आपण काहीही, कितीही, केव्हाही आणि कसेही खाल्ले तरी पचनसंस्था तिचे काम बिनबोभाट करतच असते याकडे आपले आदरयुक्त लक्ष कधीच जात नाही. उलट आपण तिच्यावर अनावश्यक ओझं लादतच असतो. त्यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे ते ‘एक्झिट धोरण’. ते व्यवस्थित असेल तर शरीराचे ५० ते ६० टक्के विकार टाळता येऊ शकतील.

आपण एखाद्या मोठय़ा ऑफिस, बिल्डिंग किंवा मॉलमध्ये वाहन घेऊन गेलो की प्रथम दृष्टीस पडतात त्या पार्किंगच्या एन्ट्री आणि एक्झिटच्या पाटय़ा. एन्ट्रीपासून एक्झिटपर्यंत वन-वे ट्रॅफिक असते. तिचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत होते आणि ट्रॅफिक जॅम, अपघात टळतात. आपल्या शरीरातही अशीच एक सिस्टीम आहे तिचे नाव पचनसंस्था. ही पोकळ टय़ूबप्रमाणे असून (लांबी सुमारे ३० फूट ) तिची एन्ट्री तोंडापासून असते व एक्झिट गुदद्वाराशी असते. आपल्या आहाराची ही वन-वे वाहतूक व्यवस्था आहे. अपवाद फक्त अन्नातून विषबाधा झाली, अपचन झाले तर अशा आपत्कालीन परिस्थितीत विषारी अन्नपदार्थाची लवकर बाहेर रवानगी करण्याकरता, प्रवेशद्वाराचा (तोंडाचा) वापर केला जातो. आपली पचनसंस्था ही कधीच न थांबणारी प्रक्रिया-यंत्रणा आहे.
जेवताना जे अन्न आपण तोंडात टाकतो त्यावर जठरात आणि लहान आतडय़ात अनेक रासायनिक क्रिया होतात व अन्नातील कबरेदके, प्रथिनं व चरबीयुक्त पदार्थाचं पचन होऊन ते रक्तामध्ये शोषून घेतले जाते व अन्नाचा उरलेला भाग मोठय़ा आतडय़ात प्रवेश करतो. यातली बरीचशी माहिती आपल्याला ऐकून किंवा वाचून ज्ञात आहे. आपले लक्षही बहुधा इथपर्यंतच मर्यादित असते. पण आज आपण लक्ष देणार आहोत ते मोठय़ा आतडय़ात काय काय चालते त्याकडे. इथेही बऱ्याच रासायनिक क्रिया होतात, पण त्याकडे न पाहता आपण केवळ एक्झिट क्रियेकडेच पाहणार आहोत. अन्नातला टाकाऊ भाग (वेस्टेज), न पचलेला भाग (आपण जे खातो ते सगळंच पचतं असं नाही), फायबर, मृत पेशी, यकृतामधील पित्त , शरीरातील जंतू, टॉक्सिन्स व पाणी इतके मिळून जे तयार होते त्याला मल म्हणतात. हा मल शरीराबाहेर टाकणे हे अन्नग्रहण व पचनाइतकेच महत्त्वाचे आहे. हे मलविसर्जन व्यवस्थित होण्यासाठी एक धोरण किंवा कार्यनीती (एक्झिट स्ट्रॅटेजी) असणे गरजेचे आहे. या कामात अडथळा येत असेल तर त्याला मलावरोध (कॉन्सटीपेशन) म्हणतात. आपल्या शरीरातील बऱ्याचशा व्याधींचे हे मूळ असते. मूळव्याध, फिशर्स, पॉलिप्स, तोंड येणे अशा किती तरी पचनाशी संबंधित विकारांचे, तसेच निद्रानाश, चिंता, काळजी अशा परिणामांचेही बऱ्याचवेळा मलावरोध हे मूळ असते.
मलविसर्जनाचे महत्त्व सांगणारा एक प्रसिद्ध इंग्रजी विनोदी किस्सा सांगितला जातो . असे म्हणतात की जेव्हा माणसाचे शरीर निर्माण झाले तेव्हा प्रत्येक अवयवाला आपले श्रेष्ठत्व सांगायचे होते – बॉस व्हायचे होते. मेंदूचे म्हणणे, ‘मी सबंध शरीराचे नियंत्रण करतो, तेव्हा साहजिकच मी बॉस.’ त्यावर हृदय म्हणाले, ‘माझ्यामुळे शरीर जिवंत राहते मग मीच बॉस नाही का?’ याप्रमाणे हात,फुप्फुस, डोळे असे सर्वजण आपापले श्रेष्ठत्व सांगू लागले. शेवटी, गुदद्वार आपणच बॉस होण्यास कसे लायक आहोत हे सांगायला लागताच सर्व अवयव खदाखदा हसू लागले. ते पाहून ते ‘बघाच आता!’ म्हणून संपावर गेले. त्याचे काम बंद पडल्यावर शरीरात एकच हलकल्लोळ माजला. डोळ्यांना झापड आली, हाता-पायातले त्राण गेले, हृदय फुप्फुसाचे कार्यही गडबडू लागले, जठर काम करेना आणि मेंदूचेही काम मंदावले. शेवटी सर्वानाच गुदद्वाराचे महत्त्व पटले.
