लेटेस्ट म्हणजेच आधुनिकता अशी जणू आधुनिकतेची व्याख्याच झाली आहे. खाण्यापिण्याचे पदार्थ, कपडे या सर्वामध्ये ‘लेटेस्ट’ असणं म्हणजे ‘कूल’ असणं झालंय; पण.. प्रत्यक्षात रस्त्यावर नवीनच पाटय़ा दिसत आहेत? रक्तदाब.. २ वर्षे पुढे, कोलेस्टेरॉल.. ३ वर्षे पुढे, डायबेटीसचा टोलनाका ५ वर्षे पुढे, टर्न लेफ्ट फॉर आयसीयू, टर्न राइट फॉर सीसीयू, गो अहेड फॉर हेल्थ इन्शुरन्स.. आनंद शून्य किमीवर आणायचा असेल तर?

प्रत्येक वर्तमानाला भूतकाळ आणि भविष्यकाळ जोडलेला असतो. सुधारणा किंवा आधुनिकता हे प्रत्येक वर्तमानाचं वैशिष्टय़ असतं. एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना शिक्षण घेण्यास अलिखित बंदी होती; परंतु महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे यांसारख्या समाजसुधारकांच्या प्रयत्नाने ही पद्धत भूतकाळात गेली व स्त्रिया शिक्षण घेऊ  लागल्या. तसेच विसाव्या शतकात स्त्रियांचे सोवळे-ओवळे भूतकाळ बनले व स्त्रिया समाजात पुरुषांच्या बरोबरीने दिसू लागल्या; परंतु कोणत्याही पद्धतीचा भूतकाळात समावेश होऊन त्याची जागा आधुनिकतेने घेण्यात बराच कालावधी जात असे. त्या वेळी जनरेशन गॅप वा पिढीतील अंतर ही वर्षांच्या हिशेबात मोठे असे. घरामध्ये पाच-सहा मुले असतील तर मोठय़ा व धाकटय़ा भावंडांमध्ये सहज पंधरा-वीस वर्षांचे अंतर असे आणि तरीही ही सर्व भावंडे एकाच पिढीची मानली जायची; परंतु गेल्या पन्नास वर्षांत आधुनिकतेच्या वेगामध्ये बरीच वाढ झाली. गोष्टी भराभर भूतकाळात जाऊ  लागल्या. पाच वर्षे ही जनरेशन गॅपची व्याख्या झाली आहे. सध्या संगणक क्षेत्रात तर तीसच्या पुढे वय असणं म्हणजे ‘वय झालंय’ असं वाटू लागलंय.

लेटेस्ट म्हणजेच आधुनिकता अशी जणू आधुनिकतेची व्याख्याच झाली आहे. खाण्यापिण्याचे पदार्थ, कपडे या सर्वामध्ये ‘लेटेस्ट’ असणं म्हणजे ‘कूल’ असणं झालंय. पाश्चिमात्य देशाचं बाह्य़ अनुकरण करणं म्हणजे ‘सोशल अ‍ॅक्सेप्टन्स’ हे ब्रीदवाक्य झालंय. लेटेस्ट मोबाइल फोन, त्यावरचे वेगवेगळे अ‍ॅप्स वापरणं, फेसबुक, ट्विटरवर सतत पडीक असणे हे जणू आधुनिकतेचं व्यक्त स्वरूप झालंय; पण गंमत म्हणजे काही बाबतीत भूतकाळ पुन्हा वर्तमानाचं रूप घेऊन येतोय असं दिसतंय. दर वीस वर्षांनी फॅशन री-सायकल होते असं म्हणतात. सत्तरच्या दशकात (नैसर्गिक) कॉटन वापरणं हे तरुणांमध्ये मागासलेपणाचं किंवा आर्थिक गरिबीचं लक्षण समजले जात असे. त्याऐवजी टेरेलीनसारखे सिंथेटिक कपडे वापरणे म्हणजे ‘यूथ’ असण्याचं लक्षण होतं; पण आता चित्र उलटं झालंय. कॉटन हे किंग झालंय. पूर्वी खेडेगावातून गरीब माणसं शहराकडे श्रीमंत होण्याकरिता येत. आता शहरातली अति श्रीमंत माणसं खेडय़ात जाऊन शेतात घर बांधत आहेत. खेडेगावात घर (फार्म हाऊस) असणं, तिथे महागडय़ा गाडीतून उतरून चुलीवरचं पिठलं खाणं.. वाऽऽऽ क्या बात है! आमच्या लहानपणी कोणी अमेरिकेला गेला तर वर्तमानपत्रात बातमी व फोटो छापून येत असे, पण आता अमेरिकेतून भारतात परत येणाऱ्यांचं कौतुक आणि स्वागत होत आहे.

