गुढीपाडव्याला श्रीरामांची आठवण येते. ‘श्रीराम’ या नावाबरोबरच त्यांचे गुण, त्यांचा पराक्रम, त्यांची कर्तव्यनिष्ठा, त्यांच्या मनाचा समतोलपणा आठवतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांचा कोणताही एक गुण आपण अंगी बाणविण्याचा निश्चय आणि त्यानुसार प्रयत्न केला तर आपल्या आतच अ-युध्या (शांतता) का होणार नाही?

कालच गुढीपाडवा झाला. नवं शालिवाहन शक सुरू झालं. हा वर्षांरंभाचा सण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर किती तरी ठिकाणी उत्साहानं साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन झालेलं असल्याने झाडांनी, वाऱ्याच्या साहाय्याने स्वत:ला हलवून, अंगावरची जुनी, मलीन वस्त्रे पानगळतीच्या रूपात टाकलेली असतात आणि नवीन पालवीची मोहक वस्त्रे अंगाखांद्यावर धारण केलेली असतात. आसमंत आंब्याच्या मोहोराने आणि मोगऱ्याच्या सुगंधाने भरून आणि भारून गेलेला असतो. कोकिळेचे मधुर पाश्र्वगायन वातावरण अधिकच प्रसन्न करतं. अशा निसर्गनिर्मित सुंदर वातावरणात गुढी उभारून प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील पुनरागमनाचं स्वागत होणारच. श्रीराम जरी अयोध्येत परतले तरी रामराज्य हे सर्वानाच हवंहवंसं असल्याने गुढीपाडवा सर्वत्र आनंदात साजरा केला जातो.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”

गुढीपाडवा म्हटलं की मला माझं बालपण आठवतं. सर्वात प्रथम आठवण येते ती कडुिलब आणि गूळ यांच्या मिश्रणाची. सकाळी उठल्या-उठल्या प्रथम ते खावंच लागायचं. आमची तोंडं पाहण्यासारखी व्हायची. त्या वेळी एवढंच माहिती होतं की, आजच्या दिवशी खायचं (नव्हे नव्हे, खाऊन टाकायचं) असतं. मग आम्ही त्या मिश्रणातल्या कडुिलबाच्या वाटणाला अगदी हलकासा स्पर्श करायचो आणि गुळाचा खडा पट्कन खायचो. आईच्या हे लक्षात येताच तिने युक्ती योजली. कडुिलबाच्या पानात गुळाचा खडा गुंडाळून तिने आम्हाला ते कडू-गोड मिश्रण खायला लावलेच. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असायचे. परंतु प्रश्न विचारणे हा बालगुन्ह्य़ातला एक प्रमुख गुन्हा होता आणि एखाद्याने पण असं का? असं विचारल्यास त्याची किंवा तिची गणना ‘आगाऊ’ या विशेषणाने केली जायची. पण मोठं होताना (म्हणजे वय वाढताना) यामागची कारणं कळायला लागली. ती म्हणजे, (१) जीवन हे कडू-गोड अनुभवाचं मिश्रण असतं. त्याचा समत्व भावाने स्वीकार करायचा. (२) जवळ आलेला उन्हाळा बाधू नये म्हणून कडूिलब-गूळ खायचा, त्याचं पचनशक्तीशी नातं असतं वगरे वगरे. हे एवढं कडू-गोड खाणं सोडलं तर गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे मज्जाच मज्जा. शाळेला सुट्टी. आम्ही मुलांनी सकाळीच गुढी उभारण्याची तयारी करायची. ती जागा स्वच्छ करून पाट मांडणे, पाटाभोवती रांगोळी काढणे, गुढीकरता काठी पुसून तिच्यावर हळद-कुंकू लावणे ही कामे आमची. साखरेची, फुलांची माळ, कडुिलबाची डहाळी, रेशमी वस्त्र, गडू, हे सगळं बांधण्याकरता सुतळी, तसेच दुधाचा नवेद्य, उदबत्ती, निरांजन वगरे तयारी आईची. वडिलांनी शुचिर्भूत होऊन गुढी उभारायची. आजूबाजूचा सगळा रस्ता दुतर्फा वेगवेगळ्या रंगांच्या आणि उंचीच्या गुढय़ांनी सजलेला असायचा. इतकं प्रसन्न वाटायचं ना! दुपारी जेवायला श्रीखंड-पुरीचा बेत असायचा. श्रीखंड हा आतासारखा ‘केव्हाही’ खाण्याचा पदार्थ नसल्याने त्या दिवशी श्रीखंड-पुरीचा खऱ्या अर्थाने समाचार घेतला जायचा. संध्याकाळी परत एकदा दुधाचा नवेद्य दाखवून गुढी उतरवली जायची आणि गुढीपाडव्याचा सण साजरा व्हायचा.