लहानपणी योगासने शिकताना आमचे सर एक वाक्य सतत उच्चारत असत. ‘(काहीही) खाऊ की नको?’ असे वाटत असेल तर ‘नको’ हेच त्याचे उत्तर असते आणि ‘(मलविसर्जनाला) जाऊ की नको?’ असे वाटत असेल तर ‘त्वरित जा!’ त्या वेळी हे वाक्य उच्चारायचीच काय पण ऐकायचीसुद्धा लाज वाटत असे. पण काही काळानंतर त्याचे महत्त्व पटले आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात केल्यावर निसर्गदत्त आरोग्याचा लाभ घेता आला. बरेच जण फोन आला म्हणून किंवा व्हॉट्सअ‍ॅप्सचे मेसेजेस चेक करायचे म्हणून किंवा सकाळचा पेपर वाचण्यात गुंग असतात म्हणून निसर्गाचा मेसेज मात्र घेत नाहीत आणि अभावितपणे शरीराला ही घातक सवय लागते. आपल्या सर्वाचाच हा अनुभव आहे की खाऊन पोट भरल्याच्या आनंदापेक्षा ‘जाऊन’ आल्यावर होणारे समाधान जास्त असते. बऱ्याच लोकांना टॉयलेट सीटवर पोट रिकामे झाल्यावर अनेक सर्जनशील कल्पना सुचतात. पाळण्यातली लहान मुले पहा. इकडे आईकडून दूध पिऊन तृप्त झाल्यावर दुसऱ्या बाजूने एक्झिट झाले की किती आनंदात दिसतात. लगेच हातपाय मारायला लागतात. हे झाले सजीवांच्या बाबतीत. पण दगड-विटांचं घर बांधतानासुद्धा चांगला आर्किटेक्ट/ इंजिनीअर प्रथम घरातून सांडपाण्याचा निचरा कसा होईल याचे नियोजन करतो.
सौंदर्याचे प्रतीक म्हणजे चेहरा. तो सुंदर दिसावा यासाठी मुलं-मुली, तरुण-तरुणी, मध्यमवयीन स्त्री-पुरुष सगळेच प्रयत्नात असतात. त्यासाठी जाहिरातीतून दिसणाऱ्या प्रसाधनांचा मनमानी वापर (बुद्धीला कोणताही प्रश्न न विचारता) सर्रास केला जातो. चेहऱ्यावरची मुख्य समस्या म्हणजे मुरमं. यासंबंधात तर अनेक तीव्र केमिकल्स असलेली लोशन्स/ क्रीम्स लावली जातात. याचा परिणाम होत नाही असे दिसल्यावर मुरमं झाकून टाकण्यासाठी कन्सिलिंग क्रीम्स वापरली जातात. क्रीम बाहेरून लावून मूळ प्रश्न संपत नाही. बऱ्याचदा मुरमांचे कारण हे पचन क्रियेतील बिघाड आणि त्याचे पर्यवसान म्हणून झालेला मलावरोध हे असते. यावर ‘युक्त आहार विहार’ अशी उपाययोजना केल्यास मुरमं आपोआप बऱ्या होऊन चेहरा सतेज होतो. या उपाययोजनेचा परिणाम हळूहळू होत असल्याने यासाठी बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो. घाई करून चालत नाही. संयम बाळगावा लागतो.