मग प्रश्न पडतो, आपल्याला नक्की काय हवंय? पुढे जायचंय की मागे? एकाच वेळी नदीच्या या काठावर आणि त्याही काठावर बसता येत नाही. नावीन्याच्या हौसेपोटी आपण सारखे पुढे-मागे करतो ते आपल्याला एका जागी स्वस्थ बसता येत नाही म्हणून. प्रवासात, बदलात गंमत आहे यात शंकाच नाही; पण एकाच जागी काही काळ शांत बसण्यातही आनंद असू शकतो हे आपल्याला पटतच नाही. आयुष्य हे जसजसे फास्ट लेनमध्ये प्रवास करू लागले तसतशी एक्साइटमेन्ट वाढली हे खरं; पण वेगाबरोबर धोकाही वाढतो. (हायवेवर नेहमी दिसणारी सूचना ‘स्पीड थ्रिल्स, स्पीड किल्स’!). आपल्याला लहानपणी शाळेत असताना गणितात ‘काळ-काम-वेग’ नावाचा प्रकार असे. म्हणजे कामाचा वेग वाढला तर तेच काम कमी वेळात होते असा नियम आपण शिकलो. तर मग आयुष्याचं काम जर आनंद, शांतता, समाधान मिळवणे हे असेल तर लाइफ फास्ट झाल्यावर हे काम कमी वेळातच व्हायला हवे, पण तसं होताना दिसत नाही. आयुष्याच्या गाडीचा स्पीड वाढलाय की नुसताच इंजिनातून आवाज आणि एक्झॉस्टमधून धूर येतोय – स्ट्रेस आणि लाइफस्टाइलच्या आजारांचा? म्हणजे आयुष्याची गाडी फास्ट लेनमधून जातेय असं वाटतं, पण.. पण.. प्रत्यक्षात रस्त्यावर या काय नवीनच पाटय़ा दिसत आहेत? ..रक्तदाब.. २ वर्षे पुढे, कोलेस्टेरॉल.. ३ वर्षे पुढे, डायबेटीसचा टोलनाका ५ वर्षे पुढे, टर्न लेफ्ट फॉर आयसीयू, टर्न राइट फॉर सीसीयू, गो अहेड फॉर हेल्थ इन्शुरन्स.. बाप रे! या सर्वामधून आरोग्य, शांती, समाधान यांचं एक्झिट कुठेच दिसत नाहीये.

खरंच आधुनिकता इतकी नकारात्मक आहे का? आपण आधुनिकतेचा अर्थ काय लावतो त्यावर ते अवलंबून आहे. आधुनिकतेमध्ये बदल अंतर्भूत आहेच. कोणताही बदल स्थळ आणि काळ सापेक्ष असतो. काळ सतत पुढेच जात असतो. तो थांबविण्याचं किंवा मागे नेण्याचं सामथ्र्य मानवात नाही. काळाबरोबर जाणेच श्रेयस्कर असते. बदलाची गंमत अशी आहे की, काही तरी स्थिर असेल तरच काही तरी बदलत आहे अशी जाणीव होते. (उदाहरणार्थ, नदीकाठावर आपण स्थिर उभे असू तरच पाणी वाहात आहे असे जाणवते.) आज गोष्टी बदलल्या आहेत असं जेव्हा आपण म्हणतो ते भूतकाळाशी (जो स्थिर असतो) तुलना करूनच म्हणतो. काळाबरोबर सर्वच गोष्टी बदलतात असं नाही. ज्या गोष्टी सत्य असतात त्या स्थळ-काळ निरपेक्ष असतात. उदाहरणार्थ, अडीच हजार वर्षांपूर्वीचा पायथागोरसचा सिद्धांत आजही आणि जगातल्या सर्व देशांत तसाच ‘आधुनिक’ आहे आणि तो तसाच वापरतात. समता, स्वातंत्र्य ही मानवी मूल्यंही महत्त्वाची आहेत म्हणून आपल्या देशाच्या घटनेत कितीही दुरुस्त्या झाल्या तरी समता, स्वातंत्र्य या गोष्टी तशाच (आधुनिक) राहतात. रामायणाची कथा हजारो वर्षांपूर्वीची. आजही ती आपल्याला तितकीच आवडते. आजही ती तितकीच समर्पक वाटते, कारण भरतासारखा भाऊ, श्रीरामांसारखा पती, हनुमानासारखा सेवक-सखा आजही एकविसाव्या शतकात हवा आहे. आधुनिकतेच्या कसोटीवर ही मूल्ये आजही आधुनिकच आहेत. म्हणून आधुनिकता ही केवळ काळाच्या निकषावर ठरवता येत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे काळाबरोबर ज्या गोष्टी बदलतात त्या सर्व सारख्याच वेगाने बदलत नाहीत. ज्या स्थूल, वरवरच्या आणि शरीराशी संबंधित असतात अशा गोष्टी जलद वेगाने बदलताना दिसतात. उदाहरणार्थ आपले कपडे, हेअर स्टाइल किंवा वाक्प्रचार इत्यादी; पण सूक्ष्म आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्या आहारातील पोषक पदार्थाची गरज कुठे बदलली आहे? आजही आपल्याला प्रथिने, कबरेदके, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे हेच शरीर संवर्धनासाठी लागतात. तहान भागवायला हजारो वर्षे आपण पाणीच पीत आलो आहोत. त्यात बदल नाही. शरीरापेक्षाही सूक्ष्म असणारी मन-बुद्धी आणि त्यांनी स्वीकारलेली मूल्यं – ती सहसा बदलू शकत नाहीत; पण त्यांची अभिव्यक्ती, आचार हे मात्र कालानुरूप बदलतात. नव्हे, बदलावे लागतात. नाही तर फक्त कर्मठपणा किंवा पोकळ कर्मकांड मात्र शिल्लक राहतं. त्यापासून किती भयानक किंवा हास्यास्पद प्रकार घडताना दिसतात ते आपण पाहतोच.

