्त ४०० च पॉइंट्स आहेत म्हणून ते सगळे चिडवतात मला.’’

‘‘कोणता गेम खेळतोस तू?’’ विशाखा आता काळजीत पडली होती.

‘‘ ‘किलर स्क्वाड’, ‘बॅड आर्मी’ आणि बाकीचेही गेम्स आहेत. आज मला ६०-७० जणांना शूट करायचंय, आणखी ‘आम्र्स’ कमवायचेत. तरच पॉइंट्स जमा होतील माझे. तुम्ही जा ना बाबा, मला घरीच राहू देत.’’

आई-बाबांना असे गेम्स असतात हे माहिती होतं, पण आपला लहान मुलगा इतक्या तीव्र भावनेनं गुंतून खेळतोय आणि कु णी अडवू नये म्हणून ‘प्रायव्हसी’ मागतोय, याची त्यांना अपेक्षाच नव्हती. आपलं याकडे इतकं दुर्लक्ष कसं झालं या विचारानं त्यांना अपराधी वाटू लागलं.

मुलांचं खरंच चुकतंय का? विचार करण्यासारखी बाब आहे. अनेक घरांत त्यांना दुसरं भावंडं नसल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची देवाणघेवाण होत नाही. कधी आपण नमतं घेणं, चांगल्यासाठी हार मानणं माहितीच नाही. अशानं पराभव पचवण्याची ताकद राहात नाही त्यांच्यात. बाहेरच्या जगात टिकाव लागण्यासाठी असणारा चिवट कणखरपणा कसा येणार अंगात? शिवाय नातेवाईकांकडे नियमित जाणंयेणंही अगदीच कमी असेल तर इतर मुलांशी जुळवून घेण्याची वृत्ती कशी शिकणार? घरातही आईवडिलांशिवाय (तेही काही तास) कुणी दिसत नाही, शाळा, शिकवणी आणि काहींचे कॉम्प्युटर कोडिंग वर्ग याव्यतिरिक्त मेंदूला आणि क्रियाशीलतेला चालना देणारे उपक्रम नाहीत…

आणि त्यांना बघायला काय मिळतंय? आभासी जगातील आवाक्याबाहेरचं जग.  वास्तवाशी संबंध नसलेलं आयुष्य ते जगतात. काही कॉम्प्युटर गेम्स तर भयानक हिंसा, क्रूरता, निर्विकारपणे विध्वंस करणं हेच शिकवतात.  मुलांना प्रचंड  व्यसन लावण्याची ताकद आहे त्यात. तुफान मारधाड असलेल्या खेळातून एकमेकांवर कुरघोडी करण्याची अघोरी, कपटी मानसिकता तयार होते. मैदानी खेळातून मिळणारी  खिलाडूवृत्ती या मोबाइलवरच्या खेळातून कशी  निर्माण होणार? मुलांनी स्वत:ला घडवत इतर मुलांशी सकारात्मक स्पर्धा नेमकी कुठे आणि कशी करावी, हे पालकांनी समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे. एकलकोंडी आणि अंतर्मुख मुलं आपल्याच विश्वात असतात. कुणी जोरात बोललं तरी त्यांना रडू येतं, साधं परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून स्वत:ला आपल्या खोलीमध्ये कोंडून घेतात. जीवनसंघर्षात मुलं चिवटपणे उभी राहायला हवी असतील तर त्यांना समाजाभिमुख करणं आवश्यक आहे.

आपल्या सभोवताली प्रचंड मोठं विश्व आहे. इथे  ‘मी, माझं, माझ्यापुरतं’ अशी संकुचित वृत्ती पूर्णत: चुकीची आहे, हे सोदाहरण समजावून सांगितल्यास खूप फरक पडतो, हा अनुभव आहे. आपलं जीवनविश्व समृद्ध करणारा एकांत आणि माणूसघाणेपणातून ओढवून घेतलेला एकटेपणा यातील फरक मुलांना अशा अनेक अनुभवांतूनच समजू शकतो. मग त्यांची ‘प्रायव्हसी’ हा पालकांच्या चिंतेचा विषय कधीच ठरणार नाही.

adaparnadeshpande@gmail.com