कोणत्याच प्रकारची सक्ती नसतानाही आपण आपले सण का साजरे करतो? केवळ परंपरा म्हणून जर सण साजरे केले तर त्यातून वरवरचा आणि क्षणिक आनंद मिळू शकतो. उदाहरणार्थ काही नवीन वस्तू, कपडे खरेदी करणे, गोडधोड खायला करणे इत्यादी. परंतु सणाचं, विशेषत: गुढीपाडव्याचं मुख्य प्रयोजन याकरता नाही. कारण नवीन कपडे तसे केव्हाही आणू शकतो (आजकाल ऑनलाइन दुकानं बारा महिने चोवीस तास उघडी!) आणि गोड खाण्याचं म्हणावं तर हलवायाचं दुकान स्वयंपाकघरात फ्रीजमध्ये असतंच. असं असूनसुद्धा आपण गुढीपाडवा का साजरा करतो किंवा का साजरा करायला पाहिजे? याचं उत्तर आनंदाशी निगडित आहे. खरा आनंद काय असतो आणि तो कुठे असतो हे कळण्याचं सण हे एक निमित्त आहे. आपलं जीवन जरी बुद्धीप्रमाण असलं तरी ‘मला आनंद हवा’ ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती होती, आहे आणि राहणार. आनंदाचंही एक शास्त्र आहे, विज्ञान आहे. इथेही प्रयोग आहेत, निरीक्षणं आहेत आणि निष्कर्ष आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे हे सगळं आपल्या आत असतं. इथे प्रयोग (एक्स्परिमेंट)असतात. त्याचं रूपांतर अनुभवात (एक्स्पीरियन्समध्ये) होतं. हे अनुभवाचं शास्त्र आहे -सब्जेक्टिव्ह सायन्स आहे. आपणच प्रयोग करायचा आणि अनुभव घेऊन निष्कर्ष काढायचा. गुढीपाडव्यासारखे आपल्या संस्कृतीतले सण म्हणजे आपण हे प्रयोग करून पाहावेत म्हणून योजलेले ‘रिमाइंडर्स’, आठवण करून देणारे दिवस.

कसं ते आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरणावरून पाहू- घर बांधणाऱ्या, वीटकाम करणाऱ्या गवंडय़ाला आपण सर्व जण नेहमी पाहतो. एकावर एक वीट रचताना त्याला ओळंबा वापरावा लागतो. त्याच्या कर्मकांडातला तो एक प्रकारचा विधीच असतो म्हणा ना. परंतु त्या ओळंब्याच्या मागे अदृश्य गुरुत्वाकर्षण असते. तो ओळंबा हा पृथ्वीच्या मध्यिबदूकडे (जरी हा मध्यिबदू आपल्याला कधीच दिसत नाही तरी!) निर्देश करीत असतो. तसंच शंभर मजली इमारत किंवा एखादा मोठा पूल बांधताना त्यामागे अनेक गणिती सूत्रं काम करत असतात. त्या अदृश्य सूत्रांच्या आधारानेच ती इमारत किंवा तो पूल समतोलाने उभा असतो. अगदी तशीच भूमिका आपले सण बजावत असतात. त्यांच्या मागेही आनंदाची सूत्रे काम करत असतात.

आता गुढीपाडव्याचंच बघा ना. श्रीरामांची आठवण येते ना? ‘श्रीराम’ या नावाबरोबरच त्यांचे गुण, त्यांचा पराक्रम, त्यांची कर्तव्यनिष्ठा, त्यांच्या मनाचा समतोलपणा आठवतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांचा कोणताही एक गुण आपण अंगी बाणविण्याचा निश्चय आणि त्यानुसार प्रयत्न केला तर आपल्या आतच अ-युध्या (शांतता) का होणार नाही? तसेच लक्ष्मण (कर्तव्यदक्षता), भरत (प्रेम ) यांसारख्या वृत्ती आपोआपच मनात उमटतील. ही सगळी आपल्या जीवनाशी, आनंदाशी निगडित रोल मॉडेल्स आहेत. जीवनाचा पाया स्थिर राहण्यासाठी वापरायचे हे एक प्रकारचे ओळंबे आहेत. जीवन समतोल राखणाऱ्या या ‘स्पिरिट लेव्हल्स’ आहेत.