तेव्हा आधुनिकतेचा विचार करताना तो होलिस्टिक (समग्र) पाहिजे. आपण जर चंचल मनाच्या मर्जीप्रमाणे वागू तर केवळ नावीन्य म्हणजे आधुनिकता इतकीच त्याची व्याप्ती राहील आणि ती फक्त बाह्य़ आचरणातूनच व्यक्त होईल, पण आधुनिकता ही विचाराच्या किंवा विवेकाच्या पायावर उभी असेल तर केवळ बदल म्हणजे आधुनिकता अशी फसगत होणार नाही. मी तरुण आहे म्हणजे मी आपोआपच आधुनिक असते अशी जर समजूत करून घेतली तर लॉजिकप्रमाणे माझे आई-वडील किंवा इतर वडीलधारी माणसं ही ‘जुनी’ म्हणून कालबाह्य़ अशी सोयीस्कर समजूत करून घेतली जाते. मग त्यांच्याशी संवाद म्हणजे दहा वर्षांपूर्वीचा मोबाइल वापरल्यासारखं वाटतं, म्हणजे नकोसा वाटतो. आधुनिकता ठरविण्याचा हा एकांगी विचार नाही का?

आधुनिकता जर नीट समजून घेतली व नीट वापरली तर ती आयुष्य समृद्ध करते यात शंकाच नाही. आजचं स्वयंपाकघर पूर्वीपेक्षा किती तरी आधुनिक झालं आहे. स्त्रीच्या आयुष्याचं ‘चूल आणि मूल’ हे मॉडेल त्यामुळे भूतकाळात जाऊ  शकलं. चुलीवरून आठवलं, पूर्वी धान्याचं पीठ करायला दगडी जातं वापरली जायची. त्या जात्यामध्ये धान्य दळताना जात्याची खालची तळी स्थिर असेल तरच वरची तळी खुंटय़ाला धरून फिरविल्यावर जात्यातून पीठ येऊ  शकेल. आपली जगण्याची मूल्यं आणि त्यानुसार निर्णय घेणारी बुद्धी ही जात्याच्या खालच्या तळीप्रमाणे स्थिर असेल आणि काळाबरोबर आपली बाह्य़ वर्तणूक वरच्या तळीप्रमाणे फिरत राहील तर तणावरहित आनंदाचे पीठ बाहेर पडू शकेल. अश्मयुगातील माणूस गुहेत बसून चिंता करत होता. आम्ही आधुनिक माणसे ए.सी. रूममध्ये सोफ्यावर बसून चिंताच करत असू, तर मग आपण कोणत्या बाबतीत आधुनिक म्हणायचे?

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे जसं आपण मान्य करतो, तसंच केवळ बदल किंवा नावीन्य म्हणजे आधुनिकता नव्हे हे आपण लक्षात घ्यायला हवं. जीवनाची उंची जे वाढवेल ते आधुनिक. त्याकरिता दूरदृष्टी (व्हिजन) आवश्यक आहे.

‘देह देवाचे मंदिर’ हे ध्येय जरी लांब असलं तरी निदान लाइफस्टाइलच्या नावावर देह रोगाचे घर तरी होऊ  नये. विचारांची आधुनिकता असेल तर आचाराची आधुनिकता दुधात साखरच टाकेल. असा सर्वागीण समतोल असल्यावर ‘आनंद .0 (शून्य) कि.मी.’ ही पाटी फार लांब नाही.

अंजली श्रोत्रिय

health.myright@gmail.com