आपल्या जीवनाच्या सर्व गरजांच्या बाबतीत आपण खूप जागरूक असतो. सर्व माहिती घेऊन तर्कयुक्त आणि बुद्धिनिष्ठ निर्णय घेतो. म्हणजे करिअर, आर्थिक गुंतवणूक, विमा, घर, नातेसंबंध वगैरे. पण आरोग्याचा आणि विशेषत: त्याकरिता लागणाऱ्या योग्य आहाराचा प्रश्न येतो तेव्हाही आपण आपली बुद्धी वापरली तर एक्झिटचे प्रश्न टाळता येतील. त्याकरता वेळी अवेळी, वाटेल ते, वाटेल तितक्या प्रमाणात खाणे, तसेच प्रोसेस्ड फूड आणि सॉफ्टड्रिंक्सचे सेवन, अल्कोहोल, धूम्रपान, कडक चहा कॉफी टाळले पाहिजे. त्याऐवजी फायबरयुक्त (तंतूमय) अन्न, भरपूर पाणी (सॉफ्टड्रिंक्स हे पाण्याची जागा कधीच घेऊ शकत नाही) यांचा आहारात वापर असावा. तसेच नियमित झोप (आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी विनामूल्य असतात) आणि व्यायाम यांचाही दिनचर्येत समावेश असावा. या अगदी सहज करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. थोडक्यात, लाइफस्टाइल बदलायला हवी. एक्झिट समस्या टाळण्यासाठी आपल्या पचन संस्थेला नियमितपणे मलविसर्जनाचे शिक्षण (बॉवेल ट्रेनिंग) द्यावे लागते. काही वेळा शरीरातील इतर विकारांवर घेत असलेल्या औषध उपचारामुळे मलावरोध होऊ शकतो (उदाहरणार्थ पार्किन्सन डिसीज). यासाठी मात्र डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. मलावरोधावर पर्गेटिव्ह (रेचक) घेणे हा अगदी सर्वसामान्य उपाय असतो. हा उपाय सोपाही असतो. त्यामुळे त्याची शरीराला सवय जडते. कालांतराने ही सवय आपल्या पचन संस्थेला (मोठय़ा आतडय़ाला) दुर्बल करते व त्याचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात. एक लक्षात ठेवले पाहिजे की एक्झिट धोरण व्यवस्थित असेल तर शरीराचे ५० ते ६० टक्के विकार टाळता येऊ शकतील.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, दिल्लीतील एका पेडियाट्रिक गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्टच्या पाहणीत – ४० टक्के शालेय मुले ही मलावरोधाने पीडित आहेत. – १५ टक्के मुले पोटदुखीची तक्रार करतात, त्यामागे जंक फूड, खाण्यात फायबरचा अभाव, पुरेसे पाणी न पिणे आणि मैदानी खेळाचा अभाव ही प्रमुख कारणे.

‘अति परिचयात् अवज्ञा’ हा अनुभव आपल्या पचन संस्थेच्या बाबतीतही येतो. आपण काहीही, कितीही, केव्हाही आणि कसेही खाल्ले तरी पचनसंस्था तिचे काम बिनबोभाट करतच असते याकडे आपले आदरयुक्त लक्ष कधीच जात नाही. उलट आपण तिच्यावर अनावश्यक ओझं लादतच असतो. या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधण्याकरता ऑस्ट्रेलियातील होबार्ट या शहरात एका म्युझियममध्ये (म्युझियम ऑफ ओल्ड अ‍ॅण्ड न्यू आर्ट) आपल्या पचनसंस्थेची एक प्रतिकृती काही वर्षांपूर्वी पाहिली. याला पूप मशीन (ढस्र् टूंँ्रल्ली) म्हणतात. संपूर्ण पचनसंस्थेचे कार्य दाखवणारे हे मॉडेल पारदर्शक काचेने बनवलेले आहे. बेल्जियन आर्टिस्ट विम डेलवॉश याने हे तयार केले आहे. यात काचेची हंडय़ांसारखी दिसणारी अनेक भांडी एका रांगेत टांगलेली आहेत व टय़ूबने (नळीने) ती एकमेकांशी जोडलेली आहेत. आपण अन्न खातो त्याप्रमाणे एका बाजूने एका ठरावीक वेळेला ठरावीक अन्नपदार्थ सोडले जातात. हे अन्न टय़ूब आणि हंडय़ांमधून पुढे पुढे सरकत जाते व आपल्या आत जसे पाचक रस स्रवले जातात तशाच प्रकारच्या रासायनिक क्रिया या मशीनमध्ये केल्या जातात. एका ठरावीक वेळी त्या अन्नपदार्थाचे रूपांतर मलामध्ये (पूप) होते व मलविसर्जनाची क्रिया एका टय़ूबमधून होऊन ते बाहेर पडते. ही प्रक्रिया, विशेषत: शेवटची, पाहण्यास बरीच गर्दी जमते. पाहताना जरी किळस वाटली तरी हे मशीन बऱ्याच जणांना अंतर्मुख करते, असेच काम आपल्या शरीरात सतत चालू आहे याची जाणीव करून देते.
पचन संस्थेच्या मलविसर्जनाप्रमाणेच त्वचेतून बाहेर पडणारा घाम, मूत्र, श्वसनसंस्थेद्वारे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड वायू यांच्याद्वारेही निरुपयोगी आणि घातक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. शरीराचे आणि परिणामी मनाचेही आरोग्य चांगले राहण्यासाठी या सर्वाची अत्यंत गरज आहे. कोणतेही अन्न तोंडात टाकण्याआधी क्षणभर डोळे मिटून ‘एक्झिट स्ट्रॅटेजीची माहिती आहे ना?’ हा प्रश्न स्वत:लाच विचारावा. त्यामुळे वाटेल ते आत जाणार नाही, याची नक्की खात्री आहे.
health.myright@gmail.com