या सब्जेक्टिव्ह सायन्समध्ये विज्ञान शास्त्राप्रमाणे सिम्बॉलिझम (प्रतीके) वापरली आहेत. उदाहरणार्थ अ-युध्याचा सम्राट आहे दश-रथ. म्हणजे ज्याची दश इंद्रिये (पंच कर्मेद्रिये आणि पंच ज्ञानेंद्रिये) ही त्याच्या ताब्यात आहेत. आपल्या दहा इंद्रियांवर जर आपली सत्ता चालली तर आपणही आपल्या आतल्या विश्वाचे सम्राटच होऊ. याउलट रावण म्हणजे दश-मुख, दहाही इंद्रियांनी बाहेर जाणारा. म्हणून शक्तिशाली आणि विद्वान असूनही नेहमी अस्वस्थ असणारा. प्रतीकावरून आठवण झाली. लहान मुलांना गणित शिकवताना आपण पहिल्यांदा कोणत्या तरी वस्तूंच्या आधाराने (किंवा काहीच जवळ नसेल तर हाताच्या बोटांच्या आधाराने) मोजणी, बेरीज, वजाबाकी वगरे संकल्पना शिकवतो. संख्या ही सूक्ष्म संकल्पना सुरुवातीला डोळ्यांना काही तरी स्थूल वस्तू दाखवून सांगितली जाते. परंतु एकदा डोक्यात ‘प्रकाश’ पडला की प्रत्येक वेळी वस्तू समोर असलीच पाहिजे या बंधनातून ते मूल मुक्त होते. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला रामायणाचा खरा अर्थ ‘समजला’ (नुसती कथा नव्हे) तर आपल्या मनाच्या वृत्ती, ज्या नेहमी बाहेर धावत असतात आणि मनाला अशांत करत असतात, त्यावर विजय मिळवता येईल. त्या आतमध्ये वळवता आल्या तर आपल्या आत आनंदाची गुढी उभी राहील.

लेखाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की, निसर्गात वर्षांच्या शेवटी वृक्ष वेलींची जुनी पाने गळून पडतात आणि चत्रात नवी पालवी फुटते. ही सर्व तयारी येणाऱ्या ग्रीष्म ऋतुमध्ये सावली देण्याकरता असते. आपणही निसर्गाचा भागच आहोत. आपलं शरीर हे जरी एक यंत्र असलं तरी ते निर्जीव नाही. शरीराच्या आत सतत अनेक प्रक्रिया चालू असतात. जुन्या पेशी जाऊन त्यांच्या जागी नव्या पेशी येत असतात. आपल्याला ते जाणवत नाही इतकेच. शरीराप्रमाणे मन आणि बुद्धीतून नको असलेल्या कल्पना, विचार आणि आठवणी गळून गेल्या तर नवीन विचारांची, नव्या कल्पनांची, उमेदीची पालवी फुटू शकेल व येणाऱ्या नवीन वर्षांकरता, आनंदाकरता आपण तयार होऊ शकू.
आपल्याला माहिती आहे की शारीरिक आरोग्यासाठी पौष्टिक अन्नाची, व्यायामाची आणि झोपेची गरज असते. तशीच विश्रांतीचीही गरज असते. म्हणूनच आपण रोजच्या झोपेव्यतिरिक्त आपल्या नेहमीच्या व्यापातून वार्षकि सुट्टी घेतो. पण अशी सुट्टी दर महिन्याला किंवा वारंवार घेता येत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या या गरजेची जाण आहे. आपल्या सणांची योजना याच कारणांकरता केली गेली आहे. कुठेही बाहेर जायला नको, खूप प्लािनग करायला नको किंवा पसे खर्च करायला नको. कारण सणांना उत्सवाचं रूप दिलं गेलं आहे. त्यात सर्वाना एकत्र येण्याची, भेटण्याची व आनंद साजरा करण्याची संधी तर दिली आहेच शिवाय निसर्गाशी आणि त्याही पुढे जाऊन आध्यात्मिक शांतीशीही नातं जोडण्याशी संधी दिली आहे. त्यामुळे केवळ एक दिवसाची सुट्टी, गोडधोड खाणे किंवा शॉिपगची संधी (दुकानदार प्रत्येक सणाचे रूपांतर ‘सेल’ करतात. त्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही.) एवढय़ातच सणाला बंदिस्त केलं तर त्या दिवसात आणि इतर दिवसांत काय फरक राहिला?

शरीर हे यंत्र तर आहेच, पण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ते एक मंदिर आहे अशी कल्पना करून दरवर्षी गुढीपाडव्याची संधी साधून त्यामध्ये श्रीरामांना राहायचे आमंत्रण देऊ या. त्याकरता मनमंदिर स्वच्छ करू या आणि मग त्यांच्या आगमनाची, आनंदाची गुढी उभारू या व म्हणू या, ‘विजय पताका श्रीरामांची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी.’

– अंजली श्रोत्